बरेच जण विचारतात “मधुमेह झाला आहे हे कसे ओळखायचे ? या आजाराची लक्षणें काय आहेत? “
इतर बर्याच आजारांच्या बाबतीत अगदी ठोस अशी लक्षणे असतात आणि त्या रोगाची लागण होताच लगेचच ती लक्षणें दिसायला पण लागतात त्यामुळे अशी लक्षणें दिसताच जागरुक व्यक्तीला किंवा डॉक्टरांना शंका येऊन पुढच्या तपासण्या करुन घेतल्या जातात आणि रोग निदान लौकर होणे बर्याच वेळा शक्य पण असते.
पण दुर्दैवाने मधुमेहाच्या बाबतीत अशी ठोस लक्षणे दिसतच नाहीत ! त्यामुळे या रोगाचा आपल्या शरीरात कधी शिरकाव झाला आहे हेच मुळात कळतच नाही , बर्याच जणांना त्यांना मधुमेह आहे हे दुसर्या कोणत्या कारणां साठी ( विमा, शस्त्रक्रिया . मोतीबिंदू इ) रक्त चाचणी केली जाते तेव्हा लक्षात येते.
माझ्या बाबतीत पण असेच झाले , मधुमेह माझ्या शरीरात बराच आधी शिरला होता पण माझ्या लक्षात आलेच नाही, मी जेव्हा एक नवीन नोकरी स्विकारली तेव्हा मला सक्तीने आरोग्य तपासणी करून घ्यावी लागली आणि त्या तपासण्यांतून मला मधुमेह आहे आणि इतकेच नव्हे तर तो आता चांगलाच बळावला आहे हे लक्षात आले. म्हणजे काही वर्षे मधुमेह माझ्या अंगात होता पण मला कळलेच नाही. मी जर तेव्हा नोकरी बदलली नसती तर हा लपून राहीलेला माझा मधुमेह कधीच लक्षात आला नसता आणि तसे झाले असते तर आज मी ही पोष्ट लिहायला …………..
हे वाचून काही जण म्हणतील
“असे नाही , मधुमेहाची म्हणून अनेक लक्षणें सांग़ितली जातात ना , आम्ही वाचलय ते” ,
अगदी खरे मधुमेहाची म्हणून अशी काही लक्षणे जरुर नोंदवली गेली आहेत, ती मधुमेहाचीच लक्षणे आहेत यात शंकाच नाही पण गंमत अशी की ही सर्व लक्षणे जेव्हा दिसायला लागतात तेव्हा पर्यंत तुमचा मधुमेह चांगलाच बळावलेला असतो. म्हणजेच ही जी लक्षणे सांगीतली जात आहेत ती मधुमेह प्रगत अवस्थेत (डेव्हलप्ड) अवस्थेत आल्या नंतरच दिसू शकतात , मधुमेहाची नुकतीच लागण झालयावर ही लक्षणे कधीच दिसणार नाहीत. मधुमेह आपल्या अंगात दोन – तीन वर्षे मुरल्या नंतरच ही लक्षणें दिसायला सुरवात होते आणि तो पर्यंत फार उशीर झालेला असतो.
ह्या लक्षणां वर भरवसा ठेवणे म्हणजे ‘मूल जन्माला आल्या नंतर लगेच मुलगा का मुलगी हे ठरवता न बसता, बघु या या बालकाला दाढी मिशा आल्या तर तो मुलगा नाहीतर मुलगी असा निकष ठरवून त्यासाठी १६ वर्षे वाट पाहाणे !” अशा सारखे होईल.
आपल्याला मुल जन्मता क्षणीच मुलगा का मुलगी ते कळते त्या साठी दाढी मिशा येतात का नाही याची वाट पाहत बसावे लागत नाही पण मधुमेहाच्या बाबतीत सांगीतलेली लक्षणे ही अशी दाढी मिशा फुटण्या सारखी आहेत ती दिसायला मधुमेह होऊन अगदी १६ वर्षे नसली तरी पाच –सहा वर्षे तरी जावी लागतात आणि मधुमेहाच्या निदानाला झालेला हा उशीर फार महागात पडतो !
इथे आणखी एक मुद्दा नोंद घेण्याजोगा आहे तो म्हणजे मधुमेहाची जी खास लक्षणें दिली जातात ती बहुतांश ‘टाईप 1 ‘ डायबेटीस ची आहेत त्यांच्या बाबतीत ही लक्षणे लगेच दिसतात हे मान्य पण जगात टाईप 1 वाल्यांची संख्या तशी कमी , बहुतांश मधुमेही हे टाईप 2 मध्येच मोडतात. टाईप 2 डायबेटीस वाल्यांच्या बाबतीत ही लक्षणे दिसायाला मधुमेह बरीच वर्षे अंगात मुरावा लागतो.
म्हणजे मधुमेह वर जर ठोस अशी लक्षणे नाहीत तर मधुमेह झाला आहे हे कसे कळणार ? सध्या तरी रक्त शर्करा चाचणी करून घेणे हाच एकमेव मार्ग आहे , या चाचणीतूनच आपल्याला एखाद्याला मधुमेह आहे / नाही किंवा ती व्यक्ती ‘मधुमेह पूर्व (pre-diabetic) ‘ आहे याबद्दलचे निश्चित असे निदान करता येते.
असे जरी असले तरी अशी काही लक्षणे आहेत जी (टाईप 2) मधुमेहाची चाहूल लागल्याचे सुचित करू शकतात हे नक्की. पण ही लक्षणे मधुमेहाची लक्षणे या यादीत समाविष्ट झालेली दिसत नाहीत याचे कारण म्हणजे ही लक्षणे इतरही अनेक आजार / व्याधीं मुळेही दिसू शकतात !
म्हणजे झाला का पुन्हा घोट्टाळा !!
घोट्टाळा तर आहे खराच पण असे असले तरी या सर्व लक्षणांची माहीती असणे जरुरीचे आहे. मी यादी (स्पष्टीकरणा सहीत) देणार आहेच , त्यातले एखादे लक्षण प्रकर्षाने जाणवत असेल तर दुर्लक्ष करुन नका , ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटा आणि ‘मधुमेह निदान चाचणी’ करुन घ्या , या चाचण्या स्वस्त आहेत , आपल्या कोपर्यावरच्या कोणत्याही साध्या पॅथॅलॉजी लॅब मध्ये होऊ शकतात , फास्टिंग रक्त शर्करा चाचणी आणि जेवल्या नंतर दोन तासांनंतरची रक्त शर्करा अशा दोन चाचण्या फक्त रुपये १०० ( दोन्ही चाचण्यां साठी मिळून) मध्ये होतात, HbA1C सारखी निर्णायक निदान चाचणी साधारण रुपये ५०० मध्ये होते ! म्हणजे एका पिझ्झा / सिनेमाच्या तिकीता पेक्षा कमी खर्च आहे हा! पण मधुमेहाचे निदान लौकर झाले त्याचे मोल पैशात मोजायच्या पलिकडचे असेल. खरे ना?
तर पुढच्या भागांतून आपण मधुमेहाची सर्व नोंदवलेली लक्षणें कोणती आहेत ते तपासू …
शुभं भवतु