पथारीवाला

स्टेशनच्या चौकात एके दिवाशी मला एक नवीन पथारीवाला दिसला, पहिल्यांदाचा दिसला म्हणून उत्सुकतेने तो काय विकतोय हे पहायला थांबलो.

एका लहानसे टेबल, त्यावर स्वच्छ, इस्त्री केलेला टेबल क्लॉथ, त्यावर सुबकपणे मांडून ठेवलेल्या दाढीचे साबण, रेझर अशा वस्तू , विक्रेता साधारण 25 वयाचा असेल, अत्यंत उमदा आणि हसतमुख, साधेच कपडे, व्यवस्थित इन शर्ट, नेक टाय, गुळगुळीत दाढी, नीट विंचरलेले केस, चकचकीत पॉलिश केलेले बूट . त्या चौकात नेहमी दिसणाऱ्या असंख्य पथारीवाल्यां पेक्षा अगदी वेगळा, उठून दिसणारा.

माझ्या कडे पाहून तो गोड हसला आणि आणि अगदी विनम्र आवाजात पण कमालीच्या आत्मविश्वासाने त्याने मला त्याच्या प्राडक्टस ची माहिती दिली. प्राडक्टस तसे बरे दिसत होते पण एक नवीन ब्रांड , जरा जास्त किंमत त्यामुळे मी त्याला नकार दिला.

पुढे रोज संध्याकाळी तो मला त्याच जागेवर आपली उत्पादने मांडून विक्री करताना दिसला. मला त्याचे कौतुक वाटले, मी रोज त्याच्याकडे पाहून एक स्माईल द्यायचो, तो ही हाताने सलाम करून मला विश करायचा, असेच काही दिवस गेले, एकदा केवळ त्याला मदत म्हणून मी एक शेव्हिंग क्रीम ची लहानशी ट्यूब खरेदी केली. क्रीम खरेच चांगले होते पण किंमत जरा जास्त वाटली.

हळू हळू मी त्याच्याशी थोडे बोलायला सुरवात केली, “काय कसे काय” पासून सुरवात झाली, एकदा मी त्याला विचारले “ काय म्हणते विक्री, कसा काय रिसपॉन्स आहे” .. त्यावर पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा दिसली. “काय सांगू, माझा माल चांगला आहे, पण पाच पैशाचीही विक्री होत नाही, तुम्ही एक ट्युब घेतली, आणि आणखी एक दोघांनी थोडीफार खरेदी केली, इतकेच”

मला त्याची दया आली, फार वाईट वाटले. पण त्याच बरोबर त्याच्या जिद्दीचे, चिकाटीचे कौतुक वाटले, काडीचीही विक्री होत नसताना, चिकाटीने तो रोज ठरल्या वेळी त्याच्या जागेवर यायचा, आपली पथारी अत्यंत सुबकपणे मांडायचा , हसतमुखाने ग्राहकांचे स्वागत करायचा, न कंटाळता आपल्या उत्पादनांची माहिती द्यायचा, ग्राहक काही न घेता निघून जायचे पण याच्या चेहऱ्यावर निराशा कधी दिसली नाही.

असे सुमारे 15 एक दिवस झाले असतील, एके दिवशी तो त्या जागेवर दिसलाच नाही, मला चुकल्या सारखे झाले. काय झाले असावे, आज हा पथारीवाला का बरे आला नाही? आजारी तर नसेल ना? ”

दुसऱ्याच दिवशी चौकातल्या इराण्याच्या हॉटेलात मला तो दिसला!

”काय रे पथारी लावायचे बंद केले का”

“हो, साहेब, मी 15 दिवस प्रयत्न करायचे ठरवले होते, ते झाले पूर्ण, काहीच विक्री झाली नाही. तेव्हा आता दुसरे काही करायचे ठरवले आहे”

“अरे रे “

“साहेब मी तुमचा आभारी आहे आपण रोज थांबून माझी चौकशी करायचा ते मला बरे वाटायचे. मी आता उद्या पासून इथे नसेल पण मी आपल्याला लक्षात ठेवेन “

त्यानंतर तो पथारीवाला गायब झाला तो कायमचा. त्याला त्याचे नाव सुद्धा विचारले नाही ही रुखरुख मात्र माझ्या मनात घर करून राहिली.

अशीच काही वर्षे गेली, मी काही कामा निमित्त दिल्लीला गेलो होते परत येताना म्हणजे दिल्ली मुंबई रेल्वे प्रवासात तो मला दिसला. पुणे स्टेशन च्या चौकात जसा दिसायचा अगदी तसा, पण आता तो रेल्वेच्या डब्यात माल विकत नव्हता तर माझ्या सारखाच प्रवासी होता, कपडे आता उत्तम दर्जाचे होते, चकचकीत पॉलिश केलेले शूज आजही तसेच होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य आणि आत्मविश्वास जशाच्या तसा होता किंबहुना कांकण भर अधिकच होता.

हा माणूस दिसतो तर त्या पथारीवाल्या सारखा, आपण ‘पथारीवाला ‘ म्हणून बोलायला जायचे आणि हा दुसराच कोणी तरी निघायचा, नसती पंचाईत झाली असती, माणसा सारखी माणसे असू शकतात असे समजून मी त्याला एक रूटीन स्माईल दिले आणि हातातल्या पुस्तका चे वाचन सुरू ठेवले.

पण उठून माझ्या समोर उभा रहात त्याने मला विचारल;

” साहेब ओळखले का मला?”

मी जरा सावध पवित्रा घेत त्याला म्हणालो

“आपला चेहरा कोठेतरी पाहिल्या सारख्या वाटतो आहे पण सॉरी मी आपल्याला ओळखले नाही”

“कसे ओळखणार, सर . किती वर्षे झाली त्याला, आपल्याला आठवते का ते पहा…”

असे म्हणत त्याने तो पुणे स्टेशन चौकातल्या पथारी चा संदर्भ दिला. म्हणजे माझ्या नजरेने मला दगा दिला नव्हता तर. आमच्या गप्पा झाल्या, तो आता रस्त्यावर पथारी मांडून विक्री करणारा पथारीवाला राहिला नव्हता तर एका नामांकित कंपनीचा सेल्स मॅनेजर होता. त्याचा हा पथारीवाला ते सेल्स मॅनेजर हा प्रवास विस्मय कारक होता.
मी त्याचे अभिनंदन केले , भरभरून कौतुक केले, त्याचा निटनेटके पणा, वक्तशीर पणा इ. तो म्हणाला

“साहेब खरे सांगू, चार दिवस रोज पाच तास उभे राहून देखील पाच पैशाची विक्री झाली नाही, निराशा झालो खरा पण तेव्हा मला माझ्या वडिलांचे शब्द आठवले..
“You must show up, 80% of success is in just showing up.”

बस्स मी चिकाटीने प्रयत्न चालू ठेवले, निराशा न होता रोज नव्या उमेदीने मी त्याच जागेवर त्याच पद्धतीने त्याच उत्साहात पाच तास उभा रहात होतो , विक्री होत नसताना सुद्धा. जेव्हा माझ्या लक्षात आले की इथे विक्री होणे अवघड नाही तर अशक्य आहे तेव्हा मी आवरते घ्यायचे ठरवले कारण माझ्या वडिलांचा दुसरा सल्ला होता:

”Know when to stop”

मी आवरते घेतले पण निराशा झालो नाही, “तू नहीं तो और सही ’ म्हणत मी पुन्हा नव्याने, नव्या वाटा धुंडाळत राहिलो, आणि रेस्ट इज हिस्टरी!”

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *