ती गेली तेव्हा… (भाग – ३)

………….

संज्या म्हणत होता म्हणजे त्याला कुठून तरी कळले म्हणे…ती त्या धटींगणा बरोबर पंजाबात भटींड्याला असते.. छातीत कळ उठली … संज्या दात काढत म्हणतो कसा.. धटींगण आणि भटिंडा कसे रिदमीक वाटतेयं … संज्याचा राग नाही आला तेव्हा … तिची बातमी तर कळली.
भटिंड्या ला जायचे का ? एकदा तरी तीला भेटावे, डोळे भरुन पाहावे असे वाटतेय… पण नकोच… सुखात असेल ती तिथे .. आपले ओंगळ तोंड दाखवून त्या सुखात बिब्बा कशाला घालायचा.. संज्याने पेग भरला.. ग्लास पुढे केला … कितवा कोणास ठाऊक……

हा संज्या पण गेला एके दिवशी… दारुच्या नशेत अपघात झाला म्हणतात… मी गेलो होतो ना घाटावर… पोष्टमॉर्टेम केलेली , कशीबशी शिवलेली बॉडी त्याची…पाहावले नाही… माझ्या बरोबरीचे सगळेच गेले. छे , आत्ता जाधव सर असायला हवे होते… आभाळा एव्हढ्या थोर मनाचा माणूस तो..
…..
सोसत नाही आताशा… जळजळ फारच वाढलीय… आंटी नवसागर जास्तच घालतेय हल्ली… सगळा भेसळीचा जमाना… वर आंटी म्हणते कशी, “तब्बेत यकदम डौन झाली सायेब तुमची .. कशाला पिता येव्हढे , घरी बघायला कोणी नाही का ? ”
…काय सांगू आंटीला.. आज ती सोबत असती तर ही वेळ आली असती का ? डोळे मोठे करुन , दटावून माझ्या हातचा दारुचा ग्लास तिने केव्हाच काढून घेतला असता .. पण मुळात ती असताना मी दारु घेतली असती का ?

किती घाण वास येत होता… आंटीच्या गुत्त्यावर पहिल्यांदा गेलो होतो… कळकट टीनपाटातले ते काळं पिवळे रसायन… नवसागराचा आणि आंबलेल्या गुळाचा दरवळ…त्या गुत्त्यावरच्या गिर्‍हाईकांच्या भुतावळींत मीच एकटा काय तो जंटलमन दिसत होतो..
ती हिडींबेच्या आकाराची , रासवट पण गोरीपान आंन्टी! तीलाच राहवले नाही म्हणाली … सायेब हिथे नका येऊ , ही जगह आपल्या सारख्यांसाठी नाही… पीटर बरोबर माल घरपोच करते , तब्बेतीत घरी बसूनच प्या..पीटर .. सायबांचे पार्सल घेऊन जा …

पीटर मग येतच राहीला … सुरवातीला माल पोचवायला , नंतर उधारीच्या वसुलीला आणि एके दिवशी उधारी फारच थकली म्हणून चाकू ने भोसकायला .. पीटर येतच राहीला … पीटरचा मार बसला नाही असा शरीराचा एक अवयव शिल्लक राहीला नाही… शेवटी तोच कंटाळला..

तसा देसायांचा विकी ही बडवतो मला अधून मधून पण बच्चा आहे अजून…पीटरचा हात कसा दणकेबाज होता…असली कडक पहील्या धारेचा माल असतो ना तस्सा… मार खाण्यात सुद्धा व्हरायटी असते… ब्रँड असतो!  विकी आधी मार मार मारतो , मग कुठून तरी एक खंबा आणून देतो …म्हणतो घे बेवड्या, ढोस आणि मर एकदा …. आणि नंतर बाहेर जाऊन रडतो … मी बघितलेयं ना.
…………..

“मग मुले बाळें ?“

“प्रणव , थोरला मुलगा बेंगलोर ला असतो, आय.टी. त आहे.. गेल्याच वर्षी लग्न करुन दिले त्याचे.. आणि धाकटी प्रचिती.. अहमदाबादला असते, आर्कीटेक्ट आहे , जावयांचा डायमंड पॉलीशींग चा बिझनेस आहे..”

“मग काय सध्या तुम्ही दोघेच असता इथे..”     मी उगाचच काही तरी बोलायचे म्हणून बोललो.

माझ्या समोर त्या अजगराने सुम्मीला विळखा घातला..
“येस , आम्ही दोघेच ..राजा राणी” अजगर फुत्कारले… आणि ती त्याच्या केसातून हात फिरवत मंद हसली…

टक्कल पडल्याची आयुष्यात पहील्यांदा खंत वाटली मला. आम्हाला , म्हणजे मला व तीला अशीच मुले झाली असती का प्रणव , प्रचिती… प्रणव माझ्या सारखा दिसला असता आणि प्रचिती डिट्टो तिच्या सारखी…

……………

“पुअर सोल…”. फ्रेनी स्टँपवाला …. आमच्या जॉनसन कंपनीची सेक्रेटरी… कायम मला हेच म्हणायची ..पुअर सोल.. काय चुक होते म्हणा तिचे …  पुअर सोल… जेव्हा सगळ होते पण ‘ती’ नाही म्हणून कफल्ल्क आणि आता होतं नव्हतं ते विकून खाल्ल्यावर पुन्हा एकदा कफल्लक झालोच नाही का? अधिकृत कफल्लक … अधिकृत बेवडा…

फ्रेनीचा बोलण्याने तरी काय फरक पडला होता म्हणा.. पण तेव्हा तिचे ऐकायला पायजे होते… बिच्चारी किती कळकळीने सांगत होती …साला निदान एकदा तरी ऐकायाला हवे होते…

“इतका दारु काय कू पिता रे..”
“कोण म्हणते असे..”
“बाकी लोक चा मला माहीती नाय…पन ते परब हाय नी ते म्हणाला … फ्रेनी .. काय तरी कराया पायजे …तु एक टायम तेचे शी बोल नी , साला ते नाडकर्णी ऐकला तर तुजाच ऐकनार ….”
“परब काय पित नाही का … आम्ही एकत्र तर बसतो…”
“ए बाबा ,  मला ते काय सांगू नाय ..पण छोड ना यार हे दारु … बरबादी होयेल बग तुझी”
“तुम्ही लोक पण पिता ना?”
“ते आमचे धरमचा काय तरी असते बाबा, घेयाला लागते..पन ते कितना , येक चम्मच भर … प्योर वाईन असते..”
“शेवटी दारुच ना..”
“तुजेशी काय बहस करायचा … पण प्लीज ते दारु छोड ना यार..पछी ते जरा कम तरी कर नी… आनी तुला एक बात प्रायवेट मंदी बोल्ते हां, कोनाला पन काय पन बोलू नाय. ते डिसोझा साब हाये नी तेला तुझा समदा हिस्ट्री कललाय…परसो मिटींग मंदी बोलला .. तुझ्या अगेंष्ट कॅप्लेंट छे , आता काय तर ऐक्सन घेयाला पायजे म्हनून .. मी आपला तुला फ्रेंडशीप मध्ये सांगून टाकला… तवा आता तूच बघ  …”
“फ्रेनी, तू माझ्याशी लग्न केलेस तर  दारु सोडतो ”
फ्रेनी चक्क लाजली… पण लगेचच नाक उडवत म्हणाली …
“ते आता कसा काय जमणार… माझी मंगनी कवाच जाली ते फिरोज हाय नी तेचा बरोबर , सॉरी.. तुला लेट जाला…”

फ्रेनी लग्नाला तयार झाली असती तरी काय उपयोग म्हणा.. कुठे ही बसल्या नाकाची, घोगर्‍या आवाजाची ,गोलम्टोल फ्रेनी… आणि कुठे ती !
फ्रेनी चे ऐकायला पाहीजे होते का? तिचे ऐकायचे म्हणजे दारु सोडायची… दारु सोडली तर मी करु काय ? ..तीची आठवण विसरायला मग दुसरे काय आहे माझ्या कडे ?

……

(क्रमश:)

Similar Posts

  • |

    माया जाल!

    होरारी’ चे मर्म हे की जातकाच्या प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारला क्षणाच्या ग्रहमानात बंदिस्त असते, म्हणजेच जातक एक प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोबत घेऊनच आलेला असते, ज्योतिषाचे काम म्हणजे त्या वेळेच्या ग्रहमानात दडलेले उत्तर बाहेर काढणे. अर्थात त्या साठी जातकाने प्रश्न अत्यंत…

  • |

    ‘काल निर्णय’ भाग – 1

    ‘काल निर्णय’ हा ज्योतिषशास्त्रातला अपरिहार्य घटक आहे. पण तो तितकाच अवघड ही आहे, ज्योतिर्विदाची बाजारातली सगळी ‘पत’ या एकट्या ‘कालनिर्णय’ करण्याच्या क्षमते वर व त्याच्या अचूकते वर अवलंबून असते असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. पण ‘काल निर्णय’ म्हणजेच ज्योतिष…

  • |

    जातकाची प्रश्नोत्तरें

    सौ. क्ष सप्रेम नमस्कार, आपण विचारलेल्या प्रश्नां बाबतीत काही  खुलासा करावा असे मनापासून वाटले म्हणून लिहीत आहे. ज्योतिषशास्त्र हे काहीसे दिशादर्शक शास्त्र आहे त्यामुळेच बर्‍याच वेळा हे मार्गदर्शन ज्याला आपण ईंग्रजीत ‘आऊटलाईन’ म्हणतो तशा स्थूल स्वरुपाचे असते. फक्त ज्याला आपण ईंग्रजीत…

  • |

    विधिलिखीत – १

    मी माझ्या या आधीच्या एका केस स्ट्डी मध्ये ‘ विधिलिखीत’ या गोष्टीबाबत काही ओझरता उल्लेख केला होता. त्यावर काही वाचकांनी जादा माहीती द्या अशी विचारणा केली आहे. मी या विषयावर एक विस्तृत लेखमाला लिहायचा विचार करत आहे . माझ्या कडे या…

  • |

    ज्योतिष का आणि केव्हा

    ज्योतिषशास्त्र संभाव्य संधी वा समस्या बद्दल मार्गदर्शन करते, पण ज्योतिषशास्त्र तुमच्यासाठी कोणत्याही नव्या संधी निर्माण करू शकत नाही किंवा तुमच्या समस्या एखाद्या जादू सारख्या दूर करू शकत नाही. ज्योतिषशास्त्र स्वतः मधले कच्चे दुवे ओळखून ते सुधारण्यासाठी वापरा, आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी…

  • |

    मधुमेहाची लक्षणें – ३

    या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो: १)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात. **** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत…

2 Comments

    1. श्री. विराजजी ,

      हे काहीसे अवघड आहे, नायक तसा पाहीला तर गर्भश्रीमंत होता आणि दारुचे व्यसन होते या दोनच गोष्टींवरुन तर्क बांधणे मुश्कील आहे .

      सुहास गोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *