(ही कथा मी 2006 साली ‘मनोगत’ या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली होती, माझ्या ब्लॉगच्या वाचकांच्या सोयी साठी पुन्हा एकदा उपलब्ध करुन देत आहे. ही कथा 1960 च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत आहे. मला ज्या व्यक्ती कडून हा प्रसंग कळला ती त्या वेळी त्याच महाविद्यालयात नोकरीला होती. )
असेच एक आटपाट गाव होते. गाव तसे लहान, अगदी तालुक्याच्या दर्जाचे देखिल नसेल, पण अशा गावात देखिल एक महाविद्यालय होते, अर्थात यथातथाच हे वेगळे सांगायला नकोच. महाविद्यालयात कला आणि वाणिज्य शाखां असल्यामुळे दोन अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते:
प्रा. खडपे आणि प्रा. सि.जी.कुलकर्णी.
प्रा.सि.जी.कुलकर्णींना सगळे ‘सिजीके’ म्हणत, प्रा. खडपे मात्र ‘प्रा. खडपे’ च होते.
सिजीकेंचे वर्णन काय करायचे , जसे ‘आटपाट गाव’ असते तसेच हे ‘आटपाट कुलकर्णी ‘ होते, तसे ते मुळचे पुण्याचे पण ह्या आंवंढ्या गावात खितपत पडले आहेत असे त्यांचे मत होते! कपाळभर आठ्या घालत , चिडत, चर्फ़डत त्यांचे एकच पालुपद ‘मी किती हुषार, विद्वान, व्यासंगी , ख्ररे तर मी नियोजन मंडळाचा अध्यक्ष व्हायच्या योग्यतेचा पण.. मला संधीच मिळाली नाही आणि ह्या अडाणी गावातल्या ह्या दळभद्री महाविद्यालयात, सातवी पास व्हायची सुद्धा लायकी नसलेल्या पोरांसमोर रोज तेच तेच दळण दळावे लागते.. छे मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोहोचलो असतो..’
प्रा.खडपे, एक साधीसुधी व्यक्ती, मुळचे त्याच गावातले, लहानसे घर, छोटासा कोरडवाहु जमिनीचा तुकडा आणि ही महाविद्यालयातली नोकरी, बस्स खडपे ह्यातच सुखी समाधानी होते. खडपे त्यांच्या आख्या घराण्यात शाळेत गेलेले पहिले, आपण चार बुके शिकलो, बी.ए., एम. ए झालो ह्याचेच त्यांना केव्हढे अप्रुप, त्यामुळेच असेल कदाचित पण खडपे कामात मात्र चोख होते ! पुढ्यात आलेले काम मन लावुन करायचे,आपल्या परीने ते जास्तीतजास्त निर्दोष, सुबक होईल असे बघायचे. एव्हढे शिकले, महाविद्यालयात प्राध्यापकी करत असले तरी त्यांची काळ्या आईशी नाळ तुटली नव्हती, बांधा वरचा गणप्या अजुनही त्यांचा मित्रच होता.
सिजीकेंशी ही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, ‘छे मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोचलो असतो..’ हे सिजीकेंचे पालुपद सिजीकें च्या बायको नंतर सर्वात जास्त वेळा खडपेंच्याच कानांवर तर आदळायचे , मौज वाटायची पण खडपे काही बोलायचे नाहीत.
असेच एके दिवशी, सिजीके त्यांची तासिका संपवुन म्हणजे त्यांच्याच भाषेत बोलायचे तर ‘दळण दळुन’ नुकतेच कुठे विसावले तोच प्राचार्यांचे बोलावणे आले, कपाळावरच्या आठ्या आणखी वाढवत आणि अर्थातच चर्फ़डत सिजीके प्राचार्यांच्या कक्षात पोचले.
“हे पहा सिजीके, आपल्या विद्यापीठा कडुन एक पत्र आले आहे, डॉ. स्वामीनाथन – अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग” – प्राचार्य म्हणाले.
सिजीके त्रासले, मनात म्हणाले “आता आणि कसले नवे भोग भोगायचे..?”
“डॉ. स्वामीनाथनना एका संशोधनासाठी आपली मदत हवी आहे. ‘सहकार चळवळीचा ग्रामीण समाजरचने वर परिणाम ..’ असा काहीसा विषय आहे. त्यासाठी आपल्या भागात पाहणी करुन एक अहवाल पाठवुन द्यायचा आहे, अहवाल किमान ५० मुलाखतीं वर आधारित असावा व त्यासाठी एक प्रश्नावली पण पाठवली आहे. प्रत्येक मुलाखती साठी १० रु व अहवाला साठी १०० रु मानधन दिले जाणार आहे”
प्राचार्यांनी डॉ. स्वामीनाथन कडुन आलेले ते पत्र सिजीकें च्या हातात दिले, काहीश्या नव्हे तर भरपुरच अनिच्छेने सिजीकें नी ते वाचले आणि प्राचार्यांना अपेक्षित होते तेच झाले..सिजीके उसळले, ताडताड तोंडाचा पट्टा सुरु झाला..
” कसले डोंबलाचे संशोधन! आम्ही इथे मरमर राबुन शिकवतो, त्यातच सगळा दिवस संपतो, त्यातुन जरा सुटका होते ते न होते तो हे काम बोकांडी मारताहेत, आणि काम तरी कसले तर म्हणे गलिच्छ वस्तांतुन हिंडायचे आणि त्या अडाण्यांच्या विनवण्यां करुन माहीती गोळा करायची”
“पण त्याचा मोबदला मिळणार आहे” – प्राचार्य
“मोबदला? फ़ॉर्मला १० रुपड्या हा काय मोबदला म्हणायचा? आमच्यापुढे हे असे चणे-फ़ुटाणे फ़ेकुन , हे राजश्री, तिथे विद्यापीठातल्या वातानुकुलित दालनात बसुन आम्ही पुरवलेल्याच माहितीवरुन झ्याकीत निष्कर्ष काढणार, पुरस्कार लाटणार, अनुदानें उकळणार, अरे वारे वा!”
“विद्यापीठाचे काम आहे, काहीतरी विचार करुनच आपल्याकडे पाठवले असणार ना? ” – प्राचार्य
“बोडख्याचा विचार! ही प्रश्नावली तर पहा, संशोधनाचा विषय काय, रोख काय आणि प्रश्न काय विचारलेत, आहा हा. हे असले प्रश्न विचारुन कसले होणार संशोधन आणि काय निघणार निष्कर्ष? आणि काय हो, शेवटी ह्याचा काही उपयोग होणार आहे का? असे शेकडो संशोधन प्रकल्प झाले असतील आज वर, त्यांचे काय झाले? हा पण असाच धुळ खात पडणार ना?”
“म्हणजे हे काम करायची तुमची ईच्छा नाही तर, ठिक आहे , मी बघतो काय करायचे ते ” – प्राचार्य
“नाही, आता तुम्ही सक्ती करत असाल तर …” – सिजीके
“नको, सिजीके, आपण कष्ट नका घेऊ, मी दुसरी काही व्यवस्था करतो, तुम्ही जाऊ शकता” – प्राचार्य
सिजीके चर्फ़डत (आता दुप्पट!) , दाणदाण पाय आपटत परतले. तोंडाची टकळी चालुच..
” माहीती आहे, हा स्वामीनाथन, ह्याला साधा ‘एस वाय बी ए ‘ चा पेपर सेट करता येणार नाही आणि निघालाय मारे संशोधन करायला. अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग म्हणे , कसा पोचलाय तिथे ते माहीती आहे मला, सारा वशिल्याचा कारभार, पक्का लाळघोटु.. असले संशोधन करायला बुद्धीमत्ता लागते, व्यासंग लागतो, आता माझ्यात हे काय नाही का पण मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोहोचलो असतो..”
खडपे आपली तासीका संपवुन परत येत होते न होते तो सिजीकेंचे चिरपरिचित पालुपद त्याना ऐकायला मिळाले, खडपे मंदसे हसले.
“हसु नका खडपे..” सिजीके कडाडले. ” तो विद्यापीठातला येडचाप कसले काम घेऊन आलाय ते पाह्यलत तर तुम्ही ही असेच चिडाल ”
“खडपे सर , तुम्हास्नी , बोलीवलय..” – विठोबा शिपाई तो पर्यंत बोलवायला आलाच.
“खडपे, ह्याच साठी असणार बघा..” – सिजीके पुन्हा उचकले.
पण त्या कडे जरा दुर्लक्ष करत , खडपे तत्परतेने निघाले.
प्राचार्यांनी जो गोषवारा सांगीतला तो खडपेंनी शांतपणे समजाऊन घेतला. डॉ. स्वामीनाथन कडुन आलेले पत्र ही वाचले, प्रश्नावली नजरे खालुन घातली.
“सर , हे काम मी करतो , आपण काळजी करु नका” – खडपे हसतमुखाने , आश्वासक शब्दात म्हणाले.
“धन्यवाद खडपे, मला तुमच्या बद्द्ल खात्री होतीच, काम सुरु करा, काही मदत लागल्यास अवश्य सांगा” – प्राचार्य.
मुळात खडपेंना हे काम म्हणजे काही ब्याद, लचांड, ओझे असे वाटलेच नाही. नाही तरी रोज महाविद्यालय सुटल्या वर शेता कडे एक चक्कर असते , त्या वेळी चार -आठ जणांची भेट होत असतेच , तेव्हाच हे चार प्रश्न विचारुन टाकु, काम होऊन जाईल, त्यात काय.
प्रश्नावलीतली चुक सिजीकें प्रमाणेच खडप्यांच्याही लक्षात आली होती, पण खडपेंची कामाची पध्द्त सकारात्मक होती. खडपेंनी मुळ प्रश्नावलीच्या जोडीला संशोधनाच्या विषयाला सुसंगत अशी स्वतः ची एक पुरवणी प्रश्नावली तयार केली. महाविद्यालयाच्या टंकलेखका कडुन त्याच्या सुबक प्रतीं तयार करुन घेतल्या, ह्या कामीं प्राचार्यांची मदत घेतली.
आठ-पंधरा दिवसांत खडपेंच्या मुलाखतीं पुर्ण झाल्या. डॉ. स्वामीनाथन ना ५० मुलाखतीं अपेक्षित होत्या , खडपेंनी त्यापेक्षा जास्तच मुलाखतीं घेतल्या.डॉ. स्वामीनाथन कडुन आलेल्या तक्तयात माहीती भरुन झाली, चौकटीं भरुन झाल्या. सुचवलेल्या मुद्द्यांनुसार अहवाल ही तयार झाला. पण खडपें नी त्याही पलिकडे जाऊन आपल्या निरिक्षणांवर आधारीत स्वतःचे असे एक विस्तृत असे टिपण त्या अहवालाला जोडले.
अहवाल विद्यापीठा कडे रवाना झाला, नंतर सारे काही सामसुम. खडपेंचे पैसे यायला काही महिने लागले,अर्थात खडपेंना त्याचे काही वाटले नाही, विद्यापीठातल्या एका संशोधन प्रकल्पास आपला थोडा का होईना हातभार लागला ह्याचे त्यांना समाधान होते. सिजीकेंना मात्र खडपेंना चिमटें घ्यायला हा विषय काही दिवस पुरला.
एके दिवशी अचानक विद्यापीठातुन डॉ. स्वामीनाथन नी खडपेंना बोलवुन घेतले , अर्थातच खडपेंनी मागे केलेल्या कामा संदर्भातच हे बोलावणे होते. डॉ. स्वामीनाथन नी असेच पाहणी अहवाल विद्यापीठाच्या कक्षेतल्या सुमारे २५ महाविद्यालयां कडुन मागवले होते, त्यापैकी निम्म्याहुन कमी महाविद्यालयांनी ते पाठवायची तसदी सुद्धा घेतली नव्हती, आणि जे काही अहवाल आले होते ते , अर्धवट, चुकां-खाडाखोडींनी भरलेले होते. काहींनी तर प्रत्यक्ष मुलाखतीं न घेताच ‘घाऊक’ पद्धतीने माहीती भरली होती.
ह्या सर्वात फक्त खडपेंचा अहवाल ऊठुन दिसत होता. खडपेंनी सांगीतल्या पेक्षा जास्त काम तर केले होतेच शिवाय ते कमालीचे सुबक, निटनेटके, आखीव रेखीव असे होते. पण ह्या सर्वां वर कडी म्हणजे खडपेंनी जोडलेली पुरवणी प्रश्नावली व स्वतःचे असे टिपण!
असे नेमुन दिलेले काम वेळेत आणि मन लावुन काम करणारी माणसें आपल्या समाजात ईतकी दुर्मीळ आहेत की असे एखादे ‘खडपे’ आपोआपाच लक्ष वेधुन घेतात , नजरेत भरतात!
ईथेही असेच झाले , डॉ. स्वामीनाथन ना खडपेंचे काम बेहद पसंत पडले होते. त्यांनी खडपेंना त्या संशोधन प्रकल्पासाठी आणखी मदत मागीतली. खडपेंची ना नव्हतीच. आता खडपेंच्या विद्यापीठाच्या चकरां सुरू झाल्या.
सिजीके हे सारे बघत होते , त्यांची प्रतिक्रिया अर्थातच नेहमीचीच..
“हा , खडप्या बघा , एक अहवाल काय पाठवला त्याचे किती म्हणुन भांडवल करतोय ते! आता हा त्या विद्यापीठात जाऊन काय दिवे पाजळणार? संशोधनात मदत करणार म्हणे . अहो मदत कसली , हा तिथे जातोय ते फक्त लाळ घोटायला, मस्का मारायला. अरे ह्यांना कोणी तरी सांगा रे संशोधन कशाशी खातात ते. अशी डझनावारी संशोधने करु शकतो मी , ते सुद्धा एकट्याने , एकहाती , पण छे ..मला संधीच मिळत नाही , कुठल्या कुठे पोहोचलो असतो एव्हाना ”
डॉ. स्वामीनाथन चा संशोधन प्रकल्प पुर्ण झाला, त्याचे बरेच कौतुक ही झाले, खरेतर ह्या संपर्ण प्रकल्पात खडपेंचा सिंहाचा वाटा होता पण सर्व श्रेय डॉ. स्वामीनाथननी लाटले होते, नाही म्हणायला प्रकल्पाच्या श्रेयनामावलीत खडपेंचा अगदि ओझरता उल्लेख होता. ह्याचा खडपें पेक्षा सिजीकें नाच जास्त राग आला! त्यांनी खडपेंचे बौध्दीक घेतले.
“बघा खडपे, हे हे अस्से होते, मेहनत करे मुर्गा अंडा खाय फकिर! फिटली ना तुमची संशोधनाची हौस, तरी मी तुम्हाला सांगत होतो, तो टिकोजीराव तुम्हाला वापरुन घेणार आहे, पण नाही ऐकलत.. ह्यापुढे तरी शहाणे व्हा..”
“डॉ. स्वामीनाथननी मदत मागीतली , मी दिली , बस्स. प्रकल्पाच्या श्रेयनामावलीत ओझरता का होईना माझा उल्लेख त्यांना करावासा वाटला ह्यातच मला सर्व पावले. माझ्या मेहनतीच्या प्रमाणात मला श्रेय मिळाले नाही हे काहीसे खरे आहे पण माझे नुकसान नक्कीच झालेले नाही. ह्या सगळ्यातुन मला संशोधनाची रीत कळली, आपल्या ग्रामीण भागातल्या समस्यांवर वेगळ्या दिशेने विचार करता आला, ज्ञानात थोडी का होइना भर पडली , हे काय कमी आहे?” – खडपेंची संयमित प्रतिक्रिया आली.
विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. स्वामीनाथन च्या ह्या प्रकल्पाची दखल घेतली. लौकरच अनुदान मंडळाच्या सुचने नुसार डॉ. स्वामीनाथन नी काही छोटे-मोठे संशोधन प्रकल्प सुरु केले आणि आता त्यांना ह्या कामीं खडपें शिवाय दुसरे कोणीच चालणार नव्हते. खडपेंनी ही समरसुन काम केले. खडपेंचा अनुभव वाढत होता , त्यांचे एक दोन लहान शोधनिबंध ही प्रसिध्द झाले, हळुहळू खडपे त्या विषयातले तज्ञ मानले जाऊ लागले, आता त्यांना व्याख्याने, परिसंवादांची बोलावणी येवु लागली.
सिजीकेंचा जळफळाट आणखी वाढला – ” अरे, हा कसला तज्ञ, त्या डॉ. स्वामीनाथन पुढे गोंडा घोळतो आणि त्यांच्याच प्रबंधातले उतारे वाचुन दाखवतो. तज्ञाला स्वत:ची अक्कल लागते , ती कुठे आहे? व्यासंगाचा तर पत्ताही नाही , हां , आता हा तज्ञ असलाच तर तो लाळघोटण्यातला ”
एके दिवशी डॊ. स्वामीनाथन स्वत:च खडपेंना म्हणाले,
” प्रा. खडपे, तुम्ही केलेले काम एक नाही दोन पी.एच.डी. प्रबंधाच्या तोडीचे आहे, आता तेव्ह्ढी औपचारिकता पुर्ण करुन टाका, मी तुम्हाला मार्गदर्शक मिळवुन देतो “‘
प्रा. खडपे’ आता ‘डॉ. खडपे’ झाले ह्यावर सिजीकेंचा विश्वासच बसला नाही!
“डल्लामारु” अशा एका शब्दात सिजीकेंनी खडप्यांच्या पी.एच.डी. ची संभावना केली.
“अरे, अशीच जर पी.एच.डी. मिळवायची असती तर एक नाही दोन नाही दहा पी.एच.ड्यांची माळच लावली असती मी माझ्या नावापुढे.. पण काय करणार असले चौर्यकर्म बसत नाही ना आमच्या तत्वात..”
असाच काही काळ गेला, विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. स्वामीनाथनना दोन वर्षासाठी प्रतिनियुक्ती वर दिल्ली ला बोलवुन घेतले, जाताना त्यांनी आपला कार्यभार डॉ.खडपें कडे सोपवावा असे विद्यापीठाच्या कार्यकारिणीला सुचवले आणि ते मान्य ही केले गेले! डॉ.ख़डप्यां बद्द्ल सर्वांचे मत अनुकुल असेच होते.
डॉ. खडपे आता ‘प्रभारी अधिष्ठाता, अर्थशास्त्र विभाग’ झाले आणि सिजीकें वर बॉंबगोळाच पडला!
“हा खडप्या आणि अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग? बघा बघा ही लाळघोट्याची कमाल, अरे याची लायकी काय, त्याला कुठे नेवुन बसवताय. दुसरे कोणी नव्हते काय ? आता हा वशिलेबाज , बं भोलेनाथ नंदी बैल अर्थशास्त्र विभागाचे वाटोळे करुन ठेवणार दुसरे काय!”
डॉ. खडपेंनी कार्यभार स्विकारला , जोमाने काम सुरु केले. डॉ. खडपे विद्वत्तेत कदाचित डॉ. स्वामीनाथन पेक्षा कमी असतील पण त्यांच्या कामाची पद्धत, शिस्त, झपाटा हे सारे नि:संशय उजवे होते. अल्पावधीतच त्यांनी जम बसवला.
इकडे दोन वर्षासाठी म्हणुन गेलेले डॉ. स्वामीनाथन परत आलेच नाहीत , त्यांनी एका परदेशी वित्तसंस्थेची नोकरी पत्करुन राजीनामा दिला आणि डॉ.खडपेंना ‘प्रभारी अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग’ वरुन ‘अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग’ अशी पदोन्नती मिळाली.
“झाले आता हा खडप्या बसला कायमचा उरावर ! कालपर्यंत मला थोडीफार आशा होती की विद्यापीठाला आज ना उद्या आपली चुक उमजेल.. पण नाही .. आता बसा ह्या वशिल्याच्या तट्टाचे आदेश पाळत..” – सिजीकें कडुन दुसरी कोणती प्रतिक्रिया येणार?
डॉ. खडपे अजुनही वेळात वेळ काढुन गावा कडे चक्कर मारतात, आपल्या महाविद्यालयाला आवर्जुन भेट देतात, जुन्या मित्रांशी चार गप्पागोष्टी होतात, सिजीकें आता डॉ. खडपें शी फारसे बोलत नाहीत , फक्त मनातली जळफळ , च्रर्फडाट दाबायचा केवीलवाणा प्रयत्न करत कसेनुसे हसतात .. हा खडप्या बघता बघता इतक्या पुढे कसा काय गेला ह्याचेच त्यांना राहुन राहुन वैषम्य वाटते..
तासिकेची वेळ होते तसे ते सवयीने वॉशबेसीन पाशी जातात, तोंड धुतात, घसा साफ करतात आणि कपाळावर आणखी एक आठी वाढवत वर्गाकडे चालु लागतात, मान खाली घातल्या मुळे त्यांचा चेहरा जरी दिसत नसला तरी, त्यांच्या मनात काय चालु आहे ते मात्र लख्ख दिसत असते..
“अरे माझ्यात काय कमी आहे म्हणुन मी हा असा रखडतोय … छे , मला संधीच मिळत नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोहोचलो असतो..”
शुभं भवतु
सर कथा खूप आवडली. मन लावून काम करणारयावर आणि त्यातून कदाचित त्या व्यक्तीचा काही फायदा झाला किंवा कौतुक झाले तर त्या व्यक्तीवर जळणारे अनेक सीजीके पाहण्यात आले आहेत… dr. खडपेंसारखे कमीच…एक सकारात्म विचारसरणी असेल तर संधीच संधी…पण खरंच आपल्या मनात कुणी सिजीके दडलाय का हे ..संधी मिळाली तर यंव करीन आणि त्यांव करीन असं म्हणण्यापूर्वी नक्की तपासेन… असेच लिहित रहा.. . हार्दिक शुभेच्छा.