काल रात्री विक्री केलेली सर्व पुस्तके तपासत होतो, श्री व.दा, भटांचे एक पुस्तक तपासले, पूर्वी या पुस्तकाची असंख्य पारायणे केली असतील, नंतर मात्र हे पुस्तक फारसे हाताळावे लागले नाही, आज ते पुस्तक हाताळताना त्यात वाचन खूण म्हणून ठेवलेला कागद दिसला, त्यात एक कुंडली आणि त्यावरचे माझे लहानसे टिपण होते आणि मला आठवले…
१९८७ ची गोष्ट आहे, मी पुण्यात जिथे कामाला होतो त्या कंपनीचे चे एक क्लायंट श्री xxxx चोरडिया, कामा निमित्त मी त्यांच्या कडे नेहमीच जात असे, आमच्या खूप गप्पा व्हायच्या, बोलण्याच्या ओघात मी ज्योतिषाचा अभ्यास करतोय असे बोलून गेलो, चोरडियाने लगेच त्याच जन्म तपशील देत ‘कुछ बतावो यार ..’ असे विचारलेच, अर्थात त्या वेळी माझा ज्योतिषाच्या अभ्यासाची नुकतीच सुरवात होती, मी काय सांगणार भविष्य ? पण फार आग्रह झाला म्हणून, काहीतरी थातुर मातुर , गुडी गुडी असे चार शब्द ऐकवले चोरडिया खुश मी पण खुश!
चोरडिया हा माझा ज्योतिषी म्हणून पहिला (फुकट्या) क्लायंट!
पण नंतर वेळ मिळताच त्या पत्रिकेचा जरा सखोल अभ्यास केला, माझ्या लक्षात आले की त्या पत्रिकेत एक कुयोग होता आणि त्याचे फळ हे ‘रथातून पडून मृत्यू’ असे होते! मी दचकलो, अर्थात हे काही मी त्या चोरडियाला सांगत बसलो नाही. पण त्याची नोंद एका कागदाच्या चिटोऱ्यावर केली होती आणि आज तोच कागद माझ्या हातात होता, पण धक्कादायक बाब तर पुढेच आहे!
पुढे १९९८ म्हणजे तब्बल दहा वर्षांनी इतर कामा साठी चोरडिया चे ऑफिस होते त्याच इमारतीत जावे लागले, चोरडिया ची आठवण आली, त्याला भेटावे म्हणून मी तपासले त्याचे ऑफिस अजून तिथेच होते, आत गेलो, रिसेप्शनिस्ट होती तिला म्हणालो मला चोरडियांना भेटायचे आहे, मी त्यांचा जुना मित्र आहे, तिने मला आत पाठवले खरे पण आत दुसराच चोरडिया होता, मी चक्रावलो,
मी म्हणालो “xxxx चोरडियांना भेटायचे आहे, त्यावर तो म्हणाला मी त्यांचा धाकटा भाऊ, मी म्हणालो “मग ते हे चोरडिया कोठे असतात?” “xxxx तर पाच वर्षा पूर्वीच गेला’ ‘गेला’ म्हणजे? ‘ कार अपघातात जागीच…”
मी सर्द झालो! xxxx च्या पत्रिकेतला कुयोग ‘रथातून पडून मृत्यू’ हा शब्दश: खरा ठरला होता! दहा वर्षा पूर्वी नोंद केलेली चिठ्ठी भटांच्या पुस्तकात वाचन खूण म्हणून शाबूत होती त्यात ही नवी नोंद केली आणि आज तब्बल २५ वर्षां नंतर तीच चिठ्ठी माझ्या हातात आहे.
‘रथातून पडून मृत्यू’ हे भाकीत मी चोरडियाला सांगितले नव्हते, ते भाकीत मी माझ्या पाशीच ठेवले होते , त्याचा हा आश्चर्य कारक पडताळा..
ज्योतिषशास्त्रातले काही योग हे असे ठणठणीत असतात, बंद्या रुपया सारखे वाजतात!
४० वर्षांत हजारों पत्रिकांचा अभ्यास केल्या नंतर माझ्या कडे असे असंख्य ठणठणीत वाजणारे बंदे रुपये जमले आहेत, ते सांगायचे आहेत, शिकवायची तयारी आहे, नुसती तयारी नव्हे तर तळमळ आहे पण माझे दुर्दैव हेच की हे घ्यायला कोणी तयार नाही, या रे फुकट शिकवतो म्हणालो तरीही नाही?
असो…