‘अशीही ज्योतिषाची तर्हा’ लेखमाला सुरु केल्यानंतर काही जणांनी ईमेल लिहून विचारले , १९८७ च्या म्हणजे ३० वर्षापुर्वीच्या च्या घटना , प्रसंग , संवाद इतके तपशीलवार कसे काय आठवतात हो तुम्हाला?
शंका रास्त आहे पण त्याचे उत्तर वर दिलेल्या फटुत आहे.
मी नोकरीला लागल्यानंतर लगेचच मी हा सोनी – टी.सि.एस. ३५० हा रेकॉर्डिंग ची सुविधा असलेला कॅसेट रेकॉर्डर – वॉकमन घेतला. (हो, तो जमाना कॅसेट्चा होता ! ) , त्यावेळी भारतात अशी उत्पादने सहजी मिळत नव्हती, माझ्या एका मित्राचा मोठा भाऊ नोकरी निमित्त आखाती देशात होता त्याच्या मागे लागून मी हा रेकॉर्डर अव्वाच्या सव्वा किंमत मोजून मिळवला होता.
याची साऊंड क्वालीटी अप्रतिम होती. दोन मायक्रोफोन (आणि बाहेरचा मायक्रोफोन जोडण्याची सुविधा) असल्याने उत्त्तम स्टेरिओ रेकॉर्डिंग करता येत होते, ऑटो रिवर्स (आपोआपच कॅसेट ची बाजू बदलण्याची सोय) असल्याने सलग ६०/९० मिनिटांचे रेकॉर्डिंग करणे शक्य होते. लहान आकार असल्याने हातातल्या बॅग मध्ये (तेव्हा मी शबनम बॅग नामक झोळी वापरत होतो) हा सहज एका कोपर्यात मावायचा.(आणि रेकॉर्डिंग चालू आहे हे दुसर्यांचा लक्षात पण यायचे नाही!!)
‘स्टींग ऑपरेशन’ आज आपल्याला जरा जास्त परिचित होत असले तरी मी १९८७ मध्येच त्याची सुरवात केली होती ! मुळात मी हा घेतला तो काही स्टींग ऑपरेशन साठी नै कै , त्याचा मुख्य उपयोग होता स्ट्डी नोट्स रेकॉर्ड करायला, मी सरळ पुस्तक मोठ्याने वाचून ते रेकॉर्ड करायचो, आणि ते रेकॉर्डिंग नंतर अनेक वेळा ऐकायचो, त्याने माझ्या अभ्यास जास्त चांगला लक्षात रहात असे. आजही माझ्या मुलगा हीच पद्धती वापरुन अभ्यास करत आहे. स्वत:च्याच आवाजातली अशी रेकॉर्डिंगज सबकॉन्शस माईंड वर जास्त प्रभावी परिणाम करतात असा अनुभव आहे.
जेव्हा मी एखाद्या ज्योतिषाला भेटत असे तेव्हाही त्या ज्योतिषाचे आणि माझे संभाषण रेकॉर्ड करत असे. इथेही मुळात स्टींग ऑपरेशन चा हेतु नव्हताच, ज्योतिषी काय म्हणाला ते नंतर शांतपणे पुन्हा एकदा ऐकायला मिळावे हाच एकमेव हेतु त्यामागे होता.
अशा रेकॉर्ड केलेल्या कॅसेटस आजही माझ्या संग्रहात आहेत. मध्यंतरी यातली काही रेकॉर्डिंगज डिजीटल फॉरम्यॅट मध्ये रुपांतरीत केली गेली पण काही कॅसेटस मात्र दुर्दैवाने कालौघात खराब झाल्या . त्याची आज मोठी हळहळ वाटते.
हा सोनी रेकॉर्डर पुढे दहा – बारा वर्षे वापरात होता , एकदा तो बिघडला आणि खूप प्रयत्न करुन सुद्धा दुरुस्त होऊ शकला नाही. नाईलाजाने भंगारात टाकावा लागला.
‘अशीही ज्योतिषाची तर्हा ‘ ही पूर्ण केलेली लेखमाला , नुकतीच सुरु केलीली ‘पुन्हा ज्योतिषाची तर्हा ..’ आणि आगामी ‘ आणखी ज्योतीषाची तर्हा..’ या लेखमाला मी अशाच एका रेकॉर्डिंग च्या आधाराने लिहू शकत आहे.
शुभं भवतु
