प्लंबर कधी येणार?

जातकाने प्रश्न अगदी मनापासून तळमळीने विचारला असेल तर प्रश्नकुंडली किती अचूक उत्तर देऊ शकते याचे हे एक उदाहरण.

त्याचे असे झाले की घरातले वॉश बेसिन चोक अप झाले होते, नेहमीचे सर्व उपाय करून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी प्लंबर ला पाचारण करावे लागले.

पण दिलेल्या वेळी येईल तो प्लंबर कसला? आज येतो, आत्ताच येतो, हे काय तुमच्याकडेच यायला निघालोय,  पाच मिनिटांत पोचतो अशी उत्तरे मिळत गेली पण प्लंबर काही आला नाही.

मी माझ्या मुलाला म्हणालो,

“संध्याकाळचे साडे सहा वाजले, बराच उशीर झाला आहे आता कसला हा प्लंबर येतोय, आला तर उद्याच येईल. नशीब आपले ! “

“तुमची ती प्रश्न कुंडली का काय म्हणता ना ती मांडून जरा बघा तरी हा प्लंबर आज येतो का नाही ते”

“प्लंबर आज नाही आला तर नाही,  उद्या येईल तो, पण असल्या बारक्या सारक्या प्रश्ना साठी ज्योतिषशास्त्र कशाला वेठीस धरायचे?”

“वा, सगळ्या गावाचे ज्योतिष सांगता आणि आपल्या स्वतः:च्या प्रश्ना साठी नाही असे कसे? तुमचे हे शास्त्र आपल्या उपयोगा साठीच निर्माण झाले आहे ना मग ते वापरायचे कधी? प्रश्नकुंडली मांडून तर बघा”

आता हे म्हणजे मला एक आव्हान दिल्या सारखे झाले !

“ये बात है, तो देख लो भैय्या,  तू भी क्या याद करेगा..”

आव्हान स्वीकारले.

“प्लंबर आज येईल का?’

हा प्रश्न मनात घोळवत मी ल्यापटॉप उघडला आणि सॉफ्टवेअर लॉंच केले, त्या क्षणाची पत्रिका समोर स्क्रीन वर झळकली. 


प्रश्न माझा आहे त्यामुळे लग्नेश आणि लग्नातले ग्रह माझे प्रतिनिधित्व करतील.

प्लंबर हा कारागीर असल्याने त्याचा विचार हा षष्ठम (६) स्थानावरून केला पाहिजे. षष्ठमेश आणि षष्ठातले ग्रह प्लंबर चे प्रतिनिधित्व करतील. 

इथे काही जण ‘परकी व्यक्ती’ म्हणून सप्तम स्थान (७) घेतील. प्लंबर ही परकी/ तिराहाईत व्यक्ती आहेच पण आजच्या संदर्भात ही व्यक्ती काही खास कामा साठी (दुरुस्ती) येणार आहे त्याचे काम (भूमिका/ रोल) नक्की असल्याने आणि हे काम कलाकुसरीचे, कौशल्याचे, मेहनतीचे, कारागिरीचे असल्याने एक ‘कारागीर’ या अंगाने विचारात घ्यायला हवे म्हणून षष्ठम (६) स्थान प्लंबर साठी विचारात येणेच योग्य ठरेल.

प्रश्नकुंडलीत कन्या लग्न आहे म्हणजे लग्नेश बुध माझे प्रतिनिधित्व करेल, लग्नात केतू आहे पण प्रतिनिधित्वा साठी छाया ग्रहांचा विचार होत नाही.  चंद्र हा निसर्गात:च प्रश्न करणाऱ्याचा प्रतिनिधी असल्याने चंद्र देखील माझा प्रतिनिधी असेल.

प्लंबर षष्ठम (6) भावावरून पाहावयाचा आहे, षष्ठम (6) भावा वर शनीची कुंभ रास आहे म्हणजे षष्ठेश शनी प्लंबर चे प्रतिनिधित्व करेल. षष्ठात इतर ग्रह नाहीत.

म्हणजे बुध आणि चंद्र माझे प्रतिनिधित्व करणार आहेत तर एकटा शनी प्लंबर चे प्रतिनिधित्व करेल.

आता हा प्लंबर आज येणारच असेल तर :

1) माझ्या आणि प्लंबरच्या प्रतिनिधि मध्ये कोणता तरी योग होणे आवश्यक आहे 


किंवा 

2 ) लग्न  बिंदू  आणि प्लंबरचा प्रतिनिधी यांच्यात योग व्हायला हवा.

बुध  (मी) मेषेत ६ अंशांवर आहे तर शनी (प्लंबर) मीनेत २१अंशांवर आहे. दोघांत फक्त एक राशीचे अंतर असल्याने त्यांच्यात ‘होरारी’ साठी विचारात घेतला जाणारा कोणताही योग होणार नाही.

चंद्र (मी) कर्केत ११ अंशांवर आहे, तो १० अंशांचे अंतर काटून २१ कर्क वर येईंल तेव्हा तो २१ मीनेतल्या शनी (प्लंबर) शी नवपंचम योग करेल.

म्हणजे माझा प्रतिनिधी चंद्र आणि प्लंबर चा प्रतिनिधी शनी यांच्या मध्ये नवपंचमा सारखा आश्वासक योग होणार असल्याने प्लंबर महाराज आज दर्शन देणार असे दिसते. 

जर प्लंबर आज येणार असेल तर तो आजच आपले काम करून त्याची बिदागी (पैसे) खिशात घालून जाणार म्हणजे माझ्यात आणि प्लंबर मध्ये आर्थिक व्यवहार व्हायला हवा. तसा तो पत्रिकेत दिसतो आहे का? ही एक जादाची ‘टेस्टिमोनी’ ठरेल आणि आपल्या निर्णयाला अधिक बळकटी मिळेल.

माझा पैसा द्वितीय (२)  स्थानावरून, द्वितीय स्थानावर शुक्राची तूळ रास, द्वितीय स्थानात कोणताही ग्रह नाही म्हणजे द्वितीयेश शुक्र हा एकटा माझ्या पैशाचे प्रतिनिधित्व करेल. 

प्लंबर षष्ठम (६) भावावरून पाहिला आहे म्हणजे षष्ठमाचे द्वितीय स्थान म्हणजे सप्तम (७) स्थाना वरून प्लंबर चा पैसा दिसेल.

सप्तमेश गुरु आहे, सप्तमात रवी, शनी, राहू, नेपच्यून, बुध आणि शुक्र असे ग्रह आहेत, या पैकी, शनी आणि बुध माझे आणि प्लंबर चे प्रतिनिधित्व करत असल्याने ते बाद झाले. राहू आणि नेपच्यून यांना प्रतिनिधी म्हणून विचारात घेता येणार नाही. शुक्र  माझ्या पैशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तो ही बाद झाला. आता फक्त रवी आणि सप्तमेश गुरु दोघेच उरले. या पैकी एकाची निवड करताना मी ग्रहांच्या नैसर्गिक कारकत्वाचा विचार केला. गुरु हा पैशाचा प्रथम दर्जाचा कारक ग्रह असल्यामुळे मी गुरु ची निवड केली.

आता माझ्यात आणि प्लंबर मध्ये पैशाचा व्यवहार होणार असेल तर शुक्र (माझा पैसा) आणि गुरु (प्लंबर चा पैसा) यांच्यात  योग व्हायला हवा.

गुरु मिथुनेत १२ अंशावर आहे तर शुक्र मेषेत ९ अंशावर वक्री आहे. , शुक्र मार्गी होऊन त्याने ३ अंशांचे अंतर काटले की शुक्र – गुरु लाभ योग होईल.

या टेस्टिमोनी ने माझा “प्लंबर आज नक्की येणार’ या भाकीताला पुष्टी मिळाली आहे.


हे सर्व ठीक पण हा प्लंबर येणार केव्हा ? 

चंद्र (मी) आणि शनी (प्लंबर) यांच्यात योग होण्यासाठी चंद्राला १० अंशाचा प्रवास करायचा आहे.

इफेमेरीज (रियल टाईम) च्या हिशेबाने पाहिले तर हे अंतर काटण्यासाठी चंद्राला २० तास लागतील.   


टाईम स्केल चा विचार घेतला तर १० मिनिटे  – १० तास असे स्केल मिळते.

पण हे दोन्ही अव्यवहार्य वाटले.

अशा परिस्थितीत लग्नबिंदुचे संक्रमण वापरता येईल, लग्नबिंदू देखील माझे प्रतिनिधित्व करू शकतो. लग्नबिंदूचा प्लंबरच्या प्रतिनिधी मधील योग कालनिर्णय साठी वापरता येईल, त्या अंगाने विचार केलात तर असे दिसते. लग्नबिंदू कन्येत १६ अंशावर आहे. लग्न बिंदू ५.५ अंश पुढे सरकला आणि कन्या २१:३६ अंशावर आला की त्याचा मीनेतल्या २१:३६ अंशावरच्या शनी (प्लंबर) शी प्रतियोग होईल.

याचा अर्थ जेव्हा लग्न बिंदू २१ कन्येवर येणार त्याच वेळी प्लंबर येईल.

+++

Similar Posts

2 Comments

  1. १)प्लंबर च्या चौथ्या स्थानातील हर्षल शी प्लंबरच्या दुसऱ्या स्थानातील म्हणजे धनस्थानातील शनि लाभ योग करतोय म्हणजे काय समजायचं
    २) प्लंबर च्या षष्ट स्थानातील मंगळाशी प्लंबर च्या पाचव्या स्थानातील चंद्र युती योग करतोय म्हणजे काय समजायचं
    ३) प्लंबर च्या पाचव्या स्थानातील चंद्र प्लंबर च्या चौथ्या स्थानातील गुरुशी अर्धलाभ योग करतोय एक डिग्री मध्ये म्हणजे काय समजायचं
    ४) प्लंबर च्या पाचव्या स्थानातील चंद्र प्लंबर च्या चौथ्या स्थानातील हर्षल शी 12 डिग्री मध्ये लाभ योग करतोय म्हणजे काय समजायचं
    ५) प्लंबर च्या धनस्थानामध्ये एकूण सहा ग्रह आलेत म्हणजे प्लंबर धनस्थान चांगलं असं समजायचं ना
    ६)प्लंबर चे सातवे स्थान म्हणजे त्याची पत्नी त्याचा रुलर सूर्य आणि प्लंबर चा रुलर शनि या दोघांमध्ये तीन डिग्री मध्ये युती योग होतोय म्हणजे काय समजायचं

  2. पत्रिकेत १२ ग्रह असतात , प्रत्येक ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी कोणता ना तरी कोणता योग होणारच असे सगळे 78 योग तपासायाचे नसतात! प्रश्ना साठी महत्त्वाचे असे मोजकेच दोन/ तीन एक्टर असतात ते आधी ठरवावे लागतात आणि मग त्या एक्टर च्या प्रतिनिधी मधलेच योग तपासायचे असतात,

Leave a Reply to suhasgokhale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *