(हा मस्त फटू इंटरनेट वरुन साभार , फटू चा त्या ज्योतिषीबुवांच्या घराशी काही एक संबंध नाही !)
या लेखमालीके तले पहिले दोन भाग इथे वाचा:
या ‘राजा गोसाव्याने’ ब्रिफ केले होते त्याप्रमाणे पहिला अडथळा – आईसाहेबांचा चेकपोष्ट ! तो पार करायचा होता!
उजव्या हाताला असणार्या खोलीच्या दारात मी काही क्षण तसाच उभा राहीलो, नजर अंधाराला जरा सरावल्यावर थोडे फार दिसायला लागताच जेम्स बाँड स्टाईलने पावले टाकत वाटचाल सुरु केली.
‘आईसाहेब’ जिन्यातच फतकल मारुन बसल्या होत्या. अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हते, पण बाई अवाढव्य होत्या यात शंकाच नव्हती. जिन्याची एक आख्खी पायरी त्यांनी व्यापली होती. अंधारात बाईंचे रंगरुप काही दिसत नसले तरी त्यांचे पांढरे केस मात्र चमकत होते !
माझी चाहुल लागताच , अपेक्षे प्रमाणे त्यांच्या कडून कॉल साईन आलीच!
“ए कोण चाललेय रे तिकडे”
म्हातारीचा आवाज नुसताच खणखणीत नाही तर चक्क दहशत निर्माण करणारा होता. आता मला ही त्या म्हातारीची फिरकी घ्यायची सुरसुरी आली…
“म्यॅव, मी मांजर “
“एव्हढे मोठे?”
“आफ्रिकेतले आहे”
“मेल्या, मांजर कधी बोलते का रे?”
“आफ्रिकेतली बोलतात”
“इथे कशाला आलायस”
“दुध चोरायला”
“नीच कार्ट्या, चोरी करतोस”
“आता मांजर दुसरे काय करणार?”
“इकडे ये”
“नै येण्णार ज्जा”
“ये रे माझ्या राज्जा”
“नै येण्णार ज्जा”
आज्जी – नातवाचा हा सुख-संवाद रंगात आला होता इतक्यात जिन्यावरुन कोणीतरी खाली उतरत येताना दिसले, म्हातारीची नजर तिकडे वळली आणि त्या व्यक्ती साठी आईसाहेबांची कॉलसाईन वाजली ..
“ए कोण चाललेय रे तिकडे”
जिना उतरणारा तिथलाच रहीवासी असावा , त्याला हे सवयीचे असणार , तो गुपचुप अंग चोरत , म्हातारीला चुकवून पसार झाला. आता म्हातारीचा मोर्चा पुन्हा माझ्या कडे वळणार हे लक्षात येताच मी ही चपळाई करुन पुढे सटकलो..
आधी लग्न ज्योतिषाचे मग आईसाहेबांचे!
आता पुढचा अडथळा मालकांच्या कुत्र्याचा !
सालं त्या अंधारात ते कोठे आहे हेच नेमके कळत नव्हते , मी भिंतीला पाठ लावून , दबकत दबकत, इंचा इंचाने एखाद्या कमांडो सारखा पुढे सरकत राहीलो. असा सरकत सरकत चांगला आठ-दहा फुट पुढे आलो असेल, आता समोर एक बरा उजेड असलेले बोळकांडे आणि त्याच्या दोन्ही हाताच्या दरवाजे (म्हणजेच खोल्या) दिसायाला लागल्या !
साला , ते कुत्रे नेमके आहे कोठे?
कुत्रे कोठेच नव्हते ! मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अरे कुत्रे नसेलच तेव्हा येणार कोठून?
म्हणजे त्या राजा गोसावी छाप लेंगा –सदर्याने मला चक्क उल्लू बनवले होते !!
मानले बॉस, याला म्हणतात ‘पुणेरी हिसका’ !
आता ते ‘गुरुवर्य’ तरी इथेच राहतात की आणखी एकदा उल्लू बनून घ्यायचे ? शेवटी मनात म्हणालो, आता आलोच आहे तर चार पावले पुढे जाऊन काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा.
एक – दोन – तीन , हा काय तिसरा दरवाजा तर आलाच.
जुन्या घरांना असायचा तसा कमी उंचीचा , दोन फळ्यांचा दरवाजा, दारावर जुन्या पद्धतीची गणेशपट्टी, दाराच्या शेजारील भिंतीवर एक सुबक पाटी: “ xxxxxx ज्योतिषी” आणि खाली एक बाण ! दरवाज्यावर तशीच एक छोटी सुबक पट्टी सारखी पाटी त्यावरही “ xxxxxx असे नाव होते , ते जरा पुसट झाले होते इतकेच, नावाखाली त्या काळच्या (म्हणजे जेव्हा केव्हा ती पाटी बनवली गेली असेल तेव्हाच्या) पद्धती प्रमाणे ‘घरी आहेत’ – ‘घरी नाहीत’ असे सांगणारी सरक पट्टी (स्लायडिग़ ), सघ्या ती ‘घरी आहेत’ असे दाखवत होती. मजा म्हणजे त्या पाटीवरचे ‘बी.एस्सी.’ मात्र अगदी ठळक दिसत होते, बहुदा तो भाग नंतर रंगवण्यात आला असेल.
दारात एका ओळीत शिस्तबद्ध ठेवलेल्या चपलां, शेजारीच कचर्याची बादली पण पत्रावळीने व्यवस्थित झाकलेली, शेजारीच भिंतीत खिळा मारुन अडकवले मोठे टमरेल (किंवा बादली). उजव्या हाताला पत्र्याच्या डब्ब्यातली तुळस, वरती दोरी बांधलेली , त्यावर कपडे वाळत घातलेले. दाराशी भिंतीला टेकून ठेवलेली ‘हर्क्युलस’ सायकल.
दरवाज्याला डोअर बेल नामक प्रकार नव्हताच त्यामुळे दरवाजाची कडी वाजवली , वाटले होते , पुणेरी स्टाईल —–“कॉण हॅवॅय “
————–असे खवट खेकसणे कानावर आदळेल पण…
“या हो सरळ आतच या, कोण आहात ते”
असे बोलावणे आले , एक मोठा सुखद धक्का बसला , आपण पुण्यात आहोत का दुसर्या कोणत्या गावात याची शंका वाटावी इतके अगत्यपूर्ण स्वागत !
बाहेर चपला काढल्या आणि हळूवारपणे दरवाजा ढकलला , तर आत सीन असा…
अंधार!
टिपीकल जुन्या वाड्याचा फील , उजेड आणि वायुविजनाचा कोणताही विचार न केलेली वास्तुरचना. इथेही २५ वॅटचा पिवळा बुल्लोक! मला एक नवल वाटत होते , या सार्या ज्योतिषांना लख्ख उजेडाचे काय वावडे होते ? या तिसरा ज्योतिषी जो मिणमिणत्या , २५ वॅटच्या पिवळ्या बुल्लोक मध्ये काम भागवत होता.
त्या घराला किती खोल्या होत्या ते सांगता येणार नाही , बाहेरच्या दरवाजातून आत आले की एक आडवी (म्हणजी रुंदी कमी असलेली) खोली , पूर्वी घराला ओसरी असायची तशी, कारण या खोलीतून आतल्या खोलीत जाण्यासाठी तीन पायर्या होत्या.आत आल्यावर दरवाज्याच्या उजव्या अंगाला , ज्योतिषीबुवांची बैठक होती. बैठकच म्हणावी लागेल कारण , इथे टेबल – खुर्ची असा मामला नव्हता. समोर भिंतीला एक पेशवाई तक्क्या , त्याला टेकूनच ज्योतिषीबुवा पसरले होते. समोर वित- दीड वीत भर उंचीचे , पुजेच्या चौरंगा सारखे , साधारण अडीच फूट रुंदी आणि चार फुट लांबीचे चांगल्या लाकडाचे , पॉलीश केलेले टेबल (असेच टेबल जपानी लोक टी-पार्टी किंवा जेवणासाठी वापरतात) , समोर जातकांना बसण्यासाठी गादी (साड्यांच्या दुकानात बस्त्याच्या विभागात असते तशी) . गादीवरचा अभ्रा बर्यापैकी स्वच्छ होता, ज्योतिषीबुवा ज्याला टेकून बसले होते तो तक्क्या पण चांगला स्वच्छ दिसत होता.
इथेही पुस्तके, पंचागे, कागद यांचे ढीग होतेच पण खूपच व्यवस्थित रचून ठेवलेले होते. भिंतीवर ‘सईकोशा (जपान) ‘ चे अप्रतिम व्हिंटेज वॉल क्लॉक होते. मी तिथे असताना त्या घड्याळाने तीन वेळा ठोके दिले , व्वा, काय छान दमदार मेटॅलीक , क्लीन क्रिस्प आवाज, साला दिल खुष झाला!
दरवाज्याच्या डाव्या अंगाला, म्हणजे ज्योतिषीबुवा बसले होते त्याच्या समोरील भिंती कडची बाजू. दोन जुनी शिसवी लाकडाची कपाटें, त्यात बरीच पुस्तके, कापडात गुंडाळून ठेवलेले कागद असे बरेच काही. इथे जुन्या लाकडी खुर्च्या चार-पाच होत्या , बहुदा वेटींग मधल्या जातकांना बसायला ठेवल्या होत्या का कोण जाणे. अर्थात मी गेलो होतो तेव्हा दुसरे कोणीच नव्हते आणि मी होतो तेव्हढ्या वेळात दुसरे कोणी आले नाही त्यामुळे त्या खुर्च्यांचे नक्की प्रयोजन कशा साठी होते ते कळले नाही.
भिंतीवर अनेक जुने , पिवळे पडलेले फोटी , त्यातले बरेचसे एखाद्या कॉलेज मध्ये काढलेले ग्रुप फोटो होते बाकी सिंगल बस्ट साईज आणि काही ‘जोडीचे’ होते.
भिंतीवर मध्यवर्ती अशी एकच एक अशी श्रीरामाची तसबीर . इथे कोणत्याही बुवा , बापू, बाबा, माई, माताजी, माँ , गेला बाजार पुण्यात जरा जास्त लोकप्रिय असणारा गांजावाला महाराज आणि त्याच्याच जातकुळीतले इतर वेडगळ , शिवीगाळ करणारे मतीमंद महाराज या असल्या कोणाचेही फोटो नव्हते . मला बरे वाटले.
ज्योतिषीबुवांच्या समोरचे ते टेबल एकदम क्लीन , कोणताही पसारा नव्हता, एक – दोन सुटे कागद त्यावर नाजुक असा पितळेचे पेपर वेट, लिखाणासाठी दौत-कलम! टेबलावरच एक सुंदर कट ग्लासचा बाऊल भरुन बकुळी ची नाजूक फुले… व्वा … ये हुई ना बात !
सगळे कसे आखीव – रेखीव , शिस्तबद्ध, नीट-नेटके आणि कलापूर्ण.
आणि ते ज्योतिषीबुवा ?
ते तरी याला अपवाद कसे असतील ? .…
क्रमश:
या लेख मालीके तले पहिले दोन भाग इथे वाचा:
शुभं भवतु
