गोष्ट तशी माझ्या लहानपणीची पण त्या घटनेतून मिळालेला धडा मात्र पदोपदी पुन्हा पुन्हा मिळत असतो.
मी असेन आठ – दहा वर्षाचा, म्हणजे बघा, मी तिसरी-चौथीत शिकत असतानाची ही गोष्ट, तेव्हा काय झाले, एके दिवशी आमच्या गल्लीत एक बासरीवाला बांबूच्या बासर्या विकायला आला, त्याच्या खांद्यावर एक मोठा बांबू आणि त्याला लगडलेल्या विविध आकाराच्या बासर्या! तो बासरीवाला बासरीवर त्या काळात गाजत असलेले एक हिंदी चित्रपटातले गाणे अत्यंत सुमुधुर पणे वाजवत होता.
मला जन्मजातच संगीताची आवड, एक दैवी देगणीच लाभली आहे म्हणा ना, मला ते बासरी प्रकरण फार आवडले! तशी माझ्या कडे एक बांबूची बासरी होतीच ती काही चांगली वाजत नव्हती, या बासरीवाल्या कडची बासरी चांगली वाजतेय , ही जर बासरी आपल्याला मिळाली तर आपण ही अशीच सुंदर बासरी वाजवू शकू ! बस्स , अगदी अश्शीच बासरी आपल्याला हवी, आपल्यालाही बासरीवर असेच सुंदर गाणे वाजवता आले पाहिजे!
झाले, मी घरी आई कडे हट्ट धरला , आपुन को ऐसाच बासरी मंगता है !
“अरे पण आपल्याकडे आहेच ना एक बासरी, मग आणखी एक कशाला”?”
“ती बरोबर वाजत नाही, त्या बासरीवाल्याकडची बघ, ती भारी आहे, काय मस्त वाजतेय”
“वेड्या, आपल्या कडची बासरी जास्त चांगली आहे त्या बासरीवाल्याच्या खेळण्यातल्या बासरी पेक्षा”
“हॅट, आपली बासरी एकदम डबडा आहे, एक सुर धड निघत नाही तिच्यातून, ते काही नाही मला त्या बासरीवाल्या कडचीच बासरी हवी”
आई ने मला समजावायचा प्रयत्न केला पण माझे आपले एकच ..
“त्या बासरीवाल्या कडचीच बासरी हवी, ती भारी आहे!”
शेवटी आईने माझा हट्ट पुरा केला, त्या बासरीवाल्या कडून मला जशी हवी होती तशी एक बासरी विकत घेऊन दिली.
मी खुष झालो, आता काय. सगळी आवडती गाणी आपल्याला वाजवता येणार !
ह्या बासरीवाल्या कडून घेतलेल्या बासरीतून पण काही सुर निघत नव्हते , जो काही आवाज त्यातून बाहेर येत होता त्याला केकाटणे, किंचाळणे या पलीकडे काही म्हणता आले नसते!
मी एकदम निराश झालो. आईला म्हणालो..
“या बासरीवाल्याने आपल्याला फसवले, एकदम बेक्कार बासरी विकली आपल्याला”
“अरे तसे नाही, आपण बासरी नीट बघून घेतलीय, चांगली आहे ही बासरी”
“हॅट, कसली चांगली, यातून आवाजच निघत नाही काही”
“अरे, तुला अजून बासरी वाजवता येत नाही म्हणून असे वाटतेय, जरा सराव केलास तर तुला जमेल नक्की,. या बासरीतून निघतील तुला हवे तसे स्वर, येईल गाणे वाजवता, सराव करावा लागेल तुला, मग नक्की जमेल”
“तसे नाही, तो बासरीवाला डांबिस आहे, स्वत: चांगल्यातली बासरी वाजवतो आणि आपल्याला डबडा बासर्या विकतो”
“अरे असे नाही, तो बासरीवाला रोज बासरी वाजवत फिरत असतो, अनेक वर्षांचा सराव आहे त्याचा, हात बसलाय त्याचा, तो वाजवत असलेली बासरी काही स्पेश्यल नाही, तो तीच कशाला इतर कोणतीही बासरी इतकीच चांगली वाजवू शकेल”
“नाही,काही तरी झोल आहे, आपण त्या बासरीवाल्या कडे जाऊ, आणि तो वाजवत असलेलीच बासरी घेऊ, मग शंकाच राहणार नाही”
“असे, खरेच असे काही नसते रे, ऐक माझे”
पण मी काही एकले नाही, हट्टाला पेटलोच म्हणाना.
“बासरीवाला फसवतोय, स्वत: चांगल्यातली बासरी निवडून वाजवतो आणि आपल्याला पिचक्या, बेसूर बासर्या विकतो, आपण बासरी बदलून घेऊ नव्हे त्या बासरीवाल्याच्या हातातलीच बासरी घेऊ, मग बघू कशी नाही चांगली वाजणार बासरी”
शेवटी माझ्या आईने माझा हट्ट पूरा केला , आम्ही त्या बासरीवाल्याला गाठले आणि मी अक्षरश: त्याच्या हातातली बासरी हिसकावून घेतली .. हीच बासरी, जी तू आत्ता वाजवतो आहेस ना , तीच बासरी मला पाहीजे, पिचकी बासरी देऊन मला फसवतोस काय…
पण इतका अट्टाहास करून शेवटी झाले काय? बेसुर स्वर आणि केकाटणे!
तेव्हा आईने मला समजावले..
“बेटा, चांगली बासरी , भारीतली बासरी अगदी हिरेमाणके जडवलेली बासरी मिळाली तरी त्यातून सुर हे वाजवणार्यालाच काढावे लागतात, केवळ चांगली बासरी हातात घेतली म्हणजे आपल्याला आपोआपच चांगले गाणे वाजवता येणार नाही, त्यासाठी वर्षानुवर्षाचा सराव, रियाझ तर लागतोच शिवाय उत्तम स्वरज्ञान पण असावे लागते आणि त्याहुनही महत्त्वाचे म्हणजे ‘संगीत’ ही कला आहे आणि ती रक्तातूनच यावी लागते, मुळातच रक्तातच कला नसेल तर कितीही चांगली बासरी घेतलीस, कितीही मोठ्या गुरु कडे तालीम घेतलीस, तासनतास रियाझ केलास तरीही तुझी पाटी कोरीच राहील, हे लक्षात घे.
हे मान्य की चांगली बासरी असेल तर त्यातून सुर चांगले निघू शकतात, सुरेलपणा जास्त येतो पण म्हणून बासरीवरच्या बोटांचे महत्त्व कमी होत नाही, ते अत्यावश्यकच आहे, चांगली बासरी आपले काम काहीसे सुकर करु शकेल इतकेच, पण चांगली भारीतली बासरी हा मूळची प्रतिभा, रियाझ यांना पर्याय होऊ शकत नाही !”
मला माझी चूक लक्षात आली! एक मोठा धडा मला मिळाला.
पुढे याचा पडताळा , अनुभव अनेक वेळा येत राहीला..
भारीतले १४ कॅरेट सोन्याचे निब असलेले पार्कर , शेफर , क्रॉस चे पेन असले म्हणजे आपण नामवंत लेखक बनू शकत नाही, जात्याच लेखक पाठकोर्या रद्दी कागदांवर पेंसिलच्या तुकड्याने एखादी कादंबरी लिहू शकतो, महाकाव्य रचू शकतो त्यासाठी त्याला ह्या असल्या साधनसामुग्री आवश्यक नसते.
केवळ भारीतातला लाख –दीड लाख रुपयाचा कॅनन किंवा नायकॉन चा डीएसएलआर कॅमेरा , त्यावर भारीतली प्राइम लेन्स असली म्हणजे आपण उत्कृष्ट फोटोग्राफर होत नाही.
चांगला लेखक , कलाकार , अभिनेता , खेळाडू हा जन्मावाच लागतो. शास्त्रशुद्ध शिक्षण (तालीम) , रियाझ या गोष्टी अंगच्या उपजत कलेला पैलू पाडायचे काम करेल जरुर पण जे मुळातच नाही त्याची भरपाई कदापीही करू शकणार नाही. चांगली उपकरणे आपले काम सोपे करु शकतात, कलेच्या प्रांतातले अनेक बारकावे टिपण्यात , खुलवण्यात चांगल्या दर्जेदार (म्हणजेच महागड्या!) साधनसामुग्रीचा निश्चितच हातभार असू शकतो, पण प्रतिभेला, साधनेला , मेहेनतीला पर्याय नाही हे कधीच विसरायचे नाही !
आज मी कॉस्मोबॉयॉलॉजी, युरेनियन अॅस्ट्रॉलॉजी म्हणा किवां पाश्चात्य होरारी तंत्रे म्हणा, वापरुन अनेक आश्चर्यकारक भाकिते करत असतो, बर्याच जणांना वाटते चला आपण ही विद्या शिकून घेऊ , त्याच्यावरची दोन चार पुस्तके वाचून काढली की झाले ! हाय काय आन नाय काय ! आपण ही या गोखल्यां सारखी फाड फाड भाकिते करु शकू !
मी जरी अनेक नविन तंत्रे वापरत असलो तरी त्यापूर्वी २० वर्षे मान मोडून बेसीक अभ्यास करण्यात घालवली आहेत हे विसरु नका. ‘ग्रह-तारे-नक्षत्रें-राशी-भाव- ग्रहयोग-गोचरी’ हा अभ्यास करण्यातच मी इतका वेळ घालवला आहे, अक्षरश: ढोर मेहनत म्हणतात ना तशी मेहेनत घेतली आहे, रात्र रात्र जागून पत्रिका सोडवल्या आहेत, नियम पाठ केले आहेत. कारण मला हे पक्के माहिती होते की हा पाया जर भक्कम नसेल तर पुढची प्रगती कधीच शक्य होणार नाही.
कॉस्मोबॉयॉलॉजी, युरेनियन अॅस्ट्रॉलॉजी म्हणा किवां पाश्चात्य होरारी तंत्रे किंवा आणखी अशा अनेक पद्धती आहेत पण त्या काही जगावेगळ्या नाहीत की कोणता चमत्कार नाही …
**** या पद्धती म्हणजे कोणताही शॉर्टकट नाही ***********
यातली कोणतीही पद्धत शिकायची असेल, आत्मसात करायची असेल , वापरायची असेल तर आधी मी सांगीतला तसा ‘ग्रह-तारे-नक्षत्रें-राशी-भाव- ग्रहयोग-गोचरी’ हा अभ्यास कमालीचा मजबूत असावा लागतो. अजून धड A B C D येत नसताना शेक्सपीयर ची दाढी धरण्यात काय अर्थ आहे !
पण बर्याच जणांना हेच उमगत नाही, ते बासरीवाल्याच्या हातातली बासरी मिळवण्याचा हट्ट धरतात!
आणि मग आज पारंपरीक , उद्या नक्षत्रपद्धती, तेरवा अष्टकवर्ग, मध्येच वर्गकुंडल्या, तिथे काही हाताला लागले नाही मग ‘चार पायर्यांचा गोंधळ घालायचा’ त्यानेही जमले नाही की ‘तीन आणि अर्धी पायरी, सहापदरी कार्येशत्व ‘ चा पदर धरायचा तिथेही काही जमले नाही की मग एखादा सब सब लॉर्ड वाला भाऊ पकडायचा त्याचे समजले नाही की कस्पल इंटरलिक्स च्या बासरीवाल्याच्या मागे धावायचे! तिथे निराशा झाली की ‘सर्वतोभद्र चक्र ‘ वाला कोण आहे का याचा शोध घेत फिरायचे ! आणि ‘नाडी ज्योतिष’ राहीलेच की !
हे इतके सारे घमेलेभर अंबोण बळेबळे अधाशा सारखे गिळत अजिर्ण का करुन घेता !
मुळात हे शास्त्रच अगम्य आहे, अफाट मेहेनत करुनही हाताला काही लागेल याची खात्री नाही ! या शास्त्राच्या मागण्या फार मोठ्या आणि वेगळ्या आहेत, एकवेळ अभ्यास करुन , मारुन मूटकून का होईना डॉक्टर , वकिल, इंजिनियर होऊ शकाल पण चांगला ज्योतिषी असाच तयार होत नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी काही गुण रक्तातच असावे लागतील; प्रथम आपल्यात ‘ते’ आहे का याचा शोध घ्या!आणि तसे ते नसेल तर बाकीचे सारे व्यर्थ आहे !
आणि त्या साठी प्रथम एक ‘आरसा’ मागवा !
शुभं भवतु