5 मे 2017 मध्ये मी बंगलूरू ला एक ट्रेनिंग वर्कशॉप घेत होतो, शुक्रवार होता, दुपारचा ३:३० चा टी ब्रेक नंतर माझे लेक्चर पुढे सुरू झाले खरे पण समोरचे विद्यार्थी (सगळे एका जात 35 – 40 चे बाप्पे होते हा भाग वेगळा) एकजात ढेपाळले होते, म्हणजे माझ्या शिकवण्याला कंटाळले होते अशातला भाग नव्हता, उद्याचा विकेंड त्यांना खुणावत होता, साऱ्यांना त्याचे वेध लागले होते. अशा परिस्थितीत पुढे शिकवत राहणे व्यर्थ आहे हे मला समजले होते पण ठरलेल्या वेळेच्या आधी म्हणजे ५:३० वाजल्या शिवाय क्लास सोडणे कंपनीला रुचले नसते, असा क्लास वेळे आधीच सोडला असता तर माझ्या पेमेंट मध्ये अडचण आली असती, तेव्हा काहीही करून ५:३० पर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसवून (डांबवून!) ठेवणे भाग होत. मी विद्यार्थांना ही अडचण सांगितली, ठीक आहे, अभ्यास नको पण मग 5:30 वर्गात बसायचे असेल तर आपण दुसर्या, नॉन टेक्निकल विषयांवर बोलू असे ‘एकमताने’ ठरले!
समोर काही विद्यार्थी ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते! त्यातल्या श्रीनिवासनला मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे हे माहिती होते, त्याने विषय काढला आणि ज्योतिषशास्त्रा वरती काही माहिती विचारली मी यथाशक्ती उत्तर दिले, मग काय एका पाठोपाठ प्रश्न आणि त्याला माझी उत्तरे सुरू झाली. समोर एक खवचट, कुटाळ , टिपिकल अंधश्रद्धा निर्मूलन वाला विद्यार्थी होता, त्याने काही वेळ हे सारे ऐकले मग त्याला राहावले नसावे, त्याने विरोधी सूर लावायला सुरवात केली, ज्योतिष हे थोतांड आहे, भाकड आहे, काहीतरी थातुरमातूर सांगून लोकांकडून पैसा लुबाडण्याचा मार्ग आहे इत्यादी इत्यादी.
मी त्याच्या कडे जरासे रोखून बघितले, आणि म्हणालो..
“असे काही नाही, आपण कदाचित एखाद्या कुडमुड्या ज्योतिषा चा अनुभव घेतला असणार, एका अभ्यासू . जाणकार ज्योतिषा कडे जा, चांगला अनुभव येईल”
“तुम्ही स्वत:ला अभ्यासू ज्योतिषी समजता का? “
त्याचा खवचटपणा माझ्या लक्षात आला. अशा लोकांना कसे हाताळायचे हे मला चांगले अवगत आहे! मी शांतपणे म्हणालो..
“माझा अभ्यास आहे, पण मी अभ्यासू आहे की नाही हे इतरांनी ठरवायचे असते, मीच स्वत:ला अभ्यासू कसा काय म्हणवून घेऊ? “
“आपण अभ्यास केला म्हणता पण मी ते का मानायचे, दिखाव कुछ चमत्कार तो माने “
पठ्ठ्याने चक्क आव्हानच दिले!
मी पुन्हा एकदा त्याच्या कडे रोखून पाहिले आणि लॅपटॉप वर ‘त्या’ क्षणाची पत्रिका बनवली, जी तुम्ही या पोष्ट मध्ये पहात आहात.
ज्योतिषाची आणि जातकाची जेव्हा नजरानजर होते त्या क्षणाच्या पत्रिकेला ‘कन्सलटेशन चार्ट’ म्हणतात , हा एक ‘होरारी’ चार्टच असतो फक्त जातकाचा नेमका प्रश्न जाणून घ्यायच्या आधीच बनवला जातो. त्यातून जातकाच्या मनात नेमके काय आहे, जातक सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे, नजीकच्या भूतकाळात जातकाच्या आयुष्यात काही घडले आहे का, अशा अनेक बाबींचा खुलासा या ‘कन्सलटेशन चार्ट’ च्या माध्यमातून होऊ शकतो. (या बद्दल बरीच माहिती माझ्या ब्लॉग वरच्या केस स्टडीज मध्ये सापडेल www. suhasgokhale.com)

मी त्या चार्ट कडे नीट बघितले, क्षणभर विचार केला आणि म्हणालो.
“तुम्ही आत्ता या क्षणाला तुमच्या मनात एका आर्थिक गुंतवणुकी बाबत विचार असण्याची मोठी शक्यता आहे , त्या गुंतवणुकी संदर्भात एक फार मोठा वैचारिक गोंधळ तुमच्या मनात चालू आहे, बरोबर?”
कुटाळ एकदम थबकला, त्याचा सारा आवेश क्षणात ओसरला, चेहर्यावरचे भाव बदलले, एक भुताटकी पाहील्या सारखा चेहरा झाला होता त्याचा..
“सर, काय सांगताय काय! नेमके हेच चालू आहे सध्या, आपला शब्द न शब्द खरा आहे. येस, मी एका आर्थिक गुंतवणुकी बद्दल बराच विचार करतो आहे. ”
“हो ना, आता ऐका मी काय सांगतो ते, ही आर्थिक गुंतवणुक करण्या पूर्वी नीट माहिती घ्या, खोलात जाऊन चौकशी करा कारण ही गुंतवणूक एक डिजास्टर ठरेल, सुसाईडल ठरेल! तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तेव्हा काळजी घ्या”
“हे तुम्हाला त्या चार्ट मध्ये दिसले ? आश्चर्य आहे, पण कसे काय?”
“मला दिसले कारण ‘माय चाइल्ड’, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलाय”
पुढे सुमारे चार महिन्यांनी त्या कुटाळाने (तोच तो अंधश्रद्धा निर्मूलन वाला!) फोन केला ….
“सर, मी चुकलो, मी तुमची माफी मागतो, तुमची योग्यता तेव्हा माझ्या लक्षात आली नाही, आपण मला आर्थिक गुंतवणुकी बद्दल सावध केले होते पण मी आपल्या बोलण्याला काहीसे हसण्या वारी नेले, बोला फुलाला गाठ पडली असावी असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले पण आपण बोलला होता ‘डिजास्टर’ ते शब्दश: खरे ठरले आहे , मी गुंतवणूक केली आणि ती व्यक्ती पैसे घेऊन परागंदा झाली, तब्बल 20 लाखाचा फटका बसला. आता मला सांगाल का की हे पैसे परत मिळतील का? प्लीज?”
आता, मी हे कसे काय सांगीतले होते? आपल्याला कल्पना येण्यासाठी काही ठळक मुद्दे आपल्या समोर ठेवतो ….
त्या क्षणाच्या पत्रिकेत चंद्र (जातक) आणि नेपच्यून चा अगदी पूर्ण अंशात्मक प्रतियोग 11 आणि 5 व्या भावातून होता , जो मोठा वैचारिक गोंधळ/ भूल/ फसवणूक दाखवतो, लाभ (11) म्हणजे प्राप्ती आणि पंचम भाव (5) म्हणजे स्पेक्युलेटिव्ह गुंतवणूक, त्यामुळे जातकाच्या मनात आर्थिक गुंतवणुकी बाबत काही वैचारिक गोंधळ / भ्रम असेल असा तर्क मी केला. अर्थात 11 आणि 5 वरुन इतरही काही बोध होतो उदा: संतती, प्रेमप्रकरण इ. पण जातकाचे वय पाहता ‘आर्थिक’ विषयच असावा असे मला प्रकर्षाने वाटले. पुढे पाहिले तर दिसले की, जातकाच्या पैशाचा प्रतिनिधी मंगळ अष्टमात आहे जो आर्थिक हानी दाखवतो, गुरु जो जातकाचे प्रतिनिधित्व करतो तो तृतीय भावाचा (करार मदार, बोलणी, वाटाघाटी) आणि तो अष्टमातल्या (नुकसान, डिजास्टर) रवी शी षडाष्टकात आहे आणि हा योग पूर्ण अंशात्मक आहे! रवी हा लाभ स्थानाचा भावेश असल्याने फटका बसणार आणि तोही आर्थिक बाबतीत, लाभाच्या बाबतीत. चंद्र (जातक) लगेचच ‘व्यय’ भावात प्रवेश करत आहे ही एक खास नोंद.
या भाकिताला पुष्टि देणारे इतरही पॉइंटर्स या पत्रिकेत आहेत विस्तार भयास्तव सगळे लिहित बसत नाही. (याची एक छान केस स्टडी होऊ शकते, बघू वेळ मिळाला तर…)
या सगळ्यांचा साकल्याने विचार करून (हा विचार फक्त मिनिट भर केला होता!) मी जातकाला त्याच्या मनात काय आहे ते सांगीतले आणि ‘जपून जपून चाल पुढे धोका आहे” असा सल्ला दिला होता, जातकाने माझा हा अनाहूत सल्ला मानला नाही आणि स्वतःचे मोठे आर्थिक नुकसान करून घेतले.
असो,
सध्या ज्योतिषाच्या सल्ल्या शिवाय या कुटाळ महाशयांचे पान ही हलत नाही असे ऐकतो!
—————