परीक्षा



“असे दिसते की आपण माझी परीक्षा घेऊ पाहताय, हरकत नाही, असल्या परीक्षांना मी घाबरत नाही, पण असा उगाचच येईल त्याला परीक्षा देत बसत नाही, या प्रकारात माझा वेळ खर्च होतो, बरीच मेहनत करावी लागते, त्यामुळे अशा परीक्षेचे खास, वेगळे मानधन आपल्याला द्यावे लागेल, चालेल?”

“ओक्के नो इश्यूज , सांगा तुमचे मानधन आत्ता लगेच युपीआय करतो…”

मी मानधनाचा आकडा सांगितला त्याने तत्परतेने पेमेंट केले आणि म्हणाला,

“माझा  विवाह कधी झाला असेल ते सांगा, अगदी अचूक तारीख सांगता आली नाही तरी चालेल, किमान वर्ष आणि त्या वर्षातला तीन एक महिन्याचा कालावधी सागू शकलात तरी चालेल”

“ठीक आहे, आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण सांगा” 

१२ मार्च १९८६ , संध्याकाळी ०५:२० , नागपूर (महाराष्ट)”

डेटा मिळताच मी या जातकाची पत्रिका तयार केली. 



जातकाच्या पत्रिकेवर नजर टाकताचा लक्षात येते की जातकाला विवाह योग निश्चित आहे, विवाह योग्य वयात होण्याचे शक्यता म्हणजे लौकर नाही आणि उशिरानेही नाही. जातकाचा जन्म आजच्या आधुनिक काळातला, नागपूर सारख्या शहरी भागातला जन्म , बी टेक आणि पुढे अमेरिकेत मास्टर्स अशी पार्श्वभूमी आहे. साधारण अशी पार्श्वभूमी असलेल्या मुलांचे विवाहाचे योग्य वय २७ ते ३२ असे असते हे सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्या हिशेबाने पाहता जातकाचा विवाह २०११ ते २०१६ या कालावधीत झाला असण्याची शक्यता वाटते.

पत्रिके नुसार शुक्र महादशा २००६ ते २०२६ अशी आहे, म्हणजे जातकाचा विवाह शुक्राच्या महादशेतच झाला असणार, या तर्का मागचे कारण हे की २००६ ला जातकाचे वय २० असणार, कायद्यानुसार वयाच्या २१ च्या आधी विवाह करताच येत नाही! आणि 2006 साली सुरू झालेली शुक्र महादशा आज रोजी (मार्च २०१४) चालूच आहे

महादशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व  ४ / ७/ ६, ७ / ३, १० (आणि विशेषाधिकाराने १२ ) . शुक्र सप्तमाचा (७) कार्येश आहे पण त्याचा बरोबर विवाहाच्या विरोधी अशा ६, १० भावांचा पण कार्येश आहे ! आता ६ आणि १० ची उपस्थिती बघताच काही जण शुक्र विवाहाच्या विरोधी भावांचा कार्येश आहे म्हणजे या दशेत विवाह होणार नाही असे ठरवून मोकळे होतील. पण शुक्राची दशा तब्बल २० वर्षांची असते त्यात विवाहाच्या बाबतीत शुभ – अशुभ घटना घडू शकतात. तेव्हा ६ आणि १० चा बाऊ करून घ्यायला नको. शिवाय जातक स्वतः: म्हणतोय की त्याचा विवाह झाला आहे म्हणजे शुक्र महादशेने विवाह दिला आहे.

शुक्राच्या महादशेत सर्व ग्रहांच्या अंतर्दशा येणार,  एक सुरवात करायची म्हणून, आपण जो अंदाजे कालावधी २०११ ते २०१५ असा ठरवला आहे त्या काळात येणाऱ्या अंतर्दशा प्रथम तपासू त्यातून काही सापडले नाही तर पुढच्या अंतर्दशांचा विचार करू. 

या पैकी शुक्र – शुक्र आणि शुक्र – रवी या दोन अंतर्दशा आपण सोडून देऊ कारण या कालावधीत जातकाचे शिक्षण चालू असणार त्या काळात तो विवाह करणार नाही. म्हणजे चंद्र, मंगळ आणि राहू या तीनच अंतर्दशा सध्या विचारात घेता येतील. 

चंद्राचे कार्येशत्व असे आहे:  ७ / ८ / २, ११ / १२ पण चंद्र विशेषाधिकाराने दशम (१०) भावाचा प्रथम दर्जाचा कार्येश होत आहे.

मंगळाचे कार्येशत्व असे आहे: ७ / ४ / २,११ / ४ , ९ 

राहू चे कार्येशत्व असे आहे : २ / ८ / – / – राशी स्वामी मंगळ : ७ / ४ / २,११ / ४ , ९

विवाह साठी अत्यावश्यक असे दोन भाव सप्तम (७) आणि द्वितीय (२). 

चंद्र, मंगळ दोघेही  सप्तमा (७) चे प्रथम दर्जाचे (अ) कार्येश आहेत.  राहू देखील राशीस्वामी मंगळाच्या माध्यमातून सप्तमाचा (७) चा ‘अ’ दर्जाचा कार्येश होत आहे.

द्वितीय भावासाठीही चंद्र, मंगळ आणि राहू कार्येश आहेत, मात्र राहू द्वितीय (२) भावाचा प्रथम (अ) दर्जाचा कार्येश आहे तर चंद्र आणि मंगळ ‘क’ दर्जाचे कार्येश आहेत. 

अष्टम (८) आणि दशम (१०) भावांच्या उपस्थिती मुळे चंद्राची स्थिती काहीशी कमकुवत वाटत आहे, तुलनेत मंगळ आणि राहू विवाहा साठी जादा अनुकूल वाटतात. 

हा विचार करता चंद्राच्या अंतर्दशे पेक्षा मंगळ आणि राहू अंतर्दशा मला जास्त आश्वासक वाटल्या. 

त्यानुसार जातकाच्या विवाहाचा कालावधी जाने २०१२ ते मार्च २०१६ असा असू शकेल. या कालावधीत जातकाचे वाट २६ ते ३० असे असेल हे देखील आपण आधी अंदाज केला त्याच्याशी जुळते. 

अर्थात हा झाला सुमारे ४ वर्षे ३ महिन्यांचा कालावधी, जातकाला नेमके वर्ष आणि त्यातला तीन एक महिन्यांचा कालावधी सांगता येणे अपेक्षित आहे. म्हणजे या सव्वा चार वर्षातल्या सुमारे ५० महिन्यांतले नेमके ३ महिने आपल्याला ठरवता आले पाहिजेत.

”विवाह’ या घटनेच्या अंगाने विचार करता मंगळ आणि राहू दोघेही अत्यंत तगडे आहेत, त्यामुळे सर्वप्रथम मंगळ अंतर्दशा की राहू अंतर्दशा हे ठरवावे लागेल आणि मग त्या निवडलेल्या अंतर्दशेतल्या विदशांचा विचार करावा लागेल, हे एक मोठे किचकट काम आहे त्यात हात घालण्या पूर्वी आपण पाश्चात्य (फिरंगी!) तंत्राचा वापर करून आणखी काही धागेदोरे हाताला लागतात का ते तपासू जेणे करून आपले काम अधिक सुकर होऊ शकेल. 

कालनिर्णयाचा प्रश्न असतो अशा वेळी मी ‘सेकंडरी प्रोग्रेशन्स’ म्हणजेच ‘दिनवर्ष’ या तंत्राचा प्रामुख्याने वापर करतो. या तंत्राचा वापर करून मी आत्ता पर्यंत शेकडो कालनिर्णय यशस्वी रित्या केलेले असल्याने या तंत्रावर माझा गाढा विश्वास आहे. 

आपण विवाहा साठी ‘जाने २०१२ ते मार्च २०१६’ असा कालावधी असेल असा प्राथमिक अंदाज केला आहे, या कालावधीत सेकंडरी प्रोग्रेशन्स चे चित्र काय आहे हे तपासायचे. त्यासाठी या कालावधीचा मध्ये म्हणजे जाने २०१४ या महिना निवडला,  १ जानेवारी २०१४ या दिवसाचा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट मी तयार केला तो खाली दिला आहे. 

चार्ट पाहताच मला आश्चर्याचा धक्का बसला! या दिवशीच्या चार्ट मध्ये प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू आणि जन्मस्थ शुक्र अंशात्मक युतीत आहेत, प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू  ५ मेषे  वर आहे तर जन्मस्थ शुक्र ४ मेषे वर आहे!



सप्तम बिंदू आणि शुक्र हे दोघेही विवाहा साठी अत्यंत समर्पक आहेत, ही युती ‘विवाह’ सूचित करत आहे. 

अर्थात प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू जन्मस्थ शुक्राशी युती करून १ अंश पुढे आला आहे, याचा अर्थ विवाहाची घटना या तारखेच्या ( ०१ जानेवारी २०१४) आधी घडली असेल.

मी एक वर्ष अलीकडे म्हणजे १ जानेवारी २०१३ या दिवसाचा सेकंडरी प्रोग्रेस्ड चार्ट तयार केला तो खाली दिला आहे. 

या चार्ट मध्ये प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू   ०४:४९ मेषे  वर आहे तर जन्मस्थ शुक्र ०४:०९  मेषे वर आहे, प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू अजूनही जन्मस्थ शुक्राच्या सुमारे ४० आर्क मिनिट्स पुढे आहे, अगदी तंतोतंत युती बघायची असेल तर १ जानेवारी २०१३ ही तारीख अजून काही महिने मागे घ्यावी लागेल, त्या हिशेबाने ०१ मे २०१२ या दिवशी प्रोग्रेस्ड सप्तम बिंदू   ०४:०९ मेषे  वर आहे तर जन्मस्थ शुक्र ०४:०९  मेषे वर आहे, तंतोतंत युती!



आता या अनुषंगाने आपण आता शुक्राच्या महादशेतल्या मंगळ आणि राहू या अंतर्दशा आणि त्यातल्या विदशांचा विचार करू.

१ मे २०१२ ही तारीख विचारात घेतली तर शुक्र महादशा – मंगळ अंतर्दशा:  जाने २०१२ ते मार्च २०१३ ही साखळी मिळते. 

मंगळाच्या अंतर्दशेत अर्थातच सर्व ग्रहांच्या विदशा येणार, त्या तपासणे भाग आहे. पण इथे बघितले तर शुक्र आणि मंगळ दोघेही सप्तम (७) भावाचे प्रबळ कार्येश असले तरी त्यांच्याकडे द्वितीय (२) भावाचे काहीसे कमकुवत असे ‘क ‘ दर्जाचे कार्येशत्व आहे त्यामुळे शक्यतो अशी अशा ग्रहाची विदशा पाहू जो द्वितीय (२) भावाचा प्रबळ ( ‘अ’ दर्जाचा) कार्येश आहे. 

‘राहू’ एक एकमेव ग्रह द्वितीय (२) भावाचा प्रबळ ( ‘अ’ दर्जाचा) कार्येश आहे. म्हणजे : शुक्र – मंगळ – राहू अशी साखळी जुळवता येईल. हा कालावधी ०२ फेब्रुवारी २०१२ ते ०६ एप्रिल २०१२ असा आहे. हा कालावधी ‘सेकंडरी प्रोग्रेशन्स’ ने दिलेल्या ०१ मे २०१२ या कालखंडाशी कमालीचा जुळत आहे!

दशा पद्धती असो किंवा सेकंडरी प्रोग्रेशन्स सारखी पाश्चात्त्य पद्धती, गोचरीचा कौल घेतल्या शिवाय कालनिर्णय करता येणार नाही. त्या दृष्टीने मी जानेवारी ते मार्च २०१२ या तीन महिन्यातले चे गोचर तपासले. प्रश्न विवाहाचा असल्यामुळे गुरु, मंगळ, शुक्र यांच्या गोचरीला महत्त्व येते तसेचं शनी ची साक्ष घेणे देखील आवश्यक असते.

एकंदर पाहता जाने २०१२ ते मार्च २०१२ या तीन महिन्या पैकी मार्च २०१२ मधले गोचर जास्त आश्वासक दिसले कारण:

त्या काळात गोचरीचा गुरु मेषेत होता म्हणजे तो जातकाच्या नवम (९) भावात त्याची दृष्टी जातकाच्या लग्न स्थानावर , गुरु चे चांगले गोचर त्यावेळेला जातकाला लाभले होते. हे नि:संशय  ‘विवाह’ सूचक आहे.

गोचरीचा शनी तुळेत होता त्याची दृष्टी नवम (९)  भावावर हा एक ‘डबल ट्रांसिट’ चा आश्वासक भाग आहे. 

गोचरीचा मंगळ सिंहेत, म्हणजेच जातकाच्या लग्न (१) भावात त्याची दृष्टी सप्तम (७) भावावर , विवाहाच्या संदर्भात मंगळाचे हे गोचर अनुकूल आहे. 

शुक्र मेषेत, गोचरीचा गुरु आणि गोचरीचा शुक्र पूर्ण अंशात्मक युतीत आहेत ही युती जातकाच्या भाग्य स्थानात (९) होत आहे , हा काहीसा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल!

या साऱ्यांचा विचार करता जातकाचा विवाह मार्च २०१२ मध्ये झाला असावा असा अंदाज करता येईल.

इतकी सारी कन्फरेमशन्स मिळाली असल्याने मी अत्यंत आत्मविश्वासाने जातकाला सांगितले :

“आपल्या पत्रिकेच्या अभ्यासावरून मला असे दिसते की आपला विवाह मार्च 2012 महिन्यात झाला असावा’ 

+++


  

Similar Posts

2 Comments

Leave a Reply to Kashikar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *