‘लाईट कधी येणार?’, ‘नळाला पाणी कधी येणार?’, ‘पोष्टमन कधी येणार?” हे केपी वाल्यांचे अगदी आवडते सवाल ! अशा प्रश्नांची कशी अचूक उत्तरें मिळाली / मिळवता येतात याच्या मोठ्या फुशारक्या मारण्यातच हे नक्षत्र शिरोमणी गुंग असतात, त्यात त्यांचा काय दोष आहे म्हणा कारण या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांना खरे ज्योतिषशास्त्र नेमके काय आहे आणि ज्योतिषशास्त्र नेमके कशा साठी वापरायचे असते हेच कोणी सांगीतलेले नसते त्याला ते तरी काय करणार? गल्लीबोळातला फडतूस क्लास करून किंवा एखादे चोपडे वाचून एका रात्रीत केपी सम्राट बनलेल्यांना या शास्त्राचा आवाका काय समजणार?
असो, मला पण असेच कधीमधी असली भाकितें करायचा मोह पडतो नाही असे नाही !
आता कालचेच उदाहरण घ्याना. काल सकाळी दहा –साडे वाजलाच जे लाईट गुल झाले ते आलेच नाहीत, नाही म्हणायला दुपारी थोडा वेळ लाईट आले देखिल पण संध्याकाळी सहाच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाला सुरवात झाली , चार थेंब पडतात न पडतात तोच विजबोर्डाने तत्परतेने लाईट घालवले , हे त्यांचे नेहमीचेच आहे , जरा खुट्ट झाले की लाईट बंद ! पाऊस आला आणि पार दाणादाण उडवून, अर्धा पाऊण तास नाचून गेला देखील , सारे सामसुम झाले, रात्रीचे नऊ वाजले पण लाईट काही आले नाहीत, एव्हाना माझ्या लॅपटॉप च्या बॅटरीने ने अंग टाकले , डेस्कटॉप च्या युपीएस मध्ये कसाबसा १० मिनिटे पीसी चालू राहील इतकीच धुगधुगी राहीली होती , आज काही लाईट येणार नाहीत असा विचार करुन मी पीसी शट डाऊन करणार होतो, इतक्यात माझ्या मुलगा यश (जो या विकएंड साठी नाशकात आला आहे) मला म्हणाला: “डॅड, पीसी बंद करायच्या आधी निदान आज लाईट केव्हा येणार ते तरी प्रिडीक्ट करा!”, झाले ! आता खरेतर मी असली भाकिते करत नाही, असली भाकिते करण्या साठी ज्योतिषशास्त्र वापरणे ही या शास्त्राची अवहेलना आहे असे मला वाटते पण मुलाच्या बालहट्टाला (बालहट्ट कसला चक्क २२ वर्षाचा घोडा झालाय आता !) बळी पडून मी हे एक भाकित करायचे ठरवले.
मनात प्रश्न धरला: ‘खंडीत झालेला विद्युत पुरवठा कधी सुरळीत होईल?”
सामन्यत: केपी वाले नक्षत्र शिरोमणी असल्या प्रश्नां साठी ‘रुलिंग प्लॅनेट’ चे कोंबडे कापतात ! खरे तर ही रुलिंग प्लॅनेट्स ची मदत फक्त आणि फक्त अत्यंत निर्वाणीच्या वेळेलाच घ्यावी असा संकेत आहे पण आजकालचे नक्षत्र शिरोमणी सगळे ताळतंत्र सोडून आचरटा सारखे , दिसला प्रश्न की घे रुलिंग प्लॅनेट असे करतात , हे चुकीचे आहे असे माझे मत आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘रुलिंग प्लॅनेट’ ही एक दैवी मदत आहे असे समजले जाते (केपी वालेच तसे म्हणतात, विचारा त्यांना !) , जर ते तसे असेल तर अशी दैवी मदत प्राप्त होण्यासाठी त्या (नक्षत्र शिरोमणी / केपी सम्राट / सब सब वाले भाऊ / पायर्या पायर्यांवर अडखळणारे गोंधळी!) व्यक्तीचे आचरण पण कमालीचे शुद्ध असावे लागते पण इकडे दिवसभर लांड्या लबाड्या करायच्या, खोटे बोलायचे, फसवायचे, निंदा नालस्ती कुचाळकी करायची आणि दुसरीकडे ऊठसुठ ‘बांगलादेश आणि वेस्ट इंडीज’ क्रिकेट मॅच मध्ये कोण जिंकणार यासाठी रुलिंग प्लॅनेट ची दैवी मदत मागायची ये बात कुछ हजम नही होती! आणि माझ्या पुरते बोलायचे तर ‘नाही निर्मळ जीवन काय करील साबण” असेच आहे तेव्हा ह्या रुलिंग प्लॅनेट्च्या फंदात मी पडतच नाही , ‘मनात नाही भाव आणि देवा मला पाव’ कशाला ते !
मी सरळ मनात प्रश्न आला त्यावेळेचा टाईम चार्ट घेतला ( होरारी नंबरचा अशास्त्रीय मटका मी केव्हाच बाद ठरवला आहे!) आणि मला जास्त सयुक्तीक वाटणार्या वेस्टर्न होरारी तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले.
दिनांक: ०८ जून २०१९, वेळ: २१:३६:५३ , स्थळ : नाशिक
फार फाफटपसारा न करता , फार खोलात न जाता मी मनात काही अडाखे बांधले. मी विद्युतपुरवठ्या साठी युरेनस (हर्षल) या ग्रहाचा वापर करतो. मी स्वत:च प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला घटनेचा कालनिर्णय करायचे हे लक्षात घेता मी म्हणजे प्रश्न कर्ता म्हणजेच असेंडंट ( जन्मलग्न बिंदू) आणि हा युरेनस (हर्षल) असे दोनच घटक विचारात घ्यायचे ठरवले. आता लाईट येणारच आहेत फक्त ते केव्हा इतकाच काय तो प्रश्न आहे तेव्हा हा जन्मलग्न बिंदू आणि युरेनस यांच्यात कोणता योग (युती, केंद्र, नवपंचम, प्रतियोग) होईल तेव्हा विद्युत पुरवठा सुरळीत होईल. असा माझा सोपा आडाखा ! ह्या असल्या प्रश्नासाठी ह्या हून ही जास्त रक्त आटवायची गरज नाही!
मी पत्रिके कडे बघितले , प्रश्न वेळेचे जन्मलग्न होते २२ मकर १२ आणि आपला हिरो युरेनस (हर्षल) हा ०५ वृषभ ०१. आता या दोघांत सुमारे १०३ अंशांचे अंतर आहे, आगामी काळात (काही तासांत) युरेनस काही हलणार नाही पण जन्मलग्न दर चार मिनीटाला १ अंश या गतीने पुढे सरकणार आहे, म्हणजे जन्मलग्न बिंदू असा पुढे सरकत जेव्हा मकर रास ओलांडून कुंभेत ०५ अंशावर येईल तेव्हा जन्मलग्न बिंदू आणि युरेनस यांच्या नेमका असा केंद्र योग ( ९० अंश) होईल. म्हणजे जन्मलग्न सुमारे १३ अंश पुढे सरकायला हवे , ढोबळ हिशेबाने १३ गुणिले ४ = ५२ मिनीटे लागतील म्हणजेच २१:३६ अधिक ५२ मिनिटे म्हणजेच १०:२८ वाजता लाईट येतील. ऐवीतेवी समोर अतिशय अचुक असे अत्याधुनिक सॉफ्टवेअर आहे आणि त्यात चार्ट अॅनिमेशन सुविधा आहे तेव्हा त्याचा वापर करुन चार्ट रियल टाईम सेन्स मध्ये मागे / पुढे करुन जन्मलग्न नेमके केव्हा ५ कुंभेत येईल हे पाहिले असता असे लक्षात आले की २२:२५:५७ वाजता जन्मलग्न ५ कुंभेवर येईल आणि तेव्हाच हा जन्मलग्न बिंदू आणि ५ वृषभेवर असलेला युरेनस यांच्यात नेमका पूर्ण अंशात्मक ( ० अंश) केंद्र योग होईल. म्हणजेच २२:२५:५७ वाजता बंद पडलेला विदुयत पुरवठा सुरळीत होणार !
हे सगळे करे पर्यंत पीसीच्या युपीएस ने अंग टाकलेच, कसाबसा पीसी शट डाऊन करु शकलो.
माझे भाकित ऐकल्या नंतर प्रेमचोप्रा सारखा छ्द्मी हसत माझा मुलगा म्हणाला त्या “ठीक आहे , बघूया , घोडा मैदान फार लांब नाही “ आणि उकडते म्हणून हवा खायला टेरेस वर जाऊन बसला!
हे सगळे करे पर्यंत पावणे दहा वाजले होते, आता प्रतिक्षा लाईट कधी येणार ? जास्त नाही फक्त पाऊण तासाची प्रतिक्षा!
घड्याळाचा काटा सरकत सरकत १०:२४ वर आला , आता लाईट येणार ?
येस , भाकित बरोबर आले अगदी १०:२५ ला लाईट आले ! लखलखाट झाला !
माझा मुलगा टेरेस वरुन धावत धावत खाली आला, “डॅड , अभिनंदन ! अगदी शार्प १०:२५ ला लाईट आले की ! अमेझींग !”
जै हो !
शुभं भवतु
लैय भारी सर……!
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले
KP पेक्षा वेगळी केस स्टडी वाचून चांगले वाटले, केस स्टडी वरून एक गोष्ट स्पष्ट झाली कि KP व्यतिरिक्त दुसऱ्या पण पद्धतीमध्ये एवढ्या सूक्ष्म लेवल वर वेळ सांगता येत.
अजून काही केस स्टडी पोस्ट कराव्यात त्यायोगे काही तरी वाचन होते. नाही तर कामाच्या व्यापामुळे नियमित वाचन होत नाही.
धन्यवाद.
संतोष सुसवीरकर
धन्यवाद श्री संतोषजी
पद्धती आपापल्या जागी योग्यच असतात आपल्याला प्रसंग पाहून कोणती पद्धती वापरायची हे ठरवता आले पाहिजे. एकाच एक पद्धतीचा वृथा अभिमान बाळगणे चुकीचे आहे,
सुहास गोखले
Dear Sir
I am Mahendra Ramchandra Dhawan
pl help
श्री महेंद्रजी
मी आपल्याला ईमेल पाठवली आहे
धन्यवाद
सुहास गोखले