घटना आहे मे १९९९ मधली , माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार म्हणून मी ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. सकाळीच गुहागरात पोचलो, एखादे लॉज पकडावे, सामन ठेवावे, अंघोळ उरकून देवदर्शन घ्यावे नंतर दिवसभर गुहागरातली कामे उरकून रात्री मुक्काम करुन दुसरे दिवशी परतीच्या प्रवाासाला निघावे असा प्लॅन होता.
मुक्कामा साठी लॉज बघायला सुरवात केली. नेमका त्याच दिवशी ‘एनरॉन’ प्रकल्पाचे काहीतरी मोठे फंक्शन होते, त्या साठी (तेव्हाचे) मुख्यमंत्री नारायण राणे गुहागरात येणार होते, या कार्यक्रमासाठी बरेच बाहेरचे लोक्स गुहागरात येणार असल्याने बहुतेक सर्व लॉजेस ‘एनरॉन’ ने बुक करुन ठेवली होती. सर्व लॉज फुल्ल होती.
शेवटी एका लॉज मालकाने आम्हाला ‘बर्व्यांची वाडी‘ ला जायला सांगीतले तिथे कदाचित आमची सोय होईल असे तो म्हणाला, हे सांगताना तो छ्द्मी पणे हसला होता , ते त्यावेळी आमच्या लक्षात आले नाही पण नंतर चांगलेच कळले!
आम्ही त्या ‘बर्व्यांची वाडी’ पर्यंत पोहोचलो. तशा आमच्या फार अपेक्षा नव्हत्याच , किमान स्वच्छता आणि अंघोळीची बरी सोय , बस्स.
गिर्हाईक आले हे दिसताच बर्व्या पळत पळत आला. जंगी स्वागत झाले , मुक्कामा साठी लॉज मागुन लॉज धुंडाळून आम्ही इतके दमलो होतो की रुम उपलब्ध आहे हे कळताचा आम्हाला हर्षवायु झाला. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ज्याला तो बर्व्या रुम म्हणत होता त्या जागे पेक्षा म्हशीचा गोठा देखील दहा पटीने चांगला म्हणता आला असते.
ही जागा सोडली तर दुसरी कोणती मिळणार ? जाऊ दे एकच दिवस तर काढायचा आहे , करु अॅडॅजस्ट म्हणत दाजींनी पैसे बर्व्याच्या हातावर ठेवले. रुमचे भाडे अॅडॅव्हान्स! बर्व्याचे शेकडो नियम होते त्यातला हा पहीला नियम.
पैसे हातात पडल्या नंतर आत्ता पर्यंत तोंड भरुन आमचे स्वागत करणार्या बर्व्या ने सरड्या सारखा रंग बदलला.
“अहो , बर्वे रुम मध्ये किती धूळ आहे, झाडली नाही का? ”
“ती काय केरसुणी , कोपर्यातच आहे “
“म्हणजे आम्हीच केर काढून घ्यायचा ?”
“हो , साध्या रुमला ही सर्व्हिस उपलब्ध नाही”
“अरे हे कसले लॉज ?”
“छे छे हे लॉज नाहीच, होम स्टे ! अगदी घरच्या सारखे राहायचे , आपल्या घरी नाही का आपण केर काढत?”
“केरसुणी? नुसता बुडखा उरलाय “
“हिच आहे , चांगली पाहीजे असेल तर वीस रुपये एक्स्ट्रा पडतील”
इतका वेळ दारा आडून ही सगळी गंमत पाहणार्या बर्व्याच्या नोकराला ‘पांडबाला’ आम्ही खुणेनेच बोलावले, त्याच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि त्याच्या कडून रुम झाडून घेतली . बाहेर ओसरी वर उभा राहुन बर्व्या हसत होता,
ही फक्त सुरवात होती, त्या सात – आठ तासांत ह्या बर्व्याने आम्हाला अनेक मार्गाने छळले,
“अडला नारायण’ म्हणत आम्ही गप्प बसलो , बाहेरचे काम उरकुन दुपारी दोन च्या आत परत आला तर सुग्रास जेवणाची उत्तम सोय आहे बर्व्या म्हणाला होता , त्याच्या वर विश्वास ठेवला आणि चूक केली ! जेवण म्हणून त्या बर्व्याने जे काही पानात वाढले त्याला जेवण म्हणणे केवळ अशक्य होते. अन्नाचा अपमान नको म्हणुन कशीबशी दोन शितें उष्टावून आम्ही बाहेर जाऊन जेवलो. तिकडे तो बर्व्या आम्ही दिलेली पैसे कडोसरीला लावत हसत उभा होता.
रात्रीचे जेवण पण बाहेरच घेतले , फक्कड आमरस पुरीचा बेत करतो , एकदा टेस्ट करुन तर बघा असे म्हणत बर्व्या मागे लागला होता पण आम्ही त्याला बघलो नाही.
त्या बर्व्याने दिलेला त्रास लिहायचा म्हणले तर आणखी एक मोठ्ठा लेख लिहावा लागेल!
रात्रीचे दहा एक वाजले होते , मी दाजींना म्हणालो …
‘”साला, या बर्व्याला हिसका दाखवलाच पाहीजे, तो गुहागराचा बर्वे असला तरी मी पण वेळणेश्वराचा गोखले आहे”
“तर काय , काहीतरी केलेच पाहीजे, पैशा परी पैसे गेले आणि वर त्रास”
मी माझी कल्पना दाजींना सांगीतली, दाजी दोन मिनिटें फक्त हसत होते!
आम्ही तयारीला लागलो.
रात्रीचे बारा – सव्वा बारा वाजले , आम्ही आमचे मिशन चालू केले!
आधीच जमवून ठेवलेल्या दोन काठ्या आणि एक टॉर्च घेऊन आम्ही अंगण ओलांडुन बर्व्याच्या ओसरीवर पोहोचलो. ओसरीवर सामसूम होती, इतका वेळ तिथेच बाजल्या वर बसून भयाण आवाजात भजने म्हणणारा तो बर्व्या आणि सारे कुटुंबिय आता दिवे मालवून डाराडूर झोपले होते.
“बर्वे”
मी खणखणीत आवाजात हाक मारली, तर तिकडे दाजीं नी जमीनी वर काठी हापटत जोरात ताशाच वाजवायला सुरवात केली !
“अहो बर्वे, उठा, झोपलात काय, उठा लौकर ”
“बर्वे, उठा, बाहेर या चटकन”
दाजींनी माझ्या पेक्षा जोरात आवाजात..
“सुहास , लक्ष ठेव , ते बघ शेपटी दिसतीय , काठी तैयार ठेव”
“दाजी उलटा बाहेर येणार वाटते, तुम्ही डाव्या अंगाने पुढे व्हा, टॉर्च फोकस करा, बेणं बाहेर आले की हाणुया तिच्या XXX”
“पण शेपटी हालत नाहीय”
“बेणं नाटक करतय , किती वेळ बसेल असा. बाहेर आला की हाणू “
आमचे हे डायलॉग्ज ऐकतच तो कमरेला पंचा गुंडाळलेल्या उघडाबंब बर्व्या , डोळे चोळत बाहेर आला.. त्याला काय चाललेय ते कळत नव्हते
“काय झाले हो गोखले , हाका कशाला मारताय , शिंची जरासी झोप लागत होती.”
“हाका नाही मारायच्या तर काय, जरा बघा.”
“काय झालंय?”
“काय म्हणून काय विचारता? इकडे या जरा”
“हा लांबलचक, सहा फुट तरी नक्कीच असेल”
“सहा फूट ? आठ फुटाला एक इंच कमी नसेल”
“अहो काय पण’
“मनगटा एव्हढा जाड”
“काळा – हिरवा’
“पण जनावर एकदम तेज आहे हां, मानलं बुवा”
“क्क क्क्याय आहे हे”
“काय? सर्पराज शिरलाय तुमच्या घरात. “
“स… स साप ?
“साप ? भुजंग म्हणा, आमचा आरडाओरडा काय उगाच चाललाय का”
“कु…कुठे आहे “
“हा काय ओटीची भिंत आणि छपराचा जॉईंट आहे ना तिथूनच घुसलाय तुमच्या घरात, आत्ता शेपटी दिसत होती आम्ही काठी मारणार तेव्हड्यात आत गायब झाले बेणं’
“त्याचे काय झाले आम्ही जरा गप्पा मारत बसलो होतो, तो काय आमच्या समोरुन गेले , काय चपळ जनावर, आम्ही काही हालचाल करतो न करतो तो ओटी गाठली”
“तुम्ही बघितल “
“तर काय, आणि डेरिंग बघा त्याचे! आम्ही बॅट्री , काठ्या घेऊन आम्ही येई तो पर्यंत आमची वाट बघितल्या सारखा खांबाला वेटोळं घालून बसला होता, आम्ही टॉर्च मारला आणि जनावर हालले, घुसला की तुमच्या घरात, ते बघा ओटीची भिंत आणि छप्पर यांच्यातला जॉईंट मध्ये फट दिसतीय ना, अगदी तिथुन घुस्ला बघा”
बर्व्याचे धोतर सुटायचे बाकी होते, अंघोळ केल्या सारखा घाम फुटला त्याला.
बर्व्याच्या घरात हलकल्लोळ माजला, धाड धाड सगळे दिवे लागले, घरातली यच्चयावत मंडळी झोपेतुन जागी ,
“अरुण उठ , घरात साप शिरलाय, अरे सदा लौकर ये रे बाबा, माई तुम्ही पोरांना घेऊन वरच्या माडीत जा, इथे खाली थांबु नका “
आत जोरात पळापळ सुरु झाली, एकमेकांच्या अंगावर खेकसणे / किंचाळ्या आणि लाठी- काठी डबे वाजवण्याचे आवाज, सारी वाडी दुमदुमून निघाली.
बर्व्याचे दोन शेजारी (बर्व्या सारखेच पंचा गुंडाळलेले आणि बाकी उघडेबंब ) काय झाले काय झाले करत जमा झाले.
उघडाबंब क्रमांक १.
“इथे वाडीतच घुटमळतोय, मला दिसला होता ना एक दोनदा, डेंजर आहे “
“मग , बघत काय बसलाय , जा ना आत, बर्व्यांना मदत करा, एक से भले दो, ही घ्या काठी”
“मी आणि आत ? ना बाबा, जनावर विषारी आहे, चवताळून अंगावर आले तर? कशाला विषाची परीक्षा घ्या”
मी उघडाबंब क्रमांक २ च्या तोंडावर बॅट्री मारत म्हणालो …
“ओ काका, अरे शेजारधर्म म्हणून काही आहे की नै, बघताय काय, घुसा आत”
“मला नाही जमणार, गॅसेस चा त्रास आहे ना मला”
“गॅस चा आणि सापाचा काय संबंध? उलट आत जाऊन गॅस सोडलात तर जनावर गुदमरुन जागीच मरेल”
मिसेस ना विचारतो , आलोच असे म्हणत उघडाबंब क्रमांक १ आणि उघडाबंब क्रमांक २, अंधारात केव्हा गायब झाले ते कळलेच नाही.
मध्येच बर्व्या बाहेर येऊन अजिजीने म्हणाला ..
“गोखले, जरा आत येऊन बघा ना प्लीज”
“तुम्ही आत बघा आम्ही बाहेर दबा धरुन बसतो, कसे”
बर्व्या थरथरत होता.
चावी देऊन झाली होती, थोडा वेळ ही धामधुम बघून, मनसोक्त हसत आम्ही खोली त परत आलो.
रात्री किती पर्यंत बर्व्याचा धिंगाणा चालू होता कोणास ठाउक , आम्हाला गाढ झोपा लागल्या होत्या !
दुसर्या दिवशी आम्ही खोली सोडली , बर्व्या आणि कुटुंबिय रात्र भर जागल्याने लालबुंद झालेले डोळे आणि पळापळ करुन थकलेली शरीरे घेऊन एखाद्या झोंबी सारखे अस्ताव्यस्त पसरले होते.
“काय बर्वे , सापडला का साप”
“नाही हो, रात्रभर हुडकले, कोठे आहे कोणास ठाऊक , घरातले कोणीही झोपले नाही काल”
“लपून बसला असणार कोठे तरी सांदी कोपर्यात , तुमचे सगळ्यांचे आवाज, पळापळ बघुन घाबरला असणार, आता उजेडात कसला बाहेर येणार पण रात्री पुन्हा बाहेर येईल, सांभाळा”
दाजींनी आणखी एक पीळ दिला..
“असे निवांत बसु नका, शोधा त्याला, डेंजर आहे, एकदम जहाल विषारी, एक ..फुस्स.. आणि माणूस ढगांत”
“हो, त्याचीच तर काळजी”
“एखाद्या सर्पमित्राला बोलवा , ते लोक साप पकड्ण्यात पटाईत असतात”
“सर्पमित्र ? गुहागरात नाही कोणी”
“मग सरळ एखादा गारुडी बोलवा, पुंगी वाजवून भाईर काढेल त्या सापाला, पाच मिनिटांत”
“चिपळूणास जावे लागेल त्या साठी”
“मग जा ना , जहाल विषारी जनावर आहे , काय सांगावे, चावलं तर पाणी मागायला सुद्धा वेळ मिळणार नाही ”
“हो, बघतो , काहीतरी केलेच पाहीजे”
सर्वांग घामात निथळलेला ‘बर्व्या ‘ कसेबसे म्हणाला ..
इकडे दाजींनी गाडीला स्टार्टर मारला !
शुभं भवतु
शेरास सव्वाशेर!
धन्यवाद श्री प्राणेशजी,
तो बर्व्या कोकणात राहात असला तरी मी पण कोकणचा बच्चा आहे ! ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळीं !
सुहास गोखले
छान जिरवली
शेरास सव्वा शेर
गुहागरात सगल्यांना माहित आहे बर्व्या रात्रीचा झोपत नाही हल्ली
धन्यवाद श्री अविनाशजी
असे ‘बर्वे’ आपल्याला नेहमीच भेटत असतात त्यांना असेच काहीतरी करुन धडा शिकवायचा असतो
सुहास गोखले
mast lekh aahe. tya barvyachi ghabargundi imagine karun khup hasu yet aahe
धन्यवाद श्री आनंदजी
सुहास गोखले
jaisi karni vaisi bharni….!!!
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
तुम्हाला वाचताना मजा आली , आम्ही तर प्रत्यक्ष तिथे होतो ! आजच्या सारखे मोबाईल तेव्हा नव्हते नाहीतर त्याचे व्हिडीओ शुतींग केले असते ! युटुब वर लाखाच्या वर हिट्स !
सुहास गोखले
बर्व्या आता महिनाभर झोपणार नाही
धन्यवाद श्री अविनाशजी
कस्स हिसका दाखवला नै , आता तो बर्व्या ‘गोखले’ आडनावाच्या व्य्क्तीला रुम देत नाही म्हणे!
सुहास गोखले