मन्याला प्रश्न पडला , काय करावे? पण दहा मिनिटात दुसरे काम सांगायचे इतकेच ना, मग त्यात काय शंभर कामे पडली आहेत , सहज जमेल ते..
“आपल्याला जमेल , मी सांगतो तुला काम”
“जो हुक्म मेरे आका”
“हे घे काम .. इथे मोबाईल ला रेंज आणून दे, सगळे बार येतील अशी रेंज दे आणि स्पीड पण वाढव”
मन्या ने काम सांगताच जेनी जोरजोरात हसत म्हणाला..
“बस, इतनाही मेरे आका?”
“तुझे टेस्टींग करतोय लेका, गुमान मोबाईल ला रेंज आण , गमजा नकोत , काम कर पयला”
“जो हुक्म मेरे आका, आपला मोबाईल देखो, पुरी की पुरी रेंज आयी होगी”
मन्याने खिशातला शामसिंग फोन काढला, बघतोय तो काय , मघापर्यंत एक बार दिसायची मारामार तिथे फुल्ल रेंज! मन्याने पटकन चॅट चे अॅप लॉन्च केले , डोळ्याचे पाते लवते ना लवते अॅप लॉन्च झाले, ‘संगी’ ला ‘चुम्मा ‘ पाठवला , क्षणात काम झाले ! चक्क २०० एमबीपीस चा स्पीड, त्या अंबानीला कळलं तर अॅटॅक येईल त्याला!
मन्याचे डोळे गरगरले, मन्याने पटकन एक युट्यूब वरचा ट्रंप तात्यांचा लेटेस्ट व्हिडू क्लिक केला, सुसाट स्पीड ने फुल्ल यच डी व्हीडीओ!
“मेरे आका , अब क्या हुक्म है”
मन्या सावध झाला, त्याच्या लक्षात आले , आता या जेनीला काहीतरी काम सांगायला पाहीजे नायतर…
“आस कर, मला लेवी ची जीन, रिबॉक चे शुज, रेबान चा गुगल, प्राव्हाग चा टी शर्ट पायजे”
“जो हुक्म मेरे आका”
क्षणात मन्याच्या अंगावर नवे ब्रॅन्डेड कपडे झळकले!
“आयला, खरेच, ह्ये बेणं सांगीतलेले काम करतयं तर”
“मेरे आका , अब क्या हुक्म है”
“साल्या जरा दम खा ना, मला इचार करु देशिल का नाय?”
“जी, कोई बात नहीं, आप की खिदमद में”
“बेन्या , लोकांची काय पन कामें करतोस , जरा मराठीत बोल की, तुझे उर्दू डोक्यावरुन जातयं”
“गुस्ताखी मुआफ मेरे आका, ये मेरे बस की बात नहीं, मेरा सॉफ्टवेअर कुछ ऐसा ही है ,शायद अगले अपग्रेड में लोकल लँग्वेज सपोर्ट मिल जायेगा”
“आसू दे, आता जा, माझ्या ’संगी’ ला हिथे आणून हुबी कर, बघु जमतयं का ते तुला”
“जो हुक्म मेरे आका”
दुसर्या क्षणी मन्याची ‘संगी’ मन्या पुढे उभी ठाकली, मन्याचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसला नाही!
“आयला, संगे, अग तू इकडे कोठे, तुझ्या बा ने बघिटलं तर आपण दोघे गेलो बाराच्या भावात”
“तूच तर मोटारसायकल वरुन घेऊन आलास ना मला हिथे मोर दाखवायला? आणि आता मलाच इथे का आली म्हणून विचारतोस, कुठाय मोर??”
“मोटारसायकल? मोर?”
मन्याला काही कळेना, समोर कोरी खट बजाज पल्सर होती, मन्याला विश्वास ठेवावाच लागला. मन्याने जेनी कडे पाहीले , जेनी ने छद्मी हसत डोळे मिचकावले..मन्याच्या लक्षात आले, हा त्या जेनीचा चावटपणा म्हणायचा!
“संगे कसला मोर न काय, लोच्या झालाय हिथे , तू असे कर आत्ता घरी जा, मी येतोच सांजच्याला पाटलाच्या हिरी जवळ, तेव्हा सांगतो सगळे बैजवार”
संगी खुळ्यागत बघत राहीली, तिलाही काही सुधरेना, हा मन्या आज असा का बोलायला लागलाय !
मन्या संगी ला काही सांगणार , इतक्यात हिडीसपणे हसत जेनी म्हणाला …
“मेरे आका, बंदा आप की खिदमद में हाजीर है, आपको अगला काम बोलना पडेगा, वख्त बहोत कम है आपके पास”
“आयला, खरेच की, आता असे कर या संगी ला परत इज्जत मध्ये तिच्या घरी नेऊन सोड”
“जो हुक्म मेरे आका”
मन्याच्या डोल्या देखत संगी आणि ती मोटार सायकल गायब झाली..
मन्याला काही सुचत नव्हते, भेलकांडतच तो वस्ती कडे निघाला पण वाटेतच जेनी आडवा आला..
“मेरे आका , अब क्या हुक्म है”
“आयला, आलास परत, साल्या जरा निवांत यायचे नै का, अबी ऐसा करो कुछ खाने को लाव.. रुक..”
मन्याला आयडीया सुचली, ऑक्टोबर महीना चालू होता, या टायमाला आंबे मिळत नाहीत तेव्हा या जेनीला पिकलेले आंबे आणायला पाठवू, जेनीला आंबे काय मिळणार नाहीत, बसेल बोंबलत..
असा विचार करुन मन्या म्हणाला..
“आसं कर एकदम गोड, पिकलेले आंबे आण, सा डज्जनाची प्येटीच आण, पण आंबे एकदम भारी पायजेल, हाप्पुस आण, एक्स्पोर्ट क्वालीटीचे, नायतर रायवळ आंबं आणशील”
“जो हुक्म मेरे आका”
मन्याची आयडीया एकदम चालली, कारण मन्या वस्तीवर आला, गडी माणसे एव्हाना कामाला लागली होती तिथे एक चक्कर मारुन मन्या खोपीत आला तरी जेनीचा पत्ता नव्हता! मन्या खूष झाला, खोपीत भाताच्या कणगीत रम ची बाटली खऊन ठेवली होती आणि भिंतीवरच्या फल्ली वर चखण्याची पुडी ! मन्याला आता त्याची गरज होती ! बाटलीचे बूच काहाडतो तोच, जेनी आंब्याची पेटी घेऊन हाजीर !
मन्याने कपाळावर हात मारले!
“मेरे लिए कोई खिदमत, मेरे आका”
“आयला, तू आलास बी, मला वाटले होते , एकदम तीन चार महीन्यांनी येणार तू”
“मेरे आका , थोडी परेशानी हो गयी लेकिन आपका काम हो गया”
“कसे काय जमवलस गड्या?”
“गुस्ताखी मुआफ मेरे आका ,वो बतानेकी मुझे इजाजत नहीं”
‘नको सांगूस.”
“मेरे लिए कोई खिदमत, मेरे आका”
मन्या वैतागला..
संध्याकाळ होत आली पण मन्याची सुटका झाली नाही, तो जेनी मन्याच्या राशीला लागला..
कुत्र्याचे शेपुट सरळ करुन झाले
पप्पुला अक्कल देऊन झाली
राणे मुख्यमंत्री झाले
मन्या तोंडाला येईल ती कामे सांगत होता आणि जेनी चुटकी सरशी करत राहीला…
आता काय काम सांगायचे? मन्याला एकदम आयडीया आली..
“अबी ऐसा कर, तुझे समुंदर मालूम है ना”
“जी, मेरे आका”
“तो वहाँ जा और समुंदर पे लाटां आती है ना, वोच एक दिन में कितने आती है ये गिनके मुझे बता, जाव”
“जी मेरे आका, आपको दरिया की लहरोंकी गिनती चाहीये, हो गया समझो, मेरा एक रिश्तेदार वही पे रहता है, बोतल में बंद है लेकिन हमारा काम करेगा, आप बिल्कुल बेफिक्र रहियेगा, मैं यु गया और यु आँया “
“बेन्या केबीसी बघिटलाय वाटते”
भेसुर , छद्मी हासत जेनी गायब झाला..
मन्या डोके गच्च धरुन बसला तोच त्याच्या पाठीवर थाप पडली..
मन्याला वाटले जेनी वापस आला पण नाही मन्याचा मित्र पक्या होता.
“काय राव, आज मूड नाय का , असा का बसलायस”
“असा बसु नको तर काय”
“का रे , संगी शी बिनसल ? का तिच्या ‘बा’ ने तिचे लगिन दुसरीकडे ठरवले का काय?”
“तसे काय नाय रे , हिथे वेगळाच डेंजर लोचा झालाय”
“काय सांगीशाला की नाय”
“काय सांगू मर्दा …”
मन्याने सगळी स्टोरी सांगीतली.
….
….
….
क्रमश:
शुभं भवतु
खूप छान उत्कंठावर्धक कथा
आता पुढे काय
धन्यवाद सौ. शरयु ताई, पुढचे भाग लिहून तयार आहेत (ही संपूर्ण लेखमाला सहा महीन्यांपूर्वीच तयार होती, आज मुहुर्त लागला !) दोन चार दिवसात पुढचा भाग प्रकाशीत करतो.
सुहास गोखले
सुहासजी,
गोष्ट छान रंगली आहे, पुढील भाग लवकर येऊ देत.
संतोष सुसवीरकर
धन्यवाद श्री संतोषजी
सुहास गोखले