“वाटत नाही हो!”
माझ्या तोंडून पटकन हे शब्द निघून गेले, मी जीभ चावली सुद्धा पण तो पर्यंत शब्द तोंडातून निसटले देखील!
बाई चक्क लाजल्या!
“काही तरीच काय !”
“अहो खरेच, तुमच्या कडे बघून तुम्ही ३४ वर्षांच्या आहात यावर विश्वास ठेवणे अवघड आहे! ”
“त्यात काय, इतके आश्चर्य वाटण्या सारखे काही नाही हो”
“आज काल सगळेच ‘संतूर’ साबण वापरायला लागल्या पासून अशी फसगत वारंवार होते हो, ‘त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं लगता’ असेच झालेय सगळ्यांचे!”
बाई छान हसल्या!
वय विचारले म्हणून बाई कदाचित रागावल्या असल्या तर तो ताण निवळण्या साठी मी एक विनोद केला. बाईं तशा स्पोर्टिंंग निघाल्या म्हणून बरे, वाचलो!
त्याचे झाले असे होते की मी बाईंना चक्क त्यांचे वय विचारले, एखाद्या स्त्रीला तिचे वय विचारणे हा गुन्हा आहे असे म्हणतात! पण बाईंचे वय कळले असते तर बाईंनी माझ्या पुढे जो प्रश्न टाकला होता तो सोडवायला नक्कीच मदत होणार होती म्हणून त्यांचे वय विचारायचे धाडस करावे लागले!
त्याचे झाले असे…
बाई माझ्या कडे एक प्रश्न घेऊन आल्या होत्या, खरे तर मुळातच बाईंनी विचारलेला प्रश्न मला आवडला नव्हता, अशा पद्धतीचे प्रश्न सहसा ज्योतिषाची परीक्षा पाहण्यासाठी किंवा टिंगल टवाळी साठी विचारले जातात असा माझा अनुभव आहे. त्या मुळे कोणी असा प्रश्न विचारला तर मी त्याला ताबडतोब ‘नारळ’ देतो, हो, असल्या लोकांच्या तोंडी लागणे हा नुसता वेळेचा अपव्यय नाही तर चक्क एक मूर्खपणा ठरतो!
पण या बाईंच्या बाबतीत मी असे करू शकत नव्हतो कारण माझ्या समोर बसलेल्या बाई कोणी साध्या नव्हत्या! भपकेबाज बी.एम.डब्ल्यू. गाडीतून आलेल्या या बाई, त्यांचे पतिराज तर नाशकातल्या उद्योगविश्वातले, समाजकारणातले एक बडे प्रस्थ होते. बाईंच्या नवर्याचे समाजातले स्थान पाहता बाईंना असा सरळसरळ ‘नारळ’ देणे मला परवडणारे नव्हते. त्यामुळे काहीशा नाखुशीनेच बाईंचा प्रश्न सोडवायला घेतला.
बाईंनी विचारलेला प्रश्न अगदी शब्दश: एका काना मात्रेचा फरक न करता इथे लिहितो:
“उद्या एका मेडिकल टेस्ट साठी डॉक्टरांच्या कडे जात आहे, त्याचे काय होईल?”
मला आज पर्यंत अनेक वेडेवाकडे, उलटे सुलटे, हास्यास्पद असे प्रश्न विचारले गेले आहेत. हा एक त्यातलाच प्रकार म्हणायचा, मुळात कोणी असा प्रश्न का विचारेल? जे एवी तेवी उद्या परवा कळणारच आहे ते आजच ज्योतिषाला पैसे मोजून जाणून घेण्याचा अव्यवहारीपणा कोण करेल? पण बाईंनी तो केला होता!
“अहो पण उद्या-परवा कळेलच ना टेस्ट झाल्यावर त्यासाठी आजच ज्योतिषाला का विचारत बसता?”
“नाही, मला आजच कळले तर हवे आहे”
“ते ठीक आहे पण हा कसला चेक अप वगैरे आहे का? एखादी स्पेशल टेस्ट? “
“ते मी सांगणार नाही”
“ही माहिती आवश्यक आहे त्या शिवाय प्रश्न बघता येणार नाही”
“इथेच तर तुमचे स्किल आहे असे मी समजते”
अरे बापरे! बाईंनी चक्क आव्हानच दिले म्हणायचे!
समोर बसलेल्या जातकाचे मी अगदी बारकाईने निरीक्षण करत असतो, जातक कोणत्या वाहनातून आला, अपॉईंटमेंटला वेळेत आला का, जर उशीर झाला असेल तर कोणती सबब कशा तर्हेने सांगतो, जातकाचा पेहेराव, घड्याळ, फोन, पर्स, परफ्युम, पादत्राणे, चष्मा असल्यास त्याची फ्रेम, जातक खुर्चीत कसा बसतो, जातकाची बोलण्याची हसण्याची पद्धती, एकंदर देहबोली, प्रश्न विचारतानाचे जातकाच्या चेहेर्यावरचे हावभाव, बोलताना जातकाला घाम येतो का, अडखळतो का, त-त-प-प होते का, आवंढा गिळला जातो का, चुळबुळ किती आणि कशी आहे एक ना दोन अशा अनेक गोष्टींचे मी बारकाईने निरीक्षण करत असतो, त्यातून मला जातका बद्दल बरेच काही कळते, जातक जे बोलत असतो, सांगत असतो त्यात काही लपवाछपवी आहे का, जातक प्रश्ना बाबत पुरेसा गंभीर आहे का, एकंदरच जातकाची मानसिकता कशी आहे या बद्दलचे अनेक धागेदोरे मला या निरीक्षणातून मिळत असतात. मला वाटते प्रत्येक ज्योतिर्विदाने ही कला अवगत करून घ्यायला हवी.
जातका बाबतचे माझे निरीक्षण सहसा मला दगा देत नाही, बाईंची देहबोली सांगत होती की बाईंनी काहीतरी दडवले आहे. कोठे तरी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती की बाईंनी हा प्रश्न तर विचारला आहे खरा पण त्यांना वेगळेच काही तरी विचारायचे आहे आणि कदाचित नंतर त्या आडवळणाने विचारतील ही, आत्ता विचारलेला प्रश्न ही त्या ‘खर्या’ प्रश्नाच्या आधी केलेली एक चाचपणी / खडाखडी पण असू शकेल. असे अनुभव मला काही वेळा आलेत देखील!
मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले!
जातकाने विचारलेल्या प्रश्ना संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिषांकडे दोन पर्याय असतात, जन्मकुंडली आणि प्रश्नकुंडली. कोणत्या कामासाठी जन्मकुंडली वापरायची आणि कोणत्या कामा साठी प्रश्नकुंडलीचा अवलंब करायचा याचे काही नियम आहेत, अडाखे आहेत. त्या बद्दल मी वेळोवेळी माझ्या ब्लॉग वर विस्तृतपणे लिहिले आहे त्यामुळे ते सगळे परत इथे लिहित बसत नाही.
बाईंनी त्यांचे जन्म तपशील द्यायला नकार दिला, अनेकांना आपली खासगी माहिती कोणा परक्या व्यक्ती समोर उघड करायला आवडत नाही, यात वावगे असे काहीच वाटले नाही. त्यामुळे बाईंचा प्रश्न सोडवायला माझ्या समोर प्रश्नकुंडली हाच एकमेव मार्ग उपलब्ध होता, त्याचाच वापर करायचे ठरवले.
प्रश्नकुंडली हे किती प्रभावी माध्यम आहे याचे अनुभव मी नेहमीच घेत असतो. जातक प्रश्न विचारायला येतो तेव्हा तो आपल्या प्रश्ना सोबत त्याचे उत्तर पण घेऊन आलेला असतो! जातकाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्रश्न विचारल्या वेळेच्या ग्रहस्थितीतच दडलेले असते, ज्योतिर्विदाला ते फक्त हुडकून काढायचे असते.
मात्र त्या साठी जातकाने प्रश्न अगदी तळमळीने विचारलेला असला पाहिजे, प्रश्न खूप निकडीचा असावा, जातक त्या प्रश्ना बाबत पुरेसा गंभीर असावा, प्रश्न वैयक्तिक असावा (क्रिकेटची मॅच किंवा निवडणुकांचे निकाल असा सार्वजनिक स्वरूपाचा नसावा) आणि महत्त्वाचे म्हणजे त्या प्रश्नात (आणि त्याच्या संभाव्य उत्तरात) जातकाची शारीरिक, मानसिक (भावनिक), आर्थिक, नैतिक अशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची ठोस गुंतवणूक असली पाहिजे. हा मुद्दा ही अत्यंत महत्त्वाचा आहे. काम सुरू करण्या पूर्वी ही खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक असते, प्रश्नशास्त्राच्या या मूलभूत तत्वांचीच पायमल्ली झाली तर पुढे कोणी कितीही चांगला प्रयत्न करून प्रश्न सोडवला तरी त्याचे उत्तर चुकण्याची फार मोठी शक्यता असते. चार पैसे मिळतात म्हणून किंवा जातकाला नाराज करायचे नाही म्हणून येईल त्या जातकाने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे देत बसू नये असे मला वाटते. प्रश्नकुंडली ही सर्व रोगांवरचे एकच असे रामबाण औषध किंवा जादूची कांडी (Magic wand!) नाही!
असो.
बाईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला तो नेमका क्षण आणि ‘नाशिक शहर’ या स्थळाची एक कुंडली मी तयार केली ती सोबत छापली आहे.
दिनांक: ११ जुलै २०१९, वेळ: ०९:१०:४७ स्थळ: नाशिक शहर (19N59 , 73E48)
ही (प्रश्न) कुंडली, सायन भावचलित, रिजिनोमोनटॅनस हाऊस सिस्टीम आणि मीन नोड्स अशी आहे.
प्रश्नकुंडलीचे एक बरे असते, प्रश्न नेमका असतो, अॅनालायसीस पण आटोपशीर असते, हे बघा – ते पण बघा, सतराशे साठ घटक तपासा असला फाफटपसारा नसतो. प्रश्नाच्या अनुषंगाने येणारे दोन – चारच घटक जरा डोळ्यात तेल घालून तपासले की झाले! हो, पण हे दोन- चार घटक नेमके कोणते हे ठरवणे येरा गबाळ्याचे काम नोहे!
मी या कुंडली कडे काही काळ लक्ष देऊन पाहिले, थोडा विचार केला आणि लक्षात आले की बाईंच्या प्रश्नात काहीतरी गडबड आहे, कोठे तरी झोल आहे, काही महत्त्वाची माहिती पण दडवली आहे!
आणि हेच बहुदा बाईंनी मला दिलेले आव्हान असावे!
अर्थात प्रश्नकुंडली इतकी स्पष्ट होती की हे प्रकरण नेमके काय आहे हे माझ्या लक्षात आले आणि मग उत्तरा पर्यंत पोहोचायला मला फार वेळ लागला नाही!
उत्तर तर तयार झाले पण आता ते बाईंना सांगणे किती अवघड किंबहुना अडचणीचे ठरणार आहे याची कल्पना येताच मी क्षणभर थबकलो.
“त्यात काय पत्रिका जे दाखवते आहे ते फक्त सांगायचे’ असे जरी असले तरी काही वेळा समोर कोण बसले आहे याचाही विचार करावा लागतोच. आधी एक महीला आणि त्यात अशी मातब्बर तेव्हा यांना आता कसे सांगायचे असा मोठा यक्षप्रश्नच माझ्या समोर उभा ठाकला म्हणा ना!
सांगायचे तर आहेच, पण कसे?
या कुंडली साठी जी काही गृहीतके मी वापरली होती त्यात बाईंचे वय कळणे महत्त्वाचे होते. तसे बाईं कडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज आला होताच पण काही वेळा आपली नजर आपल्याला धोका देऊ शकते म्हणून खात्री करून घेण्यासाठी मी बाईंना त्यांचे वय विचारले होते!
मी नेमके काय पाहिले ह्या पत्रिकेत? बाईंना काय सांगितले? पत्रिकेत मी जे पाहिले तसेच होते का?
सांगतो, सगळे सविस्तर सांगतो सायबानु …
पण पुढच्या भागात………..
क्रमश:
शुभं भवतु
Yummy! नववर्षाची पर्वणी!
धन्यवाद श्री प्राणेशजी
सुहास गोखले
सर ,
तुमचा ज्योतीष विषयक अभ्यास , अनुभव इ ….. खुप आहे . माझ्यासारख्या नवशीक्याला यातले बरेच लेख थोडेफार कळतात , बरेचसे कळत नाहीत .
आपल्याला माझी एक विनंती …..
कृष्णमुर्ती पद्धत तुम्ही या ब्लाॅगमार्फत सर्वांना थोडीफार तरी शीकवावी . कारण बरीच केपी ची पुस्तके घेतली . पुढे जायला थोडा आधार हवा आहे .
तरी आपल्या सवडीनुसार थोडेफार मार्गदर्शन करावे .
अतुल बर्वे .
व्हाॅटस्अप — 9930141868.
धन्यवाद श्री अतुलजी,
ब्लॉग च्या माध्यमातून नक्षत्रपद्धती शिकवणे सध्या वेळे अभावी शक्य नाही. माझ्या ब्लॉग वर नक्षत्रपद्धती नुसार सोडवलेल्या काही केस स्ट्डीज आहेत त्या वाचल्यात काही लाभ होईल असे मला वाटते
शुभेच्छा
सुहास गोखले