जातक एका व्यक्ती कडून जुना (वापरलेला) लॅपटॉप कॉम्प्युटर खरेदी करण्याच्या विचारात होता.
असा लॅपटॉप नवा घ्यायचा तर जवळपास ५०,००० रुपये मोजावे लागत असल्याने काहीसा स्वस्तात मिळत असलेल्या या लॅपटॉप ने जातकाला भुरळ घातली.
जातकाचा प्रश्न होता “हा लॅपटॉप मी खरेदी करावा का? “
त्या वेळी जातकाशी झालेली माझी प्रश्नोत्तरें अशी होती:
“तुम्हाला आवडला असेल , बजेट मध्ये बसत असेल तर घेऊन टाका , अडचण काय आहे ?”
“अडचण अशी की अशी वापरलेली वस्तू खरेदी केली आणि ती खराब निघाली तर काय ?’
“वस्तू घेतानाच व्यवस्थित तपासून घ्यायची “
“ते तर मी केले आहेच पण ३०,००० रुपयांची गुंतवणुक आहे तेव्हा जरा धाकधूक वाटणारच ना?’
“कोणतीही जुनी वस्तू विकत घेताना ती वस्तू खराब निघण्याचा धोका असतोच, असा धोका पत्करायची तयारी असेल तरच या फंदात पडायचे “
“पण असा धोका पत्करायच्या आधी ज्योतिषशास्त्रा द्वारे आपल्याला या बद्दल काही मार्गदर्शन मिळू शकेल का ते पाहात होतो”
“हरकत नाही, आपण प्रयत्न करू”
आता हे असले प्रश्न सोडवायला जन्मकुंडलीचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे मी प्रश्नकुंडलीचा वापर करायचा ठरवले.
जेव्हा जेव्हा एखादा जातक माझ्याशी संपर्क साधातो (फोन, ईमेल , व्हॉट्स अॅप, प्रत्यक्ष भेट) तेव्हा मी त्या संपर्क – क्षणाचा एक ‘कन्सलटेशन चार्ट ‘ वेस्टर्न पद्धतीचा तयार करतो. हा चार्ट मला जातका बद्दल , त्याच्या प्रश्ना बद्दल, जातक ज्या परिस्थितीत आहे त्या बद्दल, प्रश्ना संदर्भातल्या पार्श्वभूमी बद्दल बरीच माहिती देत असतो. आत्ता ही ह्या जातकाने जेव्हा (फोन द्वारे) संपर्क साधला त्या क्षणाचा कन्सलटेशन चार्ट माझ्या समोर होता, तो चार्ट मला कमालीचा रॅडीकल वाटला , शिवाय या प्रश्ना साठी ‘हो / नाही’ इतकेच उत्तर देणे अपेक्षित होते, कोणता कालनिर्णय करायचा नसल्याने , हाच ‘कन्सलटेशन चार्ट ‘ मी प्रश्न सोडवायला वापरायचे ठरवले.
‘कन्सलटेशन चार्ट ‘ शेजारी छापला आहे.
या चार्टचा डेटा:
दिनांक: २१ नोव्हेंबर २०१६
वेळ: १२:४७:१४ दुपार
स्थळ: गंगापूर रोड , नाशिक
प्लॅसीडस , सायन , ट्रू नोडस
सायन पद्धतीच्या प्रश्नकुंडली चे पाश्चात्त्य होरारी तंत्राने अॅनॅलायसीस करायचे आहे.
या पद्धतीच्या अॅनॅलायसीस मध्ये काही प्रारंभिक तपास करावा लागतो त्यात जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि वस्तूचे प्रतिनिधी ठरवावे लागतात.
पत्रिकेत लग्न बिंदू २६ कुंभ ५८ असा आहे, याला ‘लेट असेंडंट ‘ मानता येईल. याचा एक अर्थ असा होतो की प्रश्ना संदर्भात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, जातक आता या प्रश्ना संदर्भात फारसे काही करु शकत नाही. जे जे होईल ते पाहणे इतकेच काय ते जातकाच्या हातात आहे. इथे प्रश्न ‘जुना लॅपटॉप खरेदी करू का?’ असा असल्याने याचा अन्वयार्थ असा होतो की जातकाने खरेदी करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.
चंद्र सिंहेत २८ अंशावर आहे. सिंह रास ओलांडे पर्यंत चंद्र, रवी शी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही.
[जेव्हा चंद्र व्हाईड ऑफ कोर्स असतो. याचा अर्थ जातकाच्या निर्णय क्षमता प्रदूषित / गढूळ झाली आहे , प्रश्ना संदर्भात साधक बाधक निर्णय घेणे जातकाला जमेलच असे नाही, किंवा या प्रश्ना बाबतीत जातक काहीसा हतबल आहे.]
पत्रिकेत शनी दशम भावात आहे. त्यामुळे शनी प्रथम / सप्तम भावात असताना जो खास विचार करावा लागतो तो इथे करावा लागणार नाही.
आता आपण प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि वस्तूचे प्रतिनिधी ठरवू.
प्रश्नकर्ता नेहमीच लग्न (१) भावावरुन पाहतात तर प्रश्नकर्ता एका तिर्हाईत व्यक्तीशी विक्रेत्याशी व्यवहार करणार असल्याने अशी व्यक्ती सप्तम (७) स्थाना वरुन पाहतात.
जन्मलग्न २६ कुंभ ५८ असल्याने कुंभेचा स्वामी शनी जातकाचे प्रतिनिधित्व करेल. नेपच्यून लग्नात असल्याने तो ही जातकाचे प्रतिनिधित्व करेल पण युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा ‘प्रतिनिधी’ म्हणून वापर तारतम्यानेच करावा अशा मताचा असल्याने मी या नेपच्यून ला जातकाचा प्रतिनिधी म्हणून मानले नाही. चंद्र हा नेहमीच जातकाचा (प्रश्नकर्त्याचा) नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो.
शनी आणि चंद्र हे जातकाचे प्रतिनिधी आहेत.
जातक ज्या व्यक्ती कडून लॅपटॉप खरेदी करणार आहे ती व्यक्ती सप्तम (७) स्थानावरुन पाहावयाची. सप्तम स्थान २६ सिंह ५८ असे आहे , सिंहेचा स्वामी रवी विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. चंद्र सप्तमात आहे पण चंद्र नेहमीच जातकाचा (प्रश्नकर्त्याचा) नैसर्गिक प्रतिनिधी मानला जात असल्याने त्याला विक्रेत्याचे प्रतिनिधित्व मिळणार नाही. राहू पण सप्तमातच आहे पण पाश्चात्त्य होरारी मध्ये राहू / केतू ला प्रतिनिधत्व देत नसल्याने राहू चा विचार करायला नको.
रवी विक्रेत्याचा प्रतिनिधी आहे.
लॅपटॉप सध्या विक्रेत्याच्या मालकीची वस्तू आहे , विक्रेता सप्तम (७) स्थानावरून पाहतात आणि त्याच्या मालकीच्या वस्तू या त्याच्या द्वितीय स्थानावरून पाहतात, इथे सप्तमाचे द्वितीय स्थान म्हणजे अष्टम (८) स्थान. या अष्टम स्थानाचा स्वामी आणि अष्टमात असलेले ग्रह मिळून या ‘लॅपटॉप’ चे प्रतिनिधित्व करतील. अष्टमावर शुक्राची तूळ रास आहे, अष्टमात गुरु आहे.
गुरु आणि शुक्र हे लॅपटॉप चे प्रतिनिधित्व करतील.
हा खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याने पैशाचा संबंध आलाच.
जातक लग्न स्थाना पासून म्हणून द्वितीय (२) हे जातकाचे पैशाचे स्थान आहे. या स्थानावर मेष राशी आहे, मेषेचा स्वामी मंगळ जातकाच्या पैशाचे प्रतिनिधित्व करेल. युरेनस पण द्वितीय स्थानातच आहे पण त्याला प्रतिनिधत्व द्यायची आवश्यकता नाही.
मंगळ जातकाच्या पैशाचा प्रतिनिधी.
विक्रेता सप्तम (७) स्थानावरून , त्याचे द्वितीय स्थान म्हणजे अष्टम (८) स्थान विक्रेत्याचा पैसा दाखवेल.
अष्टमावर शुक्राची तूळ रास असल्याने शुक्र विक्रेत्याचा पैसा दाखवेल , गुरु पण अष्टमातच असल्याने गुरू ही विक्रेत्याच्या पैशाचे प्रतिनिधित्व करणार.
शुक्र आणि गुरु दोघेही विक्रेत्याचा पैसा दाखवतील.
प्रश्ना संदर्भातल्या सर्व खेळाडूंचे प्रतिनिधित्व निश्चित केल्या नंतर आपण या पत्रिकेचा अभ्यास करू.
जन्मलग्न हे ‘लेट असेंडंट ‘ असल्याने ‘जातकाने खरेदी करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.’ असा एक प्राथमिक तर्क आपण केला आहे.
आपल्या या तर्कांना पुष्टी मिळते ती चंद्राची सप्तम स्थानातली उपस्थिती. सप्तम (७) हे विक्रेत्याचे असते, चंद्र हा प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असल्याने तो विक्रेत्याच्या स्थानात असणे म्हणजे जातक विक्रेत्याच्या कह्यात (ताब्यात ) गेला आहे, विक्रेत्यावर , त्याचा बोलण्यावर आणि तो विकत असलेल्या वस्तू बाबत जातक हुरळून गेला आहे.
हा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे , आणि जातकाच्या पैशाचा प्रतिनिधी व्यय (१२) स्थानात आहे , म्हणजेच जातकाचा पैसा खर्च होणार आहे. जातक हा लॅपटॉप खरेदी करणार असे दिसते.
युरेनस पण द्वितीय स्थानात आहे याचा अर्थ जातकाचा खर्च ( लॅपटॉप खरेदी ) हा उतावळे पणाने (impulse) केलेला खर्च असेल.
गुरु आणि शुक्रा सारखे शुभ ग्रह विक्रेत्याचा पैसा दाखवत आहेत आणि गुरु विक्रेत्याच्या धन स्थानातच असल्याने गुरु विक्रेत्याच्या पैशाची वृद्धी करणार आहे. विक्रेत्याचा पैशाचा प्रतिनिधी गुरु आणि प्लुटो यांच्यात सध्या असलेला अंशात्मक केंद्र योग पण याला पुष्टी देत आहे . सामान्यता गुरु – प्लुटो योग पैशाची आवक दाखवतात. तसेच जातकाचा प्रतिनिधी शनी आणि विक्रेत्याचा पैसा यांच्यात अगदी लौकर लाभ योग होणार आहे .
या सर्व अॅनालायसिस वरून असे दिसते की जातक हा लॅपटॉप खरेदी करणार आहे.
आता हा व्यवहार व्हायचा असेल तर जातकाचा प्रतिनिधी (चंद्र , शनी ) आणि विक्रेत्याचा प्रतिनिधी (रवी) यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा.
चंद्र प्रश्नकर्त्याचे प्रातिनिधीत्व आणि रवी विक्रेत्याचा प्रतिनिधी आहे. या दोघांत अवघ्या १ अंशात केंद्र योग होणार आहे. आपण आधी बघितले त्या नुसार जातकाचा प्रतिनिधी शनी आणि विक्रेत्याचा पैसा यांच्यात अगदी लौकर लाभ योग होणार आहे .हा योग ही पूर्ण व्हायला अवघा १ अंश बाकी आहे! हा योगायोग नाही !
म्हणजे जातक अगदी नजिकच्या काळात , एका आठवड्यात , हा लॅपटॉप खरेदी करणारच.
हा लॅपटॉप खरेदी करायचाच असे जातकाने ठरवलेले असताना मग “हा लॅपटॉप मी विकत घेऊ का?” हा प्रश्न मुळात विचारलाच का? याचे कारण म्हणजे जातकाच्या मनात कोठेतरी धाकधूक आहे की हा लॅपटॉप चांगला असेल का? कोठे फसवणूक होणार नाही ना?
नेपच्यून ची लग्नातली उपस्थिती जातकाच्या मनातला हा संदेह अगदी व्यवस्थित दाखवत आहे.
आता आपण जातकाची ही शंका कितपत सत्यात उतरेल हे पाहू.
गुरु लॅपटॉप चा प्रतिनिधी लाभातल्या प्लुटो शी अंशात्मक केंद्र योगात आहे आणि लॅपटॉप चा दुसरा प्रतिनिधी शुक्र लाभात आहे आणि लौकरच तो लाभातल्या प्लुटो शी युती करणार आहे. लॅपटॉप अष्टमा स्थाना वरून पाहात आहोत , कोणत्याही गोष्टीची अखेर ही त्याच्या चतुर्थ स्थाना वरुन पाहतात, अष्टमाचे चतुर्थ म्हणजे लाभ (११) स्थान, शुक्र हा लॅपटॉप चा एक प्रतिनिधी लाभातच आहे! ह्या शुक्राचे आणि लॅपटॉप च्या दुसर्या प्रतिनिधी गुरुचे लाभातल्या (११) प्लुटोशी होणारे योग सांगत आहेत की या लॅपटॉप मध्ये बिघाड आहे किंवा खरेदी नंतर अगदी लगेचच त्यात बिघाड उत्पन्न होणार आहे. तेव्हा लॅपटॉप खरेदी करणे धोक्याचे आहे.
रवी सारखा ग्रह विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने विक्रेता फसवत नसावा कदाचित तो विकत असलेल्या लॅपटॉप मध्ये बिघाड आहे ही बाब त्याला माहीतीही नसेल. पण काहीही असले तरी हा लॅपटॉप खरेदी करण्यात धोका असण्याची शक्यता मोठी आहे, असे अनुमान या पत्रिकेच्या अभ्यासातुन निघते.
या लॅपटॉप मध्ये बिघाड आहे / होण्याची शक्यता आहे तेव्हा हा लॅपटॉप शक्यतो खरेदी करू नका, आणि खरेदी करणार असला तर पूर्ण तपासून घ्या. असा सल्ला मी जातकाला दिला.
पडताळा:
मी दिलेला सल्ला न जुमानता जातकाने तो लॅपटॉप खरेदी केला आणि आपण अंदाज केला तसेच झाले अवघ्या महीन्याभरात ह्या लॅपटॉप मध्ये एका पाठोपाठ एक असे मोठे बिघाड निर्माण झाले. विक्रेत्याने अर्थातच अंग झटकले , त्या लॅपटॉप च्या दुरुस्तीला जातकाला इतका खर्च आला की त्या पेक्षा सरळ नवाच लॅपटॉप घेतला असता तर फार बरे झाले असते असे जातकाला वाटले.
शुभं भवतु
सुटसुटीत आणि समजण्यास सोपी अशी केस स्टडी आहे, ही वाचून वेस्टर्न astrology शिकण्याची फार इच्छा आहे, ह्या संदर्भातील काही नवीन अभ्यासकांना समजतील अश्या काही पुस्तकांचा संदर्भ द्यावा
संतोष सुसवीरकर
धन्यवाद श्री संतोषजी
पाश्चात्य होरारीवर :
1) Simplified Horary Astrology by Ivy M Goldstein-Jacobson
2) Handbook of Horary Astrology by Karen Zondag
3) Text book of Horary Astrology by John Frwaley
ही तीन पुस्तके चांगली आहे .
शुभेच्छा
सुहास गोखले
Kharach vinash kale viprit buddhi
Very good case study.
Awaiting your classes. Not received any communication further.
धन्यवाद श्री आनंदजी क्लास बाबत मी आपल्याला कळवतो …… सुहास गोखले
Curious to read for knowledge
धन्यवाद श्री श्रीकृष्णजी
ब्लॉग वर सुमारे 375 लेख आहेत जसा वेळ होईल तसे वाचून आपला अभिप्राय कळवावा ही विनंती
सुहास गोखले