पुढची अपॉईंटमेंट गावातल्या एका धनाढ्य सावकाराची होती, त्याने ५०० वराह मुद्रा मानधन पण जमा केले होते.
ठरल्या वेळी तो सावकार त्याच्या दोन बाऊंसर्स सहीत बाबां समोर हजर झाला. .
“वत्सा, आमच्या दरबारात तुला कोणतीही भीती नाही, इथे तुला कोणताही अपाय होणार नाही, तेव्हा तुझ्या बरोबर हे जे दोन धटिंगण आलेले आहेत त्यांना जरा या मंत्रणा कक्षा बाहेरच थांबायला सांग “
सावकाराने आपल्या दोन्ही बाऊंसर्संना बाहेर थांबायला सांगीतले.
“बोल वत्सा काय समस्या आहे तुझी ?”
“काय सांगू महाराज, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहे …बडा घर पोकळ वासा अशी स्थिती निर्माण झाली आहे. माझा सावकारीचा वंशपरंपरागत धंदा आहे, पण लागोपाठ पडलेल्या दुष्काळां मुळे , मी दिलेली कर्जे वसूल झालेली नाहीत, कर्जा साठी गहाण ठेवलेल्या जमिनी ताब्यात घेतल्या तरी काय उपयोग, पाऊसच नाही तर त्या जमिनी हातात असून तरी काय उपयोग होणार.आता माझी आर्थिक स्थिती इतकी बिघडली आहे की हे असेच काही काळ चालू राहीले तर मला स्वत:लाच कोणा कडे कर्ज मागायची वेळ येईल का असे वाटायला लागले आहे…”
“ठीक आहे , बघू या , काय म्हणताहेत तुझे ग्रह …”
बाबांनी लॅपटॉप उघडला , मघाशी त्या शेतकर्यासाठी केलेली क्षेत्र कुंडली अजुनही स्क्रिन वर होतीच , ती बाबांनी रिफ्रेश केली . अर्थात दोन्ही वेळात अवघा १९ मिनिटांचा फरक असल्याने क्षेत्र कुंडलीत कोणताच बदल झाला नव्हता. त्या प्रश्नकुंडली कडे ओझरती नजर टाकून बाबा म्हणाले..
“काळजीचे काही एक कारण नाही…तुझ्या आर्थिक समस्या नक्की दूर होतील, मी तुला एक तोडगा सुचवतो.. तो न चुकता सव्वा पाच महीने कर .. तुझे प्रश्न सुटले म्हणून समज”
“मी काय करायला हवे आहे महाराज ..”
“सांगतो…तू असे कर कमीतकमी ५ कॅरेट चा निष्कलंक पुष्कराज , सोन्याच्या अंगठीत धारण कर , तसेच प्रत्येक गुरुवारी, दिवेलागणीच्या वेळी लक्ष्मी मातेची ची साग्रसंगीत पूजा कर आणि एका ब्राह्मणाला पिवळे वस्त्र, सव्वा किलो पिवळा धम्मक गुळ, सव्वा किलो स्वच्छ तुरीची डाळ या वस्तू दान दे. प्रसाद म्हणून सर्वांना केशर घातलेले मसाला दूध दे “
“महाराज असे किती गुरुवार करायचे ?”
“ २१ गुरुवार करावे लागतील “
“पण हे केल्याने माझ्या समस्या दूर होतील ?”
“अलबत, कोणतीही शंका घेऊ नकोस , पण हा तोडगा अत्यंत श्रद्धेने करायचा , जा आता ..”
सावकाराने बाबांच्या पायावर डोके ठेवले आणि तो निघून गेला.
बाबांनी लगेच मॅक बुक वर पुढची अपॉईंटमेंट कोणाची आहे हे पहायला सुरवात केली.पुढची अपॉईंटमेंट दंडकारण्याच्या प्रधान क्षेत्रपाला ची होती.
ठरल्या वेळी रथांचा एक ताफा आश्रमा पाशी पोहोचला. सर्वात आधी एक कर्कश्य तुतारी / रण शिंग वाजवणारा लोखंडी रथ , त्या पाठोपाठ क्षेत्रपालाच्या अंगरक्षकांचा रथ, मग क्ष्रेत्रपालाचा कोणत्याही बाण / अस्त्राचा कसलाही परिणाम न होणारा कवच युक्त रथ, त्या पाठोपाठ स्थानिक सुरक्षा कर्मीं चा रथ , शेवटी वैद्यराजांचा रथ असा सारा मोठा लवाजमा होता.
रथांचा ताफा आश्रमासमोर येताच, अंगरक्षकांनी आणि सुरक्षा कर्मींनी तो परिसर जवळजवळ ताब्यातच घ्यायला सुरवात केली , या सगळ्या प्रकाराकडे कुतुहलाने पाहणार्या शिष्यांना या सुरक्षा कर्मींनी दुर लोटले , धनुष्य बाण आणि विविध अस्त्रे घेतलेले नेमबाज आपापल्या पोझिशन्स घेऊ लागले , त्या कामी ज्याचा म्हणून अडथळा वाटेल ते दूर करायचा सपाटा सुरु झाला. आश्रमाच्या आवारातील अनेक नाजूक फुलांची झाडे, हिरवीगार हिरवळ या अंगरक्षक आणि सुरक्षा कर्मीं च्या हालचालीं मुळे निर्दय पणे तुडवली जाऊ लागली . आश्रमाच्या बाहेर गडबड , गोंगाट वाढू लागला.
बाबांचा मंत्रणा कक्ष बाह्य ध्वनी प्रतिबंधक असला तरी हा आवाज बाबांच्या कानावर आलाच. बाबांनी त्रासिक मुद्रेने आपल्या प्रमुख शिष्या कडे पाहीले… प्रमुख शिष्य चटकन बाहेर गेला … काही वेळात बाहेरचा गोंगाट बराच कमी झाला..
मंत्रणा कक्षाचे दार उघडले आणि प्रधान क्षेत्रपाल आपल्या चार कृष्ण मार्जार समकक्ष अंगरक्षका सहीत बाबां समोर आला.
“ही तुझी फौज बाहेर जाऊ दे..”
“पण महाराज , मला झेड प्लस सुरक्षा असल्याने , हे अंगरक्षक मी जाईन तिथे माझ्या सोबत सावली सारखे राहणार , त्यांना दुर करता येणार नाही, हा प्रोटोकॉल आहे..”
“तरीही, या सगळ्यांची इथे आवश्यकता नाही वत्सा, आमच्या दरबारात तुला कोणतीही भीती नाही, इथे तुला कोणताही अपाय होणार नाही, तेव्हा तुझ्या बरोबर हे जे चार कृष्ण मार्जार समकक्ष दैत्य आले आहेत त्यांना मंत्रणा कक्षा बाहेर जायलाच हवे , हा आमच्या आश्रमाचा प्रोटॉकॉल आहे असे समज “
प्रधान क्षेत्रपालने चेहेरा वाकडा करत आपल्या अंगरक्षकांना मंत्रणा कक्षा बाहेर थांबायला सांगीतले.
बाबांनी प्रमुख शिष्या कडे नेहमीचा कटाक्ष टाकला, प्रधान शिष्याने ‘वोक्के, अशी खूण केली, म्हणजेच प्रधान क्षेत्रपालाने एक सहस्त्र सुवर्ण मुद्रा आश्रमाच्या कोशागारात जमा केल्या आहेत.
प्रधान क्षेत्रपाल बाबांच्या आसपास उभ्या असलेल्या शिष्यां कडे नजर टाकून म्हणाला ..
“महाराज , प्रश्न जरा खासगी आहे ..तेव्हा ..”
बाबांनी खुण करुन आपल्या शिष्यांना मंत्रणा कक्षा बाहेर जाण्यास सांगीतले . सगळे शिष्य बाहेर गेले पण बाबांचा प्रधान शिष्य अजुनही बाबांजवळच आपला लॅपटॉप घेऊन उभा होता. क्षेत्रपाल आता त्या प्रधान शिष्याकडे पाहू लागला, बाबांच्या ते लक्षात आले..
“तो माझा प्रधान शिष्य आहे , इतकेच नव्हे तर तो माझ्या नंतर या आश्रमाचा कारभार सांभाळणार आहे ,तो जाणार नाही..तेव्हा वत्सा तुझी जी काही समस्या आहे ती नि:संकोच पणे सांग”
क्रमश:
शुभं भवतु

नेहमीप्रमाणे उत्सुकता आहेच …!!
धन्यवाद स्वप्नीलजी
सुहास गोखले
श्री. सुहासजी ,
तुमच्या लेखन शैलीला मानले.
सावकार व त्याचे दोन बाऊंसर्स,
प्रधान क्षेत्रपाल व त्याचे चार कृष्ण मार्जार समकक्ष दैत्य
एकदम झक्कास जमले आहेत, जणू समोरच आहेत.
उपायांची किमंत वाढती आहे, प्रधान क्षेत्रपालाला कितीला गंडा बसतो ते बघायचे.
धन्यवाद,
अनंत
श्री अनंतजी
अभिप्राया बद्द्ल धन्यवाद . कथा नेहमीसारखी न लिहता जरा विनोदाच्या अंगाने लिहली आहे .
सुहास गोखले