“अमित ३२ वर्षाचा, म्हणजे गेली पाच एक वर्षे तरी स्थळे बघत असाल नाही का?”
“तर हो, ‘अनुरुप’ मध्ये नाव गेली पाच वर्षे आहे, इतरही चार – पाच ठिकाणी नाव नोंदवले आहे, शिवाय शेजारी पाजारी म्हणू नका , मित्र – ओळखीचे म्हणू नका , नातेवाईक तर आहेतच , या सगळ्यां कडून सतत प्रस्ताव येत असतात”
“साहजीकच आहे, इतके चांगले स्थळ म्हणल्यावर उड्या पडणारच ना? पण मग फार कडक अटी घालून बसलाय का तुमचा अमित?”
“नाही हो, म्हणजे तशा फारश्या अटीं नाहीतच, मुलगी अनुरुप हवी इतकीच माफक अपेक्षा आहे”
“तरी देखील अजून एक ही नजरेत भरली नाही? दर विकएंड ला कांदा पोहे खाउन कंटाळला असेल अमित”
“छे हो, कसले कांदापोहे घेऊन बसलात”
“अरे हो , कांदे पोह्याचा जमाना गेला नाही का? आजकाल मुले परस्पर बरिस्ता, सीसीडी त भेटतात, तिथेच कॉफी पिता पिता ठरते म्हणे!”
“कुठले बरिस्टा आणि सीसीडी , तसले काही सुद्धा होत नाही”
“कांदा पोहे नाही , बरीस्टा / सीसीडी पण नाही म्हणजे? माझ्या लक्षात नाही आले”
“तसे प्रस्ताव बरेच येतात हो पण याची आणि त्या मुलींची गाठच पडत नाही”
“का?”
“मुळात हा फोटो बघूनच बर्याच मुली नाकारतो आणि ज्या बर्या वाटतात त्यांना भेटायच्या बाबतीत याची आपली चालढकल, कधी या विकएण्डला वेळ नाही नंतर बघू , कधी प्रोजेक्ट डिलीव्हरीची गडबड आहे , कधी इयर एंड अप्रायझल चे टेन्शन आहे , त्यात हे मुलगी पाहाणे नको. कधी कधी तर चक्क मूड नाही म्हणतो, मागच्या महीन्यात म्हणाला सहा महीन्यांच्या ऑन साईट प्रोजेक्ट असाईन्मेंट साठी युके ला जावे लागेल तेव्हा तिकडून परत आल्यावर मुलींचे पाहू , आता याच्या पुढे काय कप्पाळ फोडायचे?”
“थोडक्यात काय तर या ना त्या कारणाने प्रत्यक्ष मुलगी पाहायचा कार्यक्रमच होतच नाही”
“अहो हीच तर समस्या आहे ना! कित्ती छान छान स्थळे येतात हो, नक्षत्रा सारख्या देखण्या मुलीं, शिकलेल्या, आय.टी तल्या, याच्या तोडीस तोड पगार असलेल्या पण हा मुली पाहायचाच कंटाळा करतो, तिथेच तर घोडे अडलय ना!”
“आश्चर्यच म्हणायचे!”
“नाही तर काय, जवळ जवळ प्रत्येक प्रस्तावाला असेच होतेय, याच्या मागे लागुन लागुन आम्ही आता पार कंटाळून गेलोय, मुली कडच्यांचे फोन वर फोन येत असतात त्यांना काय सांगायचे? हो ही म्हणता येत नाही आणि नाही ही म्हणता येत नाही!”
“म्हणजे बघा पुर्वी मुलीच्या लग्नाची काळजी असायची तशी आता मुलाच्या लग्नाची काळजी पडायला लागली!”
“तसे झालेय खरे, याच्या सगळ्या मित्रांची लग्ने झाली, त्यांना मुले बाळे पण झाली, आणि हा आपला बसलाय असाच ब्रम्हचारी”
“तसे अमितच्या वयाचा विचार करता , गेली पाच एक वर्षे तरी चालले असेन ना हे सर्व? एकंदर किती मुली पाहील्या?”
“फार नाही”
“त्यातल्या गेल्या एक वर्षात किती?”
“मागे एकदा माझ्या नंणंदेने सुचवलेली एक मुलगी बघितली ती शेवटची, आता त्याला ही आता दीड – दोन वर्षे झाली”
“म्हणजे त्यानंतर गेल्या दोन वर्षात एक ही नाही”
“नाही”
……
अमितच्या पत्रिकेतल्या ग्रहयोगांनी खास करुन ‘युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स’ नी दिलेला कौल आणि सौ. अलकाताईंशी झालेल्या प्रश्नोत्तरां वरुन मला जवळ जवळ खात्रीच पटली होती की.. “अमितला लग्नच करायचे नाही!”
आणि म्हणूनच तो काहीतरी कारणें सांगुन मुलीं पाहायचे टाळत आहे.
ग्रहयोगांनी असा कौल दिला असला तरी अमितने ‘लग्न करायचेच नाही’ असे का ठरवले असावे हा मुद्दा राहतोच!
ग्रहयोगांच्या माध्यमातून मला हे असे का याचीही थोडी कल्पना आली होतीच पण आणखी काही माहीती मिळते का ते बघू या हेतुने मी तपास सुरु ठेवला.
मला पहीली शंका आली ती काहीतरी धार्मिक बाबतीतली. काही वेळा व्यक्ती अतिरेकी धार्मिक असल्यास किंवा एखाद्या भोंदू बाबा/बुवा/ बापू /अण्णांच्या खुळचट , बुळचट अध्यात्माच्या वाटेला गेल्याने किंवा कोणाच्या ‘ब्रम्हचर्य हेच जीवन , वीर्यनाश म्हणजे सत्यानाश’ असल्या भंपक मतांच्या आहारी गेल्याने ‘विवाह न करण्याचा’ विचार केला जाऊ शकतो.
अमितची पत्रिका अशी काही शक्यता दाखवत नव्हती तरीही एकदा खातरजमा करुन घेण्यासाठी मी विचारले:
“का हो तुमचा मुलगा जरा जास्तच धार्मिक आहे का ? म्हणजे ध्यान धारणा, खास करुन एखादी तांत्रिक साधना, मठ / आश्रम इथे नियमीत जाणारा अशातला आहे का?”
“तो तर अगदी पक्का नास्तिक आहे, मठात कसला जातोय आणि कसली ध्यान धारणा , साधना करतोय”
मुलगा धार्मिक नाही …!
मग काही कारणें? डिप्रेशन किंवा प्रेमभंगाचे प्रकरण तर नसावे ? कारण असा प्रेम भंग झालेली व्यक्ती मग आँसू गाळत, त्या बेवफेची याद करत , पुढचे सारे आयुष्य गजला ऐकत भकास एकटेपणाने घालवताना आपण बघत असतोच. याचा हमखास दिसणारा परिणाम म्हणजे व्यसनें, नोकरी – व्यवसायाची बरबादी आणि खुरटी दाढी! यातले व्यसने नाहीत ह्याचा खुलासा आधीच झालेला होता , कामा बद्दल काय ? ती ही बाजू व्यवस्थित असेल असे वाटत होते पण तरीही खुलासा करुन घ्यावा वाटला..
“बाकी अमित कामा वर जातो ना व्यवस्थित , तिथे काही अळंटळं , दांड्या मारणे , सारखे नोकर्या बदलणे असे काही प्रकार नाहीत ना?”
“शक्यच नाही, गेली आठ वर्षे एकाच कंपनीत आहे, बारा- बारा तास काम करतो, घरीही काम आणतो, शनिवारी सुट्टी असली तरी कामावर जावे लागते. कामात पार बुडुन गेलेला असतो सदा सर्वकाळ. काम चांगले आहे म्हणून तर गेल्या वर्षी प्रमोशन मिळाले ना!”
कामाचे बरे आहे म्हणजे डिप्रेशन नसावे. प्रेमभंग ही नसावा आणि तशीही अमितची पत्रिका प्रेमप्रकरणा सारख्या बाबीला अनुकूल नव्हतीच पण प्रत्यक्ष विचारलेलेल बरे ना?
“काहो त्याचे पूर्वी कधी म्हणजे कॉलेजात असताना किंवा नंतरही म्हणजे कामाच्या ठिकाणी , शेजारीपाजारी कोठे काही प्रेमप्रकरणे होते का?”
“नाही तसे काही नाही, कारण आम्ही त्याला फार पूर्वीच स्पष्ट विचारले होते “बाबा रे कोणाशी जमवले असेल तर सांग , तुला आवडलेली मुलगी स्विकारु आम्ही, आमचा कसलाही विरोध असणार नाही” पण तसले काही नाही म्हणाला. नाहीतरी हा असा प्रेमात पडणारा नाहीच, एकदम लाजरा बुजरा आहे , मुलीं कडे साधे वर नजर करुन बघणार नाही!”
आता मात्र पत्रिका पाहून मला आलेली शंका खरीच असावी असे आता वाटायला लागले.
काय होते अमितच्या पत्रिकेत ?
अमित च्या पत्रिकेतली ग्रहस्थिती काहीतरी वेगळेच सांगत होती…
अमितच्या पत्रिकेत असे दोन ग्रहयोग होते ते असता व्यक्तीला विवाहा बद्दल फारसे आकर्षण राहात नाही! त्याशिवाय पत्रिकेत इतर काही योग असे दिसले जे व्यक्तीच्या मानसिक स्थिती साठी प्रतिकूल असतात. म्हणजे असे योग असताना मानसिक दौर्बल्य जास्त असते , विविध मानसिक आजारांना बळी पडण्याची शक्यता या योगांवर जास्त असते.
प्रेम भंग नाही, डिप्रेशन नाही, व्यसने नाहीत मग काय?
याचा सरळसरळ अर्थ असा लावता येतो की :
१) अमित मध्ये कोणती तरी शारीरीक व्याधी / कमतरता असावी त्यामुळे आपण पत्नीला शारीरीक सुख देऊ शकणार नाही असे वाटल्याने तो लग्नास तयार नाही .
२) अमित ला काही वेडावाकडा मानसिक अनुभव आला असावा ज्याच्या प्रभावामुळे अमितला विवाह, स्त्री, संसार , शरीरसंबंध या सार्यां बद्दल एकतर भिती किंवा कमालीची घृणा निर्माण झालेली असावी.
यात अमितची पत्रिका , त्यातही खास करुन शुक्र , बुध आणि शनी संदर्भातली सर्व ‘युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स’ यापैकी दुसर्या कारणां कडे बोट दाखवत होती….. ‘मानसिक’
अर्थात हा ‘वेडावाकडा मानसिक अनुभव कोणता’ हे मात्र पत्रिका सांगू शकत नाही , याचा शोध त्या व्यक्तीनेच किंवा त्या व्यक्तीच्या संबंधीतानी घ्यायला हवा.
अमितची पत्रिका आणि प्रश्नोत्तरांतून गोळा झालेली माहीती वरुन मी हे अनुमान काढले खरे पण आता ‘मांजराच्या गळ्यात घंटा’ कोण बांधणार?
आता माझ्या पुढे कठीण कामगिरी होती, हे सारे अलकाताईंच्या गळी कसे उतरवायचे ?
मी क्षणभर विचार केला, जरा घसा साफ करुन अलका ताईंना म्हणालो:
“अलकाताई अमितच्या पत्रिकेत विवाहाचे योग आहेत, अगदी नक्की आहेत , आज पासुन सुमारे दोन वर्षानी हे योग येतील पण या योगावर विवाह होणार का नाही हे मात्र खात्रीलायक सांगता येणार नाही“
“असे का म्हणता?”
“त्याला काही कारणें आहेत. मी अमितच्या पत्रिकेचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्या अभ्यासाच्या बळावर मी काही सांगणार आहे. अर्थात हा एक अंदाज किंवा शक्यता असते, हे काही काळ्या दगडावरची रेघ असे मानू नका. दुसरे मी जे सांगणार आहे ते आपल्याला कदाचित पटणार नाही, आपल्याला त्याचा राग ही येऊ शकेल पण तरीही मी ते सांगणार आहे कारण मी जे सांगणार ते अमितच्या हिताचे आहे असे मला वाटते, आपण माझे क्लायंट आहात आणि आपले भले व्हावे या हेतुनेच मी प्रयत्न करणार, तेव्हा आपली ऐकायची तयारी असेल तर मी काही सुचवतो”
“चालेल , सांगा”
“अमितची पत्रिका बघताच मला काही शंका आल्या होत्या आणि पुढे आपल्या बोलण्यातूनही जो खुलासा झाला त्यावरुन मी हे खात्रीने सांगू शकतो कि अमितला मुळात लग्नच करावयचे नाही आणि म्हणूनच तो काही ना काही कारणे सांगत मुली पाहावयाचे टाळतोय”
“काय सांगता , पण हे कसे शक्य आहे? मुळात लग्न करावयाचेच नाही असे अमितला का वाटेल?”
“सांगतो, पत्रिकेतल्या ग्रहयोगां वरुन दोन तर्क करता येतात पहील्या तर्का नुसार अमित मध्ये कोणता तरी शारीरीक दोष आहे ज्याच्यामुळे तो वैवाहीक सुख भोगण्यास असमर्थ आहे आणि ते अमितला माहीती पण असावे म्हणूनच तो लग्न करायची टाळाटाळ करत असावा. दुसरा तर्क असे सुचवतो की कोणत्या तरी कारणामुळे , बहुदा लहानपणी घडलेल्या एखाद्या अप्रिय प्रसंगा मुळे / अनुभवा मुळे अमितला लग्न , पत्नी, शारीरीक संबंध, संसार , संतती याबाबत कमालीची भिती किंवा घृणा निर्माण झालेली असावी आणि म्हणुनच तो विवाहास तयार नाही. आणि हे सगळे आपल्याला सांगण्याचे घाडस त्याच्यात नाही”
“नाही हो. ऐकवत नाही हे , काय बोलता हे?”
“मी मघाशी म्हणालोच होतो की माझे बोलणे आपल्याला रुचणार नाही, अपमानस्पद वाटेल , माझा राग येऊ शकेल पण मी माझे काम केले आहे, आणि जर या सांगीतलेल्या कारणांचा शोध घेऊन योग्य त्या उपाय योजना केल्या नाहीत तर अमित चे पुढे येणारे विवाह योग देखील निष्फळ ठरतील.”
“मग आता आम्ही नेमके काय करायचे”
“सर्वप्रथम आपण अमितला विश्वासात घेऊन बोलते करा. हे असे काही आहे का हे केवळ एकटा अमितच सांगू शकेल, अमितला बोलते करणे आपल्याला जमण्यासारखे नसेल तर आपले कोणी वरिष्ठ नातेवाईक . शेजारी , अमितचा एखादा वयाने मोठा आते / मामे/ मावस/ चुलत भाऊ किंवा अमितचा एखादा चांगला मित्र हे काम करु शकेल. “
“माझा विश्वास बसत नाही, छे असे काही नसावे, मी त्याला चांगले ओळखते , अहो आई आहे मी त्याची!”
“पुन्हा एकदा सांगतो हा केवळ एक अंदाज आहे , १००% बरोबरच असेल असा दावा मी करत नाही पण मी जे सांगतो ते तसेच असण्याची शक्यता ७०% तरी नक्कीच आहे”
“पण अमितच्या बाबतीत खरेच असे काही असेल तर करायचे काय?”
“जर अमितला काही शारीरीक व्याधी असेल तर त्यावर औषधोपचार होऊ शकतात, व्याधी दूर होईल का नाही या बाबत डॉक्टरच नक्की काही सांगू शकतील पण ८० % केसेस मध्ये असले आजार / व्याधी / वैगुण्य बरे होऊ शकते इतके आजचे वैद्यकशास्त्र प्रगत झाले आहे. आणि जर मानसिक कारण असेल तर ते योग्य त्या मानसोपचाराने बरे करता येईल.अगदी १००% यश मिळेल”
……
अलकाताई नंतर काही जास्त बोलल्या नाहीत की बसल्या नाहीत, माझ्या मानधनाचे पैसे टेबला वर ठेवत , ‘बघते, प्रयत्न करते’ असे म्हणत त्या निघून गेल्या.
…….
त्यानंतर सुमारे दोन एक महीन्यांनी अलकाताईंनी फोन करुन कळवले होते की माझा तर्क बरोबर ठरला होता. अमितच्या एका जीवाभवाच्या मित्राने अमितला बोलते करायचे काम यशस्वीपणे पार पाडले होते, त्यातुन खुलासा झाला.. अमितला मानसिक त्रास होता, त्याच्या बाबतीत लहानपणी घडलेल्या एका अप्रिय घटनेने त्याचे सारे भावविश्व पार उध्वस्त झाले होते , विवाह हे त्याला संकट वाटत होते, विवाह –पत्नी – शारीरीक संबंध याबद्दल त्याच्या मनात एक प्रकारची भिती किंवा घृणा निर्माण झालेली होती.
एकदा समस्येचे कारण कळल्या नंतर पुढची उपाययोजना सोपी होती, अमित वर एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांचे उपचार चालू करण्यात आले आहेत.
मी अलका ताईंना म्हणालो – ” हे उपचार जरा वेळकाढू असतात, दिर्घकाळ चालतात, फरक दिसायला किमान सहा महिने, काही वेळा एक वर्ष सुद्धा लागू शकते , तेव्हा धीर सोडु नका आणि उपचारात खंड पडू देऊ नका, सुधार पडला असे वाटले तरी डॉक्टरांनी हिरवा कंदील दाखवल्या शिवाय विवाहाचा घाट घालू नका.”
जरा उशीराने का होईना अमितची गाडी वळणावर आली,
आता त्याला कोणता अडसर?
समाप्त
शुभं भवतु
सुहास जी आपल्यासारखे ज्योतिषी उत्तम मानसमित्र असतात. आधुनिक व पारंपारिक असा उत्तम संगम आपल्यात आहे.
धन्यवाद श्री प्रकाशजी
विश्वास ठेवा अथवा नाही पण पत्रिकेतून अनेक शारीरिक आणि मानसिक जडणघडणीचा अंदाज येतो तो ओळखणे आणि त्या नुसार योग्य मार्गदर्शन करणे हे खरे कौशल्य. सदर च्या केस मध्ये नुसता विवाह योग आहे असे सांगितले असते तर चुक झाली असती कारण जातकाच्या मनातील फोबिया अंधारातच राहीला असतां त्यांवर उपचार झाले नसते . या जातकाची केस मी जशी हाताळली ते खरे ज्योतिष बाकी अमुक घटना कधी घडेल हे सांगणे किंवा एखादी घटना म्हणून उपाय तोडगे सुचवणे हे ज्योतिष नाही.
मी स्वत: इंजिनियर आहे आणि मानसशास्त्राचा थोडा अभ्यास केलेला असल्याने ज्योतिषशास्त्र व मानसशास्त्र यांची सांगड घालुन उचित मार्गदर्शन देण्याचा थोडाफार प्रयत्न करत असतो इतकेच.
सुहास गोखले
नेमके हेच विचार नवीन पिढीच्या मनांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. तरच ज्योतिषशास्त्राचा प्रवास अंधश्रद्धेकडून समाजोपयोगी शास्त्राकडे होईल.
धन्यवाद श्री प्राणेशजी, मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो. या उपाय तोडग्यांच्या विळख्यातुन ज्योतिषशास्त्र मुक्त होईल तो सुदिन !
सुहास गोखले