शंका समाधान

श्री xxxxxxजी,

आपल्या भावना मी समजू शकतो पण आपल्या जन्मकुंडलीचा अभ्यासातून जे काही दिसले ते मी आपल्याला सांगीतले, त्यात कोणतेही ‘शुगरकोटींग’ नाही , कारण केवळ आपल्याला बरे वाटावे म्हणून जर असे काही केले तर ती शास्त्राशी प्रतारणा ठरेल आणि अशा गोष्टीं माझ्या हातून कदापि शक्य होणार नाहीत.

आपल्या भविष्यात चांगले किंवा आपल्या मनात जे आहे तेच धडावे अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते, तशी ती असणे ही गैर नाही, प्रतिकूल भाकिते स्बीकारणे , पचवणे त्यामुळेच बर्‍याच जणांना काहीसे अवघड जाते असा माझा अनुभव आहे.

आपल्याकडे जे नाही त्याची खंत बाळगून , कुढत बसण्यापेक्षा आपल्यापाशी जे आहे त्याचा जास्तीत जास्त चांगल्या तर्‍हेने आनंद कसा घेता येईल हया गोष्टी कडे लक्ष देऊन पहावे असे मी सुचवतो.

ज्योतिषशास्त्र आपल्याला आपले सामर्थ्य ,उणीवां कोणत्या आहेत, आपल्यापुढे प्रगतिच्या कोणत्या संधी आहेत आणि भविष्यात आपल्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याचे मार्गदर्शन करते. त्यायोगे आपण आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देऊन वेळ, पैसा व ताकत यांचा सुयोग्य वापर करु शकतो. अपेक्षां किती, केव्हा व कुठे ठेवायच्या याचा अंदाज आल्याने वारंवार होणारे अपेक्षाभंग कमी होतात आणि जे होतात त्यांचे आघात काहीसे सौम्य होतात.

ज्योतिषशास्त्र हे दिशादर्शक शास्त्र असल्याने ते तुमच्या समस्यां वा अ‍डचणीं एखादी जादू केल्या सारख़े दूर करु शकत नाही. हे शास्त्र तुमचे नशिब बदलू शकत नाही. काही समस्यां वा अ‍डचणीं या न सूटणार्‍या स्वरुपाच्या असतात त्या आहे तशा स्विकारणे एव्हढाच पर्याय आपल्या हातात असतो, काही समस्यांना केवळ ‘काळ आणि विस्मृती’ हाच एक उपाय असतो, मात्र काही समस्या प्रयत्नांच्या जोरावर ,प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर सोडवता येतात. आपल्या पुढ्यातली समस्या या तीन पैकी कोणत्या गटात मोडते याचे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र निश्चीतपणे करु शकते आणि तुमच्या बाबतीतही ते तसे केलेले आहे.

नकारात्मक गोष्टींचाही सकारत्मक उपयोग करुन घेता येतो. माझ्या माहीतीतील एका महिलेला प्रकृतीतल्या दोषांमुळे विवाह करता येणार नाही असे ऐन पंचविशीतच कळून चुकले होते, केव्ह्ढा मोठा आघात त्यांच्या वर झाला असेल, पण त्यामुळे खचुन न जाता त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य शास्त्रीय संशोधन व समाजसेवेत व्यतीत केले, लग्न नाही,संसार नाही, जबाबदार्‍या नाहीत ना कोणतेही पाश या गोष्टी हाती घेतलेल्या कार्याला पोषकच ठरल्या , त्याचा त्यांनी चांगला उपयोग करुन घेतला आणि त्या यशस्वी ठरल्या, नावलौकीक मिळवून एक कृतार्थ जीवन जगल्या.

माझ्या कडे मार्गदर्शना साठी येणार्‍यांच्या एका पेक्षा एक, कल्पनेच्या बाहेरच्या समस्या बघितल्या तर आपण फार सुखी आहात असे मला वाटते, आपली नोकरी शाबूत आहे, दोन वेळ्चे पोटभर जेवण मिळण्या एव्हढे उत्पन्न आहे, चांगली व उज्ज्वल भवितव्य असलेली संतती आहे, आणखी काय हवे, आपण फार सुख़ी आहात असे मी म्हणेन. चांगले बूट चप्पल नाहीत म्हणून आपण कुरकर करतो मग ज्याला पायच नाहीत त्याने काय करायचे?

तेव्हा माझी आपल्याला एकच विनंती आहे ती अशी की मनातले हे नैराश्य दूर लोटून द्या. सफरचंद हवे असताना हाती लिंबू का आले याची खंत न बाळ्गता , ह्याच लिंबाचे छानसे सरबत करुन त्याचा आस्वाद कसा घेता येईल असा विचार करायचा.

मला माहिती आहे हे सांग़ायला फार सोपे आहे पण प्रत्यक्षात अंमलात आणणे कर्मकठीण आहे, पण निदान त्या दिशेने प्रयत्न तरी करुन बघायला काय हरकत आहे?

शुभं भवतु

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *