तो भेटेल का?

प्रश्नशास्त्र अजब आहे !

प्रश्नकुंडलीच्या माध्यामातून ज्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यांची उत्तरें जन्मकुंडलीच्या माध्यमातून स्वप्नात सुद्धा देता येणार नाही ! पण यात एक धोका आहे! उत्तरे मिळतात म्हणून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो . आणि इथे प्रश्नशास्त्राच्या महत्त्वाच्या गृहीतकाची पायमल्ली होते ते म्हणजे “प्रश्न अगदी गंभीर पाहिजे , तळमळीचा असला पाहिजे”

नक्षत्रपद्धतीचा प्रचार करताना नेमकी हीच चूक झाली आहे , सभासंमेलनातून , पुस्तकांतून , मासिकांतल्या लेखातून सातत्याने “नळाला पाणी कधी येईल?” “खंडीत झालेला विद्युतपुरवठा कधी सुरळीत होईल’ अशा सारख्या प्रश्नांची उत्तरे अगदी अचूक येतात असे दाखले दिले गेले, त्याचा अतिरेक झाला. आता हे असले प्रश्न काही जीवनमरणाचे आहेत का? नाहीत पण प्रश्नशास्त्र अशा प्रश्नांची उत्तरें हुडकण्या साठी वापरले गेले यात शास्त्राच्या नियमांची पायमल्ली तर झालीच शिवाय संपूर्ण नक्षत्र पद्धती एक चेष्टेचा विषय ठरली ते वेगळेच.

पण एक अभ्यासाचा , सरावाचा भाग म्हणून अशा प्रश्नांची उत्तरें शोधण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हरकत अजिबात नाही, असे केल्याने शास्त्राची मुलभूत तत्वे पक्की होतात, नियम कसे व केव्हा वापरायचे हे समजते.  फक्त याचा अतिरेक होतो तो टाळला पाहिजे. “फक्त गंभीर, तळमळीच्या प्रश्नांचीच उत्तरे’ हे अवधान राखता आले पाहिजे. डास मारायला तोफ वापरायची नसते इतके तारतम्य राखले म्हणजे झाले !

नक्षत्र पद्धतीच कशाला पारंपरिक वाले सुद्धा असा उद्योग करताना दिसतात, जातकाचा मामाच्या पाठीवर काळ्या रंगाची जन्मखूण आहे हे कसे अचूक सांगितले याची फुशारकी मारली जाते ! पण मुळात जातक आलेला असतो ‘विवाह कधी होणार?” हे विचारायला , त्याचे उत्तर मिळणे महत्त्वाचे का मामाच्या पाठीवरचा डाग? जातकाला कशात जास्त रस असेल ? आणि मजा बघा,  जातकाच्या पाठीवरचा डाग कसा अचूक ओळखला अशी स्वत:ची पाठ थोपटून घेणारा ज्योतिषी विवाहाचा कालनिर्णय देताना ‘होईल पुढच्या दोन एक वर्षात’ असे गुळमुळीत उत्तर देताना दिसतो. मामाच्या पाठीवर काळा डाग आहे हे सांगण्या साठी शास्त्राचा सखोल अभ्यास लागतो हे मान्य मग हे सखोल ज्ञान ‘विवाह कधी’ हे सांगताना कोठे पेंड खाते ?

असो.

बरीच प्रस्तावना झाली .

आज आपण अमेरिकेतील विख्यात ज्योतिर्विदा सौ सिल्विया डीलॉंग यांनी सोडवलेली एक प्रश्नकुंडली पाहू.

प्रश्नकुंडली चा तपशील:

दिनांक 9 ऑगष्ट 1971
वेळ: 12:12 दुपार EDT
स्थळ : Fort Myers , Florida , US (26:38:25 N , 81:52:21 W)

Geocentric, placidus , Tropical, Mean Nodes

प्रश्न होता” ‘पुढच्या आठवड्यात भेटायला येतो असे म्हणालेला त्यांचा मित्र नक्की येईल का”

आता हा काय प्रश्न झाला का? पण विचारला गेला आणि त्याचे अचूक उत्तर दिले गेले होते. कसे तेच आपण पाहू.

जातक नेहमीच प्रथम (1) स्थानावरून पाहिला जातो. प्रथम स्थानावर शुक्राची तूळ रास आहे. शुक्र जातकाचे प्रतिनिधित्व करणार आहे. चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असतोच. जातका कडे येणारा पाहुणा (गेस्ट)  जातकाचा मित्र आहे, मित्र परिवार लाभ (11) स्थानावरून पाहतात. लाभ स्थानावर रवीची सिंह रास आहे. त्यामुळे रवी जातकाच्या मित्राचे प्रतिनिधित्व करेल.  लाभात बुध आहे त्यामुळे बुध देखील जातकाच्या मित्राचे प्रतिनिधित्व करेल.

आता जातकाचा मित्र जातकाच्या घरी भेट देणार म्हणजे जातकाचा प्रतिनिधी आणि मित्राचा प्रतिनिधी यात कोणता तरी ग्रहयोग व्हायला पाहिजे.

जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी चंद्र जो मीनेत 25 अंशावर आहे त्यामुळे तो 16 सिंह वरील रवी आणि 10 कन्या वरील बुध या मित्राच्या प्रतिनिधींशी कोणताही योग करत नाही.

जातकाचा दुसरा प्रतिनिधी शुक्र सिंहेत 11 अंशावर आहे आणि मित्राचा प्रतिनिधी रवी 16 सिंहेत वर आहे, म्हणजे शुक्र आणि रवी एकाच राशीत असल्याने त्यांच्यात युती योग होईल म्हणजेच मित्र जातकाला भेटायला येणार का?  थांबा  जरी हे दोन ग्रह एकाच राशीत असले तरी यांच्यात युती होणार नाही !

एफेमेरीज मध्ये पाहीले तर लक्षात येईल की रवी सिंहेत असताना शुक्र त्याला गाठू शकणार नाही ! 30 ऑगष्ट 1971 रोजी ही युती होणार आहे पण तेव्हा रवी आणि शुक्र कन्येत असतील , होरारीतले ग्रहयोग त्याच राशीत असताना पूर्ण व्हावे लागतात.

त्यामुळे जातकाचा मित्र आणि जातक यांच्यात गाठभेट  होणार नाही का?  याचे उत्तर हो पण आहे नाही पण आहे !

भेट पुढच्या आठवड्यात नक्कीच होणार ‘नाही’  पण काही काळाने जातकाचा मित्र जातकाच्या घरी येणार हे पण नक्की.

जातकाचा प्रतिनिधी चंंद्र जो मीनेत 25 अंशावर आहे तो एक अंश पुढे सरकला की द्वीतीय स्थानातल्या गुरुशी नवपंचम योग करेल, आता हा गुरु तृतीय स्थानाचा भावेश आहे , तृतीय स्थान म्हणजे पत्रव्यवहार, निरोप, बातमी. याचा अर्थ अगदी लौकर जातकाचा हा मित्र “मी येऊ शकत नाही” असे जातकाला कळवेल ! चंद्र आणखी एक अंश पुढे जाऊन व्यय (12) स्थानातल्या प्लूटो शी प्रतियोग करेल म्हणजे जातकाने मित्राच्या स्वागता साठी काही तयारी करण्यासाठी केलेला खर्च वाया जाईल.

जातकाच्या प्रश्नाचे उत्तर (ज्याला एक निश्चित कालमर्यादा आहे) सध्यातरी ‘नाही, तुमचा मित्र ठरल्या प्रमाणे पुढच्या आठवड्यात आपल्या घरी भेट देणार नाही “  असेच आहे.

जातकाच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर केस इथेच बंद करायला हरकत नाही पण एक उत्सुकता म्हणून जातकाचा हा मित्र ठरलेल्या दिवशी का येऊ शकणार नाही याचे काही कारण सापडते का हे पाहण्यासाठी  पत्रिका पुन्हा एकदा बारकाईने तपासली.

जातकाचा मित्र (शुक्र) , जातका कडे (रवी) निघाला आहे हे तर दिसत आहेच पण रवीशी युती करण्या आधी शुक्र 17 कुंभेत असलेल्या मंगळाशी प्रतियोग  करत आहे ! आणि मग सिंह रास ओलांडून  कन्येतल्या रवी शी युती करेल.

मंगळाशी होणारा हा प्रतियोग जातकाच्या मित्राला आपली भेट लांबणीवर टाकायला लावणार आहे. हा मंगळ जातकाच्या मित्राच्या सहाव्या घरात (6) आहे म्हणजे मंगळ जातकाच्या मित्राची प्रकृती दाखवेल, मंगळ म्हणजे अपघात , रक्तपात,  शस्त्रक्रिया, सर्जन   ,  जातकाच्या मित्राच्या सहाव्या घरावर कुंभ रास म्हणजे शनी आणि शनी म्हणजे हाडे / दात .  म्हणजे जातकाच्या मित्राला काही वैद्यकीय कारणां मुळे आपली भेट पुढे ढकलायला लागणार आणि हे वैद्यकीय कारण म्हणजे दात / हाडे यांची शस्त्रक्रिया , अपघात असे काही असू शकेल.

जातकाने नंतर कळवले , जातकच्या मित्राला अचानक रूट कनाल सारखी डेंटल ट्रीटमेंट घ्यावी लागणार असल्याने त्याला त्याची नियोजित भेट रद्द  करावी लागली पण नंतर पंधरा दिवसांनी तो भेटीस आला.

बघितलेत अगदी साधे , सरळ , सोपे नियम वापरून अशी थक्क करून टाकणारी भाकिते करता येतात! फक्त तसा अभ्यास करण्याची तळमळ पाहिजे , हाच गुण आजकाल दुर्मिळ झाला आहे त्याला काय करणार ?

शुभं भवतु

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *