‘विल्स’ ही ‘विल्स’ होती !
बाकीच्यात काय दम नव्हता , हिरवी पट्टी मिरवणारी ‘कूल’ शिगरेट खरोखरच ‘कुल’ होती नाय असे नाय, एकदम बिनवासाची ! अशीच बिनवासाची दारू तैयार झाली तर काय बहार येईल नै , कित्ती जणांची सोय होईल !
बाकी लोक्स ह्या असल्या ‘कूल’, ‘कॅप्स्टन’, ‘पनामा’. ‘ब्रिस्टॉल’ शिगरेटीं का ओढायचे कळत नाही, कोणी कितिही , काहीही म्हणले तरी ‘विल्स’ ची नजाकत कश्या कश्यात नै.
या ‘विल्स’ च्या अनेक ‘हळूवार’ आठवणी आहेत. नोकरी करायला लागल्यावर खिशात चार पैसे खुळखुळायला लागले आणि मग ‘स्टेट एक्स्प्रेस’, ‘डनहील’ वगैरे सुरु झाले ( स्टंडर्ड वाढले ना !) , पुढे आम्रविकेत आल्यावर ‘कॅमल ‘(असली!), ‘मार्लब्रो’ यांनी भुरळ घातली हो, नै असे नै, सिगार झाला, पाईप झाला, चिरूट पण ट्राई क्येला पण ‘विल्स’ ती ‘विल्स’ ! काही झाले तरी ‘विल्स’ हे माझे पहिले प्रेम , ते मी अजूनही विसरलेलो नाही.
इंजिनीअरिंगला सिगरेट ओढणं ही चैन नसते, व्यसन नसतं तर ‘गरज’ असते, हे आम्हाला कॉलेज मधल्या ज्येष्ठ इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी शिकवलं. सबमिशन, ड्राइंग्ज, जागरण त्यासाठी चहा आणि सिगरेट यासारखा जालीम उपाय नाही, हे मनावर बिंबविण्यात आलं.
त्या काळात कुणी आणि कशी सिगरेट हातात दिली हे मला आठवत नाही, पण सिगरेट ही जिवाभावाची मैत्रीण झाली. मग अनेक गोष्टी करताना ही मैत्रीण आपल्याबरोबर लागते. सकाळी उठल्यावर डोळ्यावरची झोप घालवण्यासाठी, मग कोठा साफ करण्यासाठी. नंतर तुडुंब जेवलो म्हणून, मग चहाबरोबर, अभ्यास करताना आणि काहीही कारण नसेल तर तल्लफ आली म्हणून! समोर मित्राने सिगरेट पेटविली की, ‘दोन दम दे रे’ असं मित्राकडे मागायची मग सवयच होऊन जाते.
आमच्या कॉलेजच्या दिवसात ‘विल्स’ एक करंसी होती, ‘विल्स’ चे अर्धे पाकीट खिशात असले की खुषाल स्वत:ला ‘अंबानी’ समजावे ! सबमीशन च्या दिवसात येका विल्स च्या पाकीटाच्या बदल्यात आख्खा ड्राईंग शीट काढून मिळायचा , अर्ध्या पाकीटात जर्नल मधले सगळे डायग्रॅम काढून मिळायचे, ‘विल्स’ च्या बदल्यात कोणीही हसत हसत लेक्चर्स ना तुमची प्रेझेंटी लावायचे, बिनबोभाट, या कानाचा त्या कानाला पत्ता लागायचा नाही (मग आपण समोरच्या ‘चिंतामण’ वर निर्धास्तपणे पडीक !)
त्या टायमाला ‘चारमिनार’ ओढणारा स्वत:ला उगाचच ‘स्पेश्यल’ समजायचा , मर्दानी रुबाब म्हणे ! नाही म्हणजे ‘चार्मिनार’ च्या जैराती पण हाच ‘मर्दानी’ या एका युनिक सेलिंग पॉईंट वर आधारीत असायच्या ! माझा कोल्हापुर चा येक मित्र म्हणायचा ‘चारमिनार ओढणाऱ्या माणसाला दुसरी कुठलीही सिगरेट ओढायला सांगणं म्हणजे पांढऱ्या आणि लाल रश्शावर पोसलेल्याला आंबट वरणाचा आग्रह करण्यासारखं होतं.’ , असेल बाबा तसे पण तेव्हा चारमिनार ओढणारा माणूस फिल्टर सिगरेट ओढणाऱ्या माणसाकडे तुच्छतेने पाहत असे. माझा एक मित्र (तोच इरसाल कोल्हापुरी !) मला नेहमी म्हणायचा, ‘फिल्टर सिगरेट ओढणं म्हणजे सिगरेटला कंडोम लावण्यासारखं आहे.’.. जाऊ दे !
कॉलेजला असताना सिगरेट मी स्टाइल साठी सुद्धा ओढायचो. कॉलेजमध्ये असताना पाहिलेल्या म्यॅटीनी सिनेमांचा (जयश्री टाकी !) तो संस्कार होता. मुळात देवानंद-शम्मी कपूर हे स्टाइलबाज हीरो माझे लाडके, त्यामुळे स्टाइल मध्ये भर घालणाऱ्या गोष्टी मलाही आवडायच्या. अशोककुमारची सिगरेट पेटविण्याची स्टाइल. एकंदरीत सिगरेटशी चाळा करीत केलेला त्याने अभिनय मला आवडायचा. तो झुरका मारतानाचा त्याचा अभिनय अफलातून असायचा. सिगरेटवर जीवापाड प्रेम करणारा माणूसच तसा अभिनय करू शकतो. देवानंदने तर सिगरेटचं तत्त्वज्ञानच दिलं- ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुँवे में उडाता चला गया.
पण खरी स्टाईल आवडायची ती ‘प्राण’ ची , त्याने शिगरेट स्टाईल मध्ये कशी ओढायची याचा एक आदर्श निर्माण केला , पुढे रजनी ने त्याची भ्रष्ट सौथेंडियन नक्कल केली !
कॉलीजातली ती सोनेरी वर्षे आणि नोकरीला लागल्याची (आणि गरम खिशाची!) ‘स्वतंत्र’ वर्षे झपाट्याने सरली आणि यथावकाश शिगरेट कमी होत होत कधी बंद झाली ते कळलेच नाही, ‘विल्स’ ही आता पूर्वी सारखी रायली नाही हे पण खरेच. .
पुढे आयुष्याच्या एका वळणावर अशाच एका अवलिया मित्राने ‘पुडी’ हातावर ठेवली . सोपी , सूटसुटीत ‘आणि जब्री ‘किक’ देणारी ही पुडी’ मात्र अनेक उन्हाळे – पावसाळे झाले अजून सोबतीला आहे ,
पण त्या बद्दल नंतर कधी तरी…
येक वैधानिक का काय म्हणतात ना तो इशारा…
सिगरेट ओढणे आरोग्यास धोकादायक आहे !
(हुश्श ! सर्कारी नियमांचे पालन केले की बरे असते नै का )
शुभं भवतु
नमस्कार, अस आमच्या पायरीवर उतरून बोलले, जिव हरकला!
धन्यवाद श्री अण्णासाहेब
सुहास गोखले
Khup chhan anubhav sangitla
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले