आजच्या संगणकाच्या आणि स्मार्टफोन / टॅबलेट्स च्या जमान्यात हाताने ‘लिहणे’ हा प्रकारच अगदिच कमी झाला आहे. मला मात्र लिहायला खूप आवडते आणि ते ही चांग़ला कागद, उत्तम दर्जाची शाई आणि अर्थातच तितक्याच तोलामोलाची लेखणी म्हणजेच ‘पेन’ वापरुन.
मी जेव्हा ‘पेन’ म्हणतो तेव्हा ते ‘फौंटनपेन’ असते, हे ‘फौंटनपेन’ बर्याच जणांच्या आयुष्यातून केव्हाच हद्दपार झाले आहे , नव्या पिढीला तर ते माहीती तरी असेल का ही शंका. पण बॉलपॉईंट, जॉटरपेन, रोलरपेन, जेलपेन ,फेल्टटिप्ड पेनअसे कितीही प्रकार आले तरी ‘फौंटनपेन’ ची बरोबरी त्यांना कधीच करता येणार नाही.
तुमच्यापैकी बर्याच जणांनी किमान शाळेत असताना फौंटनपेन वापरले असेल मात्र शाळा संपताच ‘फौंटनपेन’ ची साथ सुटलीही असेल, मी मात्र कायमच फौंटनपेन वापरत आलो आहे. मला आठवतयं शाळेत असताना माझ्याकडे ‘कॅमलिन’, ‘पेपरकवीन’, ‘चेलपार्क’ ,’हिरो’ यांची पेन्स होती, पुढे कॉलेजात असताना माझ्या कडे ‘क्रुझर’ चे नितांत सुंदर पेन होते. नोकरीला लागल्यानंतर त्या काळात परवडत नसताना सुद्धा मी ‘पार्कर 51’ घेतले होते, जे अगदि कालपरवा पर्यंत म्हणजे हरवले / चोरीस जाई पर्यंत मी वापरत होतो.
नंतरच्या काळात एक एक करत ‘शेफर’,’क्रॉस’,’वॉटरमन’, ‘म्वू ब्लांक’, ‘पार्कर–स्टर्लींग सिल्वर बॉडी’, ‘रतनम’ असा पेन्स चा संग्रह होत गेला.
जसा मूड (लहर) ,जसे लिखाण तसे मी कोणते पेन ,कोणती शाई ,कोणता कागद ते ठरवतो. शाई मध्ये मी ‘शेफर स्कीर्प -ब्रिलियंट ब्लॅक’, ’वॉटरमन – फ्लोरीडा ब्लू’, ‘पेलिकन 4001 वायोलेट’, ‘पेलिकन 4001 सेपीया ’, ‘चेलपार्क रेड’ तर ज्योतिष विषयक खास लिखाणासाठी ‘ सेलर’ जेंटिल एपीनार्ड‘ ‘हिरवी’ शाई वापरतो. कागद बहुतांश जेके एक्सेक्युटिव्ह बॉंड पेपर किंवा र्होडीया ची नोटपॅड्स (जी सध्या सहजासहजी मिळत नाहीत).
मे -जून 2014 ह्या दोन महिन्यात माझ्या पेन संग्रहात तब्बल आठ फौंटन पेन्स ची भर पडली.
यातली दोन पेन्स फक्त नविन आहेत आणि बाकीची सहा जुनी किंवा आपण ज्याला व्हिंटेज म्हणतो त्या गटातील.
सर्वप्रथम दाखल झाले ते नवे कोरे ‘शेफर 300’. या आधी बघितलेली, हाताळलेली शेफर पेन्स काहीशी नाजूक ,झिरो फिगर (शेफर टारगा) असताना अचानक पणे शेफर चे दणकेबाज ,रफ टफ ,कणखर हेवी मेटल- लॅकर ऑन ब्रास बॉडी, पेन दिसताच डोळ्याचे पाते लवायच्या आत खरेदी करण्यात आले. पेन राकट आहे, दणकट कमावलेले शरीर आहे , सगळा रोखठोक कारभार आहे, पण त्यासर्वात एक कमालीचा मर्दानी गोडवा आहे , एक खानदानी आदब आहे, काही झाले तरी ते ‘शेफर’ आहे भौ! निब स्टील मध्ये आहे मिडीयम पॉईंट आहे, बटर स्मूथ आणि कमालीचे डौलदार , रुबाबदार पेन. का कोणास ठाऊक पण हे पेन पाहताच मला जुन्या ‘जावयाची जात’ या चित्रपटातले कुर्रेबाज कुलदिप पवार आठवतात!
दणकेबाज शेफर 300 माझ्या सध्याच्या ‘डार्लिंग डार्लिंग’ पेन ‘नारंजा’ बरोबर , नारंजात सध्या पेलिकन 4001 व्हायोलेट ईंक आहे , त्यामुळे ही गुलनार नार मजेत आहे !
रतनम चे एक हॅन्डमेड एबोनाईट पेन माझ्या संग्रहात पूर्वीपासुनच आहे पण ते मला ईतके आवडते की दुसर्या रंगाच्या शाईने लिहायला सोपे जावे म्हणून मी अजून एक रतनम 302 पेन खरेदी केले. रतनम ची पेन्स म.गांधी, नेहरु, ईंदिरा गांधी, डॉ राजेंद्रप्रसाद सारख्या महान व्यक्तींनी वापरली आहेत , यातच सर्व काही आले!
वरच्या काही फटूत ब्यॅकग्राऊंड ला दिसतेय ते माझे हस्ताक्षर ! तसे कुत्र्या मांजराच्या पायांसारखेच आहे पण लोक उगाचच छान आहे छान आहे म्हणतात झाले.
आता आजचा मुख़्य शो : व्हिंटेज पेन्स!
व्हिंटेज पेन्स ची नजाकत, शान काही वेगळीच ! 40/50/60/70 वर्ष झालीत यांना अगदी माझ्या जन्माच्याही कितीतरी आधीची आहेत ही पेन्स पण अजून आपला रुबाब टिकवून आहेत.
ही पेन्स जेव्हा बनली तो आजच्या सारखा ‘ईंस्टंट’ ‘युज अॅन्ड थ्रो’ चा जमाना नव्हता तेव्हा जे काही तयार करायचे ते जान ओतुन , कारीगरीचा एक सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून , दोन तीन पिढ्या टिकेल असे कणखर! मशिन्स चा वापर तेव्हाही काही प्रमाणात होत असला तरीही, मानवी हाताने करण्या सारखे बरेच काही शिल्लक होते, मेहेनत होती , सचोटी होती आणि कामावर निष्ठा होती, सर्वात महत्वाचे म्हणजे मी जे काही करेन त्याचा मलाच काय पण माझ्या पुढच्या पिढीलाही अभिमान वाटला पाहीजे ही पक्की धारणा होती.
ही व्हिंटेज पेन्स जेव्हा मी घरी आणली तेव्हा एखाद्या वूद्धश्रमातल्या अडग़ळीत पडलेल्या आजोबांना घरी आणल्या वर त्यांच्या चेहेर्यावर जे हास्य फुलेल तसे काहीसे या पेन्स च्या बाबतीत झालेले मला दिसले. स्वच्छ पाण्यात रात्र भर भिजवले, मग हळुवार पणे एकेक भाग पुसुन वाळवला, सुंदर शाई भरली आणि मंडळी रंगात आली, पुन्हा हसू खेळू लागली.
ही पेन्स मी जेव्हा हातात घेतो तेव्हा माझ्या आजोबांचा हात हातात धरलाय असे वाटते, या पेनांनी लिहताना सतत माझे आजोबा माझ्या अवती भोवती वावरताहेत असे वाटते, चांगले लिहले तर पाठीवर शाबासकीची थाप पडेल याची खात्री आहे अणि वाईट उपयोग केला तर दणका बसेल याचा धाक पण आहे.
या महिन्यात मिळालेली व्हिंटेज पेन्स:
सर्व प्रथम सिनियर मोस्ट, दुर्मिळ अशी एक प्रकारच्या सेल्युलॉईड मध्ये बनवलेली पार्कर वॅक्युमॅटीक ची जोडी, 14 कॅरेट सोन्याच्या निब सहित.
यातले जे हिरवे पार्कर वॅक्युमॅटीक आहे ते 1944 साली बनले आहे , ब्लू डायमंड क्लीप, सिंगल ज्वेल, 14 Ct Solid gold fine Nib’ अगदि इमाक्युलेट / प्रिंस्टाईन स्थितीतले !
दुसरे ब्राऊन पार्कर वॅक्युमॅटीक आहे ते 1946 साली बनले आहे,सिंगल ज्वेल, 14 Ct Solid gold dual tone fine Nib.
आज उणीपुरी 70 वर्षाची आहेत ही पेन्स पण अजूनही ऐन जवानीतल्या देवआनंद सारखी देखणी आणि तरणीबांड दिसतात , आणि त्यांची निब्स , काय सांगू राव! काही झाले तरी 14 कॅरेट सोन्याचे निब – ‘जो लिखे वही जाने’ !
बर्याच जणांना वाटते की हे 14 कॅरेट सोन्याच्या निब म्हणजे नुस्ते श्रीमंती चोचले आहेत पण तसे नाही, सोने हा धातू कमालीचा लवचिक असल्याने, लिहताना निब वर जो कमी अधिक दाब पडतो व त्याला कागदाकडून जी एक प्रतिक्रिया मिळते त्या सर्वांना हे 14 कॅरेट सोन्याचे निब स्वत:च्या अंगभूत लवचिकपणामुळे सामाऊन घेते त्यामुळे लिहताना एक अत्यंत सुखद अनुभव येतो. (जसे आपल्या वाहनाचे शॉक अबसॉर्बर – ते जितके चांगले तितका प्रवास सुखकारक ) सामान्यपणे आढळणार्या स्टेनलेस स्टिल च्या निब मध्ये हा लवचिक पणा नसतो आणि असल्यास तो अगदि कमी असतो, त्यामुळे कोठे तरी विसंवाद निर्माण होतो. शिवाय सोने गंज प्रतिबंधक आहे, रसायनचा त्याच्यावर अत्यल्प प्रभाव पड्तो (शाई म्हणजे एक रसायनच तर असते),त्यामुळे सोन्याची निब वर्षानुवर्षे उत्तम टिकतात ,अगदि नव्या सारखी!.
नंतर दाखल झाले ते 1981 चे ‘पार्कर 45 सर्कलेट’ . ‘पार्कर 45′ तशी बरीच आहे , असंख्य प्रकारात ती बनवली गेली पण ‘पार्कर 45 सर्कलेट’ फक्त एका वर्ष भरच बनली गेली, उत्पादन खर्च जास्त वाटल्याने पार्कर ने ‘पार्कर 45 सर्कलेट’ बनवायचे थांबवले. त्यामुळेच ही पेन्स लिमीटेड एडीशन झाली, त्यामुळेच फार दुर्मिळ , क्वचित कोणीतरी ते विकायला काढते. हे पेन ‘एक्स्ट्रा फाईन ‘ निब मध्ये आहे, ‘एक्स्ट्रा फाईन असूनही लिखावट लोण्यासारखी मुलायम आहे , हु की चु नै ! आणि देखणेपणा तो काय सांगावा !
मैं शायर तो नहीं, मगर ऐ हसीं
जब से देखा मैंने तुझको, मुझको शायरी आ गयी
मैं आशिक तो नहीं, मगर ऐ हसीं
जबसे देखा मैंने तुझको, मुझको आशिकी आ गयी”
त्यापाठोपाठ मिळाली ती 1971 मध्ये बनलेली पार्कर 25 फायटर ची जोडी. ग्रीन ट्रिम व ब्लू ट्रिम !
पार्कर 25 फायटर ब्लू व ब्लॅक ट्रिम मधे तशी बरीच आढळतात पण मला गवसलेले हे पार्कर पी-25 ग्रीन ट्रिम तसे दुर्मिळ, जवळजवळ लिमीटेड एडीशन कॅटेगेरी मध्ये मोडू शकेल असे.
पार्कर पी-25 ब्लॅक ट्रिम तर एक्स्ट्रा फाईन मध्ये आहे. दोन्ही पेन्स ‘मिंट’ कंडिशन मध्ये आहेत , आणि लिखाण तर कागदाला पेनाचा स्पर्श होतोय की नाही याची शंका यावी असे!
प्यार का नाम, मैंने सुना था मगर
प्यार क्या है, ये मुझको को नहीं थी खबर
मैं तो उलझा रहा, उलझनों की तरह
दोस्तों में रहा, दुश्मनों की तरह
मैं दुश्मन तो नहीं, मगर ऐ हसीं
जबसे देखा मैंने तुझको, मुझको दोस्ती आ गयी
शेवटचे पेन , पार्कर 45 फायटर ब्रश्ड क्रोम बॉडी आणि गोल्ड ट्रिम्स. मिडियम निब चे हे पेन एखाद्या उत्साहाने खळाळणार्या शेलाट्या तरुणी सारखे दिसते !
हे पेन म्हणजे ना.सी.फडक्यांच्या कादंबर्यातली एखादि ‘अलका’,’कुमुदिनी, ‘शरयु’, ‘ललिता’ ! आजही तितकीच फ्रेश , टवटवीत वाटते.
आता ना.सी.फडके कोण ते विचारु नका, लिहण्या बरोबरच वाचन ही हद्दपार झाले आहे आणि ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्स अप’ च्या पलिकडे वाचण्यासारखे काही आहे हे तरी सांगण्यात काय अर्थ आहे म्हणा!
सोचता हूँ अगर मैं दुवां मांगता
हाथ अपने उठाकर मैं क्या मांगता
जबसे तुझसे मोहब्बत मैं करने लगा
तबसे जैसे इबादत मैं करने लगा
मैं काफ़िर तो नहीं, मगर ऐ हसीं
जबसे देखा मैंने तुझको, मुझको को बंदगी आ गयी “
शुभं भवतु
very best
श्री. अविनाशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
आपला
सुहास गोखले
सुहासजी,
आता जरा विरंगुळा म्हणून तुमचे फौंटन पेन्स संबधी लेख वाचत होतो परत वाचताना पण नव्यासारख वाटत.
तुम्ही हि फौंटन पेन्स कशी जमा केलीत ह्या संबधी लेख वाचायला आवडेल.
संतोष सुसवीरकर
धन्यवाद श्री संतोषजी
फौंटन पेन्स ची मला आवड आहे, मी बरीचशी पेन्स मुंबई , बेंगलोर, हैद्राबाद , चेन्ने इथून मिळवली आहेत. या मोठ्या शहरांत अशी पेन मिळणारी दुकानें असतात. माझ्या सारखेच अशी आवड असलेले अनेक मित्र जोडले आहेत त्यांचा कडून माहीती मिळते .
सुहास गोखले