एक पुनर्वसन!
सहा एक वर्षे झाली असतील, एक अत्यंत प्रतिष्ठित मानले गेलेले दांपत्य माझ्या कडे त्यांच्या मुला बद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते.
मुलगा वय २४ वर्षे, शिक्षण मेकॅनिकल इंजिनियरिंग मधली पदवी, चांगल्या कंपनीत नोकरीही होती, सगळे सुरळीत चालू असताना, नको ते घडले, मुलाला दारूचे व्यसन लागले, एके दिवशी चक्क दारू पिऊन कामावर गेला, अर्थात नोकरीतून काढून टाकले गेले, दारूचे व्यसन आणखी वाढले, दारूच्या नशेत त्याने चक्क एका ट्रॅफिक हवालदारावरच हात उचलला, बराच मोठा अर्थपूर्ण व्यवहार करून प्रकरण दाबले गेले. परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
आता या मुलाचे काय? याच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे? हा सुधारेल का ? दारूचे व्यसन सुटेल का? प्रश्नांची सरबत्ती झाली…
मुलाची पत्रिका आधीच मिळाली होती, त्याचा अगदी सखोल असा अभ्यास मी करून ठेवला होताच. पत्रिकेच्या अभ्यासातून सगळा खुलासा झाला होता, या मुलाचे पुढे नक्की काय होणार याचा मला चांगला अंदाज आला होता.
तब्बल 40 वर्षे पत्रिकांचा अभ्यास करतो आहे त्यातून काही धागेदोरे निश्चित हाताला लागले आहेत, काही गूढ थोडेफार का होईना उकलले आहे. ग्रहांचे संकेत हे काहीसे अगम्य असतात, तसेच ते मोघम असतात, ते फक्त रोख (ट्रेंड) दाखवतात, बारीक सारीक तपशील दिसत नाहीत, त्याचा अर्थ ज्योतिषालाच लावावा लागतो आणि चूक इथेच होते!
ग्रह मोघम सांगतात म्हणजे ‘आजारपण येईल ‘ असे सुचवतील पण नेमका काय आजार असेल हे कळणे अवघड असते. इथे ‘फ्री विल – इच्छा स्वातंत्र्य’ महत्त्वाची भूमिका बजावते. आजारपण येणार असे ग्रहयोग म्हणत आहेत पण नेमका कोणता आजार या बद्दल मौन आहे, म्हणजेच कोणता आजार होऊन द्यायचा हे आपल्या हातात असते! ‘कॅन्सर’ सारखा दुर्धर आजार आहे किंवा ‘ताप – खोकल्या ’ सारखा साधा, सोपा आजार पण आहे , निवड तुमची !
आजारपण टाळू शकत नाही पण कमी तीव्रतेचा आजार निश्चित निवडू शकता, रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर टाळता येत नाही पण वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवून त्या स्पीड ब्रेकर चा त्रास निश्चित कमी करता येतो, तसेच हे आहे. यालाच आपण ‘फ्री विल – निवड स्वातंत्र्य ‘ म्हणू शकतो.
या जातकाच्या बाबतीत, नजीकच्या काळात:
1) गंभीर आजारामुळे हॉस्पिटल मध्ये दीर्घ काळ उपचार घेणे
2) परागंदा होणे , लोकां पासून तोंड चुकवून फरार होणे
3) तुरुंगवास
4) दूरच्या अनोळखी प्रदेशात/ परदेशात जाऊन राहणे
अश्या चार फळांची मोठी शक्यता होती, आणि जातका कडे ‘निवड स्वातंत्र्य ‘ आहे.
आता या चार पैकी कोणते फळ निवडायचे? अर्थात या चार पैकी ‘दूरच्या अनोळखी प्रदेशात/ परदेशात जाऊन राहणे’ हे फळ निश्चितच चांगले आहे!
माझ्या समोर बसलेल्या जातकाच्या पालकांना (जातक अनुपस्थित होता) हेच करायला सांगितले.
“तुमच्या कडे पैसा आहे, ओळखी आहेत, त्याचा वापर करून स्वखर्चाने पोराला किमान दोन एक वर्षे तरी भारता बाहेर पाठवा, त्या नंतर तो परत आला तरी चालेल, पुढचे आपण दोन वर्षा नंतर पाहू…”
“पैशाची काहीच समस्या नाही , दुबई, कॅनडा इथे नातेवाईक आहेत. कोठेही सहज पाठवू शकतो पोराला , पण या अशा व्यसनी पोराला परदेशात धाडले तर नसती आफत यायची, तिकडे त्याने असाच हा दारू पिऊन गोंधळ घातला तर , हा ड्रग्ज घेतो अशीही शंका आहे आम्हाला, तिथे जाऊन ड्रग्ज चे काही केले तर फासावर लटकवतील, इथे भारतात काहीही झाले तरी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करून प्रकरण दाबता येते पण परदेशात ही मांडवली कशी शक्य होणार?”
“तुमची अडचण लक्षात येते पण पोराला जेल मध्ये पाहण्या पेक्षा किंवा गंभीर आजारा पेक्षा, मी सुचवलेला मार्ग चांगला आहे. आता काय करायचे, कसे करायचे हा तुमचा प्रश्न आहे, ग्रह काय सुचवतात ते मी तुम्हाला सांगीतले, बाकी तुमची मर्जी..”
जातकाच्या पालकांनी पोराला सहज शक्य असूनही परदेशात पाठवले नाही, जातक भारतातच राहिला, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली, लिव्हर चे मोठे दुखणे झाले, मुंबई ला ‘लिलावती’ सारख्या ठिकाणी चार महिने राहून अत्यंत महागडे उपचार घ्यावे लागले. पुढे त्याला एका ‘व्यसनमुक्ती केंद्रात’ काही महिने ठेवले , त्याचा मात्र उपयोग झाला.
जातक थोडा सुधारला, व्यसन जवळ जवळ बंद झाले पण अजून पोरगा कोणतेही काम करत नव्हता, नुसता बसून राहायचा.
दोन वर्षांपूर्वी या जातकाचे पालक पुन्हा एकदा माझ्या कडे आले होते …
“तुमचा तेव्हाचा सल्ला मानायला हवा होता हो, हे पहा काय झाले आमच्या पोराचे…”
आताही प्रश्न तेच होते.. आता या मुलाचे काय? याच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे?
एव्हाना ग्रहस्थिती ( ट्रांसिटस / प्रोग्रेशन/ डायरेक्शन) सुधारली होती, थोडीफार आशा दायक परिस्थिती दिसत होती!
“तुमची काही शेती वाडी आहे?”
“हो आहे ना”
“मग आता पोराला शेतावर पाठवा, तिथेच राहायला सांगा, कोंबड्या, गायी – म्हशी सांभाळायला सांगा, काटेरी फळे किंवा औषधी वनस्पतींची लागवड करायला सांगा. सोबत एखादा विश्वासू नोकर ठेवा, सहा महिन्यात चांगला फरक पडेल. हे मात्र नक्की जमवा…”
“हो, आता मात्र तुमचा सल्ला मानणारच, दुसरा पर्याय नाही!”
जातकांच्या पालकांनी माझा सल्ला मानला, जातक पहिल्यांदा तयार नव्हता पण कसेबसे समजावून त्याला त्यांच्या नाशिक भागातल्या शेतावर पाठवले, त्याची सगळी सोय केली, सोबत बंगल्यावरचे जुने विश्वासू ‘रामू चाचा’ दिले!
त्यालाही आता दोन वर्षे झाली आणि गेल्याच महिन्यात जातक आपल्या आईवडिलां सोबत भेटायला आला होता. एकदम सुधारला होता. जंटलमन झाला होता. दुधाचा धंदा उत्तम चालू आहे शिवाय ड्रॅगन फ्रूट मध्ये ही चांगली कमाई होत आहे!
आता या वेळेचा प्रश्न होता..
“लग्नाचे पाहतोय तेव्हा योग केव्हा आहे, कसा आहे ते बघा जरा, हो पण आम्हाला ग्रामीण भागात, शेतावर राहायला तयार असलेली मुलगी पाहिजे!“