अंगठीचा किस्सा!



रमणीकभाई हे एक उमदे, दिलदार व्यक्तिमत्व, आमच्या परिसरातल्या जॉगिंग ग्राउंड वर त्यांची माझी रोजच भेट होत असते. 

२१ जून २०२५,  नेहमी प्रमाणे आमचा मॉर्निंग वॉक झाला,  थोडा वेळ गप्पा झाल्या. घरी परत आल्या नंतर माझा दिनक्रम सुरु झाला इतक्यात रमणीकभाईंचा फोन आला. त्यांचा स्वर जरा घाबरल्या सारखा होता..

“सुहासभाई, एक प्रॉब्लेम झाला आहे”

“काय?”

“माझी हिऱ्याची अंगठी गायब झाली आहे”

“कधी?”

“आज ग्राउंड वर येताना तर बोटात होती हे नक्की पण घरी आल्या नंतर अंघोळ करताना पाहिले तर अंगठी गायब”

“घरातच असेल, काढून ठेवली असेल, टेबलावर, वॉशबेसिन च्या काउंटर वर असेल तिथे तपासले का?”

“मी अंगठी बोटातून कधीच बाहेर काढत नाही त्यामुले ती इथे तिथे ठेवली असण्याचा प्रश्नच नाही तरी पण तुम्ही सुचवता आहात त्या सर्व जागा तर सगळ्यात पहिल्या तपासल्या आहेत, सगळे घर तपासले, अंगठी सापडली नाही, मला वाटते ती आज ग्राउंड वर बोटातून निसटून पडली असणार कारण ती जराशी सैल झाली होती”

“मग आता ग्राउंड वर जाऊन तपास केला पाहिजे”

“ग्राउंड वर पण तपासले पण इतक्या मोठ्या ग्राउंड वर किती म्हणून तपासायचे, अंगठी आता काही सापडत नाही समजून घरी आलो आणि तुमची आठवण आली ”

“मी येतो आपल्या मदतीला, आपण दोघेही पुन्हा ग्राउंड वर जाऊन तपासू”

“धन्यवाद पण मला नाही वाटत अशी शोधून अंगठी सापडेल, कदाचित ती रस्त्यात पडली असेल कोण जाणे, कोठे कोठे बघणार, त्यापेक्षा मला एक मदत करा, एकदा प्रश्नकुंडली मांडून बघता का अंगठी सापडायची कितपत आशा आहे, कोठे सापडेल” 


“ठीक आहे मी प्रयत्न करतो, मला अर्धा तास द्या, काम झाले की लगेच कॉल करतो तुम्हाला”


रमणीकभाईंचा प्रश्न मला पूर्ण समजला त्या क्षणाची पत्रिका खाली दिली आहे.

सिंह लग्नाची पत्रिका आहे, लग्नेश ‘रवी ‘आणि लग्नातला ‘मंगळ’ असे दोन ग्रह रमणीकभाईंचे प्रतिनिधित्व करतील, पण शक्यतो एकाच ग्रह प्रतिनिधी असावा या विचाराने ‘रवी’ प्रतिनिधी म्हणून निवडला, इथे ग्रहांच्या कारकत्वाचा विचार आहे,  रमणीकभाई सारख्या सौम्य, मृदु, गुज्जू व्यक्तिमत्वाला मंगळाची दाहकता, आक्रमकता, अतिरेक, धसमुसळेपणा, शोभणार नाही इथे ‘रवी’ सारखा राजेशाही, भारदस्त ग्रहच जास्त समर्पक आहे. 

चंद्र हा निसर्गात:च प्रश्नकर्त्याचा प्रतिनिधी असला तरी ‘हरवले- सापडले’ पद्धतीच्या होरारी मध्ये चंद्र हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी मानला जातो त्यामुळे एकटा ‘रवी’ रमणीकभाईंचे प्रतिनिधित्व करेल.

हरवलेली वस्तू ही एक मौल्यवान अंगठी असल्याने द्वितीय ( २ ) स्थानावरून पहायची. द्वितीय ( २ ) स्थानावर बुधाची कन्या रास आहे, धनेश बुध ‘अंगठी’ चे प्रतिनिधित्व करेल, त्याचा बरोबर चंद्र देखील प्रतिनिधी असेल, हरवलेली वस्तू एक दागिना असल्याने त्याचा कारक ‘शुक्र’ देखील प्रतिनिधी होऊ शकतो.   

आता जर अंगठी सापडणार असेल तर रमणीकभाई आणि अंगठी यांच्या प्रतिनिधी मध्ये योग व्हायला हवा. 

रवी (रमणीकभाई) आणि चंद्र  (अंगठी) यांच्यातला लाभ योग नुकताच होऊन गेला आहे,  लाभ योग करून चंद्र १ अंश पुढे आला आहे. अंगठी रमणीकभाई पासून दूर गेली याची ही साक्ष!

रवी (रमणीकभाई) आणि बुध (अंगठी) असा विचार केला तर असे दिसते की रवी आत्ताचा कर्केत दाखला झाला आहे तर बुध कर्केत २१ अंशावर आहे  या दोघांत कोणताही योग होण्याची शक्यता नाही. 

शुक्र (अंगठी) विचारात घेतला तरी रवी कर्केत आहे तो पर्यंत रवी – शुक्र योग होणार नाही.

अंगठीचे तीनही प्रतिनिधी आणि रमणीकभाई यांच्यात योग होत नाही म्हणजेच अंगठी सापडणार नाही असे समजायचे का? 

आत्ता पर्यंतचे अनालायसिस हेच सुचवत आहे.  

 
पण एका अंगाने पाहिले तर चार्ट बऱ्यापैकी रॅडिकल दिसत आहे, जन्मलग्नाने जातकाचे लक्षण अचूक पकडले आहे, पत्रिकेत चंद्र आणि रवी दोघेही क्षितिजाच्या वर आहेत (७ ते १२ स्थानांत) हा वस्तू सापडण्याच्या दृष्टीने एक आश्वासक भाग आहे. असे असताना, अंगठी सापडणार नाही, असे सांगत केस क्लोज करणे मला रुचले नाही, मी पत्रिकेचा अजून अभ्यास केला. आणि माझ्या लक्षात आले..

चंद्र जो वृषभेत १ अंशावर आहे तो अगदी लगेचच कर्क २ अंशावरच्या गुरु शी लाभ योग करत आहे आणि त्या पाठोपाठ रवी गुरूशी  २ अंशात युती करत आहे आणि हे सारे जातकाच्या लाभस्थानात होत आहे. चंद्र गुरु योग होईल आणि त्या पाठोपाठ रवी गुरु युती होईल, म्हणजे असे म्हणता येईल की गुरूच्या माध्यमातून रवी (रमणीकभाई) आणि चंद्र ( अंगठी) यांची गाठ  पडणार आहे.

असे जर असेल तर हा गुरु कोण? पत्रिकेत गुरु पंचमेश ( ५ ) आणि अष्टमेश ( ८ ) आहे, अष्टम भावावरून कोणता नातेसंबंध दिसत नाही पण पंचम ( ५ ) भाव म्हणजे रमणीकभाईंची संतती, गुरु हा पुरुष ग्रह असल्याने रमणीकभाईंचा मुलगा!

म्हणजे अंगठी रमणीकभाईंच्या मुलाला सापडेल आणि मग त्याच्या मार्फत ती रमणीकभाईंना मिळेल, अंगठी सापडणार!

अंगठीचा एक प्रतिनिधी चंद्र नवम ( ९ ) स्थानात आणि दुसरा प्रतिनिधी बुध व्यय ( १२) स्थानात या दोन्ही स्थितींचा मेळ घातला तर अंगठी रमणीकभाई पासून लांब असेल म्हणजे घरात तर नक्कीच नाही, अंगठी ग्राउंड वरच पडली असणार.

चंद्र वृषभ राशीत, बुध कन्या राशीत , म्हणजे अंगठी जमिनी लगत, गवताळ भागात किंवा पाणथळ जागेत (तलाव , डबके) असेल. 


आता हा जून महिना पाऊस चालूच होता, ग्राउंड वर पाणी साठून अनेक डबकी तयार झाली होती, त्या इतक्या डबक्यांतून अंगठी सारखी लहानशी वस्तू शोधायची म्हणजे गवताच्या गंजीतून सुई हुडकल्या सारखेच, केवळ अशक्य! आता काय करायचे?

मी माझ्या ‘Lost and Found’ वरच्या नोटस पुन्हा एकदा चाळल्या त्यात एके ठिकाणी नोंद होती: ‘कारंजा’!  आता कारंजा ही पण पाण्याची जागा आणि काय आश्चर्य पहा, त्या ग्राउंड वर खरेच एका कारंजे आहे, त्याच्या भोवती कट्टा आहे आणि याहून मोठे आश्चर्य म्हणजे मी , रमणीकभाई आणि इतरही दोघे . आम्ही आज तिथेच तर बसून तर गप्पा मारल्या होत्या!

तेव्हा बोलण्याच्या भरात, हातवारे करताना, ती अंगठी गळून बहुदा त्या कारंज्याच्या आत पडली असणार!.    

मी रमणीकभाईंना फोन केला..

“रमणीक भाई गुड न्यूज, अंगठी सापडेल, तुम्ही निखिल ला (रमणीकभाईंचा मुलगा) ग्राउंड वर पाठवा आणि ग्राउंड वर अगदी एंट्रन्स च्या जवळ जो कारंजा आहे ना, त्यात उतरून शोध घ्यायला सांगा, अंगठी तिथेच सापडेल मला खात्री आहे”

“काय सांगताय काय?”

“वेळ घालवू नका, ताबडतोब निखिल ला ग्राउंड वर पाठवा आणि तपासायला सांगा”

“पण निखिल तर बाहेर गेला आहे, घरी परत यायला संध्याकाळ होईल, त्याच्या पेक्षा मीच जातो ना ग्राउंड वर आणि त्या कारंज्यात तपासतो ”


तुम्ही जाऊन काही उपयोग नाही, अंगठी अगदी समोर असली तरी ती तुम्हाला दिसणार नाही, ती फक्त निखिललाच सापडेल, आता हे कसे जमवायचे ते तुमचे तुम्ही बघा”

+++

Similar Posts

2 Comments

Leave a Reply to suhasgokhale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *