शाईची बाटली !
गेल्याच महिन्यातली गोष्ट, नुकतीच ‘शेफर’ च्या शाईची नवी बाटली उघडली होती, फक्त एकदाच काय ते त्यातून शाई भरली होती. असेच लिहीता लिहीता पेनातली शाई संपली आणि शाई भरायला घेतली. नेहमी सारखी ‘शेफर’ ची ही शाईची बाटली कॅप उघडून वॉशबेसिन च्या काठावर ठेवली आणि पेन च्या बॅरेलची एंड कॅप काढली, आता पेनाचे निब शाईच्या बाटलीत बुडवणात तोच काय झाले कोणास ठाऊक, ही उघडी शाईची बाटली घसरली आणि चक्क वॉशबेसिन मध्ये उपडी झाली, क्षणार्धात सर्व शाई खळखळत वाहून गेली! रु 370 ची शाई चक्क माझ्या डोळ्या देखत वाहून गेली, एक थेंब भर सुद्धा शाई बाटलीत उरली नाही, मला काही करायची उसंत सुद्धा मिळाली नाही.
रु 370 असे पाण्यात (नव्हे वॉशबेसिन मध्ये ) गेलेले पाहून क्षणभर वाईट जरुर वाटले,पण तेव्हढ्यापुरतेच. शांतपणे साफसफाई केली, रिकामी बाटली बाजूला ठेवली,काही झाले तरी शेफरची बाटली आहे, ईतली देखणी,घाटदार वस्तू टाकायचे जिवावर येते.
असेच दोन तीन दिवस गेले असतील नसतील, दुसर्या एका पेनामध्ये शाई भरताना या शेफरच्या बाटली कडे लक्ष गेले, मनात आले चला लक्षात आलेच आहे तर ही बाटली जरा धूवून तरी ठेवावी म्हणून बाटली हातात घेतली, कॅप उघडली , बाजूला ठेवली आणि बाटली धुण्यासाठी वॉशबेसिनचा नळ चालू करणार ईतक्यात ही कॅप घसरुन वॉशबेसिन मध्ये पडली , अगदि जशी दोन दिवसां पूर्वी बाटली पडली होती तसेच! मी ती कॅप उचलली आणि का कोणास ठाऊक अगदि सहज मी कॅपच्या आत बघितले, आणि पाहतो तो काय आश्चर्य, मला त्या कॅप च्या आतल्या भागात हे चिन्ह दिसले !
अगदि पावलाच्या ठश्या सारखा हा आकार तिथे कसा आला असावा?
कारण बाटली जेव्हा वॉशबेसिन मध्ये उपडी झाली तेव्हा तिची कॅप मी आधिच काढून जराशी बाजूला कोरड्या ठीकाणी ठेवली होती. वाहणार्या शाईचा या कॅपला कोणत्याही प्रकारे स्पर्श झाला असण्याची अजिबात शक्यता नव्हती! हा आकार आधिच म्हणजे बाटलीत शाई होती तेव्हापासूनचा असणार पण तो दिसला मात्र आजच आणि तोही अशा अपघाताने !
चमत्कार ?
शकुन ?
मी श्रद्धाळू (काहींच्या मते अंधश्रद्धाळू !) असल्याने मला हे माता श्री महालक्ष्मी चे पदचिन्ह वाटले. अगदि पूजा आदि काही केली नाही तरी मनोमन नमस्कार केला व हे पदचिन्ह एक शुभशकुन मानून जपून ठेवले.
हे लक्ष्मीचे पाऊल ठरले हे मात्र खरेच कारण त्या प्रसंगापासून लक्ष्मीचा ओघ जो मध्यंतरी अड्खळलेला होता तो चालू झाला तो आजतागायक चालूच आहे खंड असा नाहीच! त्यातही ज्याची कल्पनाही केली नव्हती , अपेक्षाही धरली नव्हती अशा अनपेक्षित मार्गांनी लक्ष्मी घरात येत आहे !
