मधुबालेचा हुंदका!

होरारी चा अभ्यास करताना ज्या ग्रंथांची मला अत्यंत मदत झाली त्यात सिल्व्हिया डी लॉंग याच्या ‘Art of Horary Astrology in Practice‘ या ग्रंथाचे नाव मी मोठ्या आदराने घेतो. या होरारी केस स्ट्डीज वरच्या ग्रंथाची मी किती पारायणे केली असतील देव जाणे. तब्बल 101 केस स्ट्डीज आहेत. विविध विषय, विविध तंत्रे, अभ्यासपुर्ण टिप्पणीं यांनी हा ग्रंथ नटलेला आहे. केस स्ट्डीज अत्यंत मोजक्या शब्दात लिहल्या आहेत, फार फाफटपसारा नाही किंवा ललित लेखना सारखी भाषा नाही. प्रश्न विषद करणे, थोडीफार पार्श्वभूमी सांगणे, उत्तरा साठी मोजकेच पण निर्णायक ग्रहयोग तपासले की झाला निर्णय , केस क्लोजड!  अशा थाटात त्या लिहल्या आहेत. प्रश्नांच्या अनुरोधाने आवश्यक तिथे होरारीची मूलतत्वे व महत्वाचे नियम खुलासेवार दिले आहेत. आणखी काय पाहिजे? अशी पुस्तकें आपल्या कडचे लेखक का नाही लिहू शकत ? जाऊ दे जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे हे!

आज सिल्व्हिया डी लॉंग यांच्या  Art of Horary Astrology in Practice या ग्रंथातली एक केस स्ट्डी मी आज आपल्या समोर सादर करत आहे.

हे करत असताना मी लेखीकेची वा प्रकाशकाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. पण केवळ ह्या महान लेखीकेची व तिच्या तितक्याच महान ग्रंथाची माझ्या ब्लॉग च्या वाचकांना तोंड ओळख करुन द्यायच्या शुद्ध हेतुने मी हे केले आहे.

भारतात पाश्चात्य ज्योतिषशास्त्रा कडे काहीसे तुच्छतेने , हेटाळणीने बघितले जाते, पण त्यांच्याकडे सुद्धा अभ्यासू ज्योतिर्विद आहेत , ते वापरत असलेल्या पद्धतीत ही काही ‘दम’ आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आपल्याल लाभ होऊ शकतो हे मला दाखवून द्यायचे आहे. ह्या निमित्तने माझ्या ब्लॉग च्या वाचकांना होरारीच्या आणखी एका तंत्राची ओळख होईल, के.पी. बरोबरच ही पाश्चात्य तंत्रे वापरली तर आपल्या भविष्यकथनाला एक नवी झळाळी येईल, अचुकता तर वाढेलच पण त्याचबरोबर जास्त तपशीलवार , वर्णनात्मक भविष्य कथन करता येईल असा मला विश्वास वाटतो.

हे एक स्वैर भाषांतर आहे, मुळ तांत्रिक बाबी व तपशीला मध्ये जरासुद्धा बदल केलेला नाही, पण लेख रंजक होण्यासाठी मी थोडे लेखन स्वातंत्र्य जरुर घेतले आहे (ते कुठे हे ही तुम्हाला लगेच कळेल म्हणा!)

जिथे जिथे ‘मी’ हे संबोधन आढळेल तिथे ‘मी = सिल्व्हिया डी लॉंग’ असे समजावे, स्त्री लेखीकेने लिहलेली केस स्ट्डी असल्याने सर्व क्रियापदे स्त्री वाचक आहेत. (उदा: मी विचारात पडले, अंदाज बांधते, विचार करायला लागले इ.)

‘अप्सरा’ या एका शब्दात वर्णन करता येईल अशी एक तिशीच्या आतली तरुणी माझ्या समोर येऊन उभी ठाकली तेव्हा मी एक स्त्री असूनही काही क्षण स्तब्ध झाले, बाकी मग पुरुषांची काय हालत होत असेल देव जाणे!

ह्या बयेचे माझ्याकडे काय काम असावे बरे? मी विचारात पडले. त्याचे असे झाले होते, ह्या मधुबालेने जेव्हा फोन वर माझी अपॉइंटमेंट घेतली तेव्हा काय काम आहे याचा जरा सुद्धा अंदाज दिला नव्हता. पुन्हा पुन्हा विचारुन सुद्धा ‘प्रत्यक्ष भेटीतच काय ते सांगते’ हाच तिचा आग्रह होता. तिची आर्जव पाहून दिली एकदाची अपॉइंटमेंट , काय करणार, असतात असेही काही जातक !

माझी एक सवय आहे , जेव्हा अशा प्रकारचे जातक (‘प्रत्यक्ष भेटीतच काय ते सांगतो/सांगते’) जेव्हा माझ्या ऑफिस मध्ये प्रवेश करतो त्या अगदी त्या नेमक्या वेळेची एक कुंडली मी नेहमी बनवते, ह्या प्रकारच्या कुंडलीला ‘कन्सलटेशन चार्ट’ असे संबोधले जाते. या कन्सलटेशन चार्ट वरुन मी नेहमी जातकाचा प्रश्न काय आहे, जातक सध्या नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे, जातकाच्या आसपासचे लोक (वैवाहीक जीवनातला जोडीदार, आई-वडिल, बहिण भावंडे, शेजारी, नातेवाईक इ.), जातकाचा नोकरी व्यवसाय इतकेच काय जातकाच्या आरोग्या बाबतचाही अंदाज बांधते आणि बर्‍याच वेळा ते अगदी तंतोतंत बरोबर आले आहेत. मी जेव्हा असा ‘कन्सलटेशन चार्ट’  बनवते तेव्हा मग जातकाच्या प्रश्नां साठी वेगळी प्रश्नकुंडली बनवायची आवश्यकता भासत नाही. ह्या मधुबाले साठी बनवलेला कन्सलटेशन चार्ट सोबत दिला आहे तो पहा.

दिनांक : 3 Dec 1972
वेळ: 15:30:00 EST +05:00:00
स्थळ:  Cassadaga , FL, USA
81w14’10    28n57’58
Geocentric,Tropical,Placidus,Mean Node

या पत्रिकेत सर्वात प्रथम आपल्या डोळ्यात भरेल तो शुक्र, जो लग्नेश आहे आणि सप्तम भावारंभी आहे. आता जेव्हा लग्नेश (जातकाचा सिग्निफिकेटर) सप्तमाशी इतका जवळचा संबंध दाखवतो तेव्हा जातकाचा प्रश्न विवाहा संबधित असणार नाही तर मग कोणता?

“विवाह कधी हे जाणून घ्यायचेय ना?”

“नाही, तो केव्हाच झालाय , आता मला घटस्फोट घ्यायचाय, तो मिळेल का हो ?”

“घटस्फोट?”

मी काहीशा अविश्वासाने जवळजवळ किंचाळलेच, एव्हढ्या सुंदर मुलीवर घटस्फोटाची वेळ यावी?  माझाच काय पण कोणाचाच विश्वास बसला नसत्या ह्या मधुबाले कडे पाहून!

हा झाला पहिला आश्चर्याचा धका पण पत्रिकेवर पुन्हा एक नजर टाकताच दुसरा धक्का बसला, काय वेळ साधून आली होती ही मधुबाला बघा , पत्रिकेत शुक्र मंगळाच्या अगदी अंशात्मक युतीत आहे, आणि हा मंगळ सप्तमेश आहे , म्हणजे तिच्या नवर्‍याचा सिग्नीफिकेटर ! असा योग म्हणजे म्हणजे घटस्फोटाची सुतराम शक्यता नाही. केस क्लोजड !

अशा फटाफट केस क्लोज झाल्या की कित्ती बरं वाटते म्हणून सांगू !

मी तसे तिला म्हणाले,

“अगं साक्षात रंभा तुझ्या घरची भांडी घासेल , तिलोत्तमा लुगडीं बडवेल, उर्वशी केर काढेल आणि मेनका पोळ्या लाटेल, अशी त्रिलोक सुंदरी तू आणि कशाला हे असले भलते सलते अभद्र विचार मनात आणतेस. अग काही नाही होणार घटस्फोट वगैरे तुझा, हा बघ, तुझ्या नवरोबाचा सिग्नीफिकेटर मंगळ तुझ्या सिग्नीफिकेटरशी म्हणजे शुक्राशी अगदी अंशात्मक युती करतोय तेही विवाहाच्या खास अशा सप्तम स्थानात , तेव्हा काय बिशाद आहे तुमचा घटस्फोट व्हायची!”

“ती तुमची पत्रिका काहीही सांगत असेल, पण आम्हाला घटस्फोटच पाहीजे”

बघा , आता ती मधुबाला काय म्हणाली ‘आम्हाला घटस्फोटच पाहीजे’! म्हणजे हा घटस्फोट तिला एकटीला नको होता, सह संमतीने घटस्फोट घेण्याची तयारी चालली आहे तर! म्हणजेच नेहमीची ‘मारझोड’, ‘व्यसने’ , ‘विवाह बाह्य संबंध’ , ‘लपवलेले गंभीर मानसीक आजार ‘ असली कारणें नसणार, कदाचित तीव्र स्वरुपाचे वैचारीक मतभेद असू शकतील, हो, तेच कारण असायला हवे नाही तर सुखासुखी ह्या असल्या मधुबालेला टाकणारा नवरा वेड्याच्या इस्पीतळात भरती करण्याच्याच लायकीचा म्हणावा लागेल!

आता पुन्हा पत्रिका बघणे आले!

“तू  म्हणतेस, घटस्फोट – घटस्फोट पण ग्रहमान सांगतेय तसले काहीही होणार नाही, हे बघ, हा बुध जो तुझ्या नवर्‍याचा को- सिग्नीफिकेटर (सप्तमातले इतर ग्रह) आहे , तो तुझ्या को- सिग्नीफिकेटरशी म्हणजेच चंद्राशी (चंद्र हा नेहमीच जातकाचा नैसर्गिक को- सिग्नीफिकेटर असतो) युती करणार आहे, बुध वक्री असल्याने तो उलट दिशेने प्रवास करत मागे मागे सरकेल व अगदी लौकरच तो नेहमीच्या गतीने पुढे सरकणार्‍या चंद्रा शी युती करणार, शुक्र – मंगळ आधीच युतीत असताना हा दुसरा चांगला योग होतोय , असे असताना घटस्फोटाची कसली भाषा बोलतेस? आणि आता जरी तुमच्या दोघांच्या मनात हे असले भलते सलते विचार आले असले तरी लौकरच म्हणजे हा बुध जेव्हा चंद्राशी प्रत्यक्षात युती करेल तेव्हा तुमचे विचार बदलतील , मग कसला घटस्फोट आणि कसले काय !”

हे सर्व जरी मी त्या मधुबालेला दिलासा देण्यासाठी आणि एक मोडू पाहणारे लग्न पुन्हा उभे करण्याच्या हेतुने बोलले असले तरी, पत्रिका काही अशुभ संकेत देत होतीच.  सिग्नीफिकेटर या अर्थाने न घेता नुसत्या शुक्र आणि मंगळाच्या विचार केला असता , मंगळ सप्तमात, शुक्र – मंगळ युती हे दोन्ही संकेत वैवाहीक जीवनासाठी अशुभ आहेतच, त्यात आणि कहर म्हणजे हा शुक्र आणि मंगळ दोघेही ‘व्हिया कंब्युस्टा’ आहेत!

(सुहास: व्हिया कंब्युस्टा म्हणजे ‘जळणारा रस्ता’ ! राशीचक्रातला 15 अंश तुळ ते 15 अंश वृश्चिक हा विभाग पण त्यातला 23 -24 तुळ हे दोन अंश वगळून. या भागात चंद्र किंवा जातकाच्या प्रश्ना संदर्भात महत्वाचा असा ग्रह , असताना काही तरी अनपेक्षित, वादळी घटना घडतात, चुकीचे निर्णय , भांबावलेल्या अवस्थेत घेतले जातात. ह्या साधारण 30 अंशाच्या पट्ट्यात बरेच अशुभ स्थिर तारे असल्याने कदाचित हा नियम बनवला गेला असावा, आजकालचे मॉडर्न ज्योतिर्विद या व्हिया कंब्युस्टाचा तितकासा वापर करताना दिसत नाहीत)  )

…. असे जरी असले तरी, आधी बघितलेले ‘जोडणारे’ संकेतच जास्त प्रबळ असल्याने आत्ता जरी तणावाची परिस्थिती (सप्तमातला मंगळ) तरी घटस्फोटाचे टोक गाठले जाणार नाही हे नक्की.

मी विचार करायला लागले, मग ह्या दोघांच्या मनात हे असले विचार येण्याचे काय कारण असावे बरे? दुसर्‍या स्थानातल्या वक्री शनी कडे माझे लक्ष गेले , आता द्वीतीय स्थान हे पैका-पाण्याचे स्थान, त्या स्थानात वक्री शनी म्हणजे आर्थिक समस्या ! आणि हा वक्री शनी नुसता द्वितीय स्थानातच आहे असे नाही तर तो अष्टमातल्या रवी शी प्रतियोग करत आहे, म्हणजे ही आर्थिक समस्या दोघांच्या संयुक्त अर्थ व्यवहारांशी (joint finance) संबंधीत असावी. (दुसरे घर मधुबालेचा  पैसा, आठवे घर तिच्या नवर्‍याचा पैसा)

“हो, आम्ही सध्या फार मोठ्या आर्थिक अरिष्टातून जात आहोत, त्यात पदरात तीन मुलें , पैसा अगदी म्हणजे अगदी पुरत नाही हो..”

“माझे आई, घटस्फोट घेण्याने हा प्रश्न सुटणार आहे का?”

माझ्या या प्रश्नाला त्या मधुबाले ने फक्त एक हुंदका दिला. मला कळेना , नेमका काय विचार करुन हे दोघे घटस्फोटाच्या पायरीवर उतरले असतील?

काही क्षण भयाण शांततेत गेले.. शेवटी त्या मधुबालेने तोंड उघडले..

“नाही, ते काहीही असो, आम्हाला घटस्फोटच हवा आहे..”

“हे बघ, आताच्या तुमच्या पुढ्यातल्या समस्यांवर घटस्फोट हा उपाय होऊ शकत नाही असे मला वाटते. ह्या समस्या सोडवायचे इतरही बरेच चांगले आणि परिणामकारक मार्ग आहेत , मला वाटते तुम्ही दोघांनी त्याचा प्रथम विचार करावा, आता पत्रिके नुसार तुमच्यात मतभेद दिसत असले तरी तुमचा घटस्फोट होण्याची कोणतीही शक्यता नाही, एक ज्योतिषी म्हणून मी एव्हढेच सांगू शकते, बाकी आता तुम्हाला घटस्फोट घ्यायचाच असेल तर तो न्यायलयातच मिळेल नाही का?”

मधुबालेने उत्तरा दाखल फक्त मान डोलावली , तिचा निराशेने काळवंडलेला चेहेरा अगदी बघवत नव्हता. ताण हलका करण्यासाठी  तिला कॉफी देऊ दिली.

“थोडी कॉफी घे कोप भर म्हणजे बरे वाटेल तुला, मला मेलीला मात्र अॅसिडिटीच्या त्रासा मुळे तुला कंपनी देता येत नाही, तुझी कॉफी होई तो पर्यंत मी परत एकदा पत्रिका तपासते, मग तर झाले? ”

बस्स, या एव्हढ्या एका वाक्याने तिचा चेहेरा काहीसा उजळला ! अर्थात हे मी केवळ त्या मधुबालेच्या समाधानासाठी बोलले, तिला कॉफी गोड लागावी म्हणून बोलले हो !

कारण एकदा जातकाच्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाले की पत्रिकेची आणखी चिरफाड न करता तोंड मिटून गप्प बसावे. तसे बघाल तर पत्रिका आणखीही इतर अनेक शुभाशुभ गोष्टींवर प्रकाश टाकू शकते, पण सुज्ञ ज्योतिषी सहसा त्या फंदात पडत नाही किबहुना तसे ते पडू नये हेच उत्तम. काही ज्योतिषांना ही एक वाईट सवय असते, पत्रिका पुढ्यात आली की सर्वप्रथम अशुभाचे उकीरडें फुंकायला धावायचे!

ज्योतिष ही ‘संकेताची’ भाषा आहे, पत्रिकेतल्या प्रत्येक फॅक्टर ला ( ग्रह, भाव, राशी, योग) अक्षरश: शेकड्यांनी अर्थ आहेत , त्यातला कोणता निवडायचा हे स्थळ , काल , परिस्थिती व व्यक्ती सापेक्ष असते, त्यासाठी जातकाची संपूर्ण पार्श्वभूमी , संदर्भ (context) माहिती असणे अत्यंत जरुरीचे असते, हा संदर्भ दोन मार्गाने मिळतो, एक जातकाने विचारलेला प्रश्न आणि दुसरा, जातकाशी त्या प्रश्ना संदर्भात झालेल्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेला खुलासा. म्हणूनच जातकाने विचारलेले नसताना अपुर्‍या माहीतीवर अकलेचे तारे तोडू नयेत, एखाद्या ग्रहस्थितीचा संदर्भ सोडून अर्थ लावला गेला तर अनर्थ होऊ शकतो.

असे जरी असले तरी काही वेळा विचित्र परिस्थिती ओढवते. कितीही टाळायचे म्हणले तरी काही दणकेबाज अशुभ योग आपल्याला असे सहजासहजी दुर्लक्षुन चालत नाही. या योगांचा संबंध जातकाने विचारलेल्या प्रश्नाशी नसला तरीही त्यावर भाष्य करावयाचा मोह होतोच होतो, काही वेळा तर ‘या योगा बद्दल जातकाला सावध कर’ असे इंट्यूईशन मिळते. तेव्हा मात्र नाईलाज होतो. मधुबालेच्या बाबतीत अगदी असेच काहीसे घडले म्हणा.

घटस्फोट होईल का?  हे बघत असताना दिसलेला द्वीतिय स्थानातला वक्री शनी काही मला स्वस्थ बसू देत नव्हता , शनीची या स्थानातली उपस्थिती म्हणजे ‘आर्थिक समस्या’ आणि तशा त्या होत्या हे मधुबालेने मान्य केलेले आहेच. खरे तर आता ह्या शनी ने माझी पाठ सोडावयास पाहीजे , पण नाही, मधुबाला कॉफी घेत असताना मी पत्रिका बघण्याचे नाटक काय करायला गेले , ह्या शनी महाराजांनी पुन्हा एकदा माझा कब्जा घेतला !

हा शनी वक्री आहे , आणि अष्ट्मातल्या रवीच्या प्रतियोगात आहे, ह्या वक्री शनीचा ‘आर्थिक समस्या ‘ हा अन्वयार्थ आधीच लावून झाला होता, आता रवी पंचमेश असल्याने आणखी काय फरक पडणार आहे? पंचम स्थान म्हणजे काहीशी जुगारी पद्धतीची गुंतवणूक (speculative investment , gambling), मी मधुबालेला विचारले:

“काय ग, आर्थिक अडचणी आहेत म्हणतेस, पैसा पुरत नाही म्हणतेस, कोणत्या जुगारी पद्धतीच्या आर्थिक व्यवहारात तर गुंतला नाही ना तुझा नवरा?”

“नाही हो, तसले काही नाही, लॉटरीचे तिकीट सुद्धा काढत नाही आम्ही कधी..”

ह्या क्षणी मी हादरले , देवा, काय वाढून ठेवलेस या पोरीच्या पुढ्यात? याला कारण म्हणजे पंचम स्थान हे संतती स्थान सुद्धा आहे.. म्हणजे…

मधुबालेच्या प्रश्न कुंडलीत डोकावले , वक्री शनी व रवी बरोबर 5 डिग्रीज 44 मिनिटांत पूर्ण अंशात्मक प्रतियोगात येतात. टाइम स्केल होईल:

5 तास – 5 दिवस – 5 आठवडे
5 दिवस – 5 आठवडे – 5 महिने
5 आठवडे -5  महिने- 5 वर्षे
5 महिने – 5 वर्षे- अनसर्टन

कोणते टाईम स्केल फिट्ट बसेल? शनी द्वीतीयेत व रवी अष्टमात , दोन्ही  Succedent  हाउसेस,  दोघेही ग्रह म्युटेबल साईन्स मध्ये! असे असताना कोणतेही स्केल निवडले तरी त्यातले मध्यम टाइम युनीट वापरायचे, म्हणजे पहिल्या स्केल प्रमाणे  पावणे सहा दिवस ! पुढचे स्केल देणार  पावणे सहा आठवडे . त्यापुढचे स्केल देईल पावणे सहा महिने. आणि शेवटच्या स्केल प्रमाणे पावणे सहा वर्षे !  पावणे सहा दिवस आणि  पावणे सहा वर्षे यांचा विचार करायला नको (एक खूपच लवकर आणि दुसरे खूप उशीरा) मग उरले पावणे सहा आठवडे आणि पावणे सहा महिने.  म्हणजे एकतर दीड महिन्यात किंवा सहा महिन्याच्या आतबाहेर ,  काय हे पोरीच्या नशिबात ….

“काय गं, तुझ्या मुलां पैकी कोणी धनु किंवा सिंह राशीचे (सन-साईन) आहे  का?” (पंचमस्थानी सिंह रास आणि रवी धनु राशीत)

“आहे ना , माझा मोठा मुलगा , ‘अ‍ॅन्ड्रू’ तो आहे सिंह राशीचा , धाकट्या दोन्ही मुलीं वृषभेच्या, पण त्याचा इथे काय संबंध?”

“अ‍ॅन्ड्रू ची जन्मतारीख सांगता येईल ?”

पण अ‍ॅन्ड्रू ची पत्रिका करायची आवश्यकता भासलीच नाही, इफेमेरीज समोरच होत्या , साधारण पाचेक महीन्यात अ‍ॅन्ड्रू एक अत्यंत अशुभ ट्रान्सीट अनुभवणार होता. पाच महिनें अरे देवा म्हणजे  हे बसतेय मिटर मध्ये .. टाईम स्केल ने सांगीतलेले पावणे सहा महीने  आणि अ‍ॅन्ड्रू साठीचे अत्यंत अशुभ ट्रान्सीट .. एकाच वेळी !!    म्हणजे .. होणार काय? .. पंचमेश रवी ( तिच्या मोठ्या मुलाचा सिग्नीफिकेटर) , अष्टमात (मुलाचे चतुर्थ – अखेर) , वक्री शनी ( मुलाच्या षष्ठम स्थानाचा भावाधिपती) बुधाच्या (वाहतुक) राशीत.

वाहन अपघातात मोठी दुखापत किंवा ..किंवा …  किंवा मृत्यू !

“हे बघ , तुमचा घटस्फोट होणार नाही हे नक्की, पण साधारण मे महिन्यात अ‍ॅन्ड्रू वर जरा लक्ष ठेव “

“का? काही काळजीचे कारण आहे का?”

“नाही ग , तसे आताच ठोस काही सांगता येणार नाही, पण दक्षता घेतलेली बरी म्हणून सांगीतले. काय आहे, आज काल वाहतुकीची वर्दळ किती वाढलेय हे बघतेच आहेस, मुले पळतात, बागडतात, हुंदडतात, लक्ष कुठे असते त्यांचे, आपणच काळजी घेतली पाहीजे ना?”

“हो तुम्ही म्हणता ते खरेच आहे, माझा अ‍ॅन्ड्रू तसाही अवखळ आहेच , सतत ओरडावे लागते त्याला..”

“बघ बाई,  काळजी घे अ‍ॅन्ड्रूची आणि तुझी सुद्धा, काय?”

“हो”

……..

मार्च महिन्यात मधुबाला पुन्हा एकदा अवतिर्ण झाली , यावेळी तिच्या सोबत तिचा किशोरकुमार होता, म्हणजे घटस्फोट टळला म्हणायचा , मला फार हायसे वाटले. मधुबाला आली होती इतर काही कामा साठी, काम तसे किरकोळच होते , लगेच झाले, हसतहसत जोडा निघून गेला. अॅन्ड्रूचा विषय मीही काढला नाही आणि मधुबालाही ती गोष्ट विसरलेली दिसली.

पण, मधुबाला विसरलेली असली तरी, नियती नाही. ग्रहयोगांनी द्यायचा तो फटका दिलाच, मे महिन्यात रस्त्यावरच्या एका ट्रक अपघातात अ‍ॅन्ड्रू गेला ! मधुबाला हे सांगायलाच माझ्या कडे आली होती, पण काही बोललीच नाही.. फक्त एक हुंदका दिला तिने ..

मी ऐकलेला हा दुसरा… मधुबालेचा हुंदका!

शुभं भवतु

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *