संध्याकाळच्या ७ च्या सुमारास उषाताईंचा फोन: “माझी सोन्याची साखळी हरवली!”
उषाताईंशी झालेल्या प्रश्नोत्तरातून काही खुलासा करून घेतला:
- कायम (रोज) वापरातला दागिना.
- सकाळी साखळी गळ्यात होती हे नक्की लक्षात आहे.
- दुपार पर्यंत घराच्या बाहेर पडलेल्या नाहीत.
- दुपारी 3 च्या सुमारास सोसायटीच्या बॅडमिटन हॉल मध्ये एकच गेम खेळल्या.
- घरात असताना 5 वाजता गळ्यात साखळी नसल्याचे लक्षात आले.
- घरात सर्वत्र शोधले, बॅडमिटन हॉल मध्ये कसून तपास केला, सर्वांना विचारले, घर ते बॅडमिटन हॉल रस्ता धुंडाळला साखळी सापडली नाही.
यावरून लक्षात आले:
साखळी हरवली का चोरीस गेली? वर्णना वरून साखळी हरवली असल्याची शक्यता जास्त.
साखळी तुटून पडली असणार. साखळी कोठे असण्याची शक्यता?
- घर
- बॅडमिटन हॉल
- घर- बॅडमिटन हॉल हा रस्ता
उषाताईंनी प्रश्न विचारला आणि मला तो समजला त्या वेळेची प्रश्नकुंडली तयार केली. सोनसाखळी हरवली!
24 फेब्रुवारी 2024 , संध्याकाळी 07:18:56 , पुणे
(सायन, रिजियोमँटनस)

प्रश्नकर्ता : लग्नेश आणि लग्नातले ग्रह
लग्नात कोणताही ग्रह नाही , एकटा लग्नेश ‘बुध ’ प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व करेल. एरवी ‘चंद्र’ हा प्रश्न विचारण्याऱ्याचा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो पण ‘हरवले-सापडले’ सारख्या प्रश्नाच्या बाबतीत ‘चंद्र’ हा नेहमीचा हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधित्व करतो.

हरवलेली वस्तू ही वैयक्तिक मालकीची वस्तू, त्यातही दागिना, द्वितीय स्थानावरून. द्वितीय स्थानात ग्रह नाही, एकटा द्वितीयेश ‘शुक्र’ हरवलेल्या वस्तूचे (सोन साखळी) प्रतिनिधी असेल, चंद्र हा नेहमीच हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी असतो

शुक्र सारखा दागदागिन्यांचा कारक ग्रहच, हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी होत आहे, हे होरारी चार्ट रॅडिकल असल्याचे लक्षण मानता येईल.

‘चंद्र ’ हरवलेल्या वस्तूचा (साखळी) प्रतिनिधी ‘बुध’ (जातक) यांच्यात होऊन गेलेला प्रतियोग आहे, याचा अर्थ साखळी जातकाच्या जवळ नाही!
‘शुक्र’ हरवलेल्या वस्तूचा (साखळी) प्रतिनिधी पंचम स्थानात आहे! म्हणजे साखळी बॅडमिंटन हॉल मध्येच पडली आहे, कारण पंचम स्थानावरून खेळ, करमणुकीच्या जागा यांचा बोध होतो.

प्रश्नकर्ता (बुध) आणि हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी शुक्र यांच्यात कोणताही योग नाही!
प्रश्नकर्ता (बुध) आणि हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी चंद्र यांच्यातही कोणताही योग नाही!
वस्तू सापडणार नाही?
साखळी सापडणार नाही असा काहीसा कौल मिळत असला तरी आपण एक शक्यता अजून विचारात घेतलेली नाही !
वस्तू चोरीस गेली असेल किंवा एखाद्या परक्या व्यक्तीच्या हातात पडली असेल!
ह्या दुसऱ्या शक्यते नुसार झाले असेल तर साखळी त्या चोराच्या / परक्या व्यक्तीच्या जवळ असली पाहिजे !
तशी ती आहे का?

परकी व्यक्ती सप्तम स्थान आणि सप्तमातले ग्रह , सप्तमात ग्रह नाही (नेपच्यून चा प्रतिनिधी म्हणून विचार केला जात नाही)
एकटा सप्तमेश ‘गुरु’ परक्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करेल

गुरु (परकी व्यक्ती) आणि शुक्र (साखळी) यांच्यात अवघ्या १ अंशात केंद्र योग होत आहे. साखळी परक्या व्यक्तीच्या हातात पडेल.

गुरु (परकी व्यक्ती) आणि चंद्र (साखळी) यांच्यात अवघ्या 4 अंशात नवपंचम योग होत आहे. साखळी परक्या व्यक्तीच्या हातात पडेल.
चार्ट हा संकेत देत आहे की साखळी अद्याप बॅडमिंटन कोर्ट अथवा त्या आसपासच्या परिसरात बेवारस पडली आहे पण अगदी नजीकच्या काळात साखळी कोणा परक्या व्यक्तीच्या हाताला लागेल!
ह्या परक्या व्यक्तीचा शोध घेतला तर त्याच्या कडून साखळी परत मिळवता येईल. कदाचित ती व्यक्ती ह्या सापडलेल्या साखळीची चटकन विल्हेवाट लावेल, साखळी मिळणारही नाही
पण निदान चोराला पकडल्याचे समाधान तरी मिळेल!

गुरु (परकी व्यक्ती) आणि बुध (जातक) यांच्यात अवघ्या 8 अंशात लाभ योग होत आहे.
जातक आणि परकी व्यक्ती यांच्यात संवाद होऊन साखळी जातकाच्या हातात पडेल.

बुध (जातक) आणि रवी (अधिकारी व्यक्ती ) यांच्यात अवघ्या 3 अंशात युती होत आहे. जातकाला एखाद्या अधिकार पदा वरच्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल.
परक्या व्यक्तीचा प्रतिनिधी ‘गुरु’ असल्याने गुरु ग्रहाच्या कारकत्वा नुसार ती व्यक्ती असण्याची शक्यता जास्त.
गुरु अष्टमात आहे, चतुर्थेश आणि सप्तमेश आहे, या वरून काही अंदाज बांधून मी जातकाला काही नेमक्या सूचना दिल्या
( सूचना कोणत्या त्या इथे लिहता येणार नाहीत! )
जातकाने सोसायटीच्या सेक्रेटरी आणि चेअरमन यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्फत संशयित व्यक्ती कडे तपास केला. सीसी टीव्ही फुटेज चा वापर केला,
बरीच खळखळ केल्या नंतर त्या व्यक्तीने त्याला बॅडमिंटन कोर्टावर सापडलेली सोनसाखळी उषाताईंना परत केली!

खूपच सुंदर विश्लेषण केले सर आपण त्यासाठी धन्यवाद. बुध आणि शुक्र यामध्ये कुठलाही योग होत नसल्यामुळे साखळी सापडणार नाही हे होरारी चार्ट सांगतो आहे. तथापि ज्या माणसाच्या हातात ती साखळी पडली आहे तो त्रयस्थ म्हणून सप्तम स्थान. सप्तम स्थानाचा अधिपती गुरू आणि या गुरुशी हरवलेली साखळी शुक्र योग करते म्हणजे त्या त्रयस्त माणसाला ही साखळी मिळत आहे हे नक्की. पण होरारी चार्ट तर सांगते की साखळी मिळणार नाही आणि साखळी तर चौकशी अंतिम मिळाली असं आपण सांगितले. म्हणजे मला असे म्हणावेसे वाटते की अजून काहीतरी कुठले योग या होरारी चोट चार्ट मध्ये असावेत जेणेकरून ती साखळी मिळते हे ते योग सांगत असतील. म्हणजे हे रेगुलर आपले सात ग्रह सोडून दुसरे कुठले तरी ग्रह असावेत आणि त्यांच्याशी योग होत असावा. याबाबतीत आपलाच अभ्यास दांडगा आहे आपणच सांगू शकाल असं मला वाटते. चतुर्थ स्थान तसेच सप्तम स्थानाचा वरून आपण ती व्यक्ती कोण असावी हे काढले याबद्दल उत्सुकता आहे. आपल्या अभ्यासास सलामच. खूप खूप धन्यवाद .अशाच नवीन नवीन केस स्टडी बाबत उत्सुक.
धन्यवाद