प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.
आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !
कोणते मुद्दे आहेत हे ?
L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध
A : Appropriate सुयोग्य
M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा
P : Positive सकारात्मक
P : Personal वैयक्तिक
O : Objective वस्तुनिष्ठ
S : Sincere तळमळीचा
T : time bound समय बद्ध
वर दिलेल्या मुद्द्यां पैकी “ L = Legitimate कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध “ , “ O = Objective सापेक्षता”, ‘P “ Personal – वैयक्तीक’ आणि “S (Sincere/ Serious)” या चार मुद्द्यांचा उहापोह आपण या लेखमालेच्या पहिल्या चार भागांत केला आहे , आज या लेखमालेच्या पाचव्या भागात आपण आणखी एका महत्त्वाचा मुद्दा तपासू आणि तो म्हणजे:
“T (Time bound)”
प्रश्नकुंडली द्वारा उत्तर देताना हे भान ठेवायचे की प्रश्नकुंडलीचा आवाका अगदी मर्यादित असतो. अवघ्या काही महिन्यांचा. त्यापेक्षा जास्त काळानंतर घडू शकणार्या घटनांचा वेध प्रश्नकुंडली द्वारा घेऊ नये. प्रश्नकुंडली ही तात्कालिन प्रश्नांसाठी वापरायची असते. संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा एकाच प्रश्नकुंडली वरुन घेण्याचा प्रयत्न करु नये. काही के.पी. महामहोपाध्याय / गुरु / लेखक / अभ्यासकांनी ‘प्रश्नकुंडली ‘ ही जन्मकुंडली सारखीच काम करते वगैरे ठासून लिहले असले तरी त्याला काही अर्थ नाही, एखाद्या प्रश्नकुंडलीच्या बाबतीत तसा अनुभव आला म्हणून सगळ्याच प्रश्नकुंडल्यांच्या बाबतीत सरसकट असा नियम बनवता येणार नाही. नियम बनवण्यातला हा असला अतीउत्साह केपी मध्ये जास्त बघायला मिळतो. ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ ही म्हण बाकी कोणाला नसली तरी काही तथाकथीत के.पी. अभ्यासकांनाच्या बाबतीत चपखल लागू पडते!
असो.
प्रश्नशास्त्रा द्वारे एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे असले तर तेव्हा त्याला एक निश्चित अशी समयमर्यादा घातलेली असावी, तशी ती प्रश्नातच समाविष्ट केलेली असणे केव्हाही चांगले पण जातकाने अशी समय मर्यादा घातलेली नसेल तरी ज्योतिष्याने स्वत:च एक मर्यादा आखून घ्यावी.
हा मुद्दा जरा जरा खुलासेवार पाहू .
‘समय मर्यादा ‘असणे का आवश्यक आहे ? याचे मुख्य कारण म्हणजे प्रश्नवेलेची ग्रहस्थिती आपल्याला फार पुढ्चे काही सांगू शकत नाही त्यामुळे मिळालेले उत्तर काही थोड्या काळा साठी वैध असते. “माझे लग्न होईल का?” असा प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर नकारार्थी आले तर काय अर्थ घ्यायचा ? आयुष्यात कधीच लग्न होणार नाही असे तर होऊ शकणार नाही कारण समाजात लग्नाची ईच्छा असलेल्या ८० ते ९०% लोकांची लग्ने या ना त्या प्रकारे , काहींच्या बाबतीत उशीराने का होईना जमतातच. मग या ‘नकारा’ चा अर्थ असा घ्यायचा की नजिकच्या काळात विवाह योग नाही. त्या पुढील काळात विवाह योग असतील ही पण सध्याच्या प्रश्नकुंडली द्वारा त्याचा वेध घेता येणार नाही.
तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा पण प्रश्नकुंडली चा पायाच मुळी काही अज्ञात दैवी शक्तीच्या मदतीवर आहे. त्या दैवी शक्तींकडे मदत मागताना नेमके पणा हवा. भोंगळपणा चालणार नाही. म्हणूनच विवाह, संतती, नोकरी याबाबतीतल्या प्रश्नांबाबतीत ते प्रश्न एक विषिष्ठ कालमर्यादा घालूनच विचारले जावेत.
जसे: “येत्या सहा महिन्यात … येत्या वर्षभरात… अमुक तमुक घडेल का ? “अशा स्वरुपाची.
अशी समय मर्यादा घालता येत नसेल किंवा जातकाला तशी मर्यादा घालणे पसंत नसेल तर जातकाला परत पाठवावे. जातकाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहीजे / देता आलेच पाहीजे असे काही नाही.
ही काल मर्यादा घालून घेताना सुद्धा काही तारतम्य बाळगावे , प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे हे पण बघितले पाहीजे. इथे थोडे तारतम्य / सामान्य ज्ञान / स्थळ ,काळ, व्यक्ती , परिस्थिती, रुढी – परंपरा, सामाजीक/ कौटुंबिक पार्श्वभूमी या सार्यांचा विचार करावा लागतो.
“विवाह कधी होईल” या बाबतीत फार मोठी म्हणजे तीन –चार वर्षांची समय मर्यादा ठेवणे बरोबर नाही, पण त्याच बरोबर आपल्या भारतात विवाहाचा एक ‘सिझन’ (डिसेंबर – जून) असतो त्याचा विचार व्हावा. चातुर्मासात विवाह करत नाहीत याचे भान असावे. साधारण एक वर्ष ही समय मर्यादा पुरेशी आहे. “नोकरी कधी ?” या प्रश्नाला सहा महिने पुरेसे आहेत. संतती योगाचा विचार करताना ही काल मर्यादा वर्षापेक्षा जास्त, दीड ते दोन वर्षे ठेवायला पाहीजे. कारण नऊ महिन्यांची गर्भावस्था हा निसर्गाचा नियम इथे लक्षात ठेवला पाहीजे. आज संतती विषयक प्रश्न आहे म्हणजे आजच्या घटकेला जातक गर्भवती नाही हे उघड आहे म्हणजे याच्या पुढे गर्भ धारणा होणार आणि त्यापुढे नऊ महीने म्हणजे साधारण वर्ष तरी लागणारच ना.
काही प्रश्नांत त्याची एक सुनिश्चीत काल मर्यादा आधीपासुनच असते, “परिक्षेत यश मिळेल का? हा त्या प्रकाराचा प्रश्न आहे, इथे परिक्षेची तारिख, निकालाची तारीख या बर्यापैकी निश्चित असतात , त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन काल मर्यादा निश्चित करावी. मात्र परीक्षेत यश मिळेल का या प्रश्नाचे उत्तर देताना जातक आधी त्या परीक्षेला बसला आहे का याची खातरजमा करुन घ्या. ज्या परीक्षेला बसलाही नाही त्या परीक्षेच्या निकाल काय लागेल हा प्रश्नच होऊ शकत नाही.
प्रश्न कोणताही असो त्याला एक समय मर्यादा घालून घेतलीच पाहीजे. हा मुद्दा जातकाच्या लक्षात येणार नाही पण ज्योतिषाने हे पथ्य पाळले पाहीजे, पण असे होताना दिसत नाही, अनेक वेळा ज्योतिषी प्रश्नकुंडली वरुन तीन –चार वर्षां नंतर घडू शकणार्या घटनेचा वेध घेतात , हे चुकीचे आहे.
लेखाच्या पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करू
क्रमश:
शुभं भवतु
nice sir
धन्यवाद श्री गोरक्षनाथ जी
सुहास गोखले