सुमारे दिड – दोन वर्षा पूर्वी , एका जातकाने त्याच्या मुलाच्या बाबतीत ज्योतिष मार्गदर्शन घेतले होते, प्रश्न होता : ‘मुलाला परदेशी जाण्याची संधी मिळेल का ?
मी पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करून उत्तर दिले : “हा मुलगा साधारण सहा महिन्यांच्या आत बाहेर नक्कीच परदेशात जाईल”
त्या नंतर , सहा महिने होतात न होतात, त्या जातकाने कळवले : “मुलगा अजून काही परदेशात जाऊ शकलेला नाही” !
अर्थात इथे माझे भविष्य चुकले असेच म्हणावे लागले, मी माझ्या ‘रिफंड पॉलीसी’ नुसार जातकाला त्याने या मार्गदर्शना साठी दिलेले पैसे परत करायची तयारी दाखवली:
“माझे भाकीत चुकले, तुमचे पैसे मी परत करतो, तुमचा गुगल पे नंबर कळवा “
पण जातकाने पैसे परत घ्यायचे नाकारले, त्याचे म्हणणे होते ते की मार्गदर्शना करण्या साठी मी बरीच मेहनत घेतली असणार तेव्हा केवळ एखादे भाकीत चुकले म्हणून पैसे परत मागणे योग्य नाही, हा त्या जातकाच्या मनाचा मोठेपणाच मानला पाहिजे.
पण मला रुखरुख लागली, माझे भाकीत का चुकले असावे? भाकीत करताना मी काही तरी थातूरमातूर असे सांगितले नव्हते, त्या पत्रिकेचा पुरेपूर अभ्यास करुन अत्यंत आत्मविश्वासाने भाकीत केले होते, कोणताही शॉर्ट कट मारला नव्हता. पण भाकीत चुकले हे तर उघड दिसत होते. मी ती पत्रिका पुन्हा अभ्यासली सारे घटक डोळ्यात तेल घालून तपासले, पूर्वी केलेल्या विश्लेषणात काहीही त्रुटी नव्हती. ‘हा मुलगा परदेशात जायलाच हवा’ या ठाम निष्कर्षा वरच पुन्हा येऊन पोहोचलो. पण भाकीत चुकले याची टोचणी लागून राहिली, शेवटी जाऊ दे , असे होते कधी कधी अशी मनाची समजूत घालून मी ती केस बंद केली.
त्या नतर सात आठ महीन्यातच म्हणजे अगदी काल परवा त्या जातकाशी एका वेगळ्या कारणा साठी संपर्क झाला आणि या वेळी मात्र जातकाने सांगितले : “त्याचा मुलगा परदेशात गेला आहे!”
म्हणजे माझे भाकीत खरे ठरले असेच म्हणावे लागेल ना? हो, कालावधी चुकला पण ग्रहांचा कौल मी अगदी अचूक हेरला होता, माझे विश्लेषण निर्दोष होते हे सिद्ध झाले पण तरीही प्रश्न राहतो कालावधी काही महिन्यांनी का होईना चुकला , त्याचे काय?
याचे एक उत्तर असे की कालनिर्णय करताना मी दशा पद्धती वापरतो आणि जन्मवेळेत चूक असेल तर दशा- अंतर्दशांचा कालावधी त्या जन्मवेळेतल्या चुकीच्या प्रमाणात मागे -पुढे होणे स्वाभाविकच आहे. इथेही असेच काहीसे घडले असावे, म्हणजे जातकाच्या मुलाची जन्मवेळ काही मिनिटांनी, म्हणजे सुमारे 10-15 मिनिटांनी चुकीची नोंदवली गेली असली पाहिजे. असा चुका आजच्या काळात देखील सहज होऊ शकतात.
जर जातकाची जन्मवेळ अचूक मिळाली असती तर माझ्या भाकीतातला ‘घटनेचा कालावधी’ हा भाग ही अचूक आला असता!
ज्योतिष सांगताना सगळ्यात मोठा हँडीकॅप हाच आहे, जन्मवेळ अचूक मिळत नाही ( आणि जन्मवेळ अन्दाज पंचे पण जातकाची अपेक्षा मात्र अगदी अचूक, तास- मिनिट- सेकंदात कालनिर्णयाची !)
जन्मवेळ अचूक ठरवणे मानवाच्या कुवती बाहेरचे आहे, एखाद्याची जन्मवेळ नेमकी काय असेल हे केवळ ब्रह्मदेवच सांगू शकेल. माझ्या कडे काही तंत्र आहेत त्याच्या साह्याने जन्मवेळ +/- 4 मिनिटां पर्यत अचूक मिळवता येते, पण त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते, खूप वेळ मोडतो आणि या साऱ्याची भरपाई (पैशात मोबदला) द्यायला जातक तयार नसतात, मुळात ज्योतिष हे फुकटच असते असा सोयीस्कर गैरसमज असलेले किंवा तसे वेड पांघरलेले जातकच जास्त भेटतात, इतक्या मेहनतीचे साधे 400-500 रुपये मानधन द्यायला जिथे कुरकुर होते तिथे जन्मवेळेच्या खातरजमेचा जादाचा खर्च म्हणजे काहीच्या काहीच!! .
असो, आणखी एक भाकीत बरोबर आले या आनंदात मात्र मी आहे !