सहज म्हणून ‘मान्सुन धमाका’ ऑफर दिली आणि काय जादू झाली कोणास ठाऊक, एकेकाळी जातक कधी येतो याची वाट पहात बसत असे, पण आता जातकांची गर्दी सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली झाली आहे,
अगदी हात जोडून विनंती करत सांगीतले “बाबांनो, मान्सुन धमाका’ संपला आता नेहमीचे रेट चालू झाले आहेत ” पण एक ना दोन, पुन्हा पुन्हा विनवून सांगूनही दारा वरची जातकाची गर्दी काय हटत नाही,
“काय असेल ते मानधन देतो पण आमचे भविष्य सांगा’ असे म्हणत लोक दारा वर ठिय्या मारुन बसायला लागले आहेत.
आता हे रोजचेच झाले आहे, दिवसाचे चौदा तास काम करुन देखील माझ्या दारा समोर हातात पत्रिका घेतलेल्या जातकांची मोठी रांग काही संपत नाही. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आता पोलिस बोलावले लागतील का असे वाटायला लागले आहे.
कामाच्या व्यापातुन कधीतरी खिडकीतून बाहेर बघतो आणि हा एकच शीण दिसतो…
एकच कल्ला चालू आहे , माणसांची रेटारेटी चालू आहे,
लाऊडस्पीकर वरुन “शांत राहा, रांगेची शिस्त पाळा, आपला नंबर येणार आहे, गडबड करु नका ‘ असे आवाहन केले जात आहे….
“ओ लायनीतून या, आम्ही काय येडे म्हणून रांगेत उभे आहोत का ?”
“माझे जरा अर्जंट आहे “
“इथे सगळ्यांचेच अर्जंट असतय , जा गुमान शेवटाला जाऊन रांग धरा”
“मी पैला रांगेत होतो, हा मध्ये घुसलाय”
“ह्या मधे मधे घुसणार्यांना बाहेर काढा काही शिस्त म्हणून आहे की नाही”
“तर काय नुस्ता गोंधळ आहे सगळा”
“बायकां साठी स्वतंत्र लाइन असायला पाहीजे”
“बाई तो झमाना गेला , स्त्री – पुरुष समानतेचे युग आले आहे आता, बायकां राहतील उभ्या, पण सिनियर सिटीझन ची काहीतरी सोय पाहायला नको का?”
“पण गोवर्या मसणात गेल्या तुमच्या आता कशाला भविष्य बघता म्हणतो मी, बघण्या सारखे भविष्य राहीलेय का काही?”
“असे कसे म्हणता, त्यांचे ही काही प्रश्न असू शकतात, आपले भविष्य विचारायचा त्यांना ही अधिकार आहेच ना”
“कसले भविष्य विचारणार ? पेन्शन कधी जमा होणार की मुळव्याधी वर तोडगा?”
“सासु-सुनेच्या भांडणाला वैतागले असतील”
“ऑन लाईन बुकिंग घेऊन अपॉईंटमेंट का देत नाहीत? फटाफट कामे होतील , कधी सुधारणार हे लोक कोण जाणे ”
“ज्योतिष आणि इतके हाय फाय ?”
“काय हरकत आहे, लोकांची सोय नको का बघायला ? मोदीजींनी ‘डिजीटल इंडीया’ चा नारा काय उगाच दिला का”
“त्या मोदींचे अच्छे दिन कधी येणार कोणास ठाऊक पण या ज्योतिषी बुवांचे आलेत “
“ही रांग हलतच नाही अजिबात , काय चाल्लेय काय?”
“रांग कशी हलणार , ते बघा ना वशिल्याची माणसे कशी आत घुसताहेत “
“सग्ळी कडे सारखेच”
“मुलीचे लग्न कधी होणार म्हणून विचारायला आले होते पण रांगेत ईतका वेळ जातोय की माझा नंबर येई पर्यंत मुलीचे लग्न सुद्धा जमून जाईल”
“मग प्रश्न बदलून संततीचा विचारा , हाय काय अन नाय काय”
“तुम्ही चेष्टा करा ,ज्याच्या पदरात लग्नाची पोर असेल त्याला कळतील बरे का आमच्या वेदनां”
“आम्ही सक्काली नऊ पासुन रांगेत आहे केव्हा नंबर लागणार कोणास ठाउक”
“टोकन सिस्टीम चालू केली पाहीजे म्हणजे नंबर लावून जरा इतर कामे करुन परत येता येईल”
“का हो हे ‘हात’ पण बघतात का?
“नाही हात दाखवतात!
“खिक्क !”
“छ्या , काय उकडतय , ईतका माल गोळा करतात , एक साधा पंखा बसवता येत नाही”
“तर काय , अहो पंख्याचे काय घेऊन बसलात साधी प्यायच्या पाण्याची सोय नाही इथे”
“नुस्ता बाजार मांडलाय इथे”
“हो ना, पण काय करणार, म्हणतात ना ‘अडला नारायण..”
“ए दिकरा, ते जोतिसि बुवा आलयं काय “
“आलेय बर्का , ते जोतिसबुवा आलयं , आत बसलयं , काम करतंय, बावाजी , तुम पिछे लैन में ठहेरो, बीच में घुसने का नै “
“गुस्सा काय कू करता , पछी ते लाईन मंदी खडा रावून दो घंटा झ्याला म्हणून साला जरा ईचारला नी”
“मघाशी आत गेलेला माणूस वीस एक मिनिटे झाली तरी आतच आहे , एकेकाला असा वेळ लागला तर रात्री इथेच मुक्काम करायला लागेल”
“तर काय , एका माणसाला असा इतका वेळ लागायला लागला तर कसे चालणार”
“पण एव्हढा वेळ लागतोच कशाला म्हणतो मी, खटाखट कामे उरकता आली पाहीजे , आमचे पाटील डॉक्टर बघा, पेशंट आत गेला की दोन मिनिटांत बाहेर !”
“ज्योतिष इतके सोप्पे नस्ते भौ “
“तात्या तुमी काय बी म्हना पण ह्ये बेणं जोतिसि लईच स्लो हाय , लई येळ लावतय”
“आन्ना, लंबर यील तवा यील तोवर आपण जरा भाईर टपरीव ‘चा’ मारु हाप हाप “
“लाईन सरकंल ना मधल्या मध्ये “
“त्यासाठी ह्या गन्याला आणलय नव्हं का, ए गन्या नीट लंबर धरुनशान हुभा रा , कोनाला मदी घुसु दिऊ नको”
“ए भैताडा , मधुन का म्हणून घुसुन रायला बे”
“तुमचे ते नागपूरचे गड्डमवार ज्योतिषी आहेत का हो”
“ते नाय रायले ना भौ, ते असताना इथे कोण मराले यील “
“बेळगावला कुडचीकर म्हणुन आहेत , ते एकदम अक्युरेट सांगतात म्हणे”
“डोंबलाचा अॅक्युरेट , पक्का डांबीस आहे. फ्रॉड केला म्हणून नोकरी वरुन काढून टाकलेला माणूस तो, पण जैरात मात्र जोरदार करतो”
“काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही”
“साला खरा कोन खोटा कोन हेच कळत नाही”
“इतकी गर्दी कशी काय जमते बुवा यांच्या कडे , आमचे ते जोशीबुवा इतका भारी ज्योतिषी पण कुत्रे फिरकत नाही हो त्यांंच्या कडे”
“तर काय, दुनिया झुकती है ..”
“आपला तसा विश्वास नाही या ज्योतिषा फितीशा वर पण मिसेस ने फारच हट्ट धरला ना , काय करायचे”
“आमच्या कडे तेच !”
“अरे गोपाळराव तुम्ही सुद्धा ?”
“काय करु , या पोटदुखी बद्दल विचारायला आलो झाले, डागदर झाले, वैदू झाले त्या भिलवडी च्या धनगराचे औषध झाले , कश्या कश्याला गुण नाही , आता पत्रिका ब्घून काही सांगतात हे पाहायचे, इतके सगळे केले हे राहीले असे वाटु नये ”
“ओ भाऊ मध्ये कोठे घुस्ताय ऑ”
“घुसत नाय , माझा भाव उभा होता त्याच्या जागी मी , काही प्रॉब्लेम ?”
“बाकी कोणाचे नशीब कधी उघडते नै , हा ज्योतिषी काल परवा कॉलेजात मास्तरकी करायचा आज एकदम ज्योतिषाचार्य , कधी अभ्यास केला कोणास ठाऊक”
“पण इतकी लोक रोज लाईन लावून राहीलेत काहीतरी पॉवर असेल ना?”
“वाचा सिद्धी आहे म्हणे!”
“असणार हो, फेसबुक वर फोटो बघाना त्यांचा काय तेज आहे ”
“आमचे आजोबा असेच वाचासिद्धी वाले होते , नेहरु भविष्य विचारायला येत होते”
“त्या नेहरुंना काय दुसरा उद्योग नव्हता का काय , सगळी कडे ज्योतिष विचारत फिरत होते वाटते, जो तो ज्योतिषी नेहरुंची साक्ष काढतोय”
‘काही का असेना , आपल्याला पडताळा आल्याशी मतलब”
“एकदम अॅक्ययुरेट बर्का, आमच्या सोनाळकरांंचा अनुभव एकदम भारी बरे का, ‘काम होणार नाही’ म्हणून सांगीतले आणि तसेच झाले हो किती आपटली पण नाहीच झाले काम”
“आमच्या मनोज चे जॉब चे पण एकदम बरोबर आले म्हणून तर पुन्हा आलोय , प्रांजली चे मेडीकल का इंजिनियर ते विचारायला”
“पण फार पैसे घेतात हो”
“अगदी अलीकडेच वाढवलेत रेट म्हणे पुर्वी तीनशेत सांगायचे”
“गर्दी वाढली की रेट वाढणारच “
“पण पेट्रोल महाग झाले म्हणून यांनी रेट का वाढवायचे , पेट्रोलचा आणि ज्योतिषाचा काय संबंध ?”
“काहीतरी निमित्त हवेच असते रेट वाढवायला “
“ती निळ्या साडीतली बाई बघितली का? लक्ष ठेवा , गर्दीत घुसुन डल्ला मारणारी वाटते , सावध राहा, , रांगेत उभी न राहता सारखी मागे पुढे हिंंडतीय”
……
झोपेतुन जागे व्हा राजे!
……
शुभं भवतु
agadi barik sari tapshilasah vyaktiche varnan kelay tumhi. tumhal daivy dengi aahe sir
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
खास काही नाही आपल्याला जे अनुभव येत असतात तेच मी लिहून काढत असतो इतकेच
सुहास गोखले