प्रश्नाचा विचार जरा वेगळ्या पद्धतीने
तुमचा प्रश्न ज्योतिर्विदाला व्यवस्थित समजला तर त्याला तुमच्या प्रश्ना चा विचार करताना कुंडलीतल्या कोणत्या घराला महत्त्व द्यायचे हे ठरवणे सोपे जाते तसेच संकेतांचा योग्य तो अर्थ लावता येतो.या दोन्ही गोष्टी जमून आल्या तरच अचूक उत्तराकडे पोहोचता येईल. प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनातल्या काय भावभावना आहेत याचे यथार्थ आकलन होणे अत्यंत जरुरीचे असते. पुस्तकातले नियम एका परीने बरोबरच पण काही वेळा जरा वेगळा विचार करावा लागतो.
या लेखमालेतले आधीचे लेख इथे वाचा:
प्रश्न शास्त्र का आणि कसे – ६
उदा: नोकरीतल्या बदलीसाठी सामान्यतः: त्रितीय (3) स्थान विचारात घेतात. ते बरोबर ही आहे कारण त्रितीय (3) स्थान ‘घरापासून / कुटुंबीयां पासून लांब वास्तव्य ’ दर्शवते. पण काही वेळा असे होते की जातका सध्या बदलीच्या ठिकाणी आपल्या घरापासून / कुटुंबीयां पासून लांब रहात आहे , आता त्याला पुन्हा बदली हवी आहे ती घरी परतण्यासाठी , आपल्या कुटुंबीयां समवेत एकत्र राहण्यासाठी , म्हणूनच या प्रश्नासाठी चतुर्थ (4) स्थान जे घर, कुटुंबीय दर्शवते त्याचा विचार केला पाहिजे , किंबहुना त्रितीय (3) स्थाना पेक्षाही त्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे. म्हणजे नुसते ‘बदली’ हा स्थूल विचार न करता त्या प्रश्ना मागची पार्श्वभूमी व्यवस्थित समजावून घेतली तरच हे असे बारकावे लक्षात येतात आणि भविष्यकथनात अचूकता आणता येते.
उदा: एकदा माझ्या कडे एक जण त्यांचा कुत्रा हरवला होता त्या संदर्भात प्रश्न विचारण्या साठी आले होते , प्रश्न अगदी सरळ सोपा, नेहमी प्रमाणे पाळीव प्राण्यांसाठीचे षष्ठम (6) स्थान ,मालकासाठीचे प्रथम (1) स्थान, इच्छापूर्तीचे लाभ (11) स्थान ……. पण प्रश्न विचारते वेळी पन्नाशीतल्या वयाची आणि एका मोठ्या तालेवार कंपनीत जनरल मॅनेजर पदावरची ही व्यक्ती ढसढसा रडत होती, म्हणजेच त्या हरवलेल्या कुत्र्यावर त्यांचा इतका जीव होता की तो कुत्रा त्यांच्या दृष्टीने त्यांचे एक अपत्यच होते , मी क्षणार्धात ठरवले , आणि पाळीव प्राण्यांसाठीच्या षष्ठम (6) स्थानाचा विचार न करता , संततीचे पंचम (5) स्थान विचारात घेतले आणि उत्तर अचूक मिळाले. (जर नेहमीप्रमाणे षष्ठम (6) स्थानाचा विचार केला असता तर उत्तर चुकले असते).
उदा: एक लघुउद्योजक एक समस्या घेऊन आले, ते एका मोठ्या वाहन उद्योगाला सुट्या भागांचा पुरवठा करत , ही कंपनी काही नव्या सुट्या भागांचा पुरवठा करण्याचे कंत्राट माझ्या जातकाला देऊ करत होती, पण समस्या अशी होती की या नव्या पद्धतीच्या सुट्या भागांसाठी पूर्णपणे नवीन यंत्रसामुग्री , नवे तंत्रज्ञान व महागडा कच्चा माल (जो आयातच करावा लागणार होता) अशी खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार होती. जातकाची त्याला तयारी होती (त्यासाठी डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा होणार होता ), पण ही वाहन उद्योग कंपनी लहरी पणा, क्षुल्लक कारणांवरून कंत्राटे रद्द करणे ,गलिच्छ अंतर्गत राजकारण ,युनियनबाजी यासाठी अवघ्या उद्योगजगतात कुप्रसिद्ध आहे, त्यामुळे जातकाची हा जुगार खेळायची तयारी होत नव्हती. त्या वेळी जातकाशी झालेली प्रश्नोत्तरे अशी..
मी: मग या कंपनीला माल पुरवण्यात मुख़्य अडचण कोणती?
जातक: माझी गुंतवणुकीची तयारी आहे पण ही कंपनी डॅम्बीस आहे , नव्या पद्धतीचे सुट्या भाग, त्याची मोठी ऑर्डर याचे गाजर दाखवून, सध्याच्या इतर सप्लायची किंमत पाडून मागायचा गेम खेळायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत , काय वाट्टेल त्या कंड्या पिकवतील हे लोक (एक इरसाल शिवी न छापण्याजोगी) .
मी नेहमीच्या पद्धतीने नफा तोटा , ही गुंतवणूक म्हणजे एक जुगार समजून त्यात यश अपयश , अशा सरधोपट मार्गांनी विचार चालू केला पण उलट सुलट , गोंधळात टाकणारी उत्तरे मिळायला सुरवात झाली, काही सुचेना, एव्हढ्यात मला जातकाचे वाक्य आठवले “काय वाट्टेल त्या कंड्या पिकवतील हे लोक “ जातक हे वाक्य एव्हढे ठासून बोलला होता की बस्स ! म्हणजे ‘ही कंपनी थापा मारते आहे, अफवा पसरवते आहे’ अशी जातकाची पक्की धारणा झाली होती. मी लगेचच ‘ ऐकलेली अफवा खरी आहे का?” असा प्रश्न आहे असे समजून त्याची उकल करायचे ठरवले आणि काय आश्चर्य स्पष्ट , खणखणीत उत्तर मिळाले . ( पुढे जातकाने ही खास ऑर्डर न स्वीकारण्याचा निर्णय घेतला व तो बरोबर ठरला, ती खरोखरच एक अफवा होती !)
असाच एक बडा सरकारी अधिकारी बदली संदर्भात प्रश्न विचारायला आला, बदलीचे प्रश्न नेहमीचेच असल्याने मी प्रश्नकुंडली ,मांडून ‘ या ..या… कालखंडात बदली होणारच ‘ असे ठासून उत्तर दिले. ‘गोव्या’ च्या दोन पुड्या एकाच वेळेला तोंडात मोकळ्या करत साहेब बोलले “बॉदली हॉणारच भौ… पॉण त्यॉ खॉत्यात हॉणॉर क्का” आता आली का पंचाईत , कोणत्या खात्यात बदली होणार हे सांगू शकणारे नियम तर आमच्या बुकात नाहीत. हे असे सांगून सायबांची बोळवण करणार होतो एव्हढ्यात माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सायबांना हेच खाते का पाहीजे! ताबड्तोब अष्टमस्थान (8) जे लाचलुचपत,भ्रष्ट्मार्गाने जमवलेला पैसा, बेहिशेबी पैसा दाखवते त्याचा विचार केला आणि सायबांना ‘ पॉण त्यॉ खात्यात हॉणॉर क्का’ चे उत्तर देता आले.
असे अनेक किस्से आहेत ज्या मध्ये नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे जरा वेगळ्या पद्ध्तीने दिली आणि ती बरोबर ही आली आहेत … त्याबद्दल नंतर कधी तरी..
पुढच्या भागात कोणते प्रश्न विचारावेत आणि कोणते नाहीत ते पाहूया..
शुभं भवतु