लहान शुन्य आणि मोठे शुन्य

फार फार वर्षा पुर्वी हे शिर्षक असलेला एक लघु निबंध वाचला होता, लेखकाचे नाव दुर्दैवाने लक्षात नाही पण बहुदा कै. अनंत काणेकर यांनी तो लिहला होता असे मला पुसटसे आठवते. त्या अज्ञात लेखकाचे (किंवा लेखिकेचे) मनापासुन आभार मानून त्या लघु निबंधाची एक संक्षिप्त आवृत्ती आपल्या समोर ठेवत आहे.

…..

१९३० चे दशक , मुंबईला गोविंदराव नामक गृहस्थ एका ‘भंगार विक्री ‘ करणार्‍या एका व्यापार्‍या कडे कारकुनी करत होते. आता कारकुनाला पगार तो काय असणार त्यात घरी बायको, चार मुले , आई वडील, धाकटा भाऊ आणि मुंबई म्हणल्या नंतर सतत घरात असलेला पै-पाहुणा, असा १०-१२ माणसांच्या संसाराचा गाडा ओढताना गोविंदराव अगदी मेटाकुटीला यायचे. महीन्याला ४० रुपये अशी पगाराच्या रुपाने जी काही आमदानी व्हायची ती महीना अखेर कशी संपून जायची हे त्यांना कळायचेच नाही.

इतके मर मर राबून शेवटी बाकी काय तर ‘ शुन्य ‘ !

१९३८ साल उजाडले  आणि दुसर्‍या महायुद्धाचे ढग घोंगावू लागले आणि बघता बघता एक महायुद्ध पेटले. त्या काळी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता , एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताचा या महायुद्धात सहभाग नसला तरी या महायुद्धाचा भारतावर मोठा परिणाम झाला. महागाईचा भडका उडाला , सगळ्या गोष्टींची टंचाई झाली, पैशाला पासरी मिळणारे धान्य आता भल्याभल्यांच्या आवाक्या बाहेर गेले. रेशनच्या पसाभर धान्या साठी लोक तासनतास रांगेत उभे राहू लागले.

गोविंदरावांना तर मरण बरे असे वाटू लागले , आता आपले कसे होणार याचा गोविंदरावांना घोर लागला, आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले.

पण कोणाचे दिवस कसे पालटतील हे कोण सांगावे? अगदी तसेच झाले आणि ध्यानी मनी नसताना गोविंदरावांचे दिवस पालटले !

या महायुद्धा मुळे एक झाले , युद्धा साठी बंदुका , रणगाडे, तोफा, विमाने बनवण्या साठी लोखंड, पितळ, तांबे या सर्व धातुंची मागणी कमालीची वाढली, त्याचाच परिणाम म्हणुन या धातुंच्या भंगाराला सोन्याचे मोल आले! बाजारात जेव्हढा पुरवठा होता त्याच्या शेकडो पटींनी मागणी येऊ लागली, भंगार मालाचे व्यापारी मालामाल झाले , पैशाच्या राशीत लोळु लागले!

गोविंदराव ही धामधूम पाहात होते आणि एके दिवशी ‘ते’ अघटीत घडले !

एक कारकून म्हणून का असेना त्यांनी अनेक वर्षे त्या भंगाराच्या व्यवसायात काम केले होते, त्या व्यवसायाची त्यांना खडानखडा माहीती होती.  तेव्हा आपण या धंद्यात का उडी मारुन हात धुवुन का घेऊ नये असा धाडसी विचार त्यांच्या मनात डोकावला ! एरवी असा विचार त्यांनी हसण्या वारी नेला असता पण आजची परिस्थिती फारच वेगळी होती म्हणा किंवा गोविंदरावांचे सगळे ग्रह एकदम शुभ झाले म्हणा , गोविंदरावांनी कसलाही विचार न करता नोकरीचा राजीनामा टाकून या व्यवसायात उडी घेतली.

तो काळच असा धामधुमीचा होता की व्यापाराची कोणतीही पार्श्वभुमी नसताना , एक छदाम देखील भांडवल हातात नसताना केलेले हे धाडस यशस्वी ठरले. म्हणतात ना ‘अगर खुदा मेहेरबान तो गधा भी पेहेलवान’ तसेच झाले आणि वर्ष दीड वर्षात कारकुन गोविंदरावांचा चक्क गोविंद शेठ झाला !

आता गोविंदराव पण  पैशात लोळू लागले, आर्थिक सुज वाढत गेली. चाळीतली टीचभर जागा सोडून गोंविंदराव आणि फ्यॅमीली आता एका मोठ्या प्रशस्त घरात राहात होते, नोकरचाकर , गाडी , सारी सुख वैभवे पायाशी लोळण घेऊ लागली. गोविंदरावांना तर आता  पैसे मोजायला देखील वेळ होत नव्हता !

पण ‘अच्छे दिन’  आले तसे गेले ..

१९४५ साल उजाडले, आता पर्यंत अजेय असलेल्या जर्मनीला पराभवाचे तडाखे बसायला लागले आणि बघता बघता हिटलर च्या बलाढ्य जर्मनी ला हार स्विकारावी लागली आणि पाठोपाठच दोन अणु बॉम्ब चा तडाखा मिळालेल्या जपान ने पण गुढगे टेकत शरणागती पत्करली. पाच सहा वर्षे चालू असलेले महायुद्ध अखेर संपले.

महायुद्धाच्या ज्वाळा जशा जशा विझायला लागल्या तशी तशी  लोखंड, पितळ, तांबे या सर्व धातुंची मागणी एकदम कमी झाली नव्हे तर चक्क थांबलीच !

महायुद्ध असे संपेल आणि भंगारची मागणी अशी एकदम नाहीशी होईल याचा पुसटसा सुद्धा अंदाज गोविंदरावांना आला नाही. पिढ्यान पिढ्या व्यापारात असलेल्या भंगारमालाच्या धूर्त व्यापार्‍यांनी युरोप मधून येणार्‍या बातम्यांवर बारकाईने लक्ष ठेवून , काळाची पावले वेळीच ओळखून ह्या भंगार मालाच्या व्यवसायातून केव्हाच अंग काढून घेतले होते , फसले ते अनुनभवी गोविंदराव !

एका रात्रीत त्यांचा भंगाराचा व्यवसाय धुळीस मिळाला. चांगला नफा होईल या आशेने अवाच्यासव्वा भाव मोजुन घेतलेल्या भंगाराचे प्रचंड ढीग आता कवडी मोलाने ही विकले जात नव्हते. गोविंदराव भांबावले, काय करावे हे त्यांना सुचेना!

फक्त काही महीन्यां पुर्वी , पैसे मोजायला देखील वेळ नसलेल्या गोविंदरावांना आता आढ्या कडे डोळे लावून , माशा मारायची वेळ आली होती. कोणताही पुढचा विचार न करता बेदरकार पणे वाढवून ठेवलेला मोठा पसारा आता त्यांना पेलण्याच्या पलीकडे होता.

त्याच वेळा त्यांना एक विदारक सत्य जाणवले की , त्या पाच सहा वर्षांच्या काळात अमाप पैसा मिळाला तरी उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ न घालता बेदरकार खर्च करत राहील्याने डोक्यावर मोठे कर्ज ही झाले. आता ते सारे कर्जदार गोविंदरावांना सतावू लागले .

लक्ष्मी आली तशी गेली, शेवटी स्वत: जवळचे होते ते सर्व काही विकून गोविंदरावांनी सारी कर्जे चुकवली खरी पण त्यात ते आणि त्यांचे आत्ता पर्यंत वैभवात लोळणारे कुटूंबिय अक्षरश: उघड्यावर आले.

गोविंदरावांनी हिशेब केला … बाकी निघाली ‘शुन्य ‘ !

काही वर्षां पूर्वी महीना ४० रुपयात कशीबशी गुजराण करताना गोविंदरावंच्या हातात एक ‘शुन्य’ होते

आणि

आज लाखोंची उलाढाल करुन देखील गोविंदरावंच्या हातात एक ‘शुन्य’ होते !

दोन्ही शुन्येच ! त्यात काय फरक करणार ? पण एक शुन्य लहान होते आणि दुसरे मोठे होते असे म्हणायचे का ?

आपला काय विचार आहे?

शुभं भवतु

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *