माझ्या फेसबुक ग्रुप वर मी एक क्वीझ दिला होता, एका व्यक्तीची जन्मकुंड्ली देऊन त्यावर आधारीत काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरें म्हणून ही संपुर्ण केस स्ट्डी इथे देत आहे .
जातकाची माहिती
[ ही पत्रिका इंटरनेट च्या माध्यमातुन मिळालेली आहे , जातकाने स्वत: च आपली माहीती / समस्या खुले आम सार्वजनिक ठिकाणी उघड केली आहे , गोपनियतेचा कोणताही भंग होत नाही याची खात्री करुन घेतली आहे , आणि अर्थातच ही व्यक्ती माझ्या कडे आलेली जातक नाही ]
ह्या जातकाचा विवाह झाला आणि घटस्फोट पण , सध्या दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात आहे आणि प्रश्न आहे दुसरा विवाह कधी होईल ?
(प्रश्न विचारला आहे जुन 2018 , मध्ये)
जन्मतपशील:
केस 011
जातक: पुरुष
जन्मदिनांक: 19 जुन 1980
जन्मवेळ: 14:57
जन्मस्थळ: दादर, मुंबई
आपल्याला जातकाचा दुसरा विवाह होणार का? आणि होणार असल्यास केव्हा? याबद्दलचे अनुमान करायचे आहे.
ज्यांना जादा आव्हानात्मक काम हवे त्यांनी :
जातकाचा विवाह केव्हा झाला होता?
जातकाचा घटस्फोट केव्हा झाला आहे?
याची अनुमाने करावीत.
आणि मुळात घटस्फोट का झाला असावा याचे ज्योतिषशास्त्रा नुसारची कारणमीमांसा करावी.
जातकाने दिलेल्या जन्मतपशीला नुसार केलेली ‘क्षेत्र कुंडली आणि केपी अयनांश वापरून केलेली (प्लॅसीडस ) भावचलित कुंडली ‘
उत्तर … पुढे चालू
या लेखमालेच्या पहील्या भागात आपण जातकाच्या विवाहाच्या घटनेची ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा केली , लेखमालेच्या या दुसर्या भागात जातकाच्या घटस्फोटाची ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा करू
जातकाचा घटस्फोट 6 मे 2011 रोजी झाला आहे.
घटस्फोट होण्यासाठी विवाहाच्या विरोधी ग्रह सक्रिय (अॅक्टिव्हेट) व्हायला हवेत म्हणजेच विवाहाच्या विरोधी भावांच्या कार्येश ग्रहांची दशा – अंतर्दशा- विदशा ही साखळी उपलब्ध असायला हवी .
साधारणपणे 10, 6 हे दोन भाव विवाहाच्या विरोधी भाव मानले जातात, घटस्फोट हा एक प्रकाराचा लेखी करारच असतो आणि तो न्यायनिवाड्याच्या माध्यमातुन केला जातो म्हणून 10, 6 च्या जोडीला तृतीय (3) स्थान (करार) आणि नवम (9) स्थान (न्यायनिवाडा) हे भाव पण महत्त्वाचे होतात. 8, 12 हे दोन भाव हानी (लॉस) आणि मानसिक छळ ह्या अंगाने महत्त्वाचे ठरतात.
प्रथम नक्षत्र पद्धती नुसार ग्रहांचे कार्येशत्व
नक्षत्र पद्धती नुसार 10, 6, 3, 9 , 8 ,12 या भावांचे कार्येश ग्रह असे आहेत:
भाव 3: — / —- / बुध / गुरु
भाव 6: — / —- / बुध / गुरु
भाव 8: चंद्र , मंगळ, शनी / शुक्र , रवी / चंद्र , मंगळ / शुक्र
भाव 9: राहू / बुध / राहू / बुध
भाव 10: — / राहू / —- / चंद्र
भाव 12: — / —- / राहू / बुध
या सगळ्या कडे एक नजर टाकली तरी लक्षात येते की राहू आणि बुध हे दोन ग्रह सातत्याने (कॉमन) येत आहेत. गुरु 3 आणि 6 चा ‘ब’ दर्जाचा कार्येश आहे.
घटस्फोट झाला त्या दिवशी जातकाला राहू महादशा , राहू अंतर्दशा, बुध विदशा , गुरु सुक्ष्मदशा चालू होती.
वर दिलेली कार्येशत्वांची जंत्री पाहता , जातकाचा घटस्फोट राहू महादशेत , राहू अंतर्दशेत , बुध विदशेत , गुरु सुक्ष्मदशेत होणे संयुक्तीक आहे.
आता कसे ते जरा विस्ताराने पाहू.
महादशा स्वामी राहू दशमात (10) आहे , राहू ला राशी स्वामित्व नाही, राहू बुधाच्या नक्षत्रात , बुध भाग्यात (9) , बुधाच्या राशी भाग्य (9) आणि व्यय (12) स्थानांवर .
राहू : 9 / 10 / 9, 12 / —
राहू कोणाच्या युतीत वा दृष्टीत नाही , राहू चंद्राच्या राशीत असल्याने चंद्राचे कार्येशत्व पण राहू ला मिळेल ते असे: 8 / 11 / 1 , 8 / 10
राहू शनीच्या सब मध्ये आहे , शनी चे कार्येशत्व 8/ 11 / 1, 8 / 4, 5
राहू कडे 9, 10, 12 आणि चंद्राच्या माध्यमातून 8 असे कार्येशत्व लाभले आहे, राहू दशमाचा (१०) चा अत्यंत बलवान कार्येश आहे.
ज्या ग्रहाची दशा त्याच ग्रहाची अंतर्दशा प्रभावी असते असा जो सार्वत्रिक अनुभव आहे त्याचा इथे पुन्हा एकदा पडताळा मिळत आहे.
घटस्फोट राहू च्या महादशेत , राहू च्या अंतर्दशेत होणे तर्कशुद्ध वाटते.
आता या राहू अंतर्दशेत येणार्या विदशा तपासू.
राहू च्या अंतर्दशेत पहिली येणारी राहू ची विदशा घटस्फोट घडवू शकली नाही कारण घटस्फोटा साठी आवश्यक असलेले षष्ठम (6) स्थान राहू देत नाही.
नंतर येणारी गुरु विदशा षष्ठम (6) देत असली तरी ही विदशा घटना घडवू शकली नाही याचे कारण गुरु षष्ठम (6) स्थानाचा ‘ब’ दर्जाचा कार्येश आणि न जुळणारे ट्रान्सिट.
नंतरची शनी विदशा 8,11, 5, 4 ची कार्येश असल्याने ह्या विदशेत घटना कशी घडेल ?
त्या नंतर येणारी बुधा ची विदशा घटना घडवून गेली कारण बुधाचे 11, 9, 3, 6, 12 असे सणसणीत कार्येशत्व !
सुक्ष्मदशे साठी राहू , बुध आणि गुरु असे दावेदार होते त्यातल्या गुरु च्या सुक्ष्मदशेत घटना घडली आहे.
आता जरा ट्रान्सिट्स चा कौल काय ते पाहू.
राहू महादशा – राहू अंतर्दशा – बुध विदशा : हा कालावधी येतो 16 जानेवारी 2011 ते 5 जुन 2011
या काळातले ट्रान्सीट्स काय आहेत?
16 जानेवारी 2011 रोजी गुरु मीनेत होता आणि 8 मे 2011 ला तो मेषेत गेला.
गुरु मीनेत असताना तो जातकाची 6, 10, 12, 2 ही स्थाने प्रभावित करत आहे.
गुरु मेषेत असताना तो जातकाची 7,11,1,3 ही स्थाने प्रभावित करत आहे.
16 जानेवारी 2011 ते 5 जून 2011 या संपूर्ण कालावधीत काळात शनी कन्येत होता.
शनी कन्येत असल्याने तो जातकाची 12, 2, 6, 9 ही स्थाने प्रभावित करत आहे.
म्हणजे गुरु मीनेत असताना तो आणि शनी असे दोघे मिळून जातकाची 12, 6 ही स्थाने प्रभावित करत होते हा कालावधी 16 जानेवारी ते 8 मे 2011 असा आहे.
जातकाचा घटस्फोट नेमका याच कालावधीत झाला आहे , 6 मे 2011.
तेव्हा राहू – राहू – बुध- गुरु ही साखळी होती.
6 मे 2011 रोजीचे ट्रांसिट्स असे आहेत:
१) गोचरीचा गुरु जातकाची 6,10,12,2 ही स्थाने प्रभावित करत आहे.
२) गोचरीचा शनी जातकाची 12, 2, 6, 9 ही स्थाने प्रभावित करत आहे.
३) गोचरीने मेषेत आलेला मंगळ सप्तम (7) स्थानारंभाच्या अंशात्मक युतीत आहे
४) गोचरीचे मीनेतले शुक्र आणि बुध गोचरी गुरुच्या अंशात्मक युतीत आणि हा युती जातकाच्या षष्ठम (6) स्थानात होत आहे.
५) गोचरीचा चंद्र जातकाच्या अष्टम (8) स्थानातुन भ्रमण करत असून जन्मस्थ शुक्राच्या अंशात्मक युतीत आहे.
६) गोचरीचे शुक्र , बुध आणि गुरु हे जन्मस्थ प्लुटोशी अंशात्मक प्रतियोगात आहेत , हा जन्मस्थ प्लुटो जातकाच्या व्ययात आहे.
हा ताळा-पडताळा !
विवाहा पाठोपाठ घटफोट हा आणखी एक इव्हेंट मिळाल्या मुळे आता आपल्याला जातकच्या जन्मवेळे कडे बघितले पाहिजे.
विवाहच्या घटने वरून आपण तर्क केला होता की जातकाची 14:57 ही जन्मवेळ काहीशी चुकली आहे , ती 14:57 ऐवजी 14:52 ते 14:56 या पाच मिनिटांच्या स्पॅन मध्ये असायला हवी होती. 14:52 ते 14:56 एक एक मिनिटांच्या अंतराने आपल्या राहू – राहू – बुध- गुरु ह्या साखळीत काय फरक पडतो ते पाहू.
14:52 – साखळी 18 मे 2011 ते 6 जून 2011 (घटना 6 मे ) ही वेळ घेतल्यास साखळी व घटना मॅच होत नाहीत.
14:53 – साखळी 14 मे 2011 ते 1जून 2011 (घटना 6 मे ) ही वेळ घेतल्यास साखळी व घटना मॅच होत नाहीत.
14:54 – साखळी 9 मे 2011 ते 28 मे 2011 (घटना 6 मे ) ही वेळ घेतल्यास साखळी व घटना मॅच होत नाहीत.
14:55 – साखळी 5 मे 2011 ते 23 मे 2011 (घटना 6 मे ) ही वेळ घेतल्यास साखळी व घटना मॅच होतात !
14:56 – साखळी 30 एप्रिल 2011 ते 19 मे 2011 (घटना 6 मे ) ही वेळ घेतल्यास साखळी व घटना मॅच होतात !
म्हणजे 14:55 किंवा 14:56 या पैकी एक जातकाची जन्मवेळ असायला हवी. मला इतकी अचूकता पुरेशी आहे!
आता ज्यांना या दोन मिनिटां पैकी नक्की कोणते मिनिट हे ठरवायचे असेल त्यांना :
14:55 ला लग्नाचा सब चंद्र येतो , 14:56 लग्नाचा सब राहू येतो , बाकीच्या भावांचे सब बदलत नाहीत.
आता लग्नाचा सब चंद्र का राहू हे ठरवले की 14:55 का 14:56 याचा निकाल होईल!, करा प्रयत्न !!
जन्मवेळ 14:54 किंवा कमी घेतली तर घटस्फोटाचा इव्हेंट मॅच होत नाही आणि जन्मवेळ 14:57 किंवा जास्त घेतली तर विवाहाचा इव्हेंट मॅच होत नाही , म्हणजे जन्मवेळ 14:55 किंवा 14:56 अशी असेल तर आणि तरच विवाह आणि घटस्फोट या दोन्ही घटना तंतोतंत जुळतात !
विवाह आणि घटस्फोट ह्या जातकाच्या आयुष्यात घडलेल्या दोन मोठ्या घटनांची ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा आपण बघितली.
आता जातकाचा प्रश्न :
“दुसरा विवाह होणार का? असल्यास केव्हा?
ह्या प्रश्नाचे उत्तर आपण ह्या लेखमालेच्या तिसर्या भागात शोधू
क्रमश:
शुभं भवतु