मी त्यातला नाही !

खूप जुनी पण सत्य कहाणी आहे ही,

१९९० साल , त्यावेळेला मी पुण्यात होतो , बॅचलर आयुष्य मजेत घालवत होतो. तेव्हा मी पुणे स्टेशन परिसरात रहात होतो पण माझे बरेचसे मित्र मॉडेल कॉलनी , शिवाजीनगर परिसरात राहात होते त्यामुळे माझा मुक्काम त्या भागातच जास्त असायचा.

त्या काळात मॉडेल कॉलनी भागात एका मोकळ्या प्लॉट वर एक टपरी  स्टाईल हॉटेल सुरु झाले , (मूळात तो सरकारी प्लॉट , क्रिडांगणा साठी आरक्षित होता) , सुरवातीला ती एक टपरी होती , रात्री एक दीड वाजता गेले तरी डाल  फ्राय , चावल, तंदुर रोटी हमखास मिळायची (चांगली असायची !) त्यामुळे आम्ही मित्र इथे नेहमी जायला लागलो.

जसे जसे गिर्‍हाईक वाढायला लागले तसे अतिक्रमण करत त्या टपरीचा चक्क एक ढाबा झाला. मग हळुच , चोरुन मारुन (कोणताही परवाना नसताना) मद्य पुरवठा सुरु झाला , सुरवात बियर ने झाली मग पुढे चक्क फुल सर्विस बार !

मी आणि माझे मित्र तिथे नेहमीच जायचो, टपरी ते ढाबा ते बार हा प्रवास आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहीला होता. माझे मित्र खुष होते कारण आता खाण्या बरोबर प्यायची सोय पण होत  होती.  मी घेत नसल्याने मला काही फरक पडत नव्हता.

या मित्रां बरोबर असताना मी घेत नसल्याने माझी नेहमी चेष्टा व्हायची मला ते ‘श्याम’ म्हणायचे किंवा ‘मंदार’ ! मला त्याचे काहीच वाटायचे नाही. दारु मग त्याला कोणतेही लेबल लावा माझ्या साठी ते कायमच निषीद्ध,  तेव्हा ही आणि आजही! पण माझ्या समोर बसुन  कोणी दारु ढोसत  असेल , मांस – मच्छी खात असेल तर माझा आक्षेप नसायचा , त्यांना काय करायचे ते करु दे , मी असले खाणार नाही आणि असले पिणार नाही असा माझा ठाम निश्चय होता तेव्हाही आणि आत्ता ही  आहे.

माझे मित्र आणि मी जेव्हा त्या ढाब्यावर जायचो , मी ‘त्यातला’ नसल्याने ‘कोरडा’ असायचो. त्यामुळे माझ्यावर एक जबाबदारी नेहमी पडायची ती म्हणजे  हॉटेल चे बील तपासुन पैसे देणे  (माझे गणित चांगले ना!) , वेटर ला योग्य ती टीप देणे  आणि सगळ्यात महत्वाचे पुण्यकर्म – या सार्‍या डोलकरांना  व्यवस्थित त्यांच्या रुम वर पोहोचवणे!  त्या शिवाय आणखी एक काम मला सक्तीने करायला लागायचे ते म्हणजे  या पियक्कडांना लागेल तेव्हा शिगरेट चा पुरवठा करणे. दारु ते प्यायचे पण चखणा ( त्यात ही  तळलेले काजू – मला जाम आवडायचे ! ) मीच जास्त फस्त करत असल्याने मला असल्या कामांना नाही म्हणणे जीवावर याचचे, खाल्ल्या  तळलेल्या काजूंना जागायला हवे ना!

एके दिवशी असेच रात्रो १० च्या  सुमारास मी, पक्या, विज्या, मिल्या, रम्या, आशक्या आणि विक्या  त्या ढाब्यावर होतो. OC चा  खंबा , विज्या साठी ओल्ड मॉंक  असा सरंजाम आणि भरपूर चखणा टेबला वर आला, गप्पा, चेष्टा आणि नेहमी असते तशी पियक्कड बडबड चालू होती . मी आपला यांचे पिणे कधी संपते आणि आपली डाल – चावल कधी टेबलावर येते याची वाट पाहात वेफर्स, चकली, खारे शेंगदाणे, बॉईल्ड चणा आणि तळलेले काजु खात बसलो होतो.

अचानक विज्याला साक्षात्कार झाला की शिगरेटीं संपल्यात , झाले त्या वेळे पर्यंत सगळ्यांची विमाने आकाशात उड्डान घेत असल्याने या बेवड्यांना  शिगरेटी पुरवण्याची नैतीक जिम्मेवारी माझ्यावरच आली. आलीया भोगासी असावे सादर या उक्ती प्रमाणे मी त्या बार च्या बाहेर आलो, शेजारीच पानपट्टी होती. विज्या साठी गोल्ड फ्लेक, मिल्याची चारमिनार, पक्या साठी बेंसन अ‍ॅड हेजेस  (राजेशाही काम असायच याचे!) अशी उजळणी करत मी त्या पानपट्टी समोर उभा होतो,  इतक्यात एका पाठोपाठ  तीन पोलिस जीप्स आणि एक मोठी  पोलिस व्हॅन त्या बार च्या दरवाज्या बाहेर उभ्या राहील्या, दहा पंधरा हवालदार  , तीन साहेब ! म्हणजे ही पोलिसांची  रेड होती!  पोलिसांनी ताबडतोब त्या परिसराचा ताबा घेतला बार चे गेट बंद झाले,  मी बाहेरच उभा होतो.

बार च्या मालकाची  आणि  दोन चार  वेटर्स ची पुरेपुर धुलाई झाली,  बार मालकाला तर अगदी  सुबक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने  बडवले जात होते पण त्यापेक्षा ही अभूतपूर्व धुलाई हॉटेलच्या एका  गलेलठ्ठ उर्मट वेटर ची होत होती, मला काय बरे वाटले सांगू ! आम्ही त्या गलेलठ्ठ वेटर वर खार ठेवून होतोच, त्याला अगदी साऊथ च्या सिनेमात दाखवतात तसे गुरा सारखे बदडले त्याला तोड नाही ! त्या वेळी बार मध्ये साधारण चाळीस एक गिर्‍हाईके होती  सगळ्यांना एका रांगेत उभे करुन एकेकाचे नाव – गाव विचारात शिव्यांच्या गजरात थोबाडें  रंगवायचा बहारदार कार्यक्रम सुरु झाला, पक्या, विज्या, मिल्या, रम्या, आशक्या आणि विक्या आपापली रंगवलेली थोबाडे घेऊन मान खाली घालून उभे होते आणि , मी बाहेरुन हे सारे बघत होतो!

जर मी शिगरेटीं आणायला म्हणून बाहेर आलो नसतो तर मी पण त्या लायनीत आपले थोबाड कसे रंगवले जाते याची वाट पाहत असतो!!   पण वाचलो.

पंचनामा झाला , सार्वजनिक ठिकाणि मद्यपान केले या गुन्ह्या अंतर्गत या सगळ्या चाळीस गिर्‍हाईकांना अटक करुन  , ओळीने त्या व्हॅन  मध्ये कोंबले गेले सोबत हवालदारां कडून प्रेमाची भेट म्हणून  शिव्या आणि लाथांचा सुकाळ सुरु होताच.

मी वाचलो !

मी योगायोगानेच वाचलो पण माझे मित्र अडकले आता मला काही हालचाल करणे भाग होते,. सुदैवाने  आशक्याचा चुलत भाऊ वकील असल्याचे मला आठवले पण आता त्याच्याशी संपर्क साधणे आवश्यक होते पण कसा? तो जमाना लँड लाईनचा होता (सेल फोन नंतर पंधरा वर्षाने आपल्या हातात आले). नजिकच्या  एस टी डी  आय एस डी बूथ वर गेलो , फोन डिरेक्टरीतून आशक्याच्या वकील भावाचा  नंबर मिळवला  , रात्रीच्या १२ वाजता मी त्याला फोन केला , तो चौकी वर पोहोचला , दुसरे दिवशी दोन वाजता , माझे मित्रवर्य पक्या, विज्या, मिल्या, रम्या, आशक्या आणि विक्या सगळे जामीनावर सूटले !

असा ही एक अनुभव !

दारु न पिण्याचे जे अनेक फायदे आहेत त्यातला हा एक !

दारु  पिऊ नका !

शुभं भवतु

 

 

Similar Posts

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *