आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना त्यांचा एक ग्राहक (जातक) म्हणून भेटलेलो आहे. काही वेळा नुसती चौकशी केलीय तर काही वेळा चक्क पैसे मोजलेत. पुण्यातल्या तर जवळजवळ सर्वच नावाजलेल्या ज्योतिषांचा मला अनुभव आहे.
पॉश बिल्डिंग मधले वातानुकूलित ऑफिस, सेक्रेटरी, संगणक, आजूबाजूला मदतनीस, शिकाऊ ज्योतिष विद्यार्थी असा पूर्णं व्यावसायिक सेटअप असलेल्या हाय टेक ज्योतिषांकडे गेलोय आणि बोळकंडीतल्या, कुबट, अंधार्या जागेत, मिणमिणत्या पिवळ्या गुल्लोबच्या उजेडात (?), धुळीने माखलेल्या सतरंजीवर बसून भविष्य जाणून घेतलेय
(काय ढेकूण चावले हो त्या अर्ध्या तासात! आणि त्या गोण्या ज्योतिषाला त्याचे काही नाही, आपला मजेत गाय छाप मळत होता! )
‘ली मेरेडियन’ च्या लाऊंज मधला ज्योतिषी अनुभवला आहे आणि ओंकारेश्वरावर पोते टाकून बसलेल्या वृद्ध बाबाजींच्या पायाशी ही बसलोय.
सगळे ज्योतिषी बघितलेत….
पाच हजार (त्या काळी!) फी घेणारे सेलेब्रिटी ज्योतिषी बघितलेत (नुसते बघितलेत, अनुभवले नाहीत, परवडायला पाहीजे ना? )
क्रेडिट कार्डाने मानधन स्वीकारणारे बघितलेत आणि “ठेवा पंचांगावर काय इच्छेला येईल ते” असे विनवणारे अल्पसंतुष्ट ही पाहिलेत.
केशकर्तनालयात असतो तसा मानधनाचा दरफलक ऑफिसच्या भितीवर टांगणारे (अगदी टिपीकल पुणेरी इस्टाइल) ज्योतिषी पाहिलेत आणि मोफत भविष्य सांगून वर मस्त मसाला दूध पाजून, जाताना स्वत:च्या दारच्या चाफ्याची दोन नाजूक फुले हळुवारपणे हातावर ठेवणारे प्रेमळ, सात्त्विक ज्योतिषी ही अनुभवलेत.
ग्रंथकर्ते पाहिलेत (बरोबर वळिकल तुमी) , मासिक वाले पाहिलेत, क्लासवाले पाहिलेत, पोस्टलवाले भेटलेत, बालगंधर्वात तिकीट लावून तुफानी हास्याचे मंतरलेले प्रयोग करणार्यांशीही (हे ही बरोबर वळिकल तुमी राव ) एकदा बातचीत झालीय…
नाडीवाले बघितलेत, दाढीवाले-जटावाले अनुभवलेत, थ्रि पीस सुटातले पाहिलेत आणि कफनीवाले ही बघितलेत (काय त्या कफनीतला बुवा हो तो ! नको तिथे सारखा करकरा खाजवत होता, म्यॅनरलेस)…
स्वामी समर्थ वाले झाले, कालीमाता वाले भेटले, स्वामी झाले, म्हाराज पावले , बापूंचा आशीर्वाद घेतला, बुवांचे दर्शन मिळाले, बाबांनी प्रसाद (?) दिलाय , अण्णां च्या (किती बरोबर वळिकता हो तुमी) दरबारात सुद्धा हजेरी लावलीय.
गुर्जी तर पैशाला पासरी….
एव्हढेच नव्हे तर मुंबईचे पंत ही झालेत !
राजस्थानी ठाकोरजी, साऊथचा सुब्बु आणि एक पांडेजी पण भेटलेत, नशीब आमचा नेपाळी गुरखा बहादूर ज्योतिषी नाही!
पोपटवाले झाले, लोलकवाले, फांसेवाले पण अनुभवलेत .
नंदीवाल्याला सुद्धा पाच दहा रुपये देऊन झालेत.
हातवाले, पायवाले, अंगठावाले झालेत.
त्या हात वाल्याने कसली शाई वापरून हाताचा ठसा घेतलान कोण जाणे! ती शाई, तीही लालेलाल, जाता जाईना, मग काय पुढचे चार पाच दिवस मी रक्ताने बरबटलेला असावा असा तो लाल खुनी पंजा घेऊन हिंडत होतो, माझा हात बघून लोक जाम टरकायचे तेव्हा !
नुसता चेहरा बघून अचूक जन्मकुंडली मांडलेली बघितलीय.
भगवद्गीता,ज्ञानेश्वरीचे रसाळ दाखले देत , कर्मवादाची सुरेख सांगड घालून केलेले , मंत्रमुग्ध करून सोडणारे भविष्य ही ऐकलंय आणि कर्णपिशाच्चाचा अनुभवही घेतला आहे.
तोडगे वाले अघोरी ज्योतिषी पाहिलेत
आणि हो आता सांगायला हरकत नाही मी चक्क एका बंगाली बाबाला पण भेटलोय (तो नालासोपार्याचा नाही, आमचा बाबा वसईचा!) कम्युनिकेशन स्किल्स जबरी असतात या बाबा लोकांची, बॉडी लँग्वेजची उत्तम जाण असते यांना. समोरच्या व्यक्तीला एका क्षणात पारखतात, ह्यांची लेक्चर्स बिझनेस स्कूल्स मध्ये ठेवली पाहिजेत.
टि.व्ही.वर राशीभविष्याचा रतीब घालणार्याला भेटलोय, वेबसाइट वाले बघितलेत (क्लिकलेत), ब्लॉगवाले झालेत (मी स्वतः त्या पैकीच बरे का),
बच्चन, शाहरुखचे , अंबानींचे ज्योतिषी (असे ते ज्योतिषी स्वत:ला म्हणवतात) भेटलेत,
नेहरूंची साक्ष काढणारे ही भेटलेत, नाही म्हणायला तसा दाखवला त्यांनी एक पिवळा पडलेला जीर्णशीर्ण फटू , पण त्या फटूतले ते टोपीवाले हे नेहरूच असे काही ओळखता येत नाही असे भाबडेपणाने त्यांना सांगताच ते मला मारायला धावले.
थातूर मातूर , गुळमुळीत बोलणार बघितलेय, बोलबच्चन सहन केलेत, मी (म्हणजे ते ज्योतिषीबुवा ) किती महान ज्योतिषी आहे याची तासा-तासाची लेक्चर्स ऐकली आहेत,
एका अती ज्येष्ठ , अती मान्यवर ज्योतिषाने दुसर्या तितक्याच तोलमोलाच्या ज्योतिषाची अर्वाच्य भाषेत केलेली येथेच्च निंदा ऐकलीय,
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कृष्णमूर्ती वाले बघितलेत तर कृष्णमूर्तीचे नाव घेताच पिसाळून तरबत्तर होऊन अंगावर आलेले वैदिकवालेही झेललेत
आणि हो, एक अष्टकवर्ग वालं खडूस खोकड पण भेटलंय मला एकदा .
अमेरिकेत असताना फिरंगी ज्योतिषांशी सुद्धा संवाद झाला, अनुभव मात्र घेता आला नाही, बेणीं तासाला 100/200 डालर घेतात, येव्हढे कुठनं आणायचे पैसे? पण सॅन डीयागोच्या आमच्या रॅन्चो बर्नार्डो कम्युनिटीच्या अन्युअल डे च्या फंक्शन (म्हणजे जत्रा!) मध्ये एका नेटिव्ह अमेरिकन इंडियन बाईने क्रिस्ट्लबॉल मध्ये बघून सांगितलेल्या भविष्याचा अनुभव जरूर घेता आला. (मी इंडियातून आलोय हे कळल्यावर पैसे नाही घेतले त्या म्हातारीने , आणि जाताना आपल्या पडक्या दाताच्या फटीतून ‘णमो नार्हायणा’ असे काहीसे पुटपुटली)
तर असेच अनुभव काही कडू , गोड आणि आंबट आपल्याला सांगायचा बेत आहे, बघू कसे काय जमतेय ते.
शुभं भवतु
सर तुफान हास्याचे मंतरलेले तीन तास आणि कर्णपिशाच्च वश केलेल्या व्यक्तीचे काय अनुभव आले हे सांगाल काय ? आम्ही उत्सुक आहोत .
कृपया कर्ण-पिशाच्य +अघोरी तोडगे वाले ह्या बद्दल सविस्तरपणे लिहा –भोला मिलिंद
धन्यवाद श्री. मिलिंदजी,
मी यावर काही लिहायचा जरुर प्रयत्न करेन.
सुहास गोखले
Aplya Anubavanchya Pratikshet – Apla Abhijit
धन्यवाद श्री. अभिजीतजी ,
सुहास गोखले
Hello.. Have you posted after part 4 about babaji ? It is very fundamental. I would like to read about it more..
चित्रलेखाजी
अभिप्राया बद्दल धन्यवाद
बाबाजींच्या लेखमालेतले उर्वरीत भाग या जुलै मध्ये प्रकाशीत करेन.
धन्यवाद
सुहास गोखले