१५ मे ची संध्याकाळ! माझी त्या दिवशीची शेवट्ची चार वाजताची अपॉईंट्मेंट संपली होती जरासा खुष होतो कारण आज कधी नव्हे ते जॉगींग ट्रॅक वर लौकर जायला मिळणार होते, एरवी मी साडे सहा च्या सुमारास जॉगींग ला जातो.पण जरा लौकर गेलो तर आमचे बँक वाले कर्णिक भेटतात , आनंदवल्ली चे वल्ली डॉ. सावंत असतात या लोकांशी माझे चांगले जमते पण त्यांच्या आणि माझ्या वेळां जमत नाहीत. पण आज या लोकांना पकडायचेच असे ठरवत होतो इतक्यात फोन वाजला!
इंटरनॅशनल कॉल , यु.के. कंट्री कोड आणि स्क्रिन वरचे ‘रुथ पॉवेल’ नाव पाहताच मी ओळखले आजच्या या सुंदर संध्याकाळचे वाट्टोळ्ळे झाले !! ही (ब्रिटीश) बाई माझी चांगली मैत्रीण आहे, अभ्यासु ज्योतिषी आहे , ज्योतिषशास्त्राचा मानसशास्त्रीय अंगाने चांगला विचार करते. हे सर्व ठीक असले तरी आजची संध्याकाळ मला ‘गुरु – नेपच्युन योगांची मानसशास्त्रीय बैठक‘ अशा जड गंभीर विषयावर चर्चा करण्यात घालवायची नव्हती, बाकी ‘चर्चा’ नुसते आपले म्हणायला , कारण रुथ मॅडम बोलत असते तेव्हा आपल्याला ते ऐकणे हेच काम असते!
(आमचा फोन वरचा संवाद अर्थात इंग्रजीत झाला होता त्याचे शक्य तितके सुगम मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे)
“बोला, हर मॅजेस्टी, आज काय आज्ञा आहे?”
“तु होरारी वाला आहेस ना, म्हणून तुला एक विचारायचे आहे”
“रुथ , तुझ्याकडे मस्त दुपार पसरलेली असली तरी आमच्या इथे दिवस मावळतीला पोचला आहे, ही काय वेळ आहे होरारी वर चर्चा करायची?”
“चर्चा नाय, रियल होरारी क्वेश्चन आहे”
“म्हणजे तू आज चक्क माझी क्लायंट”
“तसे समज”
“मानधन मिळणार असेल तर विचार केला जाईल!”
“माझ्या कडून मानधन मागतोस?”
“क्या करु मोहतर्मा , ये पापी पेट का सवाल है”
“हे मोहतर्मा काय असते?”
“तुला नाही समजणार, तु आपला प्रश्न विचार बरे”
“माझा प्रश्न असा आहे की आज माझ्या आयुष्यात एक घटना घडली आहे ती कोणती ते सांगायचे!”
“अग पण जे तुला माहीती आहे तेच मी पुन्हा का सांगायचे”
“असेच!”
“माझे आई , पण असे कसे सांगता येईल?
“का नाही सांगता येणार ? तु कन्सलटेशन चार्ट वापरतो ना?”
‘हो पण म्हणून काय …”
‘ते काही नाही, तुला येत असलेली सगळी टेक्निक्स वापर आणि मला सांग”
“अवघड आहे”
“माहीती आहे मला, तुझी परिक्षा घेतेय समज”
“आणि मी पास झालो तर?”
“इबर्टीन ने स्वत:च्या हस्ताक्षरात लिहलेल्या दुर्मिळ नोट्सची, स्कॅन केलेली सुमारे २५ पाने, खास तुला बक्षीस , कुण्णा कुण्णा कडे नाही हा अमोल ठेवा.”
“काय सांगतेस काय? तुला कोठून मिळाले हे धन?”
“दरोडा घातला”
“कोठे?”
“तुला काय करायच्यात नसत्या चौकशां, नोट्स हव्यात ना?”
“हो तर”
“देत्ये, पण आधी माझी पहेली सोडवून दाखव”
“हा काय जुलुम आहे? सरळ सरळ नोट्स दे ना”
“तुझ्या सारख्यांना अस्सच पाहीजे”
‘बरे बाई, तासाभराने फोन कर, उत्तर हुडकून ठेवतो, पण नोट्स देणार ना?”
“नक्की”
“उत्तर चुकले तरी?”
“आधी उत्तर तर दे”
“जो हुक्म मेरे आका”
“म्हणजे काय”
“तुला नाही कळणार!”
“उत्तर दे , टाईमपास करु नको, नोट्स च्या फाईल्स ड्रॉपबॉक्स वर ठेवत्येय , उत्तर सांगीतलेस की पासवर्ड पाठवून देईन”
“ठीक आहे , ‘आलिया भोगासी असावे सादर”
“तू मर्हाटीत बोललास काय , मला समजले नाही”
“तुला समजू नये म्हणून तर …”
“डॅम्बीस आहेस, बरोब्बर दीड तासाने फोन करते , उत्तर तैयार ठेव , आणि हां, पळून जायचे नाय, गाठ माझ्याशी आहे”
“…..”
मला ही अशी प्रेमळ सक्ती आवडते आणि तसे ही इबर्टीन च्या नोट्स चे आकर्षण जबरदस्त होते ! ह्या बाईला हे असले कसे काय मिळते देव जाणे ! पण बाई प्रेमळ , मला माहीत आहे , बाई मला त्या नोट्स देणारच होत्या , उत्तर चुकले / उत्तर दिले नाही तरीही. हा होरारी सवाल म्हणजे उगाच मला थोडी ‘ट्प्पल’ मारली आहे !
असो, मी बाईने प्रश्न विचारला ती वेळ घेऊन एक चार्ट तयार केला …
चार्ट कडे एक नजर टाकताच मी थक्क झालो, झुडपातून वाघ बाहेर येणार म्हणुन तयारी करावी आणि प्रत्यक्षात एक मरतुकडी शेळी ब्यॅ ss ब्यॅ करत बाहेर यावी अशातली गत झाली!
इतका सोप्पा गृहपाठ ? हे म्हणजे दहावीतल्या विद्यार्थ्याला चौथीचा पेपर सोडवायला मिळाल्या सारखेच!
आपल्याला काय मस्तच !
रुथ साठी बनवलेला होररी चार्ट सोबत दिला आहे:
आज माझ्या आयुष्यात एक घटना घडली आहे ती कोणती?
चार्टचा तपशील:
दिनांक: १५ मे २०१७ , वेळ: १७:४०:४३ स्थळ: नाशिक – प्रमोद नगर ऑफ गंगापुर रोड, ट्रॉपीकल (सायन) , प्लॅसीडस , मीन नोडस
चला तर हा चार्ट सोडवायला घेऊया …..
(वेस्टर्न) होरारी कुंडली मांडली की सर्वप्रथम तपासायच्या गोष्टीं ज्याला ‘Considerations before judgment’ म्हणतात, त्या अशा:
१) अर्ली / लेट असेंडंट
२) चंद्र व्हाईड ऑफ कोर्स
३) लग्न स्थानातला किंवा सप्तमातला शनी
४) ‘व्हिया कंबुस्टा’ मध्ये कोणता ग्रह आहे का ?
लग्न बिंदु ०७ वृश्चिक ०४ अंशावर म्हणजे ‘लेट असेंडंट’ नाही आणि ‘अर्ली असेंडंट’ डीग्रीज पण नाही. एक काळजी मिटली.
या पत्रिकेत चंद्र मकरेत १५ अंशावर आहे , हा चंद्र मकर रास ओलांडे पर्यंत काही ग्रह योग निश्चीत करणार आहे म्हणजे चंद्र निश्चितपणे ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ नाही! चला, ही पण एक काळजी मिटली!
शनी द्वितीय स्थानात आहे म्हणजे लग्न / सप्तम स्थात शनी असल्याची अशुभता नाही! अर्थात द्वितीय स्थानातला शनी काही वेगळ्याच समस्या निर्माण करतो त्या बद्दल आपण नंतर विचार करु!
चंद्र मकरेत १५ अंशावर आहे म्हणजेच तो राशी चक्रातला १५ तुळ ते १५ वृश्चिक हा तीस अंशाच्या ‘व्हिया कंब्युस्टा’ चा पट्ट्या मध्ये नाही. काळजीचे कारण नाही.
गुरु १४ तुळ ०८ वर असल्याने तो व्हीया कंब्युस्टा च्या अगदी काठावर आहे पण गुरु वक्री असल्याने मागे मागे जात असल्याने तो इतक्या लगेच व्हीया कंब्युस्टा मध्ये येणार नाही , तेव्हा ही पण काळजी मिटली.
चला , Considerations before judgment’ तपासून झाल्या आता आपल्या प्रोसीजर प्रमाणे या खेळातले प्रमुख खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित करु. या खेळात कोण कोण आहेत?
अरेच्च्या , इथे आपल्याला ‘खेळ कोणता आहे ?’ हे कोठे ठाऊक आहे ? फक्त रुथ बाई खेळात आहे इतकेच तर माहीती आहे , त्यामुळे जरा ‘डिटेक्टीव्ह गिरी’ करावी लागणार तर !
कोसीश करने क्या हर्ज है !
पण पुढच्या भागात
क्रमश:
शुभं भवतु
Interesting
धन्यवाद श्री. अविनाशजी
सुहास गोखले