माझे ध्यानाचे अनुभव – २

सांगलीतला TM बद्दलचा अनुभव फारसा चांगला नव्हता , मला तर ते मार्केटींग चे एक गिम्मिक वाटले होते. पण १९८९ मध्ये अशाच एका TM च्या कार्यशाळेला जाण्याचा योग आला, ‘सकाळ’ मध्ये जाहीरात वगैरे केली होती , योग शिक्षक म्हणून कोणीतरी पी. वासुदेव !

अरे देवा , पुन्हा साउथ इंडियन ?

नाही माझा तसा साऊथ इंडियन लोक्स बद्दल राग , आकस , द्वेष असे काही नाही पण मागचा गुरु बालासुंदरम आणि आता पी. वासुदेव हा योगायोग पाहून जरा मजा वाटली इतकेच !

जाहीरातीत लॉ कॉलेज रोड वरचा पत्ता होता, इथे चौकशी केली तेव्हा कळले की ते फक्त बुकिंग ऑफिस होते इथे फक्त शीटा भरायचे काम होणार होते,  गाडी कोठेतरी भलत्याच ठिकाणी येणार होती.   सांगलीत ५०० रुपये मागत होते इथे फक्त १०० म्हणजे तसा सस्त्यातला सौदा होता ! म्हणालो, करु टाकू हे TM का काय म्हणतात ते. इव्हाना मी नोकरीत असल्याने १०० खर्च करणे फारसे जड नव्हते. पैसे भरले. त्यांनी ट्रेनिंगची तारिख व स्थळ सांगीतले. गाडी मित्रमंडळ सभागृह ला लागणार होती , रिपोर्टिंग टायम सक्काळी ९ चा , बोर्डींग टायम ९:३० ! उत्तम !

ठरल्या दिवशी , ठरल्या वेळी म्हणजे सक्काळी ९ वाजता मी त्या मित्रमंडळ सभागृहा वर होतो, मला वाटले होते बरेच पासिंजर आले असतील पण कसचे काय हॉल वर काळे कुत्रे सुद्धा नव्हते. इतकेच काय त्या हॉल ला चक्क टाळे ठोकलेले होते ! इकडे तिकडे चौकशी केली पण कोणालाही काही कल्पना नव्हती. हॉल चे ऑफिस पण बंद होते. त्या बुकिंग वाल्याच्या फोन नंबर होता, त्याला कॉल केला ( तो झमाना फक्त आणि फक्त लँड लाईन चा होता !) पण नुसती बेल वाजत राहीली ! आता आली का पंचाईत, मग विचार केला आता आलोच आहे तर थांबू थोडावेळ म्हणून मी तिथेच थोडा टाईम पास केला , पुन्हा त्या बुकिंग वाल्याला कॉल केला या खेपेला फोन उचलला हेला. नशिब माझे!

“मी गोखले बोलतोय, आज मित्रमंडळ हॉल मध्ये TM चे ट्रेनिंग आहे ना? हॉल वर तर कोणीच नाही, काही प्रॉब्लेम आहे का?”

“आजचा ट्रेनींग प्रोग्रॅम रद्द झाला आहे”

“का?”

“अहो कोणीच पैसे भरले नाही?”

“मी भरलेत ना?’

“तुम्ही एकटेच”

“काय सांगता ?”

“हो, असेच झाले आहे , खूप लोक्स येतील म्हणून आम्ही मित्रमंडळ हॉल बुक केला होता पण पैसे भरलेले तुम्ही एकटेच आणि एक दोन व्यक्ती हॉल वर येऊन पैसे भरणार म्हणाले होते,आता  इतका कमी रिस्पॉन्स मिळाला, म्हणून कार्यक्रमच रद्द करावा लागला”

“मग आता काय , मी काय करायचे? मी तर हॉल वर आलेलो आहे”

“तुम्ही असे करा , मी पी वासुदेव सरांचा पत्ता  / फोन देतो , त्यांना संपर्क करा, ते त्यांच्या घरीच तुम्हाला TM शिकवतील, ते सेनादत्त पोलिस चौकी – म्हात्रे पुला जवळ राहतात”

आता या  पी वासुदेव सरांना गाठणे आले ! मी त्यांना फोन केला –

फोन वर गोड आवाजाची एक महीला !

“हॅलो , कोण बोलताय?”

“मी गोखले”

“कोण पाहीजे?”

“पी. वासुदेव”

“पी. वासुदेव ? अहो इथे कोणी पी. वासुदेव नाहीतम, राँग नंबर”

“थांबा , थांबा, हा xxxxxx नंबर आहे ना?”

“हो, नंबर बरोबर आहे पण पी वासुदेव वगैरे कोणी नाही रहात इथे”

“अहो , मला तर हाच नंबर दिला गेला आहे, तुमचा पत्ता xx, xxxxxxxx , xxxx xxx सेनादत्त पोलिस चौकी जवळ हा आहे ना?”

“अय्या, पत्ता पण बरोबर आहे, असे कसे होईल ?”

“आता ते मला काय माहिती, तुम्ही म्हणता पी.वासुदेव नावाचे कोणी नाहीत?”

“अय्या , आले लक्षात माझ्या”

आणि मग अर्धा एक मिनिट हसण्याचा आवाज…

“अहो काय झाले, हसताय कशाला?”

“अहो हसू नको तर काय करु , अहो ते पी. वासुदेव वगैर नै काही!”

“मग काय?”

“अहो ते डॉ. वासुदेव पाटणकर , माझे सासरे,  पाटणकरा मधला ‘पी’ आणि ‘वासुदेव’ असे जोडून कोणीतरी त्यांना  चक्क साऊथ इंडीयन बनवलेले आहे असे दिसते”

“अच्छा म्हणजे डॉ वासुदेव पाटणकर म्हणजेच पी वासुदेव होय, मजा आहे, मला कोणी साऊथ इंडीयन व्यक्ती आहे असे वाटले होते,”

“काय काम होते त्यांच्या कडे? “

मी त्या बाईंना तो TM क्लास, मित्रमंडळ हॉल, हा सारा किस्सा सांगीतला.

“गोखले तुम्ही असे करा , दादा आत्ता घरी नाहीत बाहेर गेलेत, मी त्यांच्या कानावर घालते , तुम्ही संध्याकाळी चार नंतर पुन्हा एकदा फोन करा”

“असे बापरे..”

चार वाजता त्या पी वासुदेव ना फोन केला.

“सॉरी, गोखले, तुम्हाला त्रास झाला, काय करणार त्या कोर्सला कोणी फिरकलेच नाही, केव्हढी तयारी केली होती आम्ही, सगळी वाया गेली, पण तुम्ही असे करा, आत्ता तुम्हाला वेळ असेल तर तासाभरात या माझ्या घरी, TM चा पहीला सेशन खास तुमच्या एकट्या साठी घेऊन टाकतो, चालेल?”

आता मी काय बोलणार ? तसा रिकामा वेळ होताच हाताशी, म्हणालो , करुन टाकू हे TM का काय म्हणतात ते.

साधारण ५ च्या सुमारास मी पी. वासुदेव म्हणजेच डॉ वासुदेव पाटणकरांच्या घराची बेल वाजवली..

 

क्रमश:

शुभं भवतु

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *