भविष्याचा असाही एक पडताळा!
सुमारे दोन अडीच वर्षे झाली असतील, एक मध्यमवयीन जोडपे माझ्या कडे ज्योतिष मार्गदर्शन घेण्या साठी आले होते. प्रश्न करियर आणि आर्थिक प्राप्ती संदर्भात होता. दोघंही एकाच क्षेत्रात पण स्वतंत्र पणे व्यवसाय करत होते. कोव्हिड काळात दोघांच्याही व्यवसायांना फटका बसला होता. कोव्हिड नंतर सारे जनजीवन सुरळीत झाले, बहुतांश व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाले तरी या उभयतांच्या व्यवसायाची घडी तेव्हा जी विस्कटली ती तशीच राहिली. आर्थिक अडचणी वाढल्या होत्या , डोक्यावरचे कर्ज पण वाढले होते, खूप काळजी होती.
त्या दोघांपैकी ‘श्रीं’ ना त्यांची पत्रिका अभ्यासून योग्य ते मार्गदर्शन केले, पण ‘सौ’ च्या बाबतीत, त्यांच्या पत्रिके नुसारची ट्रांसिटस आणि प्रोग्रेशन्स मधली ग्रहस्थिती काहीशी विचित्र दिसत होती. काही क्षण मी बुचकळ्यात पडलो होतो, शेवटी साऱ्यांचा साकल्याने विचार करून मी ‘सौ’ सल्ला दिला:
“तुम्ही आगामी २ – ३ वर्षे तरी नोकरी करा, दरमहा, निश्चित असे उत्पन्न देणारी नोकरी बघा , अगदी ‘कंत्राटी’ पद्धतीची नोकरी सुद्धा चालेल. या नोकरी निमित्त लांब अंतरावरचा प्रवास ही घडण्याची शक्यता पण दिसत आहे, तेव्हा नोकरी पाहताना ‘प्रवासाची शक्यता ‘ हा घटक विचारात घ्या किंवा त्याला प्राधान्य द्या’. ३ वर्षां नंतर काय करायचे त्याचा विचार आपण नंतर करूयात”
त्यांना आश्चर्य वाटले, इतकी वर्षे चाललेला व्यवसाय असा अचानक बंद करून नोकरी करणे कसे शक्य आहे, वयाचा विचार करता आता या वयात नोकरी तरी कशी मिळेल? त्यांनी ही शंका उपस्थित केली. आता अशा शंकांना ज्योतिषशास्त्रात उत्तर नसते, ज्योतिषशास्त्र मार्ग सुचवते पण तो कसा अंमलात आणायचा हे जातकाच्या हातात असते. कृती ही जातकानेच करायची असते.
मी सांगीतले…
“आता हे कसे जमवायचे ते तुम्ही पाहा, पण ग्रहांचा कौल हा असा आहे”
जातकाच्या पत्रिके नुसारची ट्रांसिटस आणि प्रोग्रेशन्स मधली ग्रहस्थिती हे सुचवत होती की आगामी काळात जातकाला ‘दरमहा, नियमित, स्थित म्हणजेच फिक्स्ड असे उत्पन्न मिळणार आहे, आता व्यवसायात असे दरमहा, स्थिर , निश्चित उत्पन्न कधीच मिळत नाही, अशा पद्धतीचे उत्पन्न फक्त नोकरीतच शक्य असते. हा विचार करूनच मी त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला होता.
ते जोडपे काहीसे रिरुत्साही होऊन निघून गेले.
त्या नंतर तब्बल दोन वर्षांनी अगदी अलिकडच्या काळात त्या जोडप्यातल्या ‘श्रीं’ नी संपर्क साधला, माझे पूर्वीचे भाकीत आश्चर्य कारक रित्या खरे ठरले होते!
त्याचे झाले असे…
माझा नोकरीचा सल्ला त्यांना फारसा रुचला नव्हता कारण तो अंमलात आणणे व्यावहारिक पातळीवर काहीसे अवघडच नव्हे तर अशक्य वाटत होते. त्या मुळेच असेल कदाचित त्यांनी नोकरी बद्दल फारसा विचार अथवा प्रयत्न असे काही केले नाही, व्यवसायच पूर्ववत चालू ठेवला होता. पण ग्रहांचे संकेत कसे अचूक असतात ते पहा . जातकाला अचानक एका संस्थे कडे काम करण्याचं संधी चालून आली, त्यात परदेशात राहून काम करायचे होते, दर महिन्याला स्टायपेंड स्वरूप वेतन ( शिष्यवृत्ती / स्कॉलरशिप) मिळणार होते. जातकाने ती ऑफर स्वीकारली, जातक सध्या परदेशात आहे, स्टायपेंड/ स्कॉलरशिप चे का असेना दरमहा नियमित उत्पन्न चालू आहे आणि हे अजून एक वर्ष भर तरी चालू राहणार आहे.
नोकरीतून नियमित उत्पन्न नसले तरी व्यवसाय न करता या ना त्या मार्गाने नियमित, फिक्स्ड असे उत्पन्न जातकाला मिळत आहे अगदी नोकरीत दरमहा पगार मिळावा तसे! ग्रहांनी हेच तर सांगितले होते ना?
अशा प्रकारची भाकिते करण्यासाठी पत्रिकेचा अत्यंत सखोल अभ्यास करावा लागतो, पारंपरिक ज्योतिषा बरोबरच, रेझर शार्प अंदाज देऊ शकणाऱ्या काही पाश्चात्त्य तंत्रांचा (डायरेक्शन्स, प्रोग्रेशन्स) पण अभ्यास करावा लागतो.
दोन चोपडी वाचून किंवा एखादा फडतूस क्लास लावून सहा महिन्यात अवगत होणारे हे शास्त्र नाही, अनेक वर्षांची मेहनत त्या मागे असते हे विसरू नका!
जय डायरेक्शन्स ! जय प्रोग्रेशन्स !
