मित्रहो ,
गेले बरेच दिवस मी ब्लॉग लिहू शकलो नाही, नविन लिहा , अशी मागणी सातत्याने होत आहे, अशी मागणी होते आहे म्हणजेच निदान काही जण तरी माझ्या लिखाणात उत्सुकता दाखवत आहेत , हा मी माझा बहुमान समजतो. माझ्या वाचकांना नविन का लिहले जात नाही याचा खुलास करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. म्हणूनच आजचे हे निवेदन.
नविन लिहावे असे मला ही वाटते , बर्याच विषयांवरची कच्ची टिपणें माझ्या कडे तयार आहेत त्यात वेळोवेळी भर टाकत असतो पण त्या कच्च्या टिपणां वरुन पूर्ण सजलेला लेख तयार करणे ही मोठी वेळखाऊ प्रकिया आहे. मनात आले , काही तरी खरडले आणि दिले ढकलून ब्लॉग वर असे मी करत नाही. काहीतरी सकस , रंजक , माहीतीपर मजकूर असावा आणि तो नसेल तर काही न लिहलेले बरे असे मी ठरवले आहे. आणि म्हणूनच “ पंचांग विकत घ्यारे”, “शनीची पूजा करा रे”, “अमुक तमुक ग्रहांची युती झाली रे” “सर्दी झाली , डोकं भनभनलं” अशा थाटाच्या चतकोर / नितकोर पोष्ट मी लिहणार (पाडणार) नाही.
दैनंदीन , साप्ताहीक , मासीक राशी भविष्य टाकून ब्लॉग सजवणे सहज शक्य आहे , तसे केले असते तर महिन्याला लाखाच्या घरात पेज हीट्स घेऊ शकेन इतके मी ते चांगले लिहू शकेन पण मुळात ‘राशी भविष्य ‘ हा प्रकार म्हणजे ज्योतिष शास्त्राचा अपमान असे मी मानत असल्याने मी ते कदापीही करणार नाही. मला वृत्तपत्रे, मासिकांच्या संपादकां कडून ‘राशी भविष्याचा कॉलम’ बघता का चांगले घसघशीत मानधन देऊ’ अशा ऑफर्स अनेक वेळा आल्या आहेत पण घसघशीत लाभ दिसत असताना सुद्धा मी शास्त्राशी प्रमाणिक राहात त्या ऑफर्स नाकारल्या आहेत. हे असे लिहण्यात मी काही मोठी फुशारकी मारत नसून मी कोणत्या पद्धतीने विचार करतो आणि शास्त्राशी आणि उरी बाळगलेल्या तत्वांशी प्रामाणिक कसा राहतो हेच फक्त सांगायचे आहे.
एखादी पोष्ट करण्या मागे मोठी मेहेनत असते, फेसबुक वर एखादे ‘लाईक’ किंवा एखादी कॉमेंट रुपी पिंक टाकण्या सारखे ते किरकोळ नाही.
सुरवात होते लेखाचा विषय निवडण्या पासुन, माझ्या लेखांचे विषय सुद्धा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेऊन बेतलेले असतात , केवळ मला लिहावेसे वाटते म्हणून नव्हे. मी काही लेखमाला अर्धवट सोडल्या तेव्हा मला बर्याच जणांनी ‘असे का’ म्हणून विचारले होते , माझा खुलासा सरळ होता ‘ फार कमी लोकांनी ते लेख वाचले होते’ सध्याच्या भाषेत बोलायचे तर अगदी कमी टी.आर. पी. मिळाला होता. लेखमाला वाईट नव्हत्या पण कदाचित माझ्या बर्याच वाचकांना अशा विषयांत फारशी रुची नाही इतकेच.
लेखाचा विषय निवडल्या नंतर त्यासाठी आवश्यक माहीती जमवणे, कच्चे मसुदे तयार करणे, पक्का मसुदा तयार करणे , सर्व फॅक्टस, डेटा इ वैधतेच्या दृष्टिने तपासणे, कॉपीराईट्स तपासणे , संपादनाचे सर्व सोपस्कार करणे, हे सगळे मराठीतून टाइप करणे. (माझे बरेचसे मूळ / कच्चे लिखाण इंग्रजीतून असते नंतर त्याचे मराठीत भाषांतर होते) . त्याच बरोबर लिखाण सार्वजनिक होणार आहे, आज , उद्या , परवा हजारों नव्हे लाखों लोक ते वाचणार आहेत त्यामुळे माझ्या लिखाणातून एखादा चुकीचा वेडा वाकडा संदेश जाऊ नये ह्या कडे मला लक्ष द्यावे लागते.
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणारे अनेक जण माझा ब्लॉग वाचतात, माझ्या लेखनाने त्यांच्या अभ्यासाला मदत झाली अशा अनेक ईमेल्स मला येत असतात. माझ्या लेखनातून या अशा विद्यार्थांची कोणत्याही प्रकाराची दिशाभूल होऊ नये, चुकीची, सिद्धते शिवाय केलेली कोणतीही शास्त्रीय किंवा अन्य मते माझ्या लिखाणात येणार नाहीत याची मी पराकोटीची दक्षता घेत असतो आणि हे सगळे निकष पार पडे पर्यंत एखादे तयार लिखाण सुद्धा काही आठवडे पाईपलाईन मध्ये ताटकळत ठेवावे लागते.
लिखाणाची भाषा, तिचा दर्जा, पोत कसोशीने सांभाळावा लागतो, उगाच चटपटीत खमंग पणाचा नावाखाली , सडेतोड , स्पष्ट्वक्तेपणाच्या नावाखाली अर्वाच्य, अश्लील , गलिच्छ , शिवराळ भाषेतल्या पोष्ट मी टाकणार नाही , (तसे करणे तर फारच सोपे आहे !) , असा मजकूर असलेले काही ब्लॉग आहेत , ते माझ्या पेक्षाही किती तरी पटीने जास्त लोकप्रिय आहेत पण मी तसे करणार नाही , माझी खानदानी सराफी पेढी आहे केवळ खप आहे म्हणून गाय छापच्या पुड्या विकायला ठेवणार नाही!
मी दोन-अडीच वर्षा पूर्वी ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हा माझी आणि माझ्या ज्योतिष विषयक सेवेची थोडी जाहीरात करावी असा हेतु होताच , खोटे कशाला बोलायचे. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही कारण ब्लॉग वाचुन जेव्हढे जातक माझ्या कडे येतात त्याच्या पेक्षा कितीतरी जास्त जातक माझ्या कडे ‘माउथ टू माऊथ’ पब्लिसिटीने म्हणजे कोणाचा तरी संदर्भ घेऊन येतात. एकाला मी सांगीतलेल्या भविष्याचा पडताळा आला किंवा कोणाला माझा सरळ स्वच्छ प्रामाणीक पणा आवडला, कोणाला माझे शास्त्राशी प्रामाणिक राहणे रुचते, कोणाला मी उपाय-तोड्ग्यांचा बाजार मांडला नाही त्याचे कौतुक वाटलेले असते , मग अशा व्यक्ती दुसर्याला माझ्या कडे पाठवतात , त्यातुन तिसरा मग चौथा असे जातक माझ्याकडे येत असतात, मला असेच जातक आलेले हवे आहेत , जाहीरातबाजीला बळी पडून आलेले नकोतच.
त्यामुळे ब्लॉग लिहण्यातला ‘व्यवसायाची जाहीरात’ हा इन्सेंटिव्ह तसा खूपच कमी झाला आहे. आता मी ब्लॉग लिहतो ते केवळ हौस म्हणून . ब्लॉग लिहण्याला आता पूर्वीसारखी प्रॉयॉरीटी देता येत नाही.
मी कॉर्पोरेट ट्रेनर , सॉफ्टवेअर कन्सलटंट म्हणून काम करतो हे माझे प्रमुख उत्पनाचे स्त्रोत्र असल्याने त्यांच्या कडे मला लक्ष देणे अनिवार्य आहे , प्रामाणीक पणे केलेल्या ज्योतिषाच्या व्यवसायातून दोन वेळेचे पोट सुद्धा भरता येत नाही हे मी माझ्या एका लेखमालेतुन लिहले होते ते जसेच्या तसे माझ्या बाबतीत आहे. ज्योतिषाची कमाई किती ? – भाग १
त्यामुळे पोट भरण्यासाठी कॉर्पोरेट ट्रेनर , सॉफ्टवेअर कन्सलटंट या दोन बाबींना मी प्रथम प्राधान्य देतो, ज्योतिष , ब्लॉग हे तुलनेत काहीसे दुय्यम आणि तसे ते राहणार.
हे सगळे लिहण्या मागचा हेतु हा की सध्या मी काही ट्रेनिंग प्रोग्रॅम्स घेत आहे , काही नवीन प्रोग्रॅमस ची आखणी चालू आहे, व्यवसाय वृद्धी साठी नविन नविन कंपन्यांना भेटणे , त्यांच्या रिक्वायरमेंटस जाणुन घेणे, त्यांना प्रेझेंटेशन्स देणे , कोटेशन्स देणे अशी बरीच कामे सध्या चालू आहेत . जसा ‘आंब्याचा’ , ‘द्राक्षाचा’ सिझन असतो तसा हा माझा ‘ट्रेनिंग व्यवसायाचा सिझन’ आहे म्हणले तरी चालेल. यात मिळणार्या पैशानेच माझी वर्षभराची बेगमी होत असते. एकदा का ही अशी बेगमी झाली की मग आहेच ना शिळोप्याच्या गफ्फा , पारावरच्या चकाट्या आणि पिचकार्या. काय खरे ना?
तेव्हा वाचक हो, काही काळ कळ काढा , एकदा माझी कणगी भरुन झाली , पोटावर हात फिरवत ढेकर काढून झाली मी आहेच मोकळा. ते सद्या आणि गण्या पण आहेत गाय छाप ची पुडी सरकवायला, तेव्हा जमवू एखादा फक्कड ब्येत, पण तोवर वाईच दम खावा, पाव्हणं!
शुभं भवतु
Dear Suhas Ji , Eagerly waiting for your article of next part of ” Babajin Cha Anubhav ” .
Thanks , Niranjan .
धन्यवाद श्री. नीरंंजनजी,
बर्याच दिवसंनी आपलै कॉमेंट वाचायला मिळाली, श्री. बाबाजींच्या लेखमालेतले दोन – तीन भाग कच्च्या स्वरुपात तयार आहेत
पण त्यातला काही भाग प्रकाशीत करावा की न करावा या बाबत मलाच शंका आहेत म्हणुन मी थांबलो आहे , काही संकेत मिळाल्यास मी ते भाग प्रकाशीत करेन.
सुहास गोखले
सुहासजी,
पटल तुमच, शेवटी ब्रेड आणि बटर महत्त्वाचे.
संतोष
धन्यवाद संतोषजी
सुहास गोखले
धन्यवाद , एव्हढं मोकळे सांगितल्याबद्दल आणि ज्योतिष शास्त्राची निष्ठा आमची वाढविल्या बद्दल , सर
धन्यवाद,
आपण आपले नाव दिले नाहीत, मागेही आपण एकदा कॉमेंट केली होती तेव्हाही आपले नाव दिलेले नव्हते, तेव्हा आणि आज पोहोच दिली पण नाव न देता (किंवा ज्यातून कोणताही अर्थबोध होत नाही असे क्रिप्टिक नामाधीमान असलेल्या ) दिलेल्या कॉमेंट्स मग ज्या कितीही चांगल्या हेतुने दिलेल्या असलया तरी स्विकारता येणार नाहीत. राग मानू नका, पण इंटरनेट च्या माध्यमातून आपली ओळख लपवून केलेले असे काही काही मला उमजत नाही. हा माझा ह्ट्ट समजा किंवा स्वभावतालला दोष.
सुहास गोखले
changed Public Display name , from wordpress profile . Thanks.
सर, हा X Factor पांडू तर नसेल??
तृप्ती जी,
आगे आगे देखो होता है क्या !
सुहास गोखले
एकदा का ही अशी बेगमी झाली की मग आहेच ना शिळोप्याच्या गफ्फा , पारावरच्या चकाट्या आणि पिचकार्या. काय खरे ना? हे मात्र खरंय सुहासजी हे मात्र खरंय सुहासजी .आधी पोटोबा मग विठोबा !!! पॉट भरल्या परीस इटोबाची भक्ती करता येईल का ? न्हायतर हात इटोबासमोर जोडलेले आणि मन मात्र येगळीकडचं मला वाटतेय सुहास जी हे अध्यात्म जोतिष वगरे पॉट भरल्यानंतरच दुसर्यांना सांगावे . ईथेच आम्ही चुकतो अध्यात्म अध्यात्म करत व्यावहारिक प्रगती कडे दुर्लक्ष होते . मला चांगलाच अनुभव आहे . खूप मोहमय आहे हे सगळं .
धन्यवाद स्वप्नीलजी
सुहास गोखले
अध्यात्माचा अतिरेकी अभ्यास करून मी माझी खूप वर्षे घालवली . वाया असे नाही म्हणणार पण त्यामुळे तिकडे प्लस आणि इकडे मायनस झालो ना . असो दोन्ही मध्ये समन्वय पाहिजे .
धन्यवाद स्वप्नीलजी
सुहास गोखले