…….
नाही जाणार मी, लोक बोलतील, बघा एव्हढा जवळचा मित्र गेला पण हा आला नाही .. म्हणू देत लोकांना काय म्हणायचे ते, मला पाहावणार नाही तो परब असा चितेवर जळताना.. परब कसा गेला इतक्या लवकर ? माझ्या पेक्षा चारच तर वर्षाने मोठा. म्हणजे साठीचा आतलाच की … पण परब जायला नको पायजे होता…
त्याच्या ऐवजी मलाच जायला पाहिजे होते ? असे किती वेळा वाटले असेल , आज काल फार होतेय हे, आज परब गेला तेव्हा, गेल्या ऐन गणपतीत त्या चांदोरकरा चे कळले तेव्हा… कोणी ही खपल्याचे कळले की त्याच्या ऐवजी मीच चिते वर जळतोय असे वाटते … अंगाला धग जाणवते.. नाकात मांस जळल्याचा करपट वास …
चांदोरकराच्या बायकोने फोडलेला टाहो अजून कानात घुमतोय… दुसरे काय करणार ती बिचारी…चांदोरकराच्या मागे रडायला त्याची बायको होती… माझ्या मागे कोण आहे ? ‘ती’ आहे ना .. अरे हॅट … ‘ती’ नुसतीच आहे …रडणार थोडीच माझ्यासाठी … माझ्यासाठी रडायला मी तिच्यासाठी केलेय तरी काय ? माझ्यासाठी रडायला कोणी नाही हेच बरे…बेवड्याची अंतयात्रा….
साला काय स्टॅमीना होता त्या चांदोरकराचा, नॉन स्टॉप , घटा घटा आख्खा खंबा रिचवायचा…. आयुष्यभर एव्हढे पिऊन सुध्दा शेवट पर्यंत ठणठणीत होता… मग माझीच तब्बेत का अशी ढासळली… तिला भेटलो तेव्हा तसा बरा होतो मी.. पण तरी ती म्हणालीच…
“किती खप्पड झालास रे .. तेव्हा किती हँडसम दिसायचास… ”
अंगावर मोराचे पीस फिरले अलगद…वाटले पटकन तीचा एक गालगुच्चा घ्यावा.. पण तीच्या शेजारी तो गेंडा बसला होता ना..
चांदोरकराचे एव्हढे मनाला लागलं नाही पण जाधव साहेब गेले तेव्हा मात्र रडायला आले…. आयुष्यात दोनदाच डोळ्यात पाणी आले होते… जाधव साहेब गेल्याचे कळले तेव्हा एकदा आणि त्या आधी तीने त्या धटिंगणाचा , त्या साल्या सरपोतदार नावाच्या रानडुकराचा हात धरुन पळून जाऊन लग्न केले तेव्हा… तो रानडुक्कर का ग आवडला तुला , मी काय मेलो होतो का ?…. जाऊ दे नशीब असते एकेकाचे….
हिषेबात चुक राहीली.. तशी किरकोळच होती पण डिसोझा सरांना कळले असते तर नोकरी गेली असती… घरात स्वत:ची बायको आजारी असताना सुद्धा जाधव साहेबांनी रात्रीचे दोन वाजे पर्यंत माझ्या शेजारी बसून चूक हुडकून दिली.. म्हणाले बायकोचे बघायला घरात इतर लोक आहेत .. तुला मदत करायला कोणीच नाही..
….
खरेच , मला मदत करायला कोणीच नाही… तेव्हाही कोणी नव्हते आणि आत्ता ही कोण आहे म्हणा…तशी कॉलनीतली मुले अधून मधून मद्त करतात म्हणा.. खंबा आणून देतात… कमीशन मारतात त्यात, पण काम करतात…
“अंकल, असली कसली पिता हो… चांगली ब्रॅन्ड ची प्या ना..” तो देसायांचा विकी…
आता या विकीला काय सांगू … चांगला ब्रॅन्ड परवडायला पायजे ना ? सगळ्यांना वाटते या नाडकर्ण्या कडे बख्खळ पैसा आहे.. सडाफटींग .. फ्यॅमीली नाय इतर कसला खर्च नाय तरी कंजुषी करतो बेवडा साला…… हो मी बेवडाच तर आहे, रोज पिणार्याला दुसरे काय म्हणतात ?
तीने पळून जाऊन लग्न केल्याचे कळले तेव्हा पहीला , हो अगदी आयुष्यातला पहीला घोट घेतला.. ती कडवट चव , घशातली जळजळ … वासाने मळमळून उलटी होईल का काय असे वाटले… बरोबरीच्या जगदाळ्याने मग हातात शिगरेट दिली.. म्हणाला ओढ , बरे वाटेल… ही पण पहीली … त्या आधी काही सुद्धा नव्ह्ते हो.. काही सुद्धा नव्हते… तीचे दु:ख विसरायला घेतली.. आणि पितच राहीलो, सुरवातीला पिण्यासाठी कारणे हुडकत होतो . ती गेली म्हणून , परिक्षेत नापास झालो म्हणून , नोकरी लागली म्हणून… नोकरी गेली म्हणून . त्या जगदाळ्याने मला व्यसन लावले … नाही त्याला का म्हणून दोष द्यायचा …..काय मजा आहे नै .. माझ्या हातात दारुचा ग्लास देऊन जगदाळ्या मात्र सटकला.. म्हणजे गेला , कावीळ झाली होती त्याला , लिव्हरचं दुखण त्यात बेसुमार दारु, मग काय होणार … त्याची आठवण म्हणून .. पुन्हा प्यायलो… पुन्हा प्यायलो… पुन्हा प्यायलो…….
…………………………..
“नाडकर्णी अहो किती काळ चालणार हे असे, दारु पायी नोकर्या गेल्या… मित्र नातेवाईक दुरावले .. सगळे संपल्यात जमा झालेय आता …. उभ्या आयुष्याची राख रांगोळी झाली हो तुमच्या …”
अॅडव्होकेट कामत, जीव तोडून सांगत होते…
“सॉलीसिटर शंभूनाथांचे एकटे चिरंजीव तुम्ही.. सरांनी कष्टाने मिळवलेले सगळे सगळे विकून खाल्लेत तुम्ही .. तेही फक्त दारु पायी… जीव तुटतो हो.. शंभूनाथ सरांनी मला बापाच्या मायेने वागवले .. त्याची थोडीफार परतफेड करायचा प्रयत्न करतोय…. आज तुम्हाला मिळवून दिलाय तो शेवटचा चेक आहे , आता विकायला काहीही उरले नाही . मी याहून जास्त काय करणार ? ”
“….”
“नाडकर्णी हवेलीतून फुटपाथवर आलात तुम्ही , आवरा स्वत:ला.. अजूनही वेळ गेली नाही.. तेव्हढी दारु सोडा . मी काम मिळवून देतो तुम्हाला . पण प्लीज दारु सोडा, नाडकर्णी दारु सोडा..”
कामतांच्या बोलण्यातले मी दारु आणि सोडा एव्हढेच ऐकले… स्वत:शीच हसलो… दारुत सोडा घालून प्यायला आता काय मी नवशीका पिणारा थोडाच होतो… चक्क बेवडा होतो मी बेवडा …. बाटलीच तोंडाला लावणारा…ऑन द रॉक्स म्हणतात त्याला .. कामतांना नाय कळणार त्यातली झिंग…
कामत आणखी बोल बोल बोलले आणि नंतर कंटाळून निघूनही गेले बहुदा… मी त्या चेक कडेच एकटक पहात , या पैशात व्हिस्कीचे किती बॉक्सेस येतील याची गणिते करत होतो… गणित चांगले होते माझे…असेच एक अवघड गणित सोडवून घ्यायला तर ती माझ्याकडे आली होती.. मी तिला गणित सोडवून दाखवत होतो आणि ती पापण्या फडफडवत माझ्याकडे विस्मयाने बघत होती…
तिचे गणित सुटले आणि ती निघून पण गेली , माझे मात्र सगळेच गणित फिस्कटले… आयुष्यात फक्त वजाबाकीच काय ती शिल्लक राहीली..…………
(क्रमश:)
हळू हळू कथा उलगडतेय … आवडला हा भाग पण…
श्री. गौरवजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. कथा तशी अगदी सरळ साधी आहे .. म्हणले तर केवळ दोन ओलीत सांगून संपवण्या सारखी.. मी आपले ती च्युईंग गम सारखी चघळतोय ..
सुहास गोखले