असे जातक येती – ९

“गुरुजी , नमस्कार”

“नमस्कार”

“मी काल फोन केला होता”

“सोमनाथजी ना?’

“हो, पण मला सोमनाथ म्हणू नका”

“मग काय म्हणायचे?”

“अनिलकुमार ! तुम्हाला माहीती नसेल पण त्याची पण एक स्टूरी आहे”

“काय?”

“तुम्ही तो अनिल कपूर चा ‘वो सात दिन’ शिनेमा पायलाय का?”

“नाही, मी हिंदी सिनेमे फारसे पाहात नाही”

“बघायला पायजे होता”

“का?”

“त्यात अनिल कपूर दिसतो ना मी एकदम तसा दिसतो, डीट्टो, म्हणून मी सगळ्यांना माझे नाव ‘अनिल कुमार’ असे सांगतो””

“ठीक आहे, अनिल कुमारजी, बोला काय काम काढलेत म्हणायचे?”

“माझा एक प्रश्न आहे”

“काय?”

“सध्याची माझी नोकरी एकदम बेक्कार आहे, जरा भारी नोकरी केव्हा मिळेल ते सांगा”

“म्हणजे ‘नोकरीत बदल होणार का?’ असा प्रश्न आहे”

“बरोबर, फार कंटाळलोय या नोकरीला”

“सध्या कसली नोकरी करताय”

“JJ JJJJ सहकारी पतपेढी मध्ये ज्युनियर क्लार्क”

“अरे वा! चांगले आहे की , अनिलकुमारजी वय काय तुमचे आणि शिक्षण काय झालेय”

“२५ पूर्ण , आणि शिक्षणाचे म्हणाल तर बारावी कॉमर्स झालोय”

“बस्स इतकेच? पुढे नाही शिकलात?”

“अभ्यास जमत नाय, बारावीलाच तीन वर्षे घेतली, तसा कालेजात गेलो होतो एक वर्ष, तिथेही फेल झालो, तेव्हा माझे पप्पा म्हणाले, बास कर आता, नाही झ्येपत अभ्यास तुला, मी लगेच कालेज सोडून दिले”

“उत्तम, मग नंतर काय केले”

“नंतर बघा, दोन वर्षे ‘पोलिस भरती’ साठी ट्राय केला, पर ते काय जमले नाही, त्याचे काय आहे आपली बॉडी एकदम पतली, ते पोलिस भरतीच्या टायमाला  पळायला लावतात, उंच ऊडी मार, पुलाप काढ, फिजिकल टेस्ट म्हणे ,काय बघायला नको, त्ये कसले जमायला मला, सगळ्या टेस्ट्ला फेल गेलो, काय करणार..”

“हो, पोलिसात काम करायला जरा फिटनेस लागतो, पण ते जमले नाही तर नाही, दुसरे बरेच काही करता येते ना?”

“त्याचाच विचार करत पुढची दोन वर्षे अशीच बसून काढली, पप्पांशी रोजची भांडणे, मी काय म्हणतो ते ऐकायलाच तयार नाहीत, सरळ आमच्या मामाच्या पोल्ट्री फार्म वर बळजबरी पाठवून दिले, तिथे काम कर म्हणाले, मग काय गेलो , पण काम काय जमले नाय, तसा नाही म्हणता  एक वर्ष काढले की तिथे,  पक्षी दिवसभर क्वॉक क्वॉक कलकलाट करत बसायचे त्याने डोके उठायचे, कामात काय ध्यान लागले नाही, एकदा काय झाले, जरा  इकडे तिकडे दुर्लक्ष काय झालं आणि तिथले सगळे पक्षी पटाटा मेले की राव, मग काय, मामा चिडला, बोल बोल बोलला आणि शेवटी चिडून XX वर लाथ मारुन मला हाकलून दिले”

“अरे रे, मग पुढे काय?

“काय करणार हो, तरी मी पप्पांना सांगत होतो, मला विचार करायला जरा टायम द्या, पण ते काय ऐकेनात, कुठनं तरी ओळख काहाडूण ही कोप्रेटिव ची नोकरी लावून दिली, तसे आता वर्षभर करतोय ,  रोजच्या रोज पेमेंट पण भ्येटतेय, पण काय मजा नाय राव”

“रोजच्या रोज पेमेंट ? म्हणजे रोजंदारी म्हणायची की”

“आता त्याला काय करणार, मला अजाबात आवडत नाय हे काम पण पप्पा म्हणाले गुमान जायचे , काम चांगले केले की पर्मनंट करत्याल म्हणे”

“आत्ताच्या ह्या नोकरीत काय प्रॉब्लेम आहे?”

“पगार कमी  मिळतो आणि राबवून फार घेतात, म्हणजे बघा सक्काळी सक्काळी दहा ला कामाला हजेरी लावायची, आल्या आल्या कामाला लावतात ते पार संध्याकाळी सहा वाजे तो पर्यंत सोडत नाहीत, सारखे काम आणि काम . त्यात कामाला जायला जरा कुठे झाला एक तास उशीर तर समजून घ्यायचे म्हणूण काही असते का नाय? लगेच पेमंट कापत्यात,  कामात जरा चुकी झाली की बोलणी बसतात ती वेगळीच”

“रोजच बोलणीं बसत असतील ना?

“हा ना राव, तुम्ही बरोबर ओळीखलं  बघा, आता माणूस आहे तिथे चुका होणार का नाय? सांभाळून घ्यायला नको का?”

“पण रोज कशा चुका होतात”

”तेच कळेना झालय”

“बरे, आता कसली नोकरी पाहीजे तुम्हाला”

“एकदम भारीतली”

“हो, पण भारी म्हणजे नेमकी कसली? काहीतरी आयडीया असेल ना डोक्यात, सरकारी का खासगी?”

“सर्कारी नोकरी एकदम ब्येस्ट बघा, आपल्याला तीच जास्त सुट होणार पण त्यासाठी परीक्षा का काय ती असती म्हणे , आपल्याला ते जमणे अवघड आहे”

“हो, तसे असते खरे, मग प्रायव्हेट मध्ये काम करा”

“चालेल की, प्रायव्हेट पण भारी असतेय, पण मोठे प्यॅकेज पायजे”

“म्हणजे किती?”

“म्हणजे बघा, स्टार्ट ला महिन्याला पन्नास – साठ हज्जार तरी सुटले पाहीजेत”

“बास का? ”

“आता स्टार्ट करायचे म्हणून इतके कमी, नंतर तीन एक महिन्यात आपला वट बसला की पॉलीटीक्स करुन पगार वाढवून डब्बल करुन घ्यायचा”

“हो , तुमच्या सारख्याला इतके तरी पॅकेज मिळायलाच पाहीजे आणि घरभाडे भत्ता? त्यातच का शेपरेट ?”

“त्याचे पंधरा एक हज्जार शेपरेट दिले तरी चालतय , भागवू त्यातच सुरवातीला, नंतर समजून देतील की राव”

“हो ते पण खरेच आहे, पण बाकी कामाचे काय”

“कामाचे काय? अहो, एव्हढी भारीतली नोकरी म्हणल्यावर हाता खाली सात-आठ जण असणारच की काम करायला, त्यांना कामाला लावायचे आपण फक्त लक्ष ठेवणार”

“म्हणजे नेमके काय करणार?”

“काय नाही, सकाळीला एक राऊंड मारायचा आणि संध्याकाळी एक राऊंड चेक करायचे काम झाले की नाय ते, बाकी दिवसा काठी दोन – चार सह्या ठोकायच्या बास आणि असे काय काम असतेय?”

“हो ना, या असल्या मोठ्ठ्या पॅकेजवाल्या नोकर्‍यांत नाही तरी काम असे नसतेच, नुसता टाईम पास”

“गुरुजी, तुम्ही एकटेच मला बराबर समजुन घेताय”

“त्याचे काय आहे अनिल कुमारजी, तुम्ही अगदी माझ्या मनातले बोलताय त्यामुळे तुमचे सगळे पटतय मला”

“मग मला असली नोकरी कधी मिळेल ते सांगा ना. आपली तशी दोन – चार महीनें थांबायची तैयारी आहे, त्या हिशेबाने सांगा”

“शाब्बास रे पठ्ठ्या , अशी थांबायची तयारी पाहीजे, नाहीतर बाकीचे , महीन्याला लाख पाहीजेत आणि ते सुद्धा लगेच, उद्याच !”

“मग मला भेटेल ना?”

“काय?”

“अहो, काय म्हणून काय विचारता? नोकरीचं चाल्लेय ना आपले?”

“हो, मी विसरलोच ना! “

“मग कधी?”

“त्याचे असे आहे अनिल कुमार जी, तुम्हाला पाहीजे तशी नोकरी मला पण हवी आहे , असे प्यॅकेज मिळत असेल तर थोडे जास्त काम करायची माझी फुल्ल तयारी आहे, त्यात काय एखादा राऊंड जास्त मारेन , दोन च्या ऐवजी दहा सह्या जास्त ठोकेन , शे-पाचशेनी पॅकेज कमी असले तरी चालेल मला पण दहा वर्षे झाली, पण हुडक हुडक हुडकले पण असली नोकरी नाही भेटली बॉ”

“तुम्हाला पण?”

“मग काय सांगायला लागलोय ? अनिल भाऊ मला सांगा जरा, स्टार्ट ला महीन्याला पन्नास – साठ हज्जार पाहीजेत तुम्हाला ,  कोण देणार तुम्हाला? तुम्हाला काय येते म्हणून द्यायचे इतके पैसे ? धड शिक्षण नाही, कोठे मान घालून काम केले नाही, कोणते काम करायची तयारी नाही, मेहेनतीची तयारी नाही, फक्त बसल्या जागी पैसे पाहिजेत ते पण इतके? कशाच्या जिवावर असली भारी नोकरी मागताय ते कळेल का?”

“आता माझ्या नशिबात असेल तर असली नोकरी भेटणार नाय का?”

“माझ्या पहाण्यात , ऐकण्यात अशी नोकरी फक्त नशीबाच्या जोरावर मिळालेला कोणीही नाही, तुम्ही दाखवू शकाल कोणी असा? तुमच्या त्या अनिलकपूर ला विचारा , किती मेहेनत केल्यानंतर त्याला हे आजचे दिवस दिसले ते!”

“तो हिरो आहे”

“हो पण मुंबईत आला त्या वेळी ‘झिरो’ होता, धडपड करत होता तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्म वर , फुटपाथ वर झोपत असे तो, फक्त एक वडा-पाव वर दिवस काढलेत त्याने. पडेल ते काम करायची तयारी होती त्याची , स्टुडिओत ओझी उचललीत , झाडू मारलाय त्याने, उपाशीपोटी मॉब सिन मध्ये दिवस दिवस उभा राहीला होता तो, काम मिळवायला दिवस भर स्टुडीओचे उंबरठे झिजवलेत त्याने… हे इतके सगळे केल्यानंतर मग कोठे  चांगले दिवस आले त्याच्या आयुष्यात”

“आपली पण तयारी आहे की”

“मग कोंबड्या का मेल्या?”

“त्यात माझी चुकी नाय, तिथे मोबाईल ला रेंज नसायची, फेसबुक नाय , व्हॉट्स अ‍ॅप नाय ,  म्हणून मी रोज लांब नदी काठी बसायचो, नाईलाज होता, त्यामुळे कामात लक्ष देता आले नाही,  पक्षी म्येले खरे पण मी मारले का? त्यांच्या त्यांनीच माना टाकल्या ना?”

“हे बघा अनिलकुमारजी, तुम्हाला पाहीजे तसली नोकरी अशी मिळत नसते”

“मी काय करायचे म्हणता?”

“तुमचे पप्पा काय सांगतात ते ऐका त्यातच तुमचे हित आहे. आणि एक करा..”

“काय?”

“इथुन पुढे पाच वर्षे मलाच काय इतर कोणत्याही ज्योतिषाला भेटू नका”

“ते का?”

“तुमचे भविष्य तुमच्या पत्रिकेत नाही की हातावरच्या रेषांत नाही, तुमच्या जीवनात काही घडणार असेल तर ते फक्त आणि फक्त मेहेनती मुळेच ! तेव्हढी मान खाली घालून मेहनत करा बस्स. सध्या तुम्हाला फक्त हेच काम करायचे आहे”

 

“……”

 

शुभं भवतु

 

Similar Posts

14 Comments

    1. धन्यवाद श्री दिपकजी,

      असे बरेच अनुभव आहेत माझ्या कडे , ग्रामीण भागातली तरुणाई सध्या कसल्या अवस्थेत आहे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे

      सुहास गोखले

  1. अनेकांचे तरुणांचे प्रतिनिधित्व करतात हे अनिलकुमार साहेब. खरं सांगू, तुमच्या सारखाच कडू औषध देऊन बरा करणारा वैद्य हवा. असल्या अंधार कोठडीत स्वतःहून कोंडून घेणारे बरेच आहेत, त्यांना सूर्य दाखवणारा खऱ्या गुरुचे काम केलेत. हेच खरंखुरं पुण्य. 👌💐

  2. अनिलकुमारच ठिक आहे ,तो गाढवच आहे पण त्या “नबाब ऑफ ×××”काय पाहीजे होत ते सांगांना!

    1. श्री अणासाहेब ,

      अभिप्राया बद्दल धन्यवाद . येत्या महीना दिड महीन्यात अर्धवट राहीलेल्या सर्व लेखमाला पूर्ण करत आहे

      सुहास गोखले

  3. सुहासजी,

    एकदम नमुनेदार अतरंगी लोक आहेत, तुम्हाला पण तेवढाच विरंगुळा (stress release) होत असेल 🙂 .

    पण ह्या नमुनेदार लोकाना समजावण फारच कठीण काम असेल ?

    संतोष सुसवीरकर

    1. श्री. संतोषजी ,

      अभिप्राया बद्दल धन्यवाद . व्यवसाय मग तो कोणताही असो अनेक प्रकाराच्या लोकांना हाताळावे लागते . मनुष्य स्वभावाचे अनेक कंगोरे दिसतात. यातुन ही आपल्याला बरेच शिकायला मिळते. माझ्या कडे नाशीकच्या ग्रामीण भागातून बरेच युवक / युवती येतात एकंदरच भयानक चित्र आहे , सगळा समाज आळशी , निकम्मा झाला आहे. यांना समजाऊनही काही उपयोग नसतो ( त्यांना समजाऊन ही घ्यायचे नसते !) त्यात आपलाच टाईम बरबाद होतो, तेव्हा चार शब्द समजुतीचे सांगायचे आणि कटवायचे.

      सुहास गोखले

  4. तुमची लेखन शैली अतिशय ओघवती आहे , तुमची objectivity खूप आवडते. One should be acutely aware of limitations of the instrument at hand . मी इतर अनेक व्हाट्सप्प ज्योतिष ग्रुप्स( काही अपवाद सोडता) वर नुसते व्यर्थ शास्त्र चर्चा करण्यात धन्यता मानणारे लोक पाहतो. त्यांनी तर या युवकाला पण कुठल्या तरी ग्रह शांतीचा सल्ला दिला असता।
    One generic comment : your eastern and western synthesis method खूप छान ! लवकरच क्लास चालू करा सर !

    1. श्री शार्दुलजी,

      अभिप्राया बद्दल धन्यवाद .
      काहीवेळा एखाद्या जातकाला परत पाठवावे लागते कारण त्याच्या समस्याचे उत्तर ज्योतिषशास्त्रात नाही तर त्याच्या ईच्छाशक्ती वर आणि प्रयत्नांत असते. आगामी काळ वाईट असेल तर तो तसा असणारच कितीही जालिमातले जालिम तोडगे केले तरी आपण तो चांगला करु शकत नाही , मग आपल्या हातात काय असते? आगामी अनिष्ट काळाला चांगल्या तर्‍हेने तोंड येता येईल अशी तयारी करुन जे काही होईल त्याला धीराने तोंड देणे. पत्रिका पाहुन मी हेच सांगत असतो पण दुर्दैवाने कोणालच हा सल्ला नको आहे सगळ्यांना हवी आहे एक उपाय तोडग्यांची मॅजीक पिल !

      अ‍सो.

      काही तांत्रीक अडचणी मुळे माझा ऑनलाईन कोर्स संपुर्ण तयार असूनही सुरु करता येत नाही, प्रयत्न चालू आहेत , काही चांगल्या आश्वासक घटना घडत आहेत, मला विश्वास आहे की लौकरच कोर्स चालू होईल.

      सुहास गोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *