अगदी सकाळी सकाळीच, रमेश आणि त्याची बायको डॉक्टर देशपांड्यांच्या क्लिनीक मध्ये होते.
डॉक्टरांनी रमेशचा कान तपासला आणि म्हणाले..
“तुमच्या कानात माशी गेलेली नाही, काही नाही, एकदम स्वच्छ आहे कान”
“असे कसे, हा गुँ ss गुँ आवाज काय मी काढतोय का? माशी कानात खूप आत खोलवर असणार बघा, म्हणून दिसत नसेल”
“नाही, तसे काहीही दिसत नाही, आणि कानाचा पडदा फाडून पण ती गेलेली नाही, तसे असते तर दिसले असते ना? काही नाही, प्रवासात कानाला जास्त वारा लागल्याने रिंगींग होत असेल. टीनायटस (tinnitus) सारखे काही तरी असे वाटतेय. मी एक औषध लिहून देतो, ते कानात घाला वर कापसाचा बोळा ठेवा, थांबेल आवाज”
“आवाज थांबेल म्हणता मग त्या हालचालीचे काय?”
“कसली हालचाल?”
“अहो असे काय विचारतां, ती माशी आत मध्ये गोलगोल फिरतीय , इकडे तिकडे धडका देतेय ..”
“रमेश, सांगीतले ना तुम्हाला, तुमच्या कानात काहीही गेलेले नाही, हे ‘रिगींग’ सेनसेशन आहे, मी दिलेल्या औषधाने थांबेल ते”
“नक्की”
“ट्राय तर करा, नाही थांबला आवाज तर या पुन्हा संध्याकाळी, आणखी तपासण्या करु, पण मला वाटते त्याची आवश्यकता भासणार नाही, आवाज थांबेलच”
“ठीक आहे , बघु या औषधाने गुण येतो का…”
कानात औषध घालून सुद्धा आवाज थांबला नाहीच उलट तो आणखी जोरात सुरु झाला.
डॉक्टर देशपांड्यांना सुद्धा काही सुचेना..
“असे करा, तुम्ही डॉक्टर सरदेसायांना भेटा, ते कान-नाक-घसा तज्ञ आहेत, ई.एन.टी स्पेशॅलिस्ट. त्यांच्या कडे स्पेशल उपकरणे आहेत, तिथे पूर्ण तपासणी होईल आणि उपचार ही. मी डॉ. सरदेसायांशी फोन वर बोलतो, लगेचच भेटा त्यांना”
डॉक्टर सरदेसायांनी पण सगळ्या तपासण्या केल्या, एक्स – रे काढले, त्यांचेही असेच मत पडले की रमेशच्या कानात काहीही गेलेले नाही.
पण रमेशची तक्रार चालूच होती.. गुँ ss गुँ..
काही वेळ विचार करुन डॉक्टर सरदेसाई म्हणाले ..
“केस जरा कॉम्प्लिकेटेड दिसतेय , अशा अवघड केसेस हाताळणारे एकच डॉक्टर आपल्या शहरात आहेत, डॉ. कर्णीक, ते या विषयातले सिनियर मोष्ट डॉक्टर आहेत, तुमची वेळ चांगली बघा, डॉ. कर्णीकांची ओपीडी आज इथेच माझ्या हॉस्पीटल मध्येच असते, ते येतीलच एव्हढ्यात. त्यांच्याकडून तुमचा पक्का ईलाज होईल, अगदी खात्री बाळगा”
डॉ. कर्णिकांनी रमेशचा कान काळजीपूर्वक तपासला, सगळे जुने रिपोर्ट्स तपासले, आणि गंभीर चेहरा करुन म्हणाले…
“रमेश, यु आर राईट, अगदी बरोबर आहे, खरोखरच तुमच्या कानात माशी गेलेली आहे अगदी आत खोलवर गेलेली असल्याने दिसत नाही, पण माशी आहे, जिवंत आहे, बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे, ती आवाज, हालचाल करत असणारच, अगदी दुर्मिळ केस आहे ही, मी मागे एका मेडिकल जर्नल मध्ये ब्राझील मध्ये घडलेल्या अशाच एका केस बद्दल वाचले होते”
रमेश आपल्या बायको कडे विजयी मुद्रेने पाहात म्हणाला..
“बघ, पटले आता, कानात माशी आहे”
“आणि रमेश, तुम्ही झटपट हालचाली करुन वेळेत माझ्या कडे आलात म्हणुन बरे नाहीतर त्या माशी ने बाहेर पडण्यासाठी कानातला आतला भाग पोखरायला सुरवात केली असती”
“बाप रे ! डॉक्टर, तुम्ही पहीले, ज्यांना माझे म्हणणे पटले , तुम्ही खरे डॉक्टर, बाकी सारे भोंदू आहेत झाले..”
“रमेश, काळजी करु नका, आपण ही माशी बाहेर काढू”
“मग लौकर काढा की तिला, साला दिवस रात्र ह्या ‘गुँ ss गुँ’ आवाजाने मेंदू बधिर व्हायची वेळ आलीय आणि त्या माशीने उद्या जास्त आत जाऊन काही उद्योग करुन ठेवले, इकडे तिकडे पोखरुन ठेवले तर? ते काही नाही, ताबडतोब बाहेर काढा त्या माशीला, काय खर्च व्हायचा तो होऊ दे. पण मला सोडवा ह्या त्रासातुन”
“म्हणालो ना काळजी करु नका, माशी बाहेर काढायचीच पण त्या साठी एक लहानसे ऑपरेशन करावे लागले, जास्त काही नाही, माशी खूप आत गेलीय तेव्हा साध्यासुध्या उपायाने निघणार नाही म्हणून कानाच्या मागच्या बाजुला छेद घेऊन, माशीला उचलायला लागेल, त्याचा काहीही त्रास होणार नाही तुम्हाला, अॅनॅस्थेशिया देऊ, १५ मिनिटांचे तर ऑपरेशन, चार – पाच तासा नंतर घरी सुद्धा सोडू तुम्हाला, नंतर एक अॅन्टीबायोटीक्स चा छोटासा कोर्स करायचा, आठ दिवस बँडेज राहील तेवढ्या काळात डोक्यावरुन अंघोळ करायची नाही, बास्स”
“मग वाट कसली बघता, आत्ताच करुन टाका ना ऑपरेशन”
“लहान ऑपरेशन असले आधी तयारी करायला लागते, ऑपरेशन थिएटर उपलब्ध लागते, अॅनॅस्थेसीस्टची अपॉईंटमेंट घ्यावी लागते, हे सगळे आज जमणार नाही, पण एक स्पेशल, इमर्जन्सी केस म्हणून डॉ. सरदेसाई उद्या करु शकतील तुमचे हे ऑपरेशन, काय डॉ. सरदेसाई, जमेल ना उद्या?”
“तसे अवघडच आहे, पण आता इमर्जन्सी म्हणून जमवू कसे तरी, पण उद्या दुपारी चार नंतर , सकाळी च्या सगळ्या वेळा बुक्ड आहेत…”
“धन्यवाद डॉ. सरदेसाई, पण उद्याचे नक्की करा, नाही केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे , उशीर केलेला चालणार नाही”
डॉ. सरदेसाईंनी मान डोलावली आणि ते रमेशला म्हणाले…
“रमेश, तुम्ही आता घरी जाऊच नका, आत्ताच अॅडमीट व्हा, काही टेस्ट्स करायच्या आहेत त्या पण करुन टाकू, काय? ”
“काही हरकत नाही, पण उद्या म्हणजे उद्याच ..ती माशी आत आणखी काही उद्योग करायच्या आत बाहेर काढा, हरामखोर, साली ”
“काळजी करु नका, मी तुमच्या कानात औषध टाकतो त्याने माशी फक्त आवाज करु शकेल, कान पोखरता येणार नाही तीला. काही टेस्ट करु आत्ता लगेचच, काही औषधे लिहून देतो ती मागवा आणि आज झोपण्या पूर्वीच काय खायचे प्यायचे ते करुन घ्या. उद्या सकाळ नंतर मात्र काहीही खायचे नाही, पोट रिकामे लागते ऑपरेशन पूर्वी.”
……………………………………………………………………………………………………………………………………………………………..
“आरं, सद्या, ह्यो गण्या कुटे गेला म्हनायचा? ‘चा’ आनायला म्हनूंशा धाडलाता.. कवाचान गेलंय. हिकडे स्टुरी सुरु करुंशान घंटा झाला तरी पत्त्या नाय तेचा?”
“यिलच इतक्यात”
“आरं पन कदी? बेणं नुस्ते पळूण ख्येळतेय, कामाच्या नावानं बोंब, आता यु दे, पोकल बांबूचे फटके द्येतो चार”
“भाऊ, पर जरा जपून, नाय म्हंजे वहीनीसायबांच्या गावाकडला हाय ना त्यो?”
“थितच तर अडतयं ना! तेला जरा काय बोल्लं की समदं आमच्या मंडळींस्नी जौन सांगतयं बेणं, मग काय पोकल बांबूचं फटकं त्येला बसायचे ते आमाला बसत्यात!”
……………………………………………………………………………………………………………………………………………………………….
क्रमश:
शुभं भवतु
