आज बघता बघता आपल्या या ब्लॉग ला चक्क एक वर्ष पूर्ण झाले. (इंग्रजी ब्लॉग ला ही दोन दिवसात वर्ष पूर्ण होईल). हा ब्लॉग सुरु करण्या मागचा माझा मुख्य उद्देश ‘माझ्या बद्दल आणि माझ्या ज्योतिष विषयक मार्गदर्शन सेवे’ बद्दल लोकांना माहिती करुन देणे आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रातले माझे अनुभव , माझी मते आपल्या समोर ठेवणे, ह्या शास्त्राचा अभ्यास करताना मला यात ज्या त्रुटी जाणवल्या तसेच काही अपप्रवृत्ती दिसल्या त्या आपल्या नजरेसमोर आणणे , या शास्त्राच्या अभ्यास करताना ज्या अडचणीं येतात त्याबद्दल लिहायचे, असे ही काही हेतु मनात होते.
डिसेंबर 2013 पर्यंत मी फुकट भविष्य सांगत होतो, पण लौकरच एक विदारक सत्य माझ्या ध्यानात आले: कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की लोकांना त्यांची किंमत राहात नाही ! त्या क्षणी मी मोफत भविष्य सांगायचे बंद केले, बास झाली समाजसेवा !
मोफत असो वा सशुल्क सेवेच्या दर्जाबद्दल आणि व्यावसायीक नितिमत्तेबाबत मी कधीच तडजोड केली नाही.
- शास्त्राशी प्रामाणिक रहायचे.
- कोणतेही शॉर्ट्कट मारायचे नाहीत, नुसते वरवर पाहून काहीतरी थातुरमातुर सांगून लोकांची बोळवण करायची नाही.
- पूर्ण अभ्यास केल्या शिवाय काहीही सांगायचे नाही.
- ज्योतिषशास्त्राच्या मर्यादेत बसेल त्याच प्रश्नांची उत्तरें द्यायची.
- दुसर्याच्या वतीने विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरें त्या संबधित व्यक्तीची परवानगी असल्या खेरिज द्यायची नाहीत.
- जातकाची माहीती कमालीची गुप्त ठेवायची.
अशी अनेक व्यावसायीक नितीमूल्ये मनाशी पक्की बाळगून असल्याने, मी पुढ्यात येणारी प्रत्येक पत्रिका अगदी कसून तपासतो, जातकाने दिलेल्या जन्मवेळे वर विश्वास न ठेवता मी माझ्या पद्द्ध्तीने (रुलींग प्लॅनेटस नी नाही ) जन्मवेळेची खातरजमा करुन घेतो, जातकाशी चर्चा करुन त्याचा प्रश्न समजावून घेणे , काही वेळा प्रश्ना मागचा ‘खरा’ प्रश्न काय हे जाणून घेणे, जातकाच्या प्रश्ना मागचे ‘मानस शास्त्र’ समजावून घेणे यासाठी मी आटोकाट प्रयत्न करतो. वेळ पडली तर जातकाशी तास-तास भर चर्चा करुन खुलासा करुन घेतो. त्यानंतर एक नाही, दोन नाही , चार -चार वेगवेगळ्या मेथड्स नी पत्रिकेचा अभ्यास करुन मार्गदर्शन करतो.
भविष्य बरोबर येणे न येणे हा मुद्दा बाजूला ठेवला तरी माझ्याकडून प्रयत्न करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही हे मी अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो. अगदी काही वेळा तर ‘शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड!’ असाही अनुभव आलेला आहे तरीही जी व्यावसायिक नितिमूल्ये जपली आहेत त्यात माझ्याकडून कोणतीही तडजोड होणार नाही.
मोफत असो वा सशुल्क मी आजही जातकांना विनवत असतो ते फिडबॅक देण्या बद्दल, भविष्य बरोबर आले तर सांगाच पण माझे भविष्य चुकले तरीही नि:संकोचपणाने कळवा, कारण माझी चुकलेली भाकितेंच मला जास्त शिकवून जातात.
बर्याच लोकांना ज्योतिष फुकट ऐकायची सवय किंवा अपेक्षा असते. ही सवय लावण्याला किंवा ज्योतिष हे फुकटच असते हा गैरसमज निर्माण व्हायला आम्ही ज्योतिषीच कारण आहोत. ज्योतिषाच्या प्रांतात हौस किंवा विरंगुळा म्हणून काम करणारेच जास्त, त्यामुळे ज्योतिष सांगण्यात आत्मविश्वास कमी, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असा दृष्टीकोन, उत्पनाचे इतर स्त्रोत्र असल्याने व्यावसायिक शिस्त , केलेल्या श्रमाचे उचित मूल्य आकारण्याचा निर्भिडपणा या गोष्टींचा अभाव असणे ही व अशी बरीच लारणें आहेत
पुर्वीच्या काळी बहुतेक ज्योतिषी आपल्या कामाचे पैसे घेत नसत, पण लोक श्रद्धेने काही ना काही पैसे (ते ही शक्य नसेल तर मूठ पसाभर तांदूळ) पंचांगावर ठेवत असत, रिकाम्या हाताने कोणीही ज्योतिषाकडे जात नसत. आज ती श्रद्धाच नाहिशी झाली आहे आणि पूर्वी सारखे मूठभर तांदळात आणि सव्वा रुपयात , ज्योतिषाचे भागणार नाही अशी अक्राळविक्राळ महागाई आहे.
ज्योतीष सांगणे हा माझाही मुख्य व्यवसाय नाही, मी मोठ्या मोठ्या आय.टी. कंपन्यां साठी कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम बघतो, त्यांना सॉफ़्टेवेअर विषयक सल्ला देतो, ह्या कामातून माझी मुख्य कमाई होते, घरातली चूल त्यावरच चालते. त्यामुळेच मी ठामपणे ठरवू शकलो , आता भविष्य सांगायचे तर पैसे घेऊनच नाहितर नाही. पैसे देणारे जातक नाही आले तरी बेहेत्तर पण फुकट ज्योतीषाचे अन्नछ्त्र चालवणार नाही. कधीही नाही! समाजसेवाच करायची असेल तेव्हा मी खरोखरीच्या गरजूंना मदत करेन (तशी करतो ही आहेच) , फुकट्यांना मदत करुन कोणतीही समाजसेवा होणार नाही की मला पुण्य मिळणार नाही!
ब्लॉग चालू करण्यापूर्वी मी स्वत:ची वेबसाईट बनवणार होतो, (अजूनही तो विचार डोक्यात आहेच. ) पण त्याला वेळ आणि पैसा लागणार होता, मला झटपट काहीतरी हवे होते त्यातूंच ब्लॉगचा पर्याय समोर आला. सध्यातरी मला जे काही करावयाचे होते ते सारे या ब्लॉगच्या माध्यमातून बहुतांश रित्या पूर्ण होत आहे. ब्लॉग सुरु करण्या आधी अनेक ज्योतिष ब्लॉग्जस व वेबसाईट्स ना भेटीं देऊन तिथे काय मजकूर असतो, त्याची मांडणी कशी असते याचा अभ्यास केला आणि त्यातूनच स्वत:चे वेगळेपण जपणार्या या ब्लॉगचा जन्म झाला. आज तो वर्षाचा झाला. चांगलेच बाळसे धरलंय या बाळाने.
हे सर्व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने , पाठींब्याने झाले आहे. ब्लॉग़च्या वाचकांची सतत वाढणारी संख्या आणि मिळणारे प्रतिसाद लक्षात घेता , ब्लॉग लोकांना पसंत पडला आहे असे वाटते. लवकरच ब्लॉग च्या रंगरुपात काही चांगले , सुखावह, रमणीय बदल करण्याची योजना आहे , पोष्ट्स ची संख्या ही वाढवत आहे, अनेक नव्या नव्या विषयांवर लिहणार आहे. त्या संदर्भात आपल्या काही सूचना , अपेक्षा असल्यास मला जरुर कळवाव्यात.
माझ्या ब्लॉग वर जेव्हढी विविधता आहे तेव्हढी इतर कोणत्याही मराठी ज्योतिष विषयक ब्लॉग्ज वर नाही हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो. माझ्या मनात अजून ही काही छान छान कल्पना आहेत, ब्लॉगचे कंटेंट अधिक श्रीमंत करायचे प्रयत्न चालू आहेत , लवकरच आपल्याला त्याची झलक पाहायला मिळेल. अगदी भरगच्च थाळी देणार आहे, ती सुद्धा केळीच्या सव्वा हात पानावर , रांगोळ्या घालून, उदबत्त्या लावून, तयार आहात ना मंडळी ?
हा ब्लॉग आपलाच आहे, तो अधिक चांगला होण्यासाठी / करण्यासाठी मला आपल्या सल्ल्याची, सुचनांची गरज आहे. आपल्याला काय वाचायला आवडेल हे जर मला कळवलेत मी त्या विषयांवर जरुर लेखन करेन, मला काय लिहावेसे वाटते त्या पेक्षा आपल्याला काय वाचायला आवडेल हे महत्वाचे! आपले विचार अवश्य कळवा !
अनावधाने काही चुकले माकले असेल तर क्षमा करा, आणि अशीच कृपा राहू द्या, एव्हढीच आज नम्र विनंती करतो.
शुभं भवतु
अभिनंदन
धन्यवाद
सुहास
आपल्या ब्लाँग ला एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन सर , तसेच
बहुतांशी जातकांच्या जन्मवेळेच्या अचुकतेसंबंधी समस्या किंवा काही शंका असतात , जातकाने दिलेली जन्मवेळ आणि त्यात पुन्हा तुम्ही आपला मौल्यवान वेळ देऊन आपल्या परीने वेळेची खातरजमा करुन पत्रिकेचा अभ्यास करतात .खुपच छान सर
धन्यवाद सुभाषजी
सुहास
अभिनंदन !
आपल्या इंग्रजी ब्लॉगचा पत्ता कळू शकेल का ?
अनंतजी, धन्यवाद . माझा इंग्रजी ब्लॉग http://www.suhasastrology.wordpress.com इथे आहे. सध्या त्या ब्लोग कडे जरासे दुर्लक्ष झाले आहे पण लौकरच तिथेही बर्याच नव्या पोष्ट प्रसिद्ध करत आहे.
सुहास
आपला ब्लॉग म्हणजे अति आनंदाचा लोनयाचा गोळा आहे. खुपच छान. हैट्स ऑफ.
यशवंतजी , धन्यवाद
सुहास