सलिल चे घर !
१९ डिसेंबर २०१६, संध्याकाळ चे सहा वाजले होते, त्या दिवसातली माझी शेवटची ‘भेटीची वेळ’ सलिलची होती.
सलिल ला घर घ्यायचे होते तो योग केव्हा आहे हे बघायचे होते. सलिलने गेल्याच वर्षी एक घर घेतले होते पण काही कौटुंबिक समस्यां मुळे त्याला दुसरे घर घेऊन तिथे राहायला जाणे भाग आहे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. अगदी थोड्या कालावधीतच दुसरे घर त्यामुळे हा प्रश्न तपासायाला जन्मकुंडली पेक्षा प्रश्नकुंडलीच मला जास्त योग्य वाटली.
सलिल या पूर्वी एका कृष्णमुर्ती पद्धती अभ्यासका कडे जाऊन आलेला असावा कारण त्याला प्रश्नकुंडली, १ ते २४९ मधला होरारी क्रमांक इ. बद्दल माहीती होती.
सलिल आल्या आल्या लगेच होरारी क्रमांक न घेता मी थोडे इकडचे तिकडचे बोलून काही वेळ जाऊ दिला, हे करावे लागते कारण जातक आल्या आल्या लगेच प्रश्नकुंडली साठी क्रमांक घेऊ नये. कुठुन कुठुन लांबून जातक आलेला असतो, वाहन चालवण्याचा मानसीक थकवा, रस्त्यातले खड्डे, धुळ, धुर गोंगाट, अपरिहार्य असलेला ‘वाहतुकीचा खोळांबा’ या सार्यांमुळे नाही म्हणले तरी मनावर आणि शरीरावर बराच ताण आलेला असतो. प्रश्नकुंडली साठी क्रमांक घेताना जातकाचे शरीर व मन दोन्हींही स्वस्थ असणे अत्यंत जरुरीचे असते. त्यामुळे आल्या वर जातकाला शिथील व्हायला वाव देणे, जरा इकडचे तिकडचे बोलून वातावरण तणाव मुक्त करणे गरजेचे असते. तसेच या अवांतर बोलण्यातूनही जातकाचे व्यक्तिमत्व, बोलण्याची शैली, देहबोली (Body language) यावरुन आपल्याला बरेच अंदाज बांधता येतात, जातक कोणत्या परिस्थितीत आहे याचाही अंदाज येतो. याचा ग्रह, भाव, ग्रहयोग यांचा व्यक्ती-स्थळ-काळ-परिस्थिती सापेक्ष अर्थ लावायला खूपच चांगला उपयोग होतो. या बोलण्यातून (सुचकपणे विचारलेल्या प्रश्नां मधुन !) जातकाला प्रश्ना बाबत किती तळमळ आहे ते पण तपासता येते!
असो.
सलिल ने मनात ‘माझे घर कधी होईल’ असा प्रश्न घेऊन क्रमांक दिला: १२९.
काही तर्कट शास्त्री नक्षत्रशिरोमणी जातकाने दिलेल्या क्रमांका वरुन काहीबाही तर्क करत बसतात त्याला काहीही अर्थ नाही. जातकाने दिलेल्या क्रमांका वरुन असले काही तर्कट रचणे वेडगळ पणाचे आहे. या क्रमांकाचा प्रश्नकुंडलीतला ‘लग्न बिंदु’ ठरवण्या पुरताच ऊपयोग करावयाचा असतो, बाकी कशालाही ह्या क्रमांकाचा उपयोग नाही.
हा होरारी क्रमांक वापरुन बनवलेली प्रश्न कुंडली (होरारी चार्ट) बनवली , ती अशी.
दिनांक: १९ डिसेंबर २०१६, सोमवार, वेळ: १८:२२:५८ , स्थळ: गंगापुर रोड , नाशिक, अयनांश: न्यू के.पी. २४:००:१४
प्रश्न आहे : सलिल चे घर होणार का? (सलिलच्या नावावर एक घर नुकतेच झाले असले तरी इथे (विवाहाच्या प्रश्ना सारखे) पहीले / दुसरे असा भेद करण्याची आवश्यकता नाही)
वास्तुयोगा साठी प्रश्नकुंडलीतली खालील स्थाने महत्वाची असतात:
४ : वास्तु
११: ईच्छा पूर्ती.
१२: व्यय स्थान (घर काही फुकट मिळत नाही , चांगले पैसे मोजावे लागतात तेव्हा व्ययस्थानाचा विचार होणे आवश्यक)
यात सुख स्थान (४) हे मुख्य (Principle) मानले जाते.
या जोडीला आपल्याला इतर पुरक भावांचाही विचार करावा लागतो:
आपण जागेचा व्यवहार ज्या व्यक्तीशी करतो ती व्यक्ती सप्तम (७) स्थाना ने दर्शवली जाते. जागा विकणार्याच्या ताब्यात असल्याने ती त्याची मालमत्ता असते , त्यामुळे सप्तमाचे चतुर्थ (४) स्थान म्हणजे दशम (१०) हे त्या वास्तुचे स्थान झाले, आता जेव्हा विकणारा जागा विकतो तेव्हा ती जागा त्याच्या ताब्यातून जाते (अर्थात त्याला त्याचे पैसे मिळालेले असतात हा भाग वेगळा) म्हणजे त्या ‘जागे’ चे व्ययस्थान म्हणजेच नवम (९) स्थान सक्रिय असावे लागते. हे स्थान सक्रिय नसेल तर विकत घेतलेल्या जागेचा ताबा खरेदी करणार्याला मिळणार नाही.
आजकाल घराची खरेदी पुर्णपणे स्वत:च्या पैशातून होणे जर अवघडच त्यामुळे कर्ज घेणे आवश्यक , त्या दृष्टीने ६ व २ ही स्थाने पण विचारात घ्यावी लागतात.
जागेचा संदर्भ असल्याने शनी आणि मंगळाचा विचार करणे सयुक्तिक असले तरी प्रश्नकुंडली साठी असा विचार आवश्यक नाही, जन्मकुंडली असेल तर जरुर मंगळाची साक्ष काढावी .
प्रश्न कुंडली आहे आणि जातक समोरच बसला आहे, प्रश्न विचारता क्षणाचे ग्रहमान आहे , तेव्हा हा चंद्र काय म्हणतो ते प्रथम पाहूयात. जर प्रश्न खर्या तळमळीने विचारला असेल तर बहुतांश वेळा चंद्र जातकाच्या मनातला प्रश्न दाखवतो , म्हणजे चंद्राचे कार्येशत्व हे जातकाने विचारलेल्या प्रश्नाशी निगडीत असते. चंद्र प्रश्ना संबधीतल्या मुख्य किंवा पुरक भावांचा कार्येश असतो. जर चंद्र अशा पद्धतीने कार्येश होत नसेल तर तीन शक्यता असतात.
- जातकाने खर्या तळमळीने प्रश्न विचारलेला नाही.
- जातकाच्या मनात काहीतरी वेगळेच आहे, प्रश्न भलताच विचारला आहे किंवा जातकाला त्याचा प्रश्न व्यवस्थित शब्दबद्ध करता आलेला नाही.
- ही वेळ जातकाच्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासाठी अनुकूल नाही.
जातकाची तळमळ नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर देत बसू नये, गोड बोलून जातकाची बोळवण करावी.
चंद्राच्या कार्येशत्वा वरुन प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात काय घोळते आहे याचा अंदाज येतो, जर जातकाचा प्रश्न आणि चंद्राचे कार्येशत्व यांच्या फारसा मेळ दिसत नसेल तर पुरेसा खुलासा करुन घ्यावा. आपल्या समस्या/ प्रश्न नेमक्या / समर्पक भाषेत , मुद्देसुद पणे मांडणे सगळ्यांनाच जमेल असे नाही तेव्हा जातकाला प्रश्न विचारुन , प्रश्ना मागची पार्श्वभुमी समजाऊन घेणे महत्वाचे असते , शब्द रचना जराशी बदलली तरी प्रश्नाचा रोख बदलू शकतो आणि त्यामुळे प्रश्नकुंडलीतला कोणता भाव महत्वाचा हे ठरवताना चुक होऊ शकते!
काही जातक भिती, अज्ञान, संकोच , दडपण अशा अनेक कारणांमुळे मनातला नेमका प्रश्न विचारायला कचरतात, आडवळणें घेतात हे लक्षात घेऊन , जातकाला आश्वस्त करुन , धीर देऊन, बोलते करुन त्याचा खरा प्रश्न काय आहे , नेमकी दुखरी नस कोणती आहे हे जाणून घेणे अत्यावश्यक असते.
चंद्राचा मेळ बसत नसला आणि बाकी सारा अविर्भाव प्रामाणीक वाटला तर जातकाला त्याचे मन त्याच्या प्रश्नावर एकाग्र करायला सांगून पुन्हा एकदा नवा होरारी क्रमांक मागून घ्यावा. हा ही प्रयत्न विफल झाला तर त्यावेळी जातकाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ नये, कदाचित ‘प्रश्नाचे उत्तर मिळण्याची ही वेळ नसावी’ , जातकाला तसे समजाऊन सांगून , नंतर कधीतरी प्रश्न विचारायला सुचवावे.
तळमळीने प्रश्न विचारणे आणि समोर चांगला ज्योतिषी असणे हे जरी अत्यावश्यक असले तरी काही वेळ नियतीचीच ईच्छा नसते की जातकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे, त्यामुळे असेल कदाचित पण काही वेळा चंद्र प्रश्नाचा रोख दाखवू शकत नाही. त्याच बरोबर त्या प्रश्न / समय कुंडलीतही तसे काही योग दिसतात , ते ही बाब अधोरेखीत करतात (ते कोणते योग या बद्द्ल नंतर कधी तरी).
मात्र चंद्राची ही अशी साक्ष काढायची असेल तर प्रश्न विचारता क्षणीच कुंडली मांडली गेली असली पाहीजे. जर प्रश्न विचारण्याची वेळ आणि प्रत्यक्षात कुंडली मांडली ती वेळ यात अंतर असेल ( १५ मिनिटां पेक्षा जास्त) तर मात्र ही चंद्राची साक्ष घेण्यात काही अर्थ नाही.
चला तर मग, या सलिलचा चंद्र काय म्हणतो आहे ते !
चंद्र: लाभात (११), चंदाची कर्क राशी दशम स्थानी (१०), चंद्र शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र सुख स्थानात (४), शुक्र अष्टमेश (८) आणि लग्नेश (१) , म्हणजे चंद्राचे एकंदर कार्येशत्व असे असेल .
चंद्र: ४ / ११ / ८ , १ / १०
चंद्र वास्तु खरेदी संदर्भातल्या सुख स्थानाचा (४) स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे, तसेच तो पुरक अशा लाभ स्थानाचा (११) ही कार्येश आहे, म्हणजे प्रश्न कुंडली जातकाच्या प्रश्नाचा रोख अगदी बरोबर दाखवत आहे. प्रश्न तळमळीने विचारला आहे, प्रश्न विचारायची वेळ ही बरोबर निवडली गेली आहे, ही कुंडली आपल्याला सलील चे घर होईल का याचे उत्तर शोधण्यास निश्चित मदत करु शकेल.
आता, सलिलचे घर होणार का नाही हे आपल्याला प्रश्ना संदर्भातल्या प्रमुख भावाचा म्हणजेच सुखस्थानाचा (४) सब सांगणार आहे.
या सुख स्थानाचा (४) सब आहे बुध.
हा असा सब बघताना एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची म्हणजे हा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा. तो सब स्वत; वक्री असला तरी चालेल. जर मुख्य भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर प्रश्ना मध्ये अपेक्षित असलेली घटना घडणार नाही. मग पुढे जाऊन पत्रिकेचे विष्लेषण करायची आवश्यकता नाही. अपेक्षीत घटना घडणार नाही म्हणजे ती जातकाच्या आयुष्यात कधी घडणार नाही असा अर्थ अजिबात घ्यायचा नाही. ही प्रश्नकुंडली आहे , जी साधारणे पणे सहा महीन्या पर्यंतचा वेध घेऊ शकते त्यामुळे येत्या सहा महीन्यात घटना घडणार नाही असा अर्थ घ्यायचा , म्हणजे कदाचित सहा महिन्यानंतर घटना घडू ही शकेल पण त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही इतकेच.
दुसरा तपासणीचा मुद्दा, हा सब प्रश्ना संदर्भातल्या भावसमुहातल्या एकातरी भावाचा कार्येश असातलाच हवा.तसा तो नसेल तर प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे असे समजावे, म्हणजेच नजिकच्या काळात तरी प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडणार नाही . असे झाल्यास इथेच थांबावे , पुढचे विष्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही.इथेही अपेक्षीत घटना घडणार नाही म्हणजे ती जातकाच्या आयुष्यात कधी घडणार नाही असा अर्थ अजिबात नाही. प्रश्नकुंडली साधारणे पणे सहा महीन्या पर्यंतचा वेध घेऊ शकते त्यामुळे येत्या सहा महीन्यात घटना घडणार नाही असा अर्थ घ्यायचा , म्हणजे कदाचित सहा महिन्यानंतर घटना घडू ही शकेल पण त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही इतकेच.
सुखस्थानाचा (४) सब बुध आहे, बुध स्वत: वक्री आहे आणि तो शुक्राचा नक्षत्रात आहे, आणि शुक्र मार्गी आहे. ‘प्रश्नाच्या संबधीत प्रमुख भावाचा सबलॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा’ हा नियम पाळला जात आहे.
बुध: त्रितिय स्थानात (३), बुधाच्या राशीं नवम (९) आणि व्यय (१२) स्थानी, बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र सुखस्थानात (४), शुक्र लग्नेश (१) आणि अष्टमेश (८) म्हणजे बुधाचे कार्येशत्व असे असेल .
बुध: ४ / ३ / १ , ८ / ९ , १२.
हा बुध एका विषेषाधिकाराने आणखी एका म्हणजे षष्ठम (६) स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश होतो आहे !
हा नियम मी माझ्या पूर्वीच्या लेखां (Case studies) मधुन सविस्तरपणे सांगीतला आहे तरी ही आपल्या माहीती साठी तो विषेषाधिकाराचा नियम पुन्हा सांगतो:
या पायरीवर मी आपल्याला के.पी. मधला एक अत्यंत महत्वाचा नियम सांगणार आहे, कृपया त्याच्या कडे लक्ष द्यावे.
कुंडली तयार होताच ज्या भावात कोणताही ग्रह नाही असे भाव व ज्या ग्रहांच्या नक्षत्रात कोणी ग्रह नाही असे ग्रह यांची ताबडतोब दखल घ्या. ते ग्रह व भाव काळजीपूर्वक तपासा. ही अत्यंत महत्वाची पायरी आहे. विसरु नका. याचे कारण म्हणजे एक महत्वाचा नियम:
एखाद्या भावात कोणताही ग्रह नसेल आणि त्या भावाच्या अधिपतीच्या नक्षत्रात ही कोणी ग्रह नसेल तर भावाधिपती जो एरवी त्या भावाचा ‘ड’ दर्जाचा कार्येश असतो तो आता एकमेव बलवान कार्येश होतो. जेव्हा एकाद्या भावासाठी एकच एक कार्येश ग्रह असतो तेव्हा त्या भावाच्या अधिपती ग्रहाच्या उपनक्षत्रातले ग्रह त्या भावाचे कार्येश होतात व त्यांचा दर्जा हा भावाधिपती पेक्षाही वरचा असतो.
या प्रश्नकुंडलीतल्या षष्ठम (६) स्थाना कडे जरा लक्ष द्या:
या स्थानात एकही ग्रह नाही,भावाधिपती गुरु आहे आणि गुरुच्या नक्षत्रांत एकही ग्रह नाही म्हणजे गुरु हा षष्ठ्म स्थानाचा एकमेव कार्येश होतो.
षष्ठ्म स्थान : —-/—–/—-/ गुरु
मघाचा नियम आता वापरायला लागणार , तेव्हा भावाधिपती गुरु कोणाचा सब आहे ते बघायचे (म्हणजेच कोणता ग्रह गुरुच्या सब मध्ये आहे ), सोबत दिलेल्या तक्त्यात बघितले तर आपल्या लक्षात येईल की, (फक्त) बुधाचा सब गुरु आहे , म्हणजेच गुरु बुधाच्या सब मध्ये आहे. याचा अर्थ बुध षष्ठ्म स्थानाचा कार्येश होणार इतकेच नव्हे तर गुरु जो भावाधिपती म्हणून षष्ठ्म स्थानाचा कार्येश आहे त्याच्या ही वरच्या दर्जाचा कार्येश होणार.
( पण समजा इथे तर एक ही ग्रह गुरुच्या सब मध्ये नसेल तर? अशा वेळी सब सब पातळी वर तपासायचे म्हणजे कोणता ग्रह गुरु च्या सब सब मध्ये आहे ते तपासायचे. गुरुच्या सब-सब मध्येपण ग्रह नसेल तर आणखी पुढे म्हणजे सब-सब-सब पातळी वर जायचे !)
आता या विषेषाधिकार नियमाने
षष्ठ्म स्थान: —/ —- / बुध/ गुरु.
त्यामुळे बुधाचे सुधारित कार्येशत्व असे दिसेल:
बुध: ६, ४ / ३ / १ , ८ / ९ , १२.
प्रश्ना संबधीत मुख्य भावाचा सब जरी वक्री असला तरी तो मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे आणि महत्वाचे म्हणजे तो प्रश्नाच्या संदर्भातल्या प्रमुख भावाचा म्हणजेच चतुर्था स्थानाचा (४) प्रथम दर्जाचा कार्येश तर आहेच शिवाय पुरक अशा षष्टम (६) , नवम (९) आणि व्यय (१२) स्थानांचा कार्येश आहे.
प्रश्ना संदर्भातल्या प्रमुख भावाच्या सब चा असा होकार मिळाल्याने आपण पुढे जाऊ शकतो.
अर्थात प्रश्ना संदर्भातल्या मुख्य भावाचा सब अनुकूल आहे म्हणजे घटना घडणारच असे मात्र नाही. घटना घडण्यासाठी योग्य त्या ग्रहांच्या दशा- अंतर्दशा – विदशा असायला हव्यात आणि ही साखळी आपली समय मर्यादा ‘सहा महीने’ आहे त्या काळातच पूर्ण व्हायला हवी.पण केवळ घटना घडवण्याची क्षमता असलेल्या दशा-विदशा-अंतर्दशा असुनही चालणार नाही तर ती घटना घडण्यासाठी आवश्यक असलेली ठिणगी(ट्रिगर) देणारे गोचरभ्रमण (ट्रॅन्सिट) पण असावे लागते!
तेव्हा आता दशा –अंतर्दशा- विदशा तपाऊन ठरवूया की हे सलिल चे घर होणार का?
प्रश्न विचारते वेळी शुक्राची महादशा चालू आहे, ती १८ जुलै २०३२ पर्यंत आहे, तब्बल सोळा वर्षे आहेत ! बराच मोठा कालावधी आहे हा.
महादशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व:
शुक्र चतुर्थात (४) , लग्नेश (१) आणि अष्टमेश (८), शुक्र चंद्राच्या नक्षत्रात , चंद्र लाभात (११) आणि दशमेश (१०) .
शुक्र: ११ / ४ / १० / १ , ८
महादशा स्वामी शुक्र चतुर्थ स्थानाचा (४) कार्येश आहेच शिवाय इच्छापूर्ती च्या लाभ स्थानाचा (११) पण कार्येश होत आहे.म्हणजे दशा स्वामी शुक्र अनुकूल आहे पण दशास्वामीचा सब काय म्हणतोय? शुक्र बुधाच्या सब मध्ये आहे, या बुधाचे कार्येशत्व आपण या आधीच बघितले आहे.
बुध: ६, ४ / ३ / १ , ८ / ९ , १२.
त्यामुळे दशास्वामी शुक्राचा सब पण वास्तु योगा साठी अनुकूल आहे.
महादशा स्वामी शुक्र वास्तु योगा साठी अनुकूल आहे. पण ही शुक्र महादशा १६ वर्षे चालणार आहे , त्यामुळे नेमका कालवधी ठरवण्यासाठी आपल्याला या महादशेतल्या अंतर्दशा पाहावयास लागतील.
प्रश्न विचारते वेळी या शुक्राच्या महादशे अंतर्गत चंद्राची अंतर्दशा चालू होती, आणि ती १८ जुलै २०१८ ला संपणार आहे. प्रश्न विचारला आहे १९ डिसेंबर २०१६ रोजी, त्या हिशेबाने प्रश्न विचारलेल्या दिवसा पासुन दीड वर्षे इतका कालावधी ही चंद्र अंतर्दशा चालणार आहे.
प्रश्नकुंडलीची ‘समय मर्यादा – अटेंशन स्पॅन’ ३ ते ६ महीने इतकीच ठेवावी, त्या पुढील कालावधीचा सहसा विचार करु नये, या ३-६ महिन्यात योग नसल्यास तसे जातकाला स्पष्टपणे सांगून , सहा महिन्यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्या साठी सुचवावे.
म्हणजे सलिल चे घर होणार का नाही या साठी आपण या एकट्या चंद्र अंतर्दशेचाच विचार करुयात , त्या पुढच्या म्हणजे मंगळ , राहु आदी ग्रहांच्या अंतर्दशा आपल्याला विचारात घ्यावयाची आवश्यकता नाही.
या अंतर्दशा स्वामी चंद्राचे कार्येशत्व आपण या आधीच तपासले आहे ते असे आहे:
चंद्र: ४ / ११ / ८ , १ / १०
चतुर्थ (४) आणि लाभाचे (११) कार्येशत्व मिळाले असल्याने ही चंद्र अंतर्दशा वास्तु खरेदीला अनुकूल आहे. चंद्रा स्वत:च्याच सब मध्ये असल्याने अंतर्दशा स्वामीच्या सब ची अनुकूलता आहेच.
म्हणजे या चंद्राच्या अंतर्दशेच्या काळात घटना घड्ण्याची मोठी शक्यता आहे.
अर्थात आपण बघितले तसे हा चंद्र अंतर्दशेचा कालावधी तसा मोठा म्हणजे दीड वर्षाचा आहे , कालनिर्णयात आणखी स्पष्टता आणण्या साठी आपण या चंद्राच्या अंतर्दशेतल्या विदशा तपासु.
महादशा स्वामी शुक्र आणि अंतर्दशा स्वामी चंद्राचे कार्येशत्व पाहीले तर एक लक्षात येईल ते म्हणजे वास्तु योगा साठी आवश्यक असलेले ४ आणि ११ हे भाव आपल्याला मिळालेले आहेत पण वास्तुयोगा साठीचा आणखी महत्वाचा भाव, व्यय (१२) भाव तो मात्र अजुन या महादशा – अंतर्दशा साखळीत आलेला नाही, म्हणजे चंद्राच्या अंतर्दशेत अशी एक विदशा निवडायला पाहीजे जी या व्यय (१२) भावाची प्रथमदर्जाची कार्येश असेल. आता कोणता ग्रह या व्यय स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे?
या साठी आपण व्ययस्थानाचे (१२) कार्येश ग्रह कोणते होतात ते पाहूयात.
व्यय स्थानात गुरु आहे आहे, भावेश बुध आहे. गुरुच्या नक्षत्रात ग्रह नाही. आणि भावेश बुधाच्या नक्षत्रात शनी आहे. म्हणजे व्ययस्थानाचे कार्येश ग्रह:
व्ययस्थान : —- / गुरु / शनी / बुध
गुरु ,शनी आणि बुध या तीनच ग्रहां कडे व्ययस्थानाचे (१२) कार्येशत्व असल्याने चंद्राच्या अंतर्दशेत या तीन ग्रहांच्याच विदशांचा विचार आपल्याला करावा लागेल.
गुरुची विदशा १३ मे २०१७ ते २ ऑगष्ट २०१७ अशी आहे, शनीची विदशा त्यानंतर लगेचच म्हणजे २ ऑगष्ट २०१७ ते ७ नोव्हेंबर २०१७ अशी आहे. त्यापाठोपाठ बुधाची विदशा ७ नोव्हेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ अशी आहे.
आता या तीनही ग्रहांचे कार्येशत्व तपासू.
गुरु व्ययात (१२) आहे, गुरुच्या राशी त्रितिय (३) आणि षष्ठम ( ६ ) भावारंभी आहेत, गुरु मंगळाच्या नक्षत्रात आहे. मंगळ चतुर्थात (४) , धनेश (२) , सप्तमेश (७) , गुरुचे कार्येशत्व असे:
गुरु: ४ / १२ / २ , ७ / ३ , ६
म्हणजे गुरु आपल्याला हव्या असलेल्या व्ययस्थानाचा (१२) कार्येश तर आहेच शिवाय तो पुरक अशा धनस्थान (२) आणि षष्ठम (६) स्थानाचाही कार्येश आहे.
आता या विदशा स्वामी गुरुचा ‘सब’ काय म्हणतो?
गुरु राहुच्या सब मध्ये आहे.
राहु लाभात (११) , राहु केतु च्या नक्षत्रात , केतु पंचमात (५) , राहु वर मंगळाची दृष्टी , राहुची चंदाशी युती , राहु रवीच्या सिंह राशीत.
राहु आणि (आणि केतु) या छाया ग्रहासाठी राहु (केतु) शी युती / प्रतियोग करणारे ग्रह आणि राहु (केतु) च्या राशीस्वामी चे कार्येशत्व पण विचारात घ्यावे लागते.
मंगळ चतुर्थात (४), सप्तमेश (७) आणि धनेश (२), मंगळ स्वत:च्याच नक्षत्रात , मंगळाचे कार्येशत्व:
मंगळ: ४ / ४ / २ , ७ / २, ७
राहुच्या युतीतल्या चंद्राचे कार्येशत्व आधी पाहीलेच आहे:
चंद्र: ४ / ११ / ८ , १ / १०
रवी धनस्थानात (२), रवीची सिंह रास लाभाच्या (११) आरंभी, रवी केतु च्या नक्षत्रात , केतु पंचम (५) स्थानात, रवीचे कार्येशत्व:
रवी: ५ / २ / — / ११
म्हणजेच राहु चे एकंदर कार्येशत्व:
राहु: ५ / ११ / —/ —- दृष्टी मंगळ: ४ / ४ / २ , ७ / २, ७ , युती चंद्र ४ / ११ / ८ , १ / १०, राशी स्वामी रवी: ५ / २ / — / ११
गुरु महाराज भलतेच प्रसन्न आहेत , वास्तु साठी लागणार्या भावांचे कार्येश आहेत आणि विदशा स्वामी गुरुचा सब राहु देखील वास्तु खरेदीसाठी अनुकूल आहे. म्हणजे या गुरु विदशेतच सलिलचे घर व्हायला हवे.
अर्थात गुरु विदशा इतकी खणखणीत कौल देणारी असली तरी आपण पुढची शनीची विदशा पण लगे हाथ पाहून घेऊ.
शनी धनात (२) आहे, शनीच्या राशी चतुर्थ (४ ) आणि पंचम ( ५ ) भावारंभी आहेत, शनी बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध त्रितिय स्थानात (३) , नवमेश (९) , व्ययेश (१२) , शनीचे कार्येशत्व असे:
शनी: ३ / २ / ९,१२ / ४, ५
शनी राहु च्या सब मध्ये आहे. राहु चे कार्येशत्व अपण पाहीलेच आहे;
राहु: ५ / ११ / —/ —- दृष्टी मंगळ: ४ / ४ / २ , ७ / २, ७, युती चंद्र ४ / ११ / ८ , १ / १०, राशी स्वामी रवी: ५ / २ / — / ११
गुरु च्या तुलनेत शनीची विदशा तितकी दमदार नाही,
त्या पुढची बुधाची विदशा आहे , बुध देखील व्ययाचा कार्येश असल्याने या विदशेतही घटना घडू शकते,या बुधाचे कार्येशत्व आपण पाहीलेच आहे:
बुध: ६, ४ / ३ / १ , ८ / ९ , १२.
बुध गुरुच्या सब मध्ये आहे , गुरु: ४ / १२ / २ , ७ / ३ , ६
म्हणजे बुधही अपेक्षीत घटना घडवू शकतो, अगदी भक्कम पणे !! तसे पाहीले तर बुध हाच गुरु पेक्षा जास्त फलदायी दिसतो.
पण बुधाची विदशा ७ नोव्हेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ अशी आहे. बुधाच्या विदशेचा कालावधी हा आपल्या प्रश्न कुंडलीच्या आवाक्या बाहेरचा असल्याने त्याचा आत्ताच विचार नको, जर गुरु , शनीच्या विदशेत सुयोग्य गोचर भ्रमणें मिळाली नाहीत तर या बुधाचा विचार करु, किंवा गुरुच्या विदशेत बुधाची सुक्ष्मदशा आपल्याला निवडता येईल.
प्रश्न कुंडलीचा आवाका ओलांडून केलेली भाकीत चुकतात असा माझा अनुभव आहे.
हा, आता काही नक्षत्र शिरोमणी , फेसबुक गुरु , व्हॉट्सॅप शास्त्री , ब्लॉग मार्तंड एका प्रश्नकुंडलीवरुन उभ्या आयुष्याचे भाकित करत असताना मी पाहीले आहेत, महान लोक आहेत ते!
असो…
आता आपल्याला बघायचे आहे की ही गुरुची विदशा सलील ला घर मिळवून देणार का?
इथे एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात ठेवायची की दशा – विदशा इ. अनुकूल असल्या तरी प्रत्यक्ष घटना घडेल असे नाही !! घटना घडण्यासाठी एक ठिणगी लागते. जसे दारु गोळा मजबूत असला तरी तो पेटवायला एक ठिणगी आवश्यक असते तसेच. ही ठिणगी देण्याचे काम गोचर भ्रमणें (ट्रॅन्सीट्स) करतात. गोचर भ्रमणाचा कौल नसेल तर अनुकुल दशा – विदशा आल्या तरी घटना घडत नाहीत.
म्हणजे आता गोचर भ्रमणें (ट्रॅन्सीट्स) तपासायला हवीत.
आपण शुक्राची महादशा, चंद्राची अंतर्दशा आणि गुरु विदशा असा विचार करतोय म्हणजे आपली साखळी :
शुक्र – चंद्र किंवा चंद्र- शुक्र अशी असू शकते.
आपला अपेक्षित कालावधी असा आहे:
१३ मे २०१७ ते २ ऑगष्ट २०१७ (गुरुची विदशा )
चंद्राच्या कर्केत शुक्राचे नक्षत्र नाही म्हणजे चंद्र- शुक्र अशी साखळी जुळणार नाही. पण शुक्राच्या वृषभेत चंद्राचे नक्षत्र आहे म्हणजे शुक्र – चंद्र अशी साखळी जुळू शकते.
आपण निवडलेल्या दशा -अंतर्दशा- विदशा ह्या साखळी या नुसार घटना सहा महीन्याच्या आत बाहेर घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रवी चे या साखळीतले गोचर भ्रमण विचारात घ्यावे लागेल.
रवी वृषभेत साधारण पणे १४ मे ला येतो (आणि १४ जुन पर्यंत असतो) , वृषभेतले पहीले नक्षत्र (जे रवीचेच आहे) पार करुन रवी साधारण पणे २४ मे रोजी चंद्राच्या रोहीणी नक्षत्रात येतो आणि त्यानंतर १३ दिवसांनी रवी वृषभेतल्या मंगळाच्या नक्षत्रात जातो. म्हणजे २४ मे ते ७ जुन ह्या १३ दिवसांच्या कालावधीतच आपल्याला शुक्र – चंद्र ही साखळी मिळते.
त्यानुसार सलिलचे घर होण्याची शक्यता मे २०१७ च्या अखेरचे सहा दिवस ते जुन चा पहीला आठवडा ह्या पंधरा दिवसात आहे.
आपल्याला पंधरा दिवसांचा कालावधी मिळाला आहे , वास्तु संदर्भातल्या अशा प्रश्ना साठी इतकी स्पष्टता पुरेशी आहे (क्या बच्चे की जान लोगे क्या ?) त्यामुळे इथेच थांबायचे ठरवले.
…शुभं भवतु
Thank you for one more detailed analysis. Can similar approach used on birth chart as well? The software does not show mercury as 6th house significater. So we cannot solely depend upon it.
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. जे नियम प्रश्नकुंडलीला वापरले तेच नियम जन्मकुंडलीला लागू पडतात. जन्मकुंडली साठी वक्री ग्रहांचा फारसा विचार करायचा नाही, ग्रहांच्या कारकत्वाला जरा जास्त महत्व द्यायचे आणि ट्रॅन्सिट वेगळ्या पद्दतीने पाहावयाचे असते.
ह्या सॉफ्टवेअर मध्ये के.पी. मधल्या काही नविन (अनुभव सिद्ध) नियमांचा समावेश केलेला नाही पण असे असले तरी हे सॉफ्ट्वेअर कमालीचे अचूक आहे यात शंकाच नाही, मी गेले आठ वर्षे हे सॉफ्टवेअर वापरत आहे पण त्यात कोणतीही कधीही चूक सापडली नाही की इतर कोणताही दगा या सॉफ्टवेअर ने दिला नाही, हे सॉफ्टवेअर पूर्णत: विश्वासार्ह्य आहे .
सुहास गोखले
लिहिते झालात, आभार!
मागिल अनेक लेख अपुर्ण आहेत(ऊदा:नबाब ऑफ़ ×××)ते पुर्ण
करावे हि विनंती।
बाकि सध्याच्या लेखातील पत्रिका विश्लेषन बद्दल मला काही “कळने”
ह्या जन्मात तरी शक्य नाही
असो,बरेच लिहावे वाटते पण हे टायपिंग येते कुनाला?
पुनश्च आभार।
श्री. अण्णासाहेब,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
मागचे काही अपर्ण लेख पूर्ण करणार आहे. जरा वेळेचे गणीत जमत नाही अजून.
सुहास गोखले
नमस्कार सुहासजी,
बऱ्याच दिवसांनी लेख वाचायला मिळाला, नेहमी प्रमाणे सविस्तर आणि उत्कृष्ट.
तुम्ही ह्या प्रश्नकुंडली मध्ये नवीन KP आयनांश वापरले आहे त्या बद्धल काही माहिती सांगावी.
म्हणजे जुन्या आणि नवीन आयनांश मध्ये के फरक आहे ते.
संतोष सुसवीरकर
श्री. संतोषजी ,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. जुन्या आनी नव्या के.पी. अयनांशा मध्ये अगदी नगण्य फरक आहे , कोणताही वापरला तरी चालेल. के/पी. अयनांश आणि पारंपरीक पद्धतीतले लाहीरी अयनांश दोन्हीही ‘चित्रा’ तार्यावर आधारीत आहेत. लाहीरी आणि के.पी. अयनांशात फक्त ६ आर्क मिनिटांचा फरक आहे. पण के.पी. साठी के.पी. अयनांशच वापरावेत. या अयनांशा बद्दल इंटरनेट आणि अन्यत्र विपुल माहीती उपलब्ध आहे.
सुहास गोखले
केपी केस स्टडी म्हणजे अप्रतिमच!
एक शंका – कधी कधी आपल्याला एखाद्याच्या समस्येबद्दल तिसराच कोणीतरी सांगतो. ज्याची समस्या आहे ती व्यक्ती नंतर आपल्याशी संपर्क साधते. काही वेळा ती फोनवरून आधी समस्या थोडक्यात सांगते व नंतर प्रत्यक्ष भेटून सविस्तर सांगते. अशा परिस्थितीत कोणत्या वेळेची कुंडली मांडावी?
नेहमीप्रमाणे वेळ काढून आपण शंका समाधान करालच ही खात्री आहे. धन्यवाद!
श्री.प्राणेशजी,
खरेतर प्रश्नकुंडली साठीचा प्रश्न ज्या त्या व्यक्तीनेच विचारावा , याला फक्त एकच अपवाद आहे तो म्हणजे ‘ह्रवलेली व्यक्ती’ , इथे हरवलेली व्यक्ती काही स्वट; येऊन ‘मी हरवलो आहे’ असा प्रश्न विचारणार नाही , हा प्रश्न नेहमी दुसराच कोणीतरी विचारणार पण बाकी बाबतीत ज्याच्या प्रश्न त्यानेच विचारावा.
प्रश्न कुंडली ची वेळ ठरवताना ‘ज्योतिषाला प्रश्न पुर्ण पणे समजतो’ ती वेळ घ्यायची , प्रश्न फोन वर सांगीतला किंवा प्रत्यक्ष भेटीत किंवा ईमेल / व्जॉट्सॅप या मध्यमातून , प्रश्न समजला ती वेळ आणि ज्योतिषी त्यावेळी जिथे आहे ते स्थळ, यावरुन प्रश्नकुंडली मांडायची.
सुहास गोखले
Sir khup divasani lekh vachayala milala sir class kadhi suru karatay vat pahatoy
धन्यवाद श्री उमेशजी
सुहास गोखले