चक्क दहा वर्षे पूर्ण झाली !
8 फेब्रुवारी 2014 रोजी मी माझा ब्लॉग सुरु केला तो उपक्रम आता दहा वर्षांचा झाला, काळ कसा झपाट्याने पुढे सरकत जातो!
तसे पाहिले तर मी हा ब्लॉग फार फार उशीरा म्हणजे 2014 मध्ये सुरु केला. मराठीतले लिखाण, तेही ज्योतिषा सारख्या रुक्ष विषयावर इथेच मुळात गणित फसले होते. २०१०-२०११ पर्यंत सर्वच ब्लॉग्ज जोरात होते कारण दुसरे पर्याय उपलब्ध नव्हते, ज्यांनी 2005 आसपास आपले ब्लॉग सुरु केले होते त्यांनी खर्या अर्थाने लोकप्रियता मिळवली अगदी अल्पावधीत बहुतेक ब्लॉगज पाच लाख, दहा लाख अशी वाचन संख्या (पेज हीट्स) मिळवत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. कसदार लेखन असलेले ब्लॉग तर गाजलेच पण अगदीच काहीच्या काही लिखाण असलेले ब्लॉगज देखील उगाचच भाव खाऊन गेले.
2012 पासून ब्लॉग्ज ना उतरती कळा लागली, फेसबुक,, व्हॉट्सॅप ,व्टीट आणि यु ट्युब सारख्या नवीन संपर्क माध्यमांनी सारे चित्रच पालटून टाकले , ही माध्यमे आली आणि अक्षरश: वायुवेगाने पसरली, आश्चर्याने तोंडात बोटें घालावी इतक्या झपाट्याने ती लोकप्रिय झाली. मित्र – मैत्रीणांच्या संपर्कात राहणे , ख्याली खुशाली कळवणे , निरोपांची देवाण घेवाण, स्टेट्स अपडेट करणे, कॉमेंट्स मारणे, लाइक्स देणे , वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, फोटो डकवणे, पोष्ट्स लिहणे, व्हीडीओज टाकणे अशा असंख्य गोष्टीं लोक लीलया करायला लागले, जे ब्लॉग, वेबसाईट सारख्या माध्यमां द्वारा कधीच शक्य नव्हते , शिवाय ही नवी माध्यमे मुळातच कमालीची आकर्षक , सहज -सोपी , लोकांचा सक्रीय सहभाग असलेली सर्वसमावेशक ठरली. एकेकाळी काही निवडक (भाग्यवान!) लोकांना उपलब्ध असलेली ही संपर्क – गंगा आता कोणाच्याही दारात खळाळुन वाहू लागली, मग काय या वाहत्या गंगेत सगळ्यांनीच हात धुऊन घ्यायला सुरवात केली. ज्यांनी आयुष्यात कधी कॉम्प्युटर ला हात लावला नव्हता ते सर्व आता कॉम्प्युटर शिवाय ही सफाईने इंटरनेट वापरु लागले आणि ते ही मनमुराद. या संपर्क माध्यमांनी राजकारणाचे कौल ठरवले / फिरवले, सामाजिक क्रांतीचे वणवे पेटवले. एका की-बोर्ड च्या फटक्यात क्षणात लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचे अचाट बेफाट सामर्थ्य अगदी सामान्य माणसाच्याही हातात आले.
ब्लॉग / वेबसाईट च्या काहीशा एकसुरी, साचेबद्ध स्वरुपाचा वाचकांना कंटाळा येऊ लागला होता, ‘मी लिहतो- तुम्ही वाचा’ अशा एकतर्फी संवादाच्या तुलनेत ‘स्वत:चे मत/ भावभावना’ व्यक्त करायला मनसोक्त वाव देणार्या नव्या जवानीच्या , उसळत्या उत्साहाच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मस नी आख्या जगाला आपल्या विळख्यात केव्हा ओढून घेतले ते कळलेच नाही. त्या आक्रमणात ‘ब्लॉगज’ आणि ‘वेबसाईट’ मागे लोटल्या गेल्या, फार थोडे ब्लॉगज / बेवसाईट्स तगले , बहुतांश ब्लॉग्ज रोडावले आणि चक्क काळाच्या पडद्या आड गडप झाले.
मी ब्लॉग सुरु केला तो केवळ माझी लिखाणाची हौस पुरी करायला, त्यावेळेच्या ब्लॉग्जच्या लोकप्रियतेच्या लाटेत आपणही हात धुऊन घ्यावा असा माझा हेतू नव्हता. किंबहुना ‘वाचन संख्या’ वाढावी हा साठी मी खास प्रयत्न केले नाहीत. जिथे जाईल तिथे, संधी मिळेल तिथे आपल्या ब्लॉग ची टिमकी वाजवली नाही किंवा वाचकांना आकृष्ट करण्या साठी ‘अर्वाच्य , गलिच्छ, शिवराळ’ भाषेत लेखन केले नाही, कोणताही उथळ पणा नाही की बटबटीट/ ओंगळवाणी जाहीरातबाजी नाही.
सभ्यता, सुसंस्कृतता, घरंदाजपणा, दर्जेदार माहिती, विषयांचे वैविध्य आणि सातत्य या भक्कम बैठकीवर माझ्या व्लॉगचा प्रवास कासवाच्या गतीने का होईना सुरु झाला.
पण दुर्दैवाने या सर्वांचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही, वाचक संख़्या जशी वाढावी तशी वाढली नाही. दर्जदार, सकस लिखाण आकर्षक शैलीत सादर केले, लिखाणात सातत्य ठेवले, ज्योतिषशास्त्रा बरोबरच अनेक संलग्न विषयांवर लिहले पण त्याला देखील मनासारखे यश लाभले नाही ही खंत आजही आहे.
8 फेब्रुवारी 2014 मी ब्लॉग सुरु केला तो suhasgokhale.wordpress.com या मोफत प्लॅटफॉर्म वर. 2G इंटरनेटचा जमाना होता तो, रु 198 मध्ये 2 GB महिनाभरासाठी असे डेटा प्लॅन्स होते तेव्हा! इंटरनेट अगदी पुरवून पुरवून वापरावे लागायचे. याही परिस्थितीत पदरमोड करून ब्लॉग चालू ठेवला. 250 पेक्षा जास्त पोष्ट्स लिहल्या आणि 2017 पर्यंत दोन अडीच लाख वाचन संख्या मिळवत मराठीतला ज्योतिषशास्त्रावरचा ‘अव्वल’ क्रमांकाचा ब्लॉग असा नावलौकिक प्राप्त केला !
या यशात मी मांडलेल्या ‘केस स्ट्डीज’ चा मोठा वाटा आहे. माझ्या ब्लॉगवरच्या केस स्ट्डीज अव्वल दर्जाच्या आहेत, इतक्या परिपूर्ण केस स्ट्डीज ना आजवर लिहल्या गेल्या ना लिहल्या जातील. मराठीच नव्हे तर हिंदी , इंग्रजी मध्ये देखील अशा केस स्ट्डीज आपल्याला दिसणार नाहीत. केस स्टडीज कशा मांडाव्यात याचा एक ‘मापदंड’ मी निर्माण केला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
खरे तर फक्त ‘ब्लॉग’ इतपतच हेतू असता तर वर्डप्रेस ची मोफत सेवा पुरेशी होती , आजही पुरेसी राहीली असती पण मला आता ‘ज्योतिष मार्गदर्शन’ अधिक व्यावसायीक दर्जावर न्यायचे होते, ‘ऑन लाईन’ क्लासेस सुरु करायचे होते त्या सर्वांला वर्डप्रेस ची मोफत सेवा उपयोगाची नव्हती, म्हणून मी स्वत:ची वेबसाईट तयार करण्याचा घाट घातला. 28 मार्च 2017 ला माझी स्वत:ची ‘suhasjyotish.com’ ही स्वत:ची वेबसाईट सुरु केली , माझा वर्डप्रेस वरचा ब्लॉग आता माझ्या स्वत:च्या वेबसाईट वर स्थलांतरीत झाला. खूप वेळ, पैसा आणि मेहेनत घेऊन एक अत्यंत देखणी, सुबक अशी वेबसाईट मी उभी केली याचा मला आजही अभिमान आहे. मात्र मोठ्या कौतुकाने उभारलेली ही वेबसाईट काही लाभली नाही, ब्लॉग हा सेक्शन अति उत्तम होता पण वेबसाईट चे ‘होम पेज’ काही मनासारखे तयार करु शकलो नाही. होम पेज चे बरेच प्रयत्न केले पण त्यातले काहीच मला पसंत पडले नाही. वेबसाईट वर असूनही माझा ब्लॉग त्याच्या जुन्या (फ्री वर्डप्रेस सुविधा) स्वरुपातच चालू राहीला, वेबसाईट केल्याचा खास असा काही लाभ झाला नाही. .
चार वर्षे बॉग्ज लिहल्या नंतर हळू ब्लॉग लिहण्यातला माझा उत्साह ही कमी होत गेला, ध्यानधारणा. मधुमेह अशा अनेक नव्या , उपयुक्त बिषयांवर लिहण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही मनासारखा प्रतिसाद मिळाली नाही, हा एक मोठा धक्का माझ्यासाठी होता! हे सारे होते आहे तोच ‘कोव्हिड’ उसळला आणि तेव्हा जी घुसळण झाली त्या वावटळीत ब्लॉग लिहण्याचे सुचलेच नाही आणि लिहले तर वाचणार कोण, ही सल होतीच, कोविड ओसरला पण एव्हाना माझे प्राधान्यक्रम बदलले होते. ब्लॉग लिहण्यातली सारी हौस फिटली होती, नविन बरेच सुचत होते पण लिखाण करावे असे कधी वाटलेच नाही. दरम्यानच्या काळात जमान्याच्या आवडी निवडींशी सुसंगत असावे या हेतूने मी माझे यु ट्युब चॅनेल सुरु केले होते, ऑन लाईन क्लासेस पण सुरु होते त्या गडबडीत ब्लॉग लिहण्याकडे साफ दुर्लक्ष झाले हे मात्र खरे.
2020 मध्ये मी ‘suhasgokhale.com’ आणि ‘suhasgokhale.in’ ही दोन डोमेन नेम्स खरेदी केली याला बराच उशीर झाला खरा पण शेवटी माझे स्वत:चे नाव असलेले ‘.com’ डोमेन माझ्या मालकीचे झाले हे समाधान मोठे (हे समाधान टिकवून धरण्यासाठी महीन्याला रु 250 नियमीत खर्च करावे लागतात ही बाब वेगळी !)
Suhasjyotish com वरुन suhasgokhale.com ब्लॉग व इतर माहिती स्थलांतरीत करण्यास सुरूवात केली खरी पण माझ्या आजारपणा मुळे घात केला. आता ब्लॉग / वेब साईट माझ्यासाठी अत्यंत कमी प्राधान्य असलेली कृती बनली असल्याने इतर अत्यावश्यक कामांच्या रगाड्यात हे स्थलांतराचे काम अर्धवट राहीले आणि ते तसे सुमारे तीन वर्षे तसेच राहीले.
दरम्यान जुने वाचक विचारणां करत राहीले पण आजारपणा मुळे त्यांच्या मागणीला योग्य तो न्याय मी देऊ शकलो नाही याची आजही खंत वाटते.
गेल्या महीन्यात (जून 2024) अचानक माझ्या लक्षात आले की आपण सुरु केलेला ब्लॉग आता चक्क दहा वर्षांचा झाला आहे, ब्लॉग कडे इतके दुर्लक्ष झाले आहे की ब्लॉग चा वाढदिवस मी पार विसरुन गेलो होतो. अनेक जुन्या स्मृती जागृत झाल्या, अनेक नियमीत वाचक, त्यांच्या कॉमेंट्स इ सर्व आठवणींचे फेर मनात रुंजी घालू लागले. एकदम सेंटीमेंटल झालो.
ब्लॉग चे पुनरूज्जीवन करायचे ठरवले, मोठी टास्क होती, वेळ काढणे अवघड होते तरी चिकाटीने हा ब्लॉग पुन्हा त्याच्या मूळ स्वरुपात आपल्या समोर आणण्यात मला यश आले आहे. मूळ ब्लॉग वर सुमारे 460 पोष्ट्स होत्या त्यातल्या सटरफटर , कालबाह्य झालेल्या पोष्ट्स नाईलाजाने डिलिट केल्या आणि 391 पोष्ट्स सह ब्लॉग पूर्वीच्याच दिमाखात आपल्या समोर उभा आहे. सर्व लेख, चित्रे आणि मायबाप वाचकांनी केलेल्या ‘कॉमेंट्स’ जशाच्या तशा आपल्या समोर आहेत.
ब्लॉग वरच्या सर्व पोष्ट एक एक करत जोडत गेलो, मीच लिहलेल्या पोष्ट्स आज पुन्हा वाचताना एक खूप जुना ओळखीचा मित्र अनेक वर्षांनी अचानकपणे भेटावा तसे वाटले. काही पोष्टसच्या बाबतीत तर त्या पोष्ट्स लिहताना घडलेले प्रसंग पुन्हा एकदा डोळ्या समोर साकार झाले, मन हळवे झाले. मी आयुष्यात इतका भावनाविवश कधी फारसा झालो नाही. आज मात्र डोळ्याच्या कडा ओलावल्या.
काळाचा महीमा बघा, मी जेव्हा 2014/2015/2016 मध्ये ब्लॉग पोष्ट करायचो तेव्हा खुरडत खुरडत चालणारे 100 kbps वाले इंटरनेट होते , एक पोष्ट एडीट करायला पाच मिनिटें लागायची , चित्रे अपलोड करायला तर चक्क पंधरा मिनिटे वेळ लागायचा, आणि आज मी 100 mbps च्या स्पीड ने सर्व एडिटींग केले , हे काम कधी झाले ते कळलेच नाही !
या ब्लॉग साठी एक अॅप तयार करावे असे मनात आहे म्हणजे वाचकांना वेबसाईट वर न येता अॅप च्या माध्यमाने त्वरीत ब्लॉग ला भेट देता यावी. अर्थात या कामाला बराच वेळ लागणार आहे पण प्रयत्न चालू आहेत.
केवळ एक नोस्टालजीआ (Nostalgia) म्हणुन हा ब्लॉग आता पुन्हा उभा केला आहे, अधून मधून एखादी नवीन पोष्ट नक्की लिहेन, पण नव्या पोष्ट्स फारशा लिहणार नसलो तरी जुन्या पोष्टस चा अमोल ठेवा पुन्हा एकदा मायबाप वाचकांना पेश करु शकलो या पेक्षा मोठा आनंद कोणता ? माझ्या या ब्लॉग वरचे अनेक लेख आजही काल सुसंगत (रिलेव्हंट) आहेत, केस स्ट्डीज तर नव्या अभ्यासकांना पर्वणीच आहे. माझे ब्लॉग्ज वाचून जर कोणाला अल्पसा जरी लाभ झाला तर मला आनंद होईल. 10 वर्षांची मेहनत सार्थकी लागली असे म्हणेन.
जे आहे ते असे आहे, गोड मानून घ्यावे द्येवानु ,
आपला
सुहास गोखले