जातकाच्या व्यवसाया बद्दल…
जातक “बातमी / लेखन / प्रकाशन / ग्रंथ लेखन / न्यूज रिपोर्टर त्यातही शोध पत्रकारिता / संपादक” अशा प्रकारच्या व्यवसायात असेल असे अनुमान केले होते आणि ते बरोबर ही आले होते.
आता ते कसे ते आपण या लेखाच्या या भागात पाहू.
आपल्या संदर्भासाठी जातकाची पत्रिका पुन्हा देत आहे:
जातक: महिला
जन्मदिनांक: 05 नोव्हेंबर 1971
जन्मवेळ: 03:55 पहाटे
जन्मस्थळ : बेंगलोर
पत्रिकेवरून एखादी व्यक्ती कोणता व्यवसाय करत असेल हे सांगणे कमालीचे अवघड असते. याचे कारण म्हणजे पत्रिका फक्त त्या व्यक्तीचा नैसर्गिक कल दाखवते. म्हणजे गणित, विज्ञान, कला , तंत्रज्ञान, हिशेब, विक्रय कला, अधिकार गाजवणे , नेतृत्वगुण वक्तृत्व कला इ. पण ती व्यक्ती त्याला अनुसरूनच शिक्षण घेईल / व्यवसाय करेल असे मात्र होत नाही. बर्याच वेळा शिक्षण एका क्षेत्रातले आणि व्यवसाय भलत्याच कोणत्या क्षेत्रातला असे दिसते तर काहीच्या बाबतीत नोकरी – व्यवसायाची क्षेत्रे सतत बदलत असतात.
पण पत्रिकेतून दिसणारे कल त्या व्यक्ती मध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात दिसत असतातच, भले ती व्यक्ती तशा प्रकारचे शिक्षण / व्यवसाय घेईल न घेईल. एखाद्याची पत्रिका ‘कला क्षेत्र’ दाखवत असली तरी जातक प्रत्यक्षात एखाद्या बँकेत कारकुनी करत असताना दिसतो पण त्याला गाण्याची , नाटकाची खूप आवड असू शकते किंवा एखाद्या कलेत चांगली गती असू शकते.
माझ्या कडे आलेल्या एका जातकाची पत्रिका ‘अ’ प्रतीचा कलाकार दाखवत होती , जातकाला गाण्याची – वाद्य वादनाची , अभिनयाची खूप आवड , स्टेजवर परफॉर्म करता येईल इतकी उत्तम सतार जातक वाजवत असे पण पोटापाण्याचा व्यवसाय मात्र डॉक्टरीचा आणि मजा म्हणजे एखादी गाण्याची मैफिल असेल तेव्हा स्वारी चक्क दवाखाना बंद ठेवून तिला उपस्थिती लावत असते.
पत्रिकेवरून सूचीत झालेला व्यवसाय कदाचित जातकाला पैसा मिळवून देणार नाही पण जास्त समाधान देणार असतो. असे जरी असले तरी सामान्यत: आजच्या काळात बहुतेकांचे शिक्षण, नोकरी – व्यवसायाचे निर्णय पत्रिका काय सांगते किंवा व्यक्तीचा कल कशात आहे / आवड कशात आहे यावर न ठरता व्यवहारीक पातळीवरून घेतले जातात.
त्यामुळे ज्योतिषशास्त्र जातकाला कोणते क्षेत्र अनुकूल असेल / लाभदायक ठरेल हे सुचवू शकते , त्या प्रमाणे शिक्षण / व्यवसाय निवडता आला किंवा त्याच्या जवळपास जाईल असे काही निवडता आले तर दुधात साखरच.
माझ्या कडे एक तरुण आय-टी इंजिनियर आला होता , नोकरीत कमालीचा असमाधानी होता, त्याची पत्रिका तपासल्या वर हे लक्षात आले की जातकच्या पत्रिकेतले ग्रहमान ‘कायदा’ क्षेत्र सुचवते आहे. आता इंजिनियरिंग चे शिक्षण घेऊन पाच वर्षे सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात काम करत असलेल्या या जातकाला हे सगळे सोडून कायद्याचा अभ्यास करून वकील हो असे कसे सांगणार आणि सांगितले तरी आता ते शक्य आहे का? पण मी जातकाला एक माहिती असावी म्हणून तसे सांगितले. आणि काय योगायोग बघा, जातकाला ‘सायबर क्राईम ‘ या कायद्याशी संबंध असलेल्या क्षेत्रात काम करणार्या एका आय.टी कंपनी कडून नोकरीची ऑफर आली होती, पण कायद्यातले आपल्याला काय जमणार , किती किचकट असेल ते काम असे समजून जातकाने त्या ऑफर कडे लक्ष दिले नव्हते. मी जातकाला कायदा क्षेत्रात यश आहे असे सांगताच त्याने त्यावर विचार करून ती नोकरीची ऑफर स्वीकारली आणि काय आश्चर्य त्या क्षेत्रात त्याने कमालीची गती दाखवली , जे काम किचकट आहे असा त्याचा समज होता तेच काम त्याच्या अगदी आवडीचे बनले. पुढे जाऊन जातकाने लंडन मधल्या प्रतिष्ठित लॉ कॉलेज मध्ये खास प्रशिक्षण घेतले आज जातक सायबर क्राईम मधल्या कायद्यांच्या बाबतीतला एक तज्ञ मानला जात आहे. पत्रिकेतल्या ग्रहांनी जे सुचवला आहे तोच व्यवसाय करता आला तर काय होऊ शकते हे या एका उदाहरणातून लक्षात येते.
अर्थात सगळ्यांनाच अशी संधी मिळेल असे नाही पण जर पत्रिकेवरून अंदाज घेऊन शक्य असल्यास नोकरी – व्यवसायात बदल करता आला तर त्याच्या सारखे चांगले दुसरे नाही.
असो.
आपण आपल्या मूळ विषया कडे वळू.
जातकाच्या पत्रिकेतले तृतीय स्थान ! संपूर्ण पत्रिका या एकट्या तृतीय स्थानावर तोलली गेली आहे . जातकाच्या जीवनाचा आख्खा चित्रपट या स्थानाच्या माध्यमातून उलगडत जाणार आहे. कारण या स्थानात असलेली ग्रहांची भाऊगर्दी.
व्यवसाया संदर्भातला विचार दशम स्थाना वरून करतात. या पत्रिकेत दशमावर बुधाची बौद्धिक राशी मिथुन आहे आणि मिथुनेचा स्वामी बुध तृतीय स्थानात.
दशमेश बुध असल्याने जातकाच्या नोकरी – व्यवसाया वर बुधाचा प्रभाव पडणारच. बुध हा बुद्धीचा आणि वाणी (बोलणे/ संभाषण) चा कारक ग्रह आहे. वक्तृत्व, संभाषण कला, लेखन, करारमदार, स्मरणशक्ती, तर्कशास्त्र, परीक्षण, निरीक्षण, विचार, मुद्देसुद विचार करण्याची क्षमता, चिंतन, वाचन, मनन, व्यवहारीपणा, व्यापारी वृत्ती, हिशेब, गणित, सौदे, दलाली, समयसूचकता, चातुर्य, चलाखपणा, हजरजवाबीपणा, फसवेगिरी, शब्दांचे खेळ , बातमी , प्रकाशन, पुस्तके अशा अनेक बाबी बुधाच्या कारकत्वात मोडतात.
हा दशमेश बुध तृतीय (3) स्थानात आहे. बुध तृतीय स्थानात असल्याने त्या स्थानाची फळे देण्याचा प्रयत्न तो करणार , तृतीय स्थाना वरून अनेक बाबींचा होतो त्यापैकी व्यवसायाशी निगडित अशा बाबी लेखन, युक्तिवाद, लहान प्रवास, वक्तृत्व, वार्ता / बातमी , संभाषण, नकला , अभिनय, पुस्तक प्रकाशन, दलाली, सौदे, करार मदार , खरेदी विक्री, कागदपत्रे इ.
हा बुध मंगळाच्या वृश्चीक राशीत तर आहेच शिवाय तो षष्ठम (6) स्थानातील कुंभेच्या मंगळाच्या अंशात्मक केंद्र योगात पण आहे. माझे लक्ष या केंद्र योगा कडे न जाते तर नवलच!
या बुध – मंगळ केंद्र योग काही हमखास म्हणता येईल अशी फळे देतो.
बुध हा मंगळाचा पहिल्या प्रतीचा शत्रू ग्रह आणि त्यात बुध मंगळाच्या राशीत त्यामुळे मंगळा कडून बुधाला बरेच अशुभत्व मिळण्याची शक्यता आहे. बुधाच्या वाचा, लेखन, संभाषण, वादविवाद, वाटाघाटीं, विक्रय कला या कारकत्वाला मंगळाची काहीशी टोकाची अशी कडवी धार लाभते. बोलणे स्पष्ट , सडेतोड , सत्य असले तरी ते फटकळ, बोचरे, लागट, धारदार, एक घाव दोन तुकडे स्वरूपात येते. दुसर्याला बोलण्यात गप्प करण्याकडे कल असतो. टोकाच्या मतांचा दुराग्रह धरल्याने साधा संवाद / चर्चा / वाद विवादा भांडणात/ वितंडवादात जाते. बुद्धीचा उपयोग दुसर्यावर टिका करणे, दुसर्यातले दोष हुडकणे , दुसर्या बद्दल सतत अप्रिय बोलणे यासाठी केला जातो. बुध वृश्चिकेत असल्याने या सगळ्याला वृश्चिकेची जात्याच टीकाकार वृत्ती खतपाणी घालणार आहे. अर्थात या योगाची चांगली बाजू म्हणजे हुशारी, हजरजबाबीपणा, चपळता, वक्तृत्व कला, समयसूचकता.
दशमेश बुध हा शुक्र, गुरु आणि नेपच्यूनच्या युतीत आहे, चंद्र आणि शनीच्या प्रतियोगात आहे.
चंद्र – बुध प्रतियोगामुळे जातकाला नसते वाद विवाद उकरुन काढणे, दुसर्याला टोचून बोलणे, दुसर्याची निंदा नालस्ती करणे, मोठ्या गप्पा मारणे इ प्रकाराची फळे मिळण्याची मोठी शक्यता आहे.
गुरुच्या योगा मुळे बुद्धिवाद, तर्क, शनीच्या योगामुळे गूढ ज्ञान, गांभीर्य , शुक्राच्या योगाने लेखन कला, नेपच्यून च्या योगामुळे अंत:स्फूर्ती, प्रतिभा आणि कल्पनाशक्ती , मंगळाच्या योगामुळे शास्त्रीय विचार आणि गणित या बाजू बळकट होणार असल्या तरी मंगळ आणि शनी च्या अंशात्मक कुयोगात असल्याने या सार्याला काहीशी अनिष्टतेची छटा लाभणार आहे.
या सार्या ग्रहस्थितीवरून मी एक प्राथमिक अंदाज केला की जातकाचा व्यवसाय बोलणे, वक्तृत्व , वाद – विवाद , लेखन , टीका , समीक्षा अशा स्वरूपाचा असेल. मंगळाच्या प्रभावामुळे वाद विवाद , टीका इ भाग बुध- मंगळ केंद्रयोगा मुळे जिभेचे फटकारे, बोचरी टीका, त्यात बुध वृश्चिकेत ही तर खास टीकाकाराची रास!
बुध मंगळाच्या वृश्चिकेत , मंगळ शनीच्या कुंभेत, शनी शुक्राच्या वृषभेत, शुक्र मंगळाच्या वृश्चिकेत , वर्तुळ पूर्ण .
जातक बातमी (बुध) / लेखन (बुध – नेपच्यून) / प्रकाशन / ग्रंथ लेखन (गुरु) / न्युज रिपोर्टर (बुध) त्यातही शोध पत्रकारिता (मंगळ) / संपादक अशा प्रकारच्या व्यवसायात असू शकेल.
आणि काय आश्चर्य जातकाने हे अगदी बरोबर आहे असे कळवले होते.
जातक एक फ्री लान्सर पत्रकार / लेखक / क्रीटीक / कॉमेंटेटर / न्युज एडिटर अशा व्यवसायात होती. एका न्युज सिंडीकेट साठी शोध पत्रकार म्हणून असाईनमेंट्स करत होती. करियरच्या सुरवातीच्या काळात जातकाने क्राईम रिपोर्टिंग ची कामे पण केली होती.
आता माझे हे अनुमान इतके बरोबर आले ते जातकाची पत्रिका त्या दृष्टीने कमालीची बोलकी होती म्हणूनच. पत्रिकाच सारे काही सांगत होती मी फक्त काही डॉट्स जोडले इतकेच. पण दर वेळेला असे जमेलच असे नाही.
जातकाच्या व्यवसाया संदर्भातली स्थित्यंतरे :
जातकाच्या तृतीय स्थानात शुक्र , नेपच्यून, बुध आणि गुरु सारखे ग्रह असताना जातक एकाच प्रकाराचा नोकरी – व्यवसाय दीर्घकाळ करत राहणे शक्यच नाही.
शुक्र- नेपच्यून युती , चंद्र – नेपच्यून प्रतियोग , शुक्र – बुध युती आणि हे सगळे गुरुच्या सान्निध्यात मला सुचवत होते की जातक आज ना उद्या ज्याला आपण करमणूक म्हणतो अशा क्षेत्रात काम करेल.
शुक्र – नेपच्यून युती काही वेळा चांगली फळें देते पण त्या साठी ही युती कोणा अशुभ ग्रहाच्या कुयोगात नसली तरच जर ही युती कोणा पाप ग्रहाच्या कुयोगात असेल तर मात्र बरीच अशुभ फळे मिळतात. या पत्रिकेत ही युती शनी च्या प्रतियोगात आणि मंगळाच्या केंद्रयोगात असल्याने नैराश्य , काल्पनिक चिंता, वैवाहिक जीवनात मोठी संकटे, मोठी फसगत, अपेक्षा भंग, वैवाहिक जोडीदाराचे अनारोग्य, लोकापवाद, संकटे अशी अनिष्ट फळे मिळण्याची शक्यता आहे पण ही युती चांगली फळें देणारच नाही असे नाही, या युतीची खास अशी काही फळे आहेत ती ही जातकाला मिळतीलच यात कला प्रेम, सुंदर वस्तुंचे आकर्षण, रसिकता, काल / करमणुकीचे क्षेत्र , साहित्य (लिटरेचर) यांचे मोठे आकर्षण असणे, एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य व नावलौकिक, , जास्त भावनाशीलता, कोणत्याही गोष्टींचा मनावर पगडा चटकन बसणे, प्रेमा संदर्भात नाजूक आणि तीव्र भावना, नैराश्य इ.
या पत्रिकेत मंगळ – नेपच्यून अंशात्मक केंद्र योग पण आहे, हा योग अनेक प्रकाराचे दुष्परिणाम घडवून आणतो, नेपच्यून चे कारकत्व या योगात काहीसे विकृत होते, हा योग साहित्य,. कला . छंद, कल्पनाशक्ती, गायन, वादन कौशल्य अशा प्रकाराची फळे देतो पण या पत्रिकेत हा योग इतर ग्रहांच्या कुयोगात असल्याने ही फळे काहीशी निकृष्ट दर्जाची असतील. या योगाने आर्थिक बाबतीत घोटाळे होतात, फसवणूक होते, पैशाचे नुकसान होते, उद्योग व्यवसायात अनेक संकटे येतात. स्त्रियांच्या पत्रिकेत हा योग जीवनात कोणती तरी खोल व्यथा वा दु:ख देतो.
नेपच्युन सारखा ग्रह शनी आणि चंद्राच्या प्रतियोगात आणि त्याच वेळी नेपच्यून मंगळाच्या केंद्र योगात ही ग्रहस्थिती आणि हे सगळे पुन्हा गुरुच्या सान्निध्यात यातून दोन गोष्टी सूचित होतात आणि त्या म्हणजे:
- जातकाची फार मोठी आर्थिक / मानसिक फसवणूक होणार आहे
- आणि जातक मोठ्या नैराश्याच्या गर्तेत सापडून (डिप्रेशन् ) पलायनवादी तत्वज्ञान स्वीकारुन बेगडी अध्यात्म, बुवाबाजी, कर्मकांडे , साधना, मठ – आश्रम यांच्या मागे लागेल.
हा कालावधी गुरुच्या महादशेत रवी अंतर्दशा सुरू झाल्या वर म्हणजे 2012 मध्ये सुरू होईल आणि गुरु महादशेत राहू च्या अंतर्दशेत पूर्णत्वास पोहोचेल.
गुरु नंतरची शनी महादशा (2017) जातकाला या आध्यात्मिक कोषात गुरुफटून ठेवेल.
अर्थात हे पत्रिकेने दाखवलेले कल आहेत , असे बदल एका रात्रीत होत नसतात. हे बदल केव्हा होतील याचा अंदाज घेणे शक्य असले तरी त्यासाठी बराच खटाटोप करावा लागणार असल्या मुळे मी तेव्हा व्यवसायातले हे बदल केव्हा होतील इ. बाबताचा नेमका कालनिर्णय करू शकलो नव्हतो आणि आजही वेळे अभावी ते करणे मला शक्य नाही.
नंतरच्या संवादांतून जातकाने माझी ही दोन्ही अनुमाने अगदी बरोबर ठरल्याचे सांगितले आहे.
काही काळ पत्रकारिता केल्या नंतर जातकाने टीव्ही साठी मालिका लिहायला सुरवात केली इतकेच नव्हे तर एक दोन सीरियल्स मध्ये लहानशा भूमिकाही सादर केल्या.
याच काळात वैवाहिक जीवनातले अडथळे, विसंवाद , भागीदारीत केलेल्या टीव्ही मालिका निर्मितीत मोठे आर्थिक नुकसान, लोकापवाद , खोटे आळ , त्यातून उद्भवलेल्या कोर्ट कचेर्या, बदनामी आणि त्याच सुमारास झालेला घटस्फोट या सार्यातून जातक सावरलीच नाही,. काही काळ औदासीन्य डिप्रेशन चा आजार सहन केल्या नंतर जातकाने अध्यात्माची कास धरली.
जातकाशी शेवटचा संपर्क झाला तेव्हा त्या आपल्या राहत्या घराचाच एक मठ करून सदासर्वकाळ टाळ कुटत बसल्या होत्या!
आणि या खेपेला प्रश्न विचारला होता…
“मला सिद्धी प्राप्त होईल का?”
मी अर्थातच याचे उत्तर दिले नाही … कारण वेगळे सांगायला हवे का?
समाप्त
शुभं भवतु
Case Study 27 Parts 1-2-3 अप्रतिम Analysis. इतका खोलवर अभ्यास कसा बरं करता सर ? गेली ५-६ वर्षे मी हा अभ्यास करतेय तरी अजूनही मी मठ्ठ भोपलाच आहे. बेसिक सगले शिकवतात पण actual analysis कुणीच नाही समजावलं. सर आपण शिकवता का ? आपली कोर्स फी परवडल्यास नक्की करेन. पण मी ठाण्याला राहते. धन्यवाद.
सौ स्मृतीजी
माझे ऑन लाईन अभ्यासवर्ग चालू आहेत पुढची बॅच लौकरच चालू करणार आहेत त्या बद्दल मी ब्लॉग व फेसबुक वरुन कळवेन आपले या अभ्यासवर्गात स्वागत आहे.
हे शास्त्र अवगत व्हायचे असेल तर नुस्तई पुस्तके वाचून किंवा क्लास लावून काहीही साध्य होणार नाही. पत्रिका सोडवण्याचा सरवा केलाच पाहीजे, त्या शिवाय हे शास्त्र कळणार नाही. सुरवातीला आपल्या मित्र , नातेवाईकांच्या पत्रिकांचा अभ्यास करा , ज्यांची माहीती उपलब्ध आहे ( शिक्षण, नोकरी-व्यवसाय तब्बेत, स्वभाव, विवाह, संतती, आर्थिक स्थिती, छंद – आवड, प्रवास इ,) इथे कोणाचे भविष्य सांगायचे नाही तर त्यांंच्या आयुष्यात आधीच घडलेल्या घटनांच्या पाठीमागे कोणते ग्रहमान कारणीभूत होते, त्या घटनां त्याच दिवशी का घडल्या इ अंगाने हा अभ्यास करायचा . अशा कमीतकमी 500 ते 1000 पत्रिका अभ्यासाव्या लागतील. हा अभ्यास व्हायलाच काही वर्षे जावी लागतात. महिन्याला किमान 10 पत्रिका सोडवायच्याच असे ठरवले तर वर्षाला 250-200 पत्रिका होतील आणि साधारण 3-4 वर्षे लागतील.
शुभेच्छा
सुहास गोखले