प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.
आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !
कोणते मुद्दे आहेत हे ?
L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध
A : Appropriate सुयोग्य
M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा
P : Positive सकारात्मक
P : Personal वैयक्तिक
O : Objective वस्तुनिष्ठ
S : Sincere तळमळीचा
T : time bound समय बद्ध
वर दिलेल्या मुद्द्यां पैकी “ L = Legitimate कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध “ , “ O = Objective सापेक्षता”, ‘P “ Personal – वैयक्तीक’ , “S (Sincere/ Serious)” आणि “T (Time bound)” या पाच मुद्द्यांचा उहापोह आपण या लेखमालेच्या पहिल्या पाच भागांत केला आहे.
या लेखमालेतले पहिले पाच भाग इथे वाचा:
आज या लेखमालेच्या सहाव्या भागात आपण आणखी एका महत्त्वाचा मुद्दा तपासू आणि तो म्हणजे:
‘सुसंगत’ Appropriate’
जातक येतो आणि काहीही विचारतो ! अगदी उचलली जीभ लावली टाळ्याला या प्रमाणे ! पण म्हणून आपण त्याचे उत्तर दिलेच पाहीजे असे कोणतेही बंधन नाही, जातक जरी मानधन द्यायला तयार असला तरी. या मागे काही कारणे आहेत , त्यातली काही आपण आधीच्या भागांत पाहिली, आज तपासणार आहोत ते कारण म्हणजे ‘ सुसंगत म्हणजेच Appropriate’.
जातकाने विचारलेला प्रश्न त्याच्या वयाला, शिक्षणाला, आर्थिक / सामाजिक / कौटुंबिक पार्श्वभूमीला, जातकाच्या सध्याच्या स्थितीला साजेसा असावा.
काही उदाहरणे पाहू म्हणजे याचा खुलासा होईल.
व्यक्ती अजून कॉलेजात शिक्षण घेते आहे, अजून नोकरीचा पत्ता नाही आणि प्रश्न विचारते आहे “माझे स्वत: चे घर कधी होणार ?” जातकाच्या दृष्टीने हा प्रश्न कदाचित महत्त्वाचा असला तरी जातकाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तो सुसंगत होत नाही. ‘घर घ्यायचे’ ही काही साधीसुधी बाब नाही, काही लाखांचा मामला असतो, कर्ज काढून घर घ्यायचे तर कर्ज मिळू शकेल अशी नोकरी असावी, स्वत:चे 15% डाऊन पेमेंट करण्याची आर्थिक तयारी लागते, यातले काहीच नसताना केवळ ‘हवेतले मनोरे’ म्हणून कोणी असले प्रश्न विचारत असेल तर त्या मागे केवळ ‘उत्सुकता’ हाच हेतू असतो. नोकरी – व्यवसाय सुरळीत चालू आहे . स्वत:चे काही पैसे साठवले आहेत, आता घर घ्यायचे असा पक्का विचार करून आर्थिक बाबींची ( डाऊन पेमेंट , ईएमआय इ.) चाचपणी करून , गांभीर्य पूर्वक घरे बघायला सुरवात होईल तेव्हा ‘माझे स्वत: चे घर कधी होणार ‘ हा प्रश्न खर्या अर्थाने निर्माण होतो.
प्रश्न सुद्धा जातकाच्या आवाक्यातलाच असावा . गृहकर्जाचे हप्ते भरताना नाकीनऊ आलेल्या अवस्थेत असताना ‘मी कोट्याधीश, अब्जाधीश होईन का’ हा प्रश्न होऊ शकत नाही किंवा काडी पैलवान , जाड भिंगाचा चष्मा असलेल्या व्यक्तीने ‘मिल्ट्री मध्ये भरती होण्याचे योग आहेत का?’ असा प्रश्न विचारणे हास्यास्पद ठरेल.
नोकरी व्यवसाया साठी किंवा शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रमाण जसे वाढले तसे ‘मी परदेशी जाईन का ?’ या प्रश्नांचेही प्रमाण वाढले आहे. पण याचा अर्थ असा नाही की केवळ उत्सुकता म्हणून कोणीही हा प्रश्न विचारावा. नोकरी व्यवसाया साठी किंवा शिक्षणा साठी परदेशी जाण्यासाठी सर्व प्रथम प्रश्न विचारणार्या व्यक्ती कडे तसे ‘पोटेंशीयल’आहे का? हे पाहावयाप हवे. शाळा मास्तर, सरकारी खात्यातला कारकून, पानबिडीचा ठेला चालवणारा, नारीयल पानी वाला यांच्या पेक्षा आय.टी. मधल्या एकाद्या सॉफ्टवेअर इंजिनियर कडे हे ‘पोटेंशीयल’ जास्त आहे. या इथे शाळा मास्तर, सरकारी खात्यातला कारकून, पानबिडीचा ठेला चालवणारी व्यक्ती , नारीयल पानी वाला परदेशी जाऊच शकत नाही अशा अर्थाने विधान केलेले नाही , गैरसमज करून घेऊ नका , हे विधान करताना मी तुलनात्मक दृष्ट्या परदेशी जाण्याचे प्रमाण कोणा कडे जास्त आहे याचा विचार केला आहे.
नोकरीत बढती कधी मिळेल हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे . अशा प्रश्नाचे उत्तर देण्या आधी जातक काय करतो , कोठे नोकरीला आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे, काही नोकर्यां मध्ये प्रमोशन ची शक्यता अगदी कमी असते. शाळा मास्तर, पोष्टमन यांना ‘प्रमोशन मिळण्याची शक्यता कितपत असते ? त्यांच्या पूर्ण नोकरीच्या कालावधीत अशी किती प्रमोशन्स मिळू शकतात? त्यांच्या साठी फारतर ‘बदली होईल का ‘ हा प्रश्न योग्य असू शकतो.
आजकाल बर्याच कंपन्यां मधून अगदी आय टी कंपन्यां मधून फ्लॅट हायरार्की वापरली जाते म्हणजे ज्युनियर ते सीनियर मोष्ट ही उतरंड आता एकदम पातळ झाली आहे , मधले टप्पे झपाट्याने कमी होत आहेत, म्हणजे मिडल लेव्हल मॅनेजमेंट हा प्रकार हद्दपार होताना दिसतोय. आय टी मध्ये पूर्वी ट्रेनी इंजिनियर – प्रोग्रॅमर – सीनियर प्रोग्रॅमर – युनिट लिडर – टीम लीडर – प्रोजेक्ट मॅनेजर – सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर – प्रोग्रॅम मॅनेजर – सीनियर प्रोग्रॅम मॅनेजर – प्रॅक्टीस हेड– व्हाइस प्रेसिडेंट असे डझनावारी टप्पे असायचे , प्रमोशन ची शक्यता असायची , पण आता हे सगळे गेले , ट्रेनी इंजिनियर नंतर एकदम प्रोजेक्ट मॅनेजर ते प्रॅक्टिस हेड असे तीनच टप्पे आहेत , प्रमोशन मिळणे दुरापास्त झाले आहे , हीच गत आता इतर क्षेत्रात पण आहे, क्लाऊड कॉम्प्युटींग / रोबोटीक सॉफ्टवेअर मुळे आता असिस्टंट मॅनेजर , मॅनेजर , सीनियर मॅनेजर अशा जागा हद्दपार झाल्या आहेत , गरजच नाही यांची! प्रमोशन चे काय घेऊन बसलात आता आहे ती नोकरी टिकवता आली तर जिंकले असे म्हणायची वेळ आली आहे .
या ‘अॅटोमेशन’ मुळे गलेलठ्ठ पगार घेत काहीच भरीव कामगिरी न करणार्या मॅनेजर्स ची गरजच पडत नाही, कशाला पोसायचे अशा लोकांना? अशा लोकांना ‘टॉप मॅनेजमेंट’ ची कामे करण्याचा वकूब नसतो आणि ग्रास रुट लेव्हलला ला जाऊन (हात काळे करत!) कामे करायला यांना आता जमत नाही (कमी पणाचे वाटते !) , अशा डोईजड झालेल्या प्रजेला मग ‘नारळ ‘ दिला जातो.
‘मला संतती होईल का ‘ प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी निदान त्या व्यक्तीचे लग्न तरी झाले आहे का हे बघायला नको? आणि समजा विवाह झालेला असला तरीही त्या व्यक्तीचे वय काय ते ही विचारात घेतले पाहिजे, रजोनिवृत्ती झालेल्या विवाहितेस संतती होण्याची शक्यता किती असेल? चाळीशीतल्या व्यक्तीला ‘पक्की सरकारी नोकरी’ लागण्याची शक्यता काय असेल?
तेव्हा जेव्हा जातक प्रश्न विचारतो तेव्हा प्रथम तो प्रश्न जातकाला सुसंगत आहे का ते तपासावे, इथे जातक कसा दिसतो, बोलतो, काय कपडे घातले आहेत, ह्या वरून बरेच क्लूज मिळू शकतात पण काही वेळा फसगत पण होऊ शकते ! फाटकी , गबाळी दिसणारी व्यक्ती लक्षाधीश असू शकते ! तेव्हा जातकाला प्रश्न विचारून मगच काय ते अनुमान काढा.
‘सुसंगत’ Appropriate’ हा एक मुद्दा आपण तपासला , तसाच A ( Attitude) ‘जातकाचा हेतू’ हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे.
ज्योतिषशास्त्र हे दैवी , गूढ , अगम्य आणि परामानस शास्त्राच्या सीमारेषेवरचे शास्त्र आहे, याला काहीशी आध्यात्मिक डूब आहे, कोठेतरी दिव्यत्वाचा स्पर्श आहे. हे शास्त्र अनुभूतीचे आहे. विज्ञानाच्या आकलन शक्ती बाहेरचे काही तरी या शास्त्रात आहे जे मी माझ्या स्वानुभवावरून सांगतो. मनात प्रश्न उभा राहणे , त्याची तिव्रता / तगमग तीव्रता वाढणे, त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणारी व्यक्ती वेळीच भेटणे हे सगळे नियतीच्या संकेतांचा एक भाग असावा असे प्रकर्षाने वाटते , तसे अनुभव मला हरघडी येतात. विज्ञानाच्या फूटपट्टीने हे मापता येणार नाही , प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवता येणार नाही कदाचित पण यात काही अगम्य आणि कल्पनातीत आहे अशी निदान माझी तरी खात्री पटली आहे.
या पातळी वरून विचार करता, प्रश्न विचारणार्याचा या शास्त्रावर विश्वास असणे म्हणूनच आवश्यक असते. ज्याचा या शास्त्रावर , ज्योतिषावर विश्वास असेल त्यालाच मदत करावी. ज्योतिषाची वा ज्योतिषशास्त्राची चेष्टा करण्याच्या / टवाळकी करण्याच्या हेतूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरें देऊ नयेत. येणार्या प्रत्येक जातकाचा पूर्ण अभ्यास करून मगच प्रश्न स्वीकारावा. जातकाचे बोलणे, पेहेराव, देहबोली यावरून जातका बद्दल अंदाज बांधता येतात, शिवाय जातकाचा आपला प्रथम संपर्क झाला त्यावेळची ‘समय कुंडली’ पण या बाबतीत चांगले मार्गदर्शन करतेच. याचा वापर करून निर्णय घ्यावा.
जातकाला मुद्दाम वेडेवाकडे, ऊलट – सुलट प्रश्न विचारुन जातकाचा मूळ हेतू काय आहे हे तपासता येते. सत्य हे कायम सत्यच असते खोटे फार काळ टिकत नाही. जरा जरी शंका आली की थांबा, वाटल्यास जातकाला काहीतरी कारण सांगून नंतर यायला सुचवा. ही मात्रा चांगली लागू पडते.
लेखाच्या पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करू
क्रमश:
शुभं भवतु
Ekadam ‘goodh’ aani ekdam ‘good’. Thanks
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले