होरारी मध्ये कालनिर्णय हा भाग फारसा महत्त्वाचा नसतो, याचे एक कारण म्हणजे ‘होरारी’ तंत्र अत्यंत तळमळीच्या प्रश्ना साठीच वापरायचे असते, ज्याच्या बाबतीत अगदी काळजाला घोर लागला असेच प्रश्न शक्यतो विचारले जावेत आणि अशा प्रश्नाचे केवळ “हो/ नाही’ असे उत्तर मिळणे अपेक्षित असावे किंवा तसा हेतू असावा. बाकीचे तपशील जसे की ‘केव्हा/ कसे / किती’ ‘ हे काहीसे ‘बाय प्रॉडक्ट’ समजावे या मताचा मी आहे, होरारी च्या साह्याने असे तपशील मिळवता येत नाहीत असे नाही पण त्याला काही स्वाभाविक मर्यादा आहेत. ‘हो/नाही’ हे उत्तर जितके स्पष्टपणे (candid) मिळू शकते तितका कालनिर्णयाचा/ तपशिलाचा भाग असेलच असे नाही. याचा अर्थ ‘होरारी’ मध्ये कालनिर्णय करताचा येत नाही किंवा कालनिर्णय करूच नये असा होत नाही, कालनिर्णय / तपशील या बाबतीत फार मोठ्या अपेक्षा ठेऊ नयेत इतकेच.
ही झाली शास्त्राची मर्यादा पण जातकाला त्याचे काय? त्याला तर ‘हो/ नाही ‘ च्या पलीकडे जाऊन अगदी ‘दिवस – तास – मिनिटे – सेकंदाच्या’ भाषेत कालनिर्णय हवा असतो त्याला काय करणार? त्यामुळे काहीशा नाखुशीने का होईना कालनिर्णयाचा प्रयत्न हा करावाच लागतो. मात्र काही वेळेला एखादा ‘होरारी चार्ट’ इतका रॅडिकल असतो की अगदी अचूक कालनिर्णय करणे शक्य होते.
अजिंक्य च्या ‘केस’ बाबत असे झाले होते, त्या केस मध्ये माझा कालनिर्णय कल्पनेच्या बाहेर अचूक ठरला होता !
त्याचे असे झाले….
मागच्या नोकरीतून ले ऑफ मिळाला त्याला चार महिने झाले तरी अजिंक्य बेकार बसला होता, दरम्यान त्याने बरेच इंटरव्हू दिले होते देखील पण कुठेच काही क्लिक झाले नाही, गेल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी च्या सुरवातीलाच त्याने एक जॉब इंटरव्हू दिला होता, इंटरव्हू तसा चांगला झाला होता, ही नोकरी नक्की मिळेल अशी अजिंक्यला आशा होती, पण इंटरव्हू दिला त्याला आता दिड महिना झाला तरी काहीच कळले नाही, अत्यंत निराश अवस्थेत तो माझ्या कडे आला होता.
अजिंक्यचा प्रश्न होता: “ही नोकरी मला मिळेल का?”
अजिंक्यचा प्रश्न मला जेव्हा पूर्णपणे समजला त्या क्षणाची पत्रिका तयार केली ती खाली दिली आहे.

पत्रिकेत कन्या लग्न आहे, लग्नेश ‘बुध’ अजिंक्यचे प्रतिनिधित्व करेल. चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो, लग्नात केतू आहे पण छाया ग्रहांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही. म्हणजे ‘बुध’ आणि ‘चंद्र’ अजिंक्य चे प्रतिनिधित्व करतील.
नोकरी दशम ( १० ) स्थानावरून पाहिली जाते, दशमावर बुधाची मिथुन रास आहे, दशमात ‘गुरु’ आहे. दशमेश बुध अजिंक्यचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याचा विचार करता येणार नाही त्यामुळे दशमातल्या ‘गुरु’ ला नोकरीचा प्रतिनिधी मानू.
आता, अजिंक्यला ही नोकरी मिळणार असेल तर अजिंक्य चे प्रतिनिधी आणि नोकरीचे प्रतिनिधी यामध्ये योग व्हायला हवेत.
बुध (अजिंक्य) आणि गुरु (नोकरी) यांच्यात अवघ्या ३१ आर्क मिनिटात केंद्रयोग होत आहे, तर चंद्र ( अजिंक्य) आणि गुरु (नोकरी) यांच्यातही ११ अंशात प्रतियोग होत आहे.
याचा अर्थ अजिंक्यला नोकरी मिळणार.
पण केव्हा?
सामान्यत: कालनिर्णया साठी चंद्र वापरला जातो, चंद्राला गुरु शी योग करायला ११ अंश प्रवास करायला लागेल, एफेमेरीज च्या हिशेबाने अवघा १ दिवस म्हणजे उद्याच अजिंक्यला नोकरी मिळाल्याची बातमी ( इमेल/ फोन कॉल) मिळू शकते.
जर टाईम स्केल चा विचार केला तर ११ तास, ११ दिवस, ११ आठवडे, ११ महिने असे स्केल मिळते, ११ महिने वगळता बाकीची शक्यता ( ११ तास… ११ आठवडे) असू शकते कारण काही वेळा नोकरी साठी मुलाखत दिल्यानंतर ऑफर मिळायला २-३ महीने सुद्धा लागू शकतात!
मग आता नेमका कालनिर्णय कसा करायचा?
इथे मी पत्रिकेत आणखी काही धागेदोरे मिळतात ते तपासले.
आता नोकरी हा एक प्रकाराचा करारच असतो तो ‘अपॉइंटमेंट लेटर’ च्या माध्यमातून केला जातो, सर्व प्रकाराचे करार (लेखी/ तोंडी) हे तृतीय (३ ) स्थानावरून पाहतात, तृतीय स्थानावर मंगळाची वृश्चिक रास आहे, तृतीयेत चंद्र आहे पण तो जातकाचा प्रतिनिधी आहे त्यामुळे एकटा तृतीयेश मंगळ कराराचे प्रतिनिधित्व करेल, मंगळ लाभात १७ अंशावर आहे, बुध (अजिंक्य) आणि मंगळ (करार) यांच्यात ६ अंशात नव-पंचम होत आहे त्याचा बरोबर चंद्र (अजिंक्य ) आणि ‘पार्ट ऑफ फॉर्च्युन’ यांच्यातही नेमका ६ अंशातच युती योग होत आहे.
हे माझ्या साठी एक आश्चर्यच होते. या दोन योगांनी ‘अजिंक्यला ही नोकरी मिळणार’ या माझ्या अनुमानाला बळकटी तर दिलीच शिवाय कालनिर्णयाचा तिढा ही सोडवला.
या साऱ्यांचा विचार करता मी असा निष्कर्ष काढला:
प्रश्न विचारल्याच्या ६ दिवसांत म्हणजे २६ फेब्रुवारीच्या आत बाहेर अजिंक्य ला ‘ऑफर लेटर/ अपॉइंटमेंट लेटर’ मिळेल, अजिंक्य ही ऑफर स्वीकारेल आणि लगेचच म्हणजे सोमवार, ३ मार्चला नोकरीत जॉईन होईल!
हे प्रश्न विचारल्याच्या ६ दिवसांत कारण चंद्र (अजिंक्य) आणि ‘पार्ट ऑफ फॉर्च्युन’ आणि बुध (अजिंक्य) आणि मंगळ (करार) हे दोन्ही योग ६ अंशातच होत आहेत.
ऑफर बुधवार – गुरूवार येणार, त्यानंतर वीक एंड ( १ व २ मार्च शनिवार – रविवार) असल्याने अजिंक्यला लौकरात लौकर म्हणजे सोमवार, ३ मार्चला जॉईन होता होईल.
प्रश्न विचारल्याच्या बरोबर ११ दिवसांनी ही घटना घडेल,कारण चंद्र ( अजिंक्य) आणि गुरु (नोकरी) हा योग ही ११ अंशातच होत आहे.
अजिंक्यने किलोभर पेढे समोर ठेवत बातमी दिली तेव्हा माझा माझ्या वरच विश्वास बसला नाही, कारण मी भाकीत केले होते अगदी त्या बरहुकूम सारे घडले होते.
बरोबर २६ तारखेलाच अजिंक्यला जॉब ऑफर मिळाली आणि ३ मार्चला सोमवारी अजिंक्य या नव्या नोकरीत रुजू झाला.
या केस मध्ये मी केलेला कालनिर्णय कल्पनेच्या बाहेर अचूक ठरला!
+++
