सिल्व्हिया डी लॉंग याच्या ‘Art of Horary Astrology in Practice‘ या ग्रंथातील एक केस स्ट्डी मी नुकतीच प्रसिद्ध केली आहे, अनेक वाचकांना ती आवडली , या लेखीकेच्या आणखी काही केस स्ट्डीज द्या असा आग्रह ही होत आहे, कॉपीराईट चे काही नियम असतात त्याचा आपल्याला आदर करायला हवा पण या लेखीकेचा ग्रंथ आऊट ऑफ प्रिंट असल्याने तो सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही ही बाब लक्षात घेऊन मी सिल्वीया ने लिहलेली आणखी एक केस स्ट्डी आपल्या समोर सादर करत आहे.
हे एक स्वैर भाषांतर आहे, मुळ तांत्रिक बाबी व तपशीला मध्ये जरासुद्धा बदल केलेला नाही, पण लेख रंजक होण्यासाठी मी थोडे लेखन स्वातंत्र्य जरुर घेतले आहे (ते कुठे हे ही तुम्हाला लगेच कळेल म्हणा!)
जिथे जिथे ‘मी’ हे संबोधन आढळेल तिथे ‘मी = सिल्व्हिया डी लॉंग’ असे समजावे, स्त्री लेखीकेने लिहलेली केस स्ट्डी असल्याने सर्व क्रियापदे स्त्री वाचक आहेत. (उदा: मी विचारात पडले, अंदाज बांधते, विचार करायला लागले इ.)
खेळता खेळता फास बसला…
Missing 6 25 सप्टेंबरची 1978 ची रात्र, दिवसभराच्या सर्व अपॉईंटमेंट झाल्या होत्या, सोफ्यावर जरा विश्रांती घेत पहुडले होते, समोर टी.व्ही. वर बातम्या चालू होत्या, अचानक एक न्युज फ्लॅश दिसला, टी.व्ही. चा आवाज जरा मोठा केला, कारण बातमी आमच्या परिसरातीलच होती. आमच्या ‘सेमीनोल काउंटी’ मधला 8 वर्षाचा एक मुलगा बेपत्ता होता, मुलाच्या आईने दोन दिवसांपुर्वीच तशी तक्रार पोलिसात दिली होती, नेहमीच्या तपासाला काही यश आले नाही म्हणून टी.व्ही. च्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात येत होते.
एव्हाना माझ्यातला ज्योतिषी जागा झाला होताच, वाटले, प्रत्यक्ष शोधकार्यात उतरणे कदाचित जमणार नाही पण प्रश्नकुंडली मांडून काही धागेदोरे मिळतात एव्हढे तरी मला नक्कीच बघता येईल ना?
मी चटकन घड्याळात पाहीले , 20:08 , 25 सप्टेंबर 1978. मनात प्रश्न होता “हरवलेल्या या मुलाचे काय झाले असेल, तो सापडेल का?”
या वेळेची पत्रिका सोबत दिली आहे:
प्रश्न मी स्वत:च विचारलेला आहे , पण प्रश्न ज्या ‘हरवलेल्या मुला’ संदर्भात आहे ज्याच्याशी माझा कसलाही नाते संबंध नाही. अशा वेळी आपल्याला ही पत्रिका जशी तयार झाली तशी न वापरता, ती फिरवून घ्यावी लागेल. जर हा प्रश्न त्या मुलाच्या आईने विचारला असता तर पत्रिकेतले 5 वे स्थान हे लग्नस्थान मानावे लागले (मुलाची आई – लग्न स्थान, त्याचे पंचम स्थान म्हणजे तो मुलगा) , जर हा मुलगा माझ्या मैत्रीणीचा मुलगा असेल आणि प्रश्न मीच स्वत:ला विचारला असेल तर काय होईल? मी – लग्न स्थान, लाभ स्थान (11) स्थान माझी मैत्रीण, लाभाचे (11) चे पंचम (5) म्हणजे त्रितिय (3) स्थान माझ्या मैत्रीणीचा मुलगा, म्हणून त्रितिय (3) स्थान हे लग्न स्थान मानावे लागेल.
सद्य स्थितीत तो मुलगा माझ्या साठी एक तिर्हाईत / अनोळखी व्यक्ती आहे, म्हणून पत्रिकेतले सप्तम स्थान (7) हे लग्न स्थान मानावे लागेल त्याप्रमाणे फिरवलेली पत्रिका खाली दिली आहे. पत्रिकेत लाल रंगातले रोमन आकडे ( I, II, III,… XII) पत्रिका फिरवल्या नंतरचे भाव आहेत
या पुढील विष्लेषण ह्या फिरवलेल्या पत्रिकेनुसार आहे याची नोंद घ्यावी..
23 Sep 1978; 16:58:34; EDT +04:00:00
Altamonte Springs FL USA
81w21’57 28n39’39
Geocentric, Tropical, Placidus,Mean Node
पत्रिकेचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी त्या प्रश्ना संदर्भातली जितकी म्हणून माहीती / तपशील मिळवता येईल तितका मिळवण्याचा प्रयत्न करावा, कारण ज्योतिष ही ‘संकेताची’ भाषा आहे, पत्रिकेतल्या प्रत्येक फॅक्टर ला ( ग्रह, भाव, राशी, योग) अक्षरश: शेकड्यांनी अर्थ आहेत , त्यातला कोणता निवडायचा हे स्थळ , काल , परिस्थीती व व्यक्ती सापेक्ष असते, त्यासाठी जातकाची संपूर्ण पार्श्वभूमी , संदर्भ (context) माहिती असणे अत्यंत जरुरीचे असते, हा संदर्भ दोन मार्गाने मिळतो, एक जातकाने विचारलेला प्रश्न आणि दुसरा, जातकाशी त्या प्रश्ना संदर्भात झालेल्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेला खुलासा. म्हणूनच अपुर्या माहीतीवर अकलेचे तारे तोडू नयेत, एखाद्या ग्रहस्थितीचा संदर्भ सोडून अर्थ लावला गेला तर अनर्थ होऊ शकतो.
या केसच्या बाबतीत माझ्या कडे कोणी विचारायला नव्हते त्यामुळे एरव्ही जातका कडून जशी माहीती मिळते किंवा जातकाला प्रश्न विचारुन माहीती मिळवता येते तशी शक्यता या वेळी नव्हती. म्हणून मी गेल्या दोन तीन दिवसातली स्थानीक वृत्तपत्रें गोळा केली व त्या मुला संदर्भात काही बातम्या , स्टोरीज आलेल्या आहेत का ते तपासायला घेतले.
हरवलेला मुलगा, बंडू त्याचे नाव, काहीसा व्रात्य होता, सतत काहीतरी मोडतोड चालू असायची, शाळेत ही तो दंगेखोर मुलगा म्हणून कुप्रसिद्ध होता. घटना घडली त्याच्या आदल्या दिवशीच दंगा केल्याबद्दल शाळेत त्याला शिक्षा झाली होती, आणि हे घरी कळल्यानंतर त्याच्या वडिलांनीही त्याची रितसर पूजा बांधली होतीच. घटना घडली त्या दिवशीही सकाळी शाळेला जाताना बंडूने शेजारीच असलेल्या चर्चच्या खिडकीची काच फोडली होती, शाळा सुटल्यानंतर, थोडा वेळ खेळून झाल्यानंतर सगळी मुले चुपचाप घरी येऊन बसली होती, हा बंडू मात्र परत आला नव्हता. तेव्हा चर्चच्या खिडकीची काच फोडल्या बद्दल वडिलांच्या हातून मार मिळेल या भितीने तो मुलगा घरातून पळून गेला असणार निदान कोठेतरी लपून तरी बसला असणार असाच सगळ्यांचा कयास होता.
चला तर, या उपलब्ध माहीती च्या आधारावर आपण बंडूचा शोध घेऊया.
हरवलेल्या व्यक्तीच्या बाबतीत सर्व प्रथम बघायचे ते त्या व्यक्तीचा सिग्निफिकेटर आणि त्याने या आधी केलेले ग्रहयोग (काय घडले आहे) आणि पुढे होणारे ग्रह योग (काय होणार आहे).
लग्नस्थानी तूळ रास आहे म्हणजे शुक्र बंडूचा सिग्निफिकेटर आहे , ‘बुध’ हा लहान मुलांचा नैसर्गिक कारक ग्रह त्यामुळे त्याचाही विचार करायला लागेल. शुक्र लग्नातच पण वृश्चिकेत आहे , स्थिर राशीत आहे. हरवलेल्या व्यक्तीचा सिग्निफिकेटर लग्नात आणि स्थिर राशीत म्हणजे बंडू एक तर घरातच आहे किंवा घराच्या जवळपास आहे, बंडू सापडण्याची मोठी शक्यता आहे.
शुक्र (बंडू) हा हर्षलच्या (अनपेक्षित, वादळी, अकल्पीत) युतीतून नुकताच बाहेर पडला आहे (फक्त 38 आर्क मिनिट्स), हा सेपेरेटिंग असपेक्ट सुचवतो की बंडूच्या बाबतीत काहीतरी अगदी अचानक , अतर्क्य असे काहीतरी अगदी नुकतेच घडले असणार. शुक्र वृश्चिकेत आहे आणि वृश्चिक म्हणजे अष्टम स्थान , मृत्यू स्थानाची नैसर्गिक राशी. वृश्चिक पाणी आणि सेक्स (गुप्तांगे) पण दर्शवते. ह्या सार्या चा मेळ घातला तर दोन शक्यता होऊ शकतात, पाण्यात बुडणे किंवा लैगीक छळ / यातना ! बंडू घरात किंवा घराजवळ आहे असा तर्क आपण केला आहे, वृश्चिक रास पाणी ते सुद्धा जमीनीवर पसरलेले (तळे , डबके) दाखवते , बंडूचे घर एका तळ्याजवळच आहे. म्हणजे बंडू त्या तळ्यात तर बुडाला नसेल ना? बंडू घरात असेल तर वृश्चिकेने दाखवलेल्या ठिकाणी म्हणजे मोरी, संडास अशा ठिकाणी असायला हवा!
शुक्र हर्षलच्या युतीतून नुकताच बाहेर पडला आहे , हर्षल पंचम स्थानाचा भावधिपती आहे. पंचम स्थान हे मौज मजा , करमणूकीचे स्थान, म्हणजे बंडू मजेत होता , खेळत होता , स्वत:ची करमणूक करुन घेत होता , याचाच अर्थ बंडूला कोणी धाकदपटशा दाखवून पळवून नेलेले नाही किंवा कोणत्या भीतीने (वडिलांच्या माराच्या) तो पळून गेलेला नाही अथवा कोठे लपूनही बसलेला नाही असाही तर्क काढता येतो.शुक्र (बंडू) आणि हर्षल (विज, विजेवर चालणारी उपकरणे) असाही संबंध येऊ शकतो.
शुक्र हा प्लुटोच्या ‘म्युचुअल रिसेपशन’ मध्ये आहे म्हणजे प्लुटो शुक्राच्या राशीत आणि शुक्र प्लुटोच्या राशीत. याचा अर्थ शुक्र हा प्लुटो ज्या भावात आहे त्या भावात आहे असे ही मानता यईल किंवा शुक्र प्लुटो युती आहे ही मानता येईल.आहे. प्लुटो व्ययात (12) आहे त्यामुळे शुक्र व्ययात आहे मानले तर काय दिसते? 12 वे स्थान हे तुरुंग, कैदखाना, कोंदट – बंदिस्त जागा, मोठे आजारावर उपचार करणारे दवाखाने, वेड्यांचे इस्पितळ, अत्यंत प्रतिकूल – विरोधी परिस्थिती / वातावरण दाखवते. म्हणजे बंडू तुरुंगात , वेड्यांच्या इस्पितळात असेल? शक्यता नाही कारण त्या लहान गावात ना तुरुंग होता की कोणताही मोठा दवाखाना (हॉस्पीटल) ही नव्हते, वेड्याचे इस्पीतळ तर फार लांबची गोष्ट. मग बंडू कोठेतरी अडकून पडला असावा (Confined), एखाद्या बंदिस्त, अंधार्या जागी!
काय योग आहेत बघा, बुधा जो लहान मुलांचा नैसर्गिक कारक आहे तोही व्यय (12) स्थानातच आहे ! बुध व चंद्र यांच्यात लवकरच लाभयोग होत आहे, चंद्राचा बुधाशी संबंध येतोय म्हणजे एखादी स्त्री किंवा एखादे लहान मूल बंडूला साह्यभूत होण्याची शक्यता आहे !बुध कन्येत आहे, कन्येच्या कारकत्वात जमीनी लगतची जागा, दुधदूभते-खाद्यपदार्थ येतात.पण याचा अर्थ कसा घ्यायचा? काही लक्षात येत नाही,
तेव्हा हा बुध जरासा बाजूला ठेवूया. शुक्र अष्टमाचा भावाधिपती आहे, अष्टमस्थान मृत्यूचे स्थान आहे, शुक्र –प्लुटो म्युच्यल रिसेप्शन ह्या बाबीं मुळे माझे मन पुन्हा पुन्हा काही अशुभ घटने कडेच खेचले जात होते.तसे बघितले तर मंगळ ही लग्नात असल्याने बंडूचा सिग्निफिकेटर होतो आणि तो शनीच्या लाभयोगात आहे पण शुक्राचे योग आणि स्थान पाहता मंग़ळाने दाखवलेले योग अगदीच मवाळ आहेत.
तसे काही सुचत नसले तरी, आता पर्यंत ‘मिसिंग’ च्या बर्याच केसेस मी सोडवलेल्या आहेत, त्या प्रत्येक केसच्या वेळी पत्रिकेत दिसलेली ग्रहस्थिती / ग्रहयोग आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती काय आढळली याचा मोठा डाटाबेस माझ्याकडे जमा झालेला आहे, त्याचे संदर्भ घेत मी काही अडाखे जुळवले ते असे:
बंडू जिवंत सापडण्याची शक्यता अगदी कमी आहे.
बंडू जिवंत सापडला तरी गंभीर आजारी असेल व त्याला ताबडतोब मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी न्यायला लागेल.
बंडू घरातच किंवा घराच्या अगदी जवळ सापडण्याची मोठी शक्यता आहे. ती जागा जर बंडू घरी असेल तर संडास, मोरी, अंधारी , कुबट खोली असेल , जर बंडू घराबाहेर असेल तर पाण्याच्या जवळ, जमीनी लगत असेल.
त्याला कोणी पळवून नेल्याची किंवा तो स्वत: लपून बसलेला असण्याची शक्यता नाहीच, त्याच्या बाबतीत काहीशी अनपेक्षित , अतर्क्य घटना घडली असण्याची शक्यता आहे.
तो काहीशा विचित्र पद्धतीने अडचणीच्या जागी कोंडला / बंदीवान झाला असण्याची शक्यता आहे, घरात असेल तर घरातली मोठी कपाटे, धान्य साठवायची खोली, एखादी गुप्त जागा (भूयार, विवर) असू शकेल किंवा तो जर घराबाहेर असेल तर पडके वाडे, कोठड्या, ड्रेनेजचे मोठे पाईप, ड्रेनेज चे खड्डे, भुयार, भूयारी मार्ग, बांधकामाचा पाया घेण्यासाठी केलेले खोदकाम अशा जागी तो अडकला असेल.
हे सर्व विचार मंथन चालू असतानाच , हर्षल , विज, विजेवर चालणारी उपकरणे, कन्या राशीने (आणि बुधाने) दाखवलेली – दुधदुभते, खाद्य पदार्थ व ते साठवण्याची जागा ह्या संकेताचा काय अर्थ लावायचा हा विचार मला अस्वस्थ करत होता. अचानक माझ्या लक्षात आले – ‘रेफ्रिजरेटर’ . रेक्स बिल च्या रेकनर म्ध्ये पाहीले असता तिथेही अशाच स्वरुपाचा उल्लेख दिसला . ‘रेफ्रिजरेटर’ हे सर्व निकष पूर्ण करतो. पण बंडू रेफ्रिजरेटर मध्ये ? मला स्वता:लाच ह्या कल्पनेने (त्या गंभीर मन:स्थितीतही) हसायला आले, , कसे शक्य आहे, एकतर आठ वर्षाचा बंडू त्यात मावणार नाही, दुसरे असे की एव्हाना बंडूच्या घरातला रेफ्रिजरेटर शंभर वेळा तरी उघडला, बंद केला गेला असेल, बंडू त्यात असलाच तर एव्हाना तो सापडलाही असता. मी ती कल्पना हसण्यावारी नेली.
वृत्तपत्रातल्या बातम्यात आणि रिपोर्ट मध्ये तो मुलगा वडिलांच्या संभाव्य माराच्या भितीने घरातून पळून गेला असणार निदान कोठेतरी लपून तरी बसला असणार असा तर्क जरी केला असला तरी ही पत्रिका त्याला दुजोरा देत नाही, उलट तो मुलगा मृत झला आहे असाच स्पष्ट कौल ही पत्रिका देत आहे. तिर्हईत असला म्हणुन काय झाले, आठ वर्षाचा कोवळा जीव तो, त्याच्या मृत्यू बद्दल लगेच असे भाष्य करणे मलाच कसेतरी वाटले , आणखी काही ठोस समर्थन पत्रिकेतून मिळाल्या शिवाय असे अशुभ भाकीत करणे बरोबर नाही. पण ह्या पत्रिकेची जेव्हढी करता येईल तेव्हढी चिरफाड करुन झालेली होतीच आता त्यातून आणखी किती जादाची माहीती मिळणार? मला अजूनही काही ठोस सांगता येत नव्हते की बंडू जिवंत आहे का मृत आणि त्याचा मृत्यू केव्हा, कोठे आणि कसा झाला असेल, आणि दुर्दैवाने बंडू मृत असेल तर तो खून की अपघात?.
बराच विचार करुन मी बंडूच्या आई ने तक्रार नोंदवली तो दिवस व ती वेळ धरुन आणखी एक पत्रिका तयार करायचे ठरवले. नक्की दिवस व वेळ जाणून घेण्यासाठी मी माझ्या एका पत्रकार मित्राला फोन केला केला, त्यानेही या प्रकरणातले गांभिर्य ओळखून , ही माहीती (बंडूच्या आईने पोलिसांना केलेल्या फोन कॉल चा टाइम स्टॅम्प) काही वेळातच मला उपलब्ध करुन दिली.
शेजारी, बंडूच्या आईने पोलीसांना फोन करुन तक्रार दर्ज केली त्या वेळेची पत्रिका दिली आहे ती पहा.
23 Sep 1978; 16:58:34; EDT +04:00:00
Altamonte Springs FL USA
81w21’57 28n39’39
Geocentric, Tropical, Placidus,Mean Node
पत्रिकेची वेळ आहे बंडूच्या आईने पोलिसांना फोन करुन मुलाचा शोध घेण्याची विनंती केली होती, पत्रिकेचे स्थान , बंडू जिथे राहतो त्या गावाचे.
इथे बंडूची आई प्रश्नकर्ती असल्याने पत्रिकेतले पहिले स्थान बंडूची आई दाखवते आणि पाचवे स्थान अर्थातच बंडू.
वर छापलेली पत्रिका फिरवलेली नाही याची नोंद घ्या.
लग्नेश शनी हा बंडूच्या आईचा सिग्निफिकेटर होतो, पण होरारी नियमानुसार चंद्र हा प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक (by default) को- सिग्निफिकेटर असतोच. इथे पहा, चंद्र पंचमात आहे, पंचमस्थान हे संततीचे. होरारी मध्ये चंद्राच्या स्थिती वरुन प्रश्नाचा बोध होतो तो हा असा!
पंचम स्थान बंडूचे, पंचमेश बुध असल्याने तो बंडू चा सिग्निफिकेटर होणार. बुध अष्टम स्थानात अगदी नुकताच दाखल झाला आहे. अष्टम स्थान हे पंचमाचे चतुर्थ स्थान आणि चतुर्थ स्थान म्हणजे शेवट , आयुष्याच्या अखेरचा कालवधी! आणि इथेही अष्टमस्थान कन्येत सुरु होत आहे.चंद्र जरी बंडूच्या आईचा को- सिग्निफिकेटर होत असला तरी तो पंचमात असल्याने बंडूचा पण को- सिग्निफिकेटर होणार (पंचमेशा बरोबरच , पंचमातले ग्रह इतर ग्रह सुद्धा बंडूचे को- सिग्निफिकेटर होणार), जरा या चंद्रा कडे लक्ष देऊन बघा, तो मिथुनेत 26 अंशावर आहे आणि मिथुन रास ओलांडे पर्यंत तो कोणत्याही ग्रहांशी योग (Applying) करु शकत नाही,
यालाच होरारीत मून व्हाईड ऑफ कोर्स (Void of Course VOC) म्हणतात, असे जेव्हा असते तेव्हा प्रश्ना संदर्भात जातकाला काहीही करता येत नसते, केवळ हतबुद्ध हऊन ‘जे जे होईल ते पहावे’ एव्हढेच काय ते प्रश्नकर्त्याच्या हातीं उरलेले असते. हा नियम सर्व होरारी चार्ट्स ना , सर्व प्रकारच्या प्रश्नांना, सर्व प्रकारच्या जातकांना सारखाच लागू होतो. त्यासाठीच होरारी कुंडली मांडली रे मांड्ली की सर्व प्रथम चंद्र व्हाईड ऑफ कोर्स आहे का नाही हे बघणे अत्यंत आवश्यक असते.
(सुहास: के.पी. वालों हा नियम तुम्ही तुमच्या के.पी. प्रश्न कुंडलीला पण वापरु शकता, बघा एकदा प्रयत्न करुन, तुमचीही खात्री पटेल!)
चंद्र व्हाईड ऑफ कोर्स असल्याने परिस्थितीत काहीही बदल होणार नाही, जातकाला (प्रश्नकर्त्याला) आता करण्या सारखे काही ही उरले नाही. या केस मध्ये बंडू च्या बाबतीत आता आपल्याला काहीही करता येणार , परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलीय , बंडू आता परत येणार नाही!
प्रश्नकुंडलीत चंद्राला अनन्यसाधारण महत्व आहे हे वेगळे सांगायला नकोच, हा चंद्र प्रश्नकुंडलीच्या वेळे आधी कोणा कोणाशी , कोणत्या प्रकारचे योग करुन बसलेला आहे या वरुन प्रश्न विचारायच्या वेळे आधीच्या घटनांचा उत्तम बोध होतो आणि प्रश्नकुंडलीच्या वेळे नंतर चंद्र जे जे काही योग , ज्या ज्या ग्रहां बरोबर करणार आहे त्यावरुन प्रश्ना संदर्भात पुढे काय काय घडणार आहे याचे ही उत्तम मार्गदर्शन होते.आता या प्रश्नकुंडलीत पाहीले तर असे दिसेल:
चंद्राने त्या आधी ‘नेपच्युन’ शी प्रतियोग केला होता (जेव्हा चंद्र 15 अंश मिथुनेत होता तेव्हा) आता नेपच्युन म्हणजे काहीतरी गुढ, बेशुद्धी, गुदमरणे, विषारी वायु, पाण्यात बुडणे.चंद्र बुधाशी केंद्र योग करुन पुढे सरकला आहे (चंद्र मिथुनेत 24 अंशावर असताना हा केंद्र योग झाला होता) बुधाशी चंद्राचा संबंध येऊन गेलेला असल्याने , मारामारी, रक्तपात, स्फोट , अपघात अशा शक्यता नाहीत (त्यासाठी मंगळ, हर्षल सारखे ग्रह लागतात). उलट चेष्टा मस्करी, टवाळी, चंचलपणा, अवखळपणा, बोलाचाली, वादावादी अशा पद्धतीच्या घटना घडल्या असणार.
पण चंद्र अष्ट्मातल्या (बंडूच्या नुसार चतुर्थातल्या) राहू शी अगदी अंशात्मक केंद्र योगात आहे तर बुध राहू च्या मागे दोन अंशावर आहे म्हणजे बुध ही राहूशी युती करतोय. हे दोन्हीही कुयोगच आहेत आणि मृत्यूची घंटा वाजवताहेत.
या पत्रिकेतही बुध नेपच्यनच्या केंद्रयोगातून बाहेत पडला आहे. नेपच्युन म्हणजे पुन्हा काहीतरी गुढ, बेशुद्धी, गुदमरणे, विषारी वायु, पाण्यात बुडणे इ. आलेच!बुध (बंडू) कन्येत आहे म्हणजे पाणथळ जागा, पाण्या जवळची जागा, जमीनी लगतची जागा, दूध-दूभते, खाद्यपदार्थ, व ते साठवण्याची जागा, अरे देवा म्हणजे पुन्हा तो ‘रेफ्रिजरेटर’ आला ! पण मी त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले.आता या पत्रिके नुसार मला काय दिसले ते असे:
बंडू जिवंत नाही.
त्याचा मृत्यू गुदमरुन, विषबाधेमुळे , विषारी वायू मुळे झाला असावा.
पाण्यात बुडून मेला असण्याचीही शक्यता आहे.
बंडू सापडण्याच्या संभाव्य जागा: पाण्या जवळ, लो ग्राऊंड, दूध-दूभते, खाद्यपदार्थ साठवण्याची जागा.
मग आता बंडू किंवा बंडूचे प्रेत केव्हा सापडेल?
प्रश्न बंडूच्या आईने विचारला आहे तेव्हा बंडूच्या आईचा सिग्निफिकेटर आणि बंडू चा सिग्निफिकेटर यात चांगला योग येईल तेव्हा.
कुंभ लग्न आहे , म्हणजे कुंभेचा अधिपती शनी बंडूच्या आईचा सिग्निफिकेटर होणार, तसेच मॉडर्न अॅास्ट्रोलॉजी नुसार हर्षल ही बंडूच्या आईचा सिग्निफिकेटर होऊ शकतो शिवाय चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा को- सिग्निफिकेटर असतोच.
बंडूच्या बाबतीत पंचमेश बुध हा बंडूच्या सिग्निफिकेटर होणार त्याचप्रमाणे चंद्र पंचमस्थानात असल्याने तो ही बंडूच्या सिग्निफिकेटर होऊ शकतो.
या पत्रिकेतला चंद्र व्हाईड ऑफ कोर्स असल्याने तो कोणाशीच अस्पेक्ट करु शकणार नाही , त्या मुळे टाईमिंग साठी त्याचा वापर करता येणार नाही. पण हर्षल /शनी (बंडूची आई) यांचेही कोणतेही योग बुधाशी (बंडू) होत नाहीत. आता आली का पंचाईत ! याचा अर्थ बंडू सापडणारच नाही असा घ्यायचा का? बंडू पळून गेला असला किंवा त्याला पळ्ववून नेले गेल असले तर कदाचित हे होण्याची शक्यता असू शकेल. पण बंडू मृत झाल्याची शक्यताच जास्त असल्याने त्याचे प्रेत तरी सापडणारच!
आता हा तिढा सोडवायचा कसा?
चंद्र हा बंडूच्या आईचा सिग्निफिकेटर आहेच, पंचमा भावारंभ बंडू साठी वापरता येईल. अशी योजना मी अगदी कमी अवधीत पूर्ण होणार्या, घटनांचा अंदाज बांधण्यासाठी करत असते. उदा: आज भेटायला येणारी व्यक्ती नेमकी किती वाजता येईल, एखाद्याच्या फोन कॉल केव्हा येईल इ. पण आता मला हाच पर्याय उपलब्ध होता.
पंचमा भावारंभ आहे 21 मिथुन 50 आणि चंद्र आहे 26 मिथुन 43 म्हणजे दोघांत अंतर आहे 4 अंश 53 मिनीट म्हणजे 5 अंश धरुयात. म्हणजे तक्रार नोंदवलेल्या वेळे पासून साधारण 5 टाइम युनिट मध्ये , आता टाइम युनिट कोणते वापरायचे , 5 तास नाही ते तर होऊन गेलेत, पाच दिवस शक्य आहे, पाच आठवडे / पाच महिने / पाच वर्षे फारच मोठे कालावधी. पाच दिवस ठीक होईल.
म्हणजे तक्रार नोंदवल्या पासुन पाच दिवसांत बंडू सापडेल पण बहुदा मृत अवस्थेत.
मी त्याप्रमाणे माझा रिपोर्ट तयार करुन माझ्या पत्रकार मित्रा मार्फत पोलिसांकडे पोहोचवला, कदाचित त्यांना याचा काहीतरी उपयोग करुन घेता येईल या हेतुने.
त्यांनी त्याचा वापर करुन घेतला की नाही हे मला कळले नाही , पण तक्रार केल्या च्या बरोबर पाचव्या दिवशी संध्याकाळी बंडू सापडला. अर्थातच बंडू ची डेड बॉडी सापडली म्हणावे लागेल !
बंडू चे मृत शरीर एका रेफ्रिजरेटर , हो चक्क एका रेफ्रिजरेटर मध्ये होते.
(इथून पुढची माहीती, त्या वेळी बंडू बरोबर खेळणार्या मुलांना बोलते करुन मिळवण्यात आलेली आहे)
हा रेफ्रिजरेटर एका मोठ्या ट्रेलर होम मध्ये होता, हा ट्रेलर घेऊन आलेली टेक्सासची एक फॅमीली, तो ट्रेलर बंडूच्या घराजवळच्या तळ्याच्या काठावर , मोकळ्या जागेत पार्क करुन जवळच ट्रेकिंग ला गेली होती, त्यांच्या हातुन अनावधानाने ट्रेलर ची एक खिडकी जराशी उघडी राहीली होती. व्रात्य बंडूच्या ते लक्षात आले, बंडू त्या खिडकी द्वारे ट्रेलर मध्ये शिरला , त्यापाठोपाठ बंडूचे मित्र व भाऊ.
ट्रेलर मध्ये एक मोठ्या आकाराचा रेफ्रिजरेटर होता , बंडू आणि त्याच्या मित्रांनी एव्ह्ढ्या मोठ्या आकाराचा रेफ्रिजरेटर कधीच बघितला नव्हता, कुतुहला मुळे त्यांनी तो उघडायचा प्रयत्न केला , मजा म्हणजे त्या रेफ्रिजरेटरच्या दरवाज्याला तो उघडण्यासाठीचे हॅन्डलच नव्हते, त्यामुळे तो उघडायचा कसा हा प्रश्न त्या मुलांना पडला , पण बंडू व्रात्य होता तसा तो कमालीचा कल्पक आणि हुशार होता, त्याने इकडून तिकडून बोटे घालून कसाबसा त्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघड्ला!
रेफ्रिजरेटर तसा रिकामाच होता, आत जो थोडाफार खाऊ होता तो या मुलांनी फस्त केला.
बंडू म्हणाला:
“ बाप रे, केव्हढा मोठा रेफ्रिजरेटर आहे , एक माणुस आख्खा मावेल यात”
“कै तरीच काय , माणूस कसा काय मावेल त्यात?” एकाने ऑबजेक्शन घेतले.
“त्यात काय , मी आत मावून दाखऊ ?“ बंडूने आव्हान दिले!
“दाखव बघू,” दुसरा म्हणाला,
मग काय बंडू चटकन रेफ्रिजरेटर मधल्या एका मोठ्या कप्प्यात मूटकुळे करुन बसला .
“बघ , मावलो की नाही”
“हो पण आता दरवाजा लागायला पाहीजे तर तू बरोबर आत मध्ये मावलास “
“लावून बघ दरवाजा”,
खरेच त्या दुसर्या मुलाने रेफ्रिजरेटर चा दरवाजा लावून टाकला, बंडू रेफ्रिजरेटर मध्ये , मुले बाहेर. मुलांनी टाळ्या पिटल्या , त्यांना मजा वाटली. काही वेळ गेला , आणि आता बंडू ने दरवाजा आतून उघडायचा प्रयत्न केला पण तो उघडला नाही, मग त्याने आतून दार ठोठावून मला बाहेर काढा असे सांगायला सुरवात केली. मुलांनीही प्रयत्न केले पण त्यांना काही तो दरवाजा उघडता आली नाही.
“अरे असे काय करताय , दरवाजा उघडा ना, मला बाहेर यायचेय”
“अरे पण दरवाजा उघडतच नैये”
बंडू दरवाजा उघडा म्हणून ओरड्तोय, आणि या मुलांना काही दरवाजा उघडता आला नाही, बंडूला आतून काही करता येत नव्हते आणी मुलांना बाहेरुन !
मुलेच ती ,घाबरली आणि चक्क तिथून पळून गेली. घरी येऊन सुद्धा मार बसेल या भितीने त्यांच्यापैकी कोणीच ही गोष्ट आपापल्या घरी बोलले नाही.
इकडे बंडूचा आकांत हळू हळू कमी होत गेला आणि बंडू त्या रेफ्रिजरेटर मध्येच मृत झाला!
ती टेक्सासची फॅमीली ट्रेकींग वरुन परत आली, ट्रेलर मध्ये शिरताच त्यांना कसली तरी दुर्गंधी आली, वास रेफ्रिजरेटर मधुनच येत होता, रेफ्रिजरेटर उघडला गेला मात्र, तो बंडूचे प्रेत बघण्यासाठीच!
शुभं भवतु