कानात गेली माशी ! (भाग – ४)

“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती, तुम्ही माशी बाहेर काढली खरी पण ती अंडी बाहेर काढायचे तुम्ही विसरलात! “

मा

शी रमेशच्या कानात गेली नव्हती तर ती त्याच्या मनात शिरली होती, जसे रमेशच्या बाबतीत झाले तर तसे आपल्या बाबतीत पण होऊ शकते किंबहुना अगदी अगदी या क्षणाला सुद्धा आपल्या पैकी कितीतरी जणांच्या  मनात अशा अनेक माश्या  घोंगावत  असतील. रमेशला त्या माशीची  ‘गुँ ss गुँ’ सतावत होती सगळ्याच माशा ‘गुँ ss गुँ ‘ करतील असे नव्हे, त्यांची सतावण्याची पद्धत वेगळी असू शकेल पण त्रास हा होतच असतो.

रमेशची समस्या सोडवण्या साठी डॉ. कर्णीकांनी मानसोपचाराचा आधार घेतला. आज एक चांगला ज्योतिषी देखील हीच भूमिका पार पाडू शकतो. मी ‘चांगला ज्योतिषी’ लिहलेय हे इथे लक्षात घ्या.

ज्योतिषा कडे येणार्‍या १०० तल्या ९९ व्यक्ती समस्या असलेल्याच असतात. म्हणूनच ‘सुखी माणूस सोनारा कडे आणि दु:खी माणूस ज्योतिषा कडे” असे बोलले जाते.

लोक ज्योतिषाला ज्या समस्या सांगतात त्यातल्या बहुतांश समस्या या पैसा , आरोग्य आणि वैवाहीक जीवना बद्दल असतात. पैसा नाही, जो आहे तो पुरेसा नाही , कर्ज आहे , मोठे आजार आहेत, नोकरी मिळत नाही, लग्न जमत नाही , पती-पत्नीत पटत नाही इ. एखादा डॉक्टर जसे काही औषधोपचार करुन आजार बरे करतो तसेच काही तरी’  या ज्योतिषाने करावे आणि आपली समस्या दूर करावी अशी लोकांची माफक (?) अपेक्षा असते. हे ‘काही तरी’ म्हणजेच ‘उपाय –तोडगे’ !

पण ज्योतिषी कितीही चांगला असला, तज्ञ असला, अनुभवी असला, सात्विक असला तरी दुर्दैवाने तो तुमच्या ह्या समस्या सोडवू शकत नाही. ज्योतिषी तुमचा आजार बरा करु शकत नाही, नोकरी मिळवून देऊ शकत नाही , तुमचे कर्ज फेडू शकत नाही किंवा तुमच्यावर पैशाची बरसात करु शकत नाही.

मुळात या तथाकथित उपाय– तोडग्यांची ची संकल्पना ही काहीशी डॉ.कर्णीकांनी केलेल्या मानसोपचारा सारखी आहे. या ‘उपाय- तोडग्यांचा’ मूळ हेतु हा समस्या ग्रस्त व्यक्तीला थोडासा धीर देणे, त्याच्या मनाला उभारी देणे , प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्यासाठी नवी उमेद देणे असाच होता आणि तो तसाच असावा.

लहान मूल खेळताना पडून रडायला लागले तर आपण त्याला ‘अरे काही नाही झाले , बघ उंदीर पळाला’ असे म्हणून त्या मूलाचे लक्ष दुसरी कडे वळवतो , मूल तिकडे बघायला लागते आणि त्या क्षणा दोन क्षणात त्याला वेदनेचा विसर पडतो. काही वेळा आपण ‘आला मंतर कोला मंतर छू ‘ असे म्हणतो, मूलाला वाटते हा काहीतरी जादूचा मंत्र आहे , मूल वेदना विसरते आणि पूर्ववत हसायला खेळायला लागते

म्हणूनच हे ‘उपाय -तोडगे’ ‘उंदीर पळाला / आला मंतर – कोला मंतर’ या पातळीवरच ठेवायला पाहीजेत त्यांचा तितकाच उपयोग आहे. उपाय – तोडगात सुचवलेले विधी जसे पोथी वाचणे, जप वाचणे , झाडाला फेर्‍या मारणे, उपास करणे , खडा वापरणे इ गोष्टी करत असताना त्या व्यक्तीला वाटत असते की ‘आता मी हे उपाय करतोय ना , मग माझे सगळे व्यवस्थित होईल, माझ्या अडचणीं दूर होतील, समस्या सुटतील’ ,  हे असे त्या व्यक्तीला वाटणे हा एक प्रकारचा सौम्य मानसोपचारच आहे , जसा उपचार डॉ.कर्णीकांनी रमेशच्या बाबतीत केला तसाच, ती एक सायकॉलॉजीकल ट्रीटमेंटच असते. वैद्यकशास्त्रात याला ‘प्लॅसेबो इफेक्ट’ म्हणतात.  हा आपल्या मनोव्यापाराचा एक अनाकलनिय भाग आहे. ‘डॉक्टरांना नुसते भेटले तरी निम्मा आजार बरा होतो ‘ असे म्हणतात त्याच्या मागे हेच कारण असते . ‘ ‘समोरची व्यक्ती डॉक्टर आहे … आता ते मला औषध देतील आणि  माझा आजार बरा होईल’ हा जो विश्वास किंवा श्रद्धा रोग्याच्या मनात निर्माण होत असते तीच हे निम्मे काम करत असते.

पण हे ‘उपाय – तोडगे’ म्हणजे तुमच्या अडचणींचे उत्तर नसते. तुमचे नशीब बदलवणारी ‘जादुची छडी ‘ किंवा इंग्रजीत म्हणतात तशी ‘मॅजीक पिल’ नाही हे लक्षात घ्या.  ‘उपाय -तोडग्यां’ नी अशक्य ते शक्य होणार नाही, रंकाचा राव होणार नाही की एखाद्या ला ‘अप्सरा’ भेटणार नाही. मुळात या गोष्टी , म्हणजे ‘पैसा, मान-सन्मान,  चांगले वैवाहीक जीवन , चांगली नोकरी, आरोग्य , सुख-समाधान ‘ आपल्या नशिबातच असाव्या लागतात , त्याच जर नसल्या तर कितीही उपाय तोडगे केले तरी काही उपयोग होणार नाही ! आडातच पाणी नसेल तर रेशमी दोरी, सोन्या चांदीचा पोहोरा वापरला तरी पाणी कोठून येणार ? नशिबात पैसा असेल तर लक्ष्मी सोन्याचे पैजण ‘छुन छुन’ वाजवत वाजवत दारात येईल हो,  अप्सरा नशिबात असेल तर तीही मिळेल, अभिषेक ला नाही मिळाली ?  मान-मरातब , पैसा,  Z Plus सिक्युरिटी नशिबात असेल तर तीही मिळेल , पप्पूला नाही मिळाली ?   या गोष्टी उपाय -तोडग्यांनी नाही भेटणार सायबानू , त्या नशिबातच असाव्या लागतात आणि नशिबात तुरुंगवास असेल तर तोही भेटेल ना , बापू  गेला ना जेलात ?

‘मी काही करणार नाही ‘ पण मला सगळे चांगले मिळाले पाहीजे , ‘मी दिवसभर नाना तर्‍हेची पापं करणार , लोकांना फसवणार , मुंड्या मुरगाळणार पण एक तांबडे फूल गणपतीला वाहिले (हे दर मंगळवारी करायचे , पहिल्या मंगळवारी एक , दुसर्‍या मंगळवारी दोन असे क्रमाक्रमाने वाढवत जायचे बरे का !) नाहीतर  एक दालचिनिचा तुकडा गणपती पूढे ठेवला  (आणि मागे वळून न पाहता घरी परत यायचे बरे का !) की झाले , माझी सगळी पापे धुवुन निघायला पाहिजेत ! असे असते का? (गणपतीला दालचीनी प्रिय तर लक्ष्मी मातेला लवंगाच लागतात बरे का !) गणपतीला लाच देता काय ?  अशी वृत्ती ठेऊन उपाय-तोडगे करत बसलात तर ज्याची इच्छा आहे ते तर कधीच भेटणार नाही आणि या उपाय-तोडग्यांच्या मृगजळा मागे धावताना जे हातात आहे , जे सहज शक्य आहे तेही लाभणे दुरापास्त होईल.

एक लक्षात घ्या, तुम्हाला जालीम उपाय -तोडगे सुचवणारा ज्योतिषी असले तोडगे वापरुन पहिल्यांदा स्वत:च्याच समस्या का बरे सोडवत नाही ? जो दुसर्‍याला एकापेक्षा जालीम , ज्याची कोठेच तोड नाही असे तोडगे सांगून तुमच्या समस्या १००% गॅरंटीने सोडवायला बसलाय त्याला स्वत:चे प्रश्न का बरे सोडवता येत नाहीत?  दुसर्‍याला ‘धन प्राप्तीचे’  सॉल्लीड्ड नुस्के सुचवणारा प्रख्यात ज्योतिषी स्वत:च त्याच जातकाच्या समोरच फोन वर दुसर्‍याकडे ‘कर्ज फेडी साठी मुदत वाढवून द्या’ अशी  केविलवाणी गयावया करताना पाहील्याची उदाहरणें  त्याच्या कडे गेलेल्या जातकांनीच जाहीरपणे सांगीतली आहेत , आता बोला !  लाखो रुपये खर्च करुन वृत्तपत्रात पान पान भर जाहीराती झळकवणार्‍या या ज्योतिषाने स्वत: साठी हे  सॉल्लीड्ड नुस्के का बरे वापरले नाहीत ? उपाय तोडगे करुन स्वत:ची कर्जातून सुटका का  करुन घेतली नाही, कर्जदारांचे तगादे का टाळू शकला  नाही ?  ग्यानबाची मेख इथेच तर आहे !

उपाय तोडगे अगदी मर्यादीत अर्थाने काम करतात , ते एक पुरक उपचार म्हणून वापरायचे असतात. एखाद्या परिक्षेत पास व्हायला केवळ दोन – चार गुण कमी पडत असतील आणि बाकी विषयांत चांगले मार्क्स असतील तर थोडक्यासाठी त्या व्यक्तीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणुन त्याला थोडा मदतीचा हात दिला जातो तसेच या उपाय तोडग्यांचे काम असते.

जसे असे ग्रेस मार्क मिळवण्यासाठी इतर विषयांत चांगल्या मार्कानी पास झालेले असणे अत्यावश्यक असते तसेच या उपाय तोडग्यांचा उपयोग होण्यासाठी मुळात तुमचे प्रयत्न चालू असणे अत्यंत महत्वाचे असते ही महत्वाची बाबच लोक आणि असे उपाय सुचवणारे ज्योतिषी विसरुन जातात.

या इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ते म्हणजे मुळात त्या व्यक्तीच्या पत्रिकेत तसे भक्कम योग असावयासच लागतात तरच हे उपाय – तोडगे काही प्रमाणात फलदायी होऊ शकतील अन्यथा नाही. उगाच कोणीही उठावे , चार उपाय – तोडगे करावेत आणि पाहीजे ते पदरात पाडून घ्यावे असे इतके साधे सरळ सोपे समीकरण नाही हे.

उपाय- तोडगे म्हणजे ‘वेदने वर घातलेली हळूवार फुंकर’ , ‘’नैराश्याने ग्रासलेल्या मनाला खोटी खोटी का होईना उभारी ‘ देणे असे जे त्यांचे एकेकाळीचे उपयोजन होते , तो शुद्ध हेतु केव्हाच मागे पडला आणि मग उरला तो उपाय – तोडग्यांचा किळसवाणा बाजार !

या उपाय तोड्ग्यांनी तुमच्या समस्या सुटणार नाहीत कदापीही नाहीत. ‘हा उपाय / तोडगा करा, तुमची समस्या सुटली म्हणुन समजा’ असे जर कोणी आपल्याला सांगत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला फसवत आहे, अगदी १००% फसवत आहे असे समजा!

जेवताना आपण तोंडी लावण्या साठी लोणचे , चटणी, पापड , फरसाण घेतो पण त्याबरोबर आपले मुख्य जेवण म्हणजे ‘भात , चपाती, भाजी, आमटी’ असतेच ना?  एखादा जेवण म्हणून ताटभर लोणचेच खातो म्हणाला तर कसे ?  उपाय –तोडगे हे असेच पूरक आहेत , जखमे वर तात्पुरता इलाज म्हणून आपण ‘बँड एड’ वापरतो तसेच काहीसे हे उपाय -तोडगे.

पण हे लक्षात न घेता , समस्या कोणतीही असो , उपाय तोडगे केले की ती सुटली म्हणूनच समजा असे ठासुन सांगणार्‍या ज्योतिषांनी चक्क एका पतिव्रतेची बाजारबसवी करुन टाकली !

‘लग्न जमत नाही’, ‘व्यवसाय नीट चालत नाही’, ‘नोकरी मिळत नाही’ म्हणून प्रयत्न करण्या ऐवजी लोक ज्योतिषांचे उंबरठे झिजवतात. परिक्षेत यश मिळावे यासाठी झटून अभ्यास करण्या ऐवजी कोणा ज्योतिषाने सुचवलेली भाकड पोथी (ती ही एखाद्या गर्दुल्या, गांजेकस, मतीमंदाची)  वाचण्यात मौल्यवान वेळ वाया घालावणारे कित्येक तरुण मी पाहीले आहेत.

मी २००८ साली TCS नध्ये असताना एका जागेसाठी उमेदवारांचे इंटरव्हू घेत होतो, एक उमेदवार आत आला आणि आत येताना त्याने ह्ळूच चार अक्षता माझ्या केबिन मध्ये भिरकावलया . याला म्हणतात ‘तोडगा’ ! अर्थात त्या उमेदवारच्या दुर्दैवाने मी ते बघितले , माझ्या ज्योतिषाचा अभ्यास असल्याने त्याने  नोकरी मिळावी म्हणून कोणा ज्योतिषाने सुचवलेला ‘तोडगा’ केलाय हे माझ्या लक्षात आले. त्या उमेदवाराला व्यवस्थित फैलावर घेतल्यावर तो कबूल झाला. मी त्या उमेदवाराला चक्क हाकलून दिले , मी त्याला म्हणालो “सांग तुझ्या त्या पंतांना , तोडगा फेल गेला म्हणावे , आता तरी हा उपाय तोडग्याचा बाजार बंद करा ” (बाजार अजून चालूच आहे ही गोष्ट वेगळी !)

डॉ.कर्णीकांनी रमेशवर मानसोपचार केला , समस्या सुटली असे सर्वांनाच वाटले अगदी रमेशला सुद्धा पण शेवटी काय झाले ? समस्या जैसे थे उलट त्याची तिव्रता मात्र वाढून बसली!

आज असेच होते आहे, या उपाय-तोडग्यांच्या ‘इंस्टंट मसाल्याच्या’ नादात मुळ समस्या काय , ती कशी उद्भवली याचा कोणताच विचार होत नाही. या भ्रामक उपाय तोडग्यांच्या नादात व्यक्ती काही प्रयत्नच करत नाही ,  हे उपाय-तोडगे काही ज्योतिषांना श्रीमंत करत असतील पण ज्यांना हे उपाय तोडगे सुचवले जातात ते मात्र मानसिक दृष्ट्या कायमचे लुळे पांगळे होऊन  रमेश सारखे कान धरुन बसतात .. ‘गुँ ss गुँ’

समाप्त

शुभं भवतु

 

Similar Posts

4 Comments

  1. सुहासजी,

    लेख आवडला. परंतु काही प्रश्न आहेत ते असे:
    १. ज्योतिषाचे मूळ हे कर्माधिष्टीत सिद्धांतावर अवलंबून आहे (cause and effect). जर एखाद्या कर्माचे फळ हे मिळण्याआधी एखाद्या दुसऱ्या कर्माने आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता का कमी करता येऊ नये? तसेच जर ज्योतिष हे भविष्यातील घटनांची फक्त संभाव्यता दर्शवते तर ती संभाव्यता बदलता का येऊ नये?
    २. जर क्रियमाण कर्माची तीव्रता कमी असेल तर काही गोष्टींद्वारे (जसे कि प्रयत्न किंवा तत्सम उपाय) कर्मफळात बदल घडवता येणे का शक्य असू नये?
    ३. आपल्याकडे रत्नांचा उपयोग ज्योतिषामद्ये पुरातन काळापासून केला गेलेला आहे. रत्नांच्या वापरातून कर्मफळाची तीव्रता कमी करता येऊ शकते हे देखील सांगितले आहे. मग तो तोडगाच नाही का?
    हे खरे कि सध्याच्या काळात त्याचा प्रचंड गैरवापर होत आहे तेही ज्योतिषांकडूनच…परंतु त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास रत्नाचा तोडगा म्हणून वापर का करता येऊ नये?
    ४. तोडगे हे फक्त मानसिक समाधान देतात तर ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात (कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागणे, किंवा ज्या गोष्टींचे परिणाम आपल्या हातात नाहीत जसे कि जवळच्या व्यक्तीचे अपघातातून वाचणे etc) त्या गोष्टी घडून आल्यास त्या तोडग्याद्वारा नसाव्यात हे कशावरून?

    कृपया मार्गदर्शन करा.

    1. श्री. सुरेशजी,

      अभिप्रया बद्दल धन्यवाद.

      आपण लिहले आहे:

      “१. ज्योतिषाचे मूळ हे कर्माधिष्टीत सिद्धांतावर अवलंबून आहे (cause and effect). जर एखाद्या कर्माचे फळ हे मिळण्याआधी एखाद्या दुसऱ्या कर्माने आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता का कमी करता येऊ नये? तसेच जर ज्योतिष हे भविष्यातील घटनांची फक्त संभाव्यता दर्शवते तर ती संभाव्यता बदलता का येऊ नये?
      २. जर क्रियमाण कर्माची तीव्रता कमी असेल तर काही गोष्टींद्वारे (जसे कि प्रयत्न किंवा तत्सम उपाय) कर्मफळात बदल घडवता येणे का शक्य असू नये?”

      माझे उत्तर:

      ‘ज्योतिषाचे मूळ हे कर्माधिष्टीत सिद्धांतावर अवलंबून आहे ..” हा मुद्दा बरोबरच आहे इथे ‘कर्म ‘ आणि ‘चांगले कर्म’ यातला फरक समजाऊन घेणे महत्वाचे आहे! कर्माचे समीकरण बरेच लोक समजतात (किंवा त्यांचा तसा समज करुन दिला जातो) तितके सरळ सोपे बेरीज वजाबाकी सारखे नाही. हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय / प्रांत आहे.

      आपण वर मुद्दा क्रमांक १ मध्ये ‘दुसर्‍या कर्माने ’ असा उल्लेख स्वत:च केला आहे. ‘दुसरे कर्म ‘ म्हणजे ‘खडा वापरणे’ , (मतीमंद . गांजेकस महाराजाची) पोथी वाचणे ‘. ‘जप करणे’, ‘गणपतीला लाल फुल वाहणे ‘. ‘वाहत्या पाण्यात पिठाचे गोळे सोडणे’. ‘मुंग्यांना साखर घालणे’ ‘घुबडाचे पीस तिजोरीत ठेवणे’. ‘पिंपळाला प्रदक्षिणा घालणे’ ‘अक्षता भिरकावणे’, ‘शाबुदाण्याची खिचडी चापत उपास करणे’, यातले काहीही नाही हे लक्षात घ्या.

      कारण वर लिहलेली (आणि अशी अनेक कर्मे जी उपाय तोडग्यात केली जातात) ही स्वकेंद्रीत , मोहमय , फक्त स्वत:चाच विचार करुन , फक्त स्वत:च्याच लाभाची अपेक्षा ठेवून केलेली कर्मे आहेत. त्यात स्वार्थ आहेत , ही असली कर्मे फलिताच्या दृष्टीने कुचकामी आहेत.

      आता कोणतेही कर्म केले , कसलेही कर्म केले की त्याचे फळ निर्माण होतेच त्या प्रमाणे या असल्या कर्मांचीही फळे निर्माण होणारच, पण त्या फळांचा दर्जा अतिसामान्य असतो त्याच्या तुम्ही म्हणता तसा ‘आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता कमी करणे’ या कामासाठी काडीचाही उपयोग होणार नाही, कदापीही नाही! मी दिवसभर मजुरी केली ह्या कर्माचे फळ म्हणून मला ३०० उपये मिळाले, आता या ३०० रुपयात मी डाल-चावल (किंवा एखादी ‘चपटी’ !) खरेदी करु शकेन पण ३० लाखाची मर्सीडीस कार विकत घेऊ शकणार नाही हे नक्की. ‘उपाय तोडग्या’ माध्यमातून केलेली कर्मे अशीच फुटकळ, चिल्लर , चण्या फुटाण्या सारखी फळें निर्माण करतील , तुमची पापे धुवुन काढायची , भविष्य बद्लायची कोणतीही ताकद त्यात नाही.

      आयुष्यात कोणतेही चांगले काम केले नाही, सतत खोटे बोलत राहीला आज अचानक एका ज्योतिषाने सांगीतलेला तोडगा केला झाला देव प्रसन्न असे कसे होईल? असल्या फालतुगिरीला गंडायला देव काही अलिबाग हून आलेला नाही ! ए.टी. एम. मधुन पैसे मिळायला आधी खात्यात पैसे असावे लागतात, भाऊ ! हे उपाय तोडगे इतके फालतू असतात की या असल्या टीचभर लाचे ने देवच काय देवा घरचे कुत्रे देखिल तुमच्या वर भाळणार नाही (पु .ल. देशपांडें च्या रावसाहेबांचे वाक्य जरासे बदलून!) .

      जर ‘आधीचे कर्मफळ किंवा कर्मफळाची तीव्रता का कमी करणे’ हा हेतु असेल तर करावी लागणारी कर्मे वेगळी आहेत. अर्थात ही कर्मे तुमचे मुळ फळ कधीही नष्ट करु शकणार नाहीत ही बाब वेगळी . ह्या चांगल्या कर्मांची ठळक गुण विषेष म्हणजे:

      १>कोणत्याही फळाची अपेक्षा न धरणे , म्हणजेच ‘मी हे अमुक करतो आहे त्याचा मला तमुक लाभ व्हावा / काम व्हावे / संकट टळावे’ अशी अपेक्षा न धरता , कोणताही संकल्प न सोडता केलेले कर्म. (संकल्प सोडणे म्हणजे परमेश्वराशी ‘डील ‘ करणे आहे किंवा चक्क परमेश्वराला ‘लाच’ दिल्या सारखे आहे !

      केवळ ‘गणपती पुढे २१ दिवस दालचिनी चा तुकडा ठेवला की गणपती प्रसन्न ! अरे काय हे ? गणपती काय इतका ‘चीप – स्वस्त’ आहे की त्याने दालचिनीच्या २१ तुकड्यांचा बदल्यात ‘तहसील दार कचेरी / आरटीओ’ मधली ‘खाबुगिरीची – मलईदार’ नोकरी तुमच्या झोळीत टाकायची ? अरे काही लाखांत रेट चाललाय सध्या, लोक स्वत:चा दोन एकर जमीनीचा तुकडा विकतात ही असली नोकरी मिळवण्यासाठी! म्हणुनच मी म्हणतो, परमेश्वराला जरुर वंदन करा पण ते करताना ‘ मला सुखी ठेव; असे देखील म्हणू नका ! मुळात तुमची निर्मीतीच जर परमेश्वराने केली असेल तर तुमचे काय करायचे हे त्यालाच ठरवू दे ना! आपले काम कसे करायचे हे परमेश्वराला चांगले ठाऊक आहे , म्हणूनच तो परमेश्वर आहे , खरे ना?

      २> ज्या कर्मात फक्त स्वत:चाच विचार न करता दुसर्‍याचा विचार जास्त किंबहुना स्वत:ला विसरुन फक्त दुसर्‍याच्याच विचार केलेले कर्म. या मध्ये रुग्ण सेवा करणे, अनाथ मुले / अपंग / वद्ध व्यक्ती यांना मदत करणे. प्राणी मात्रांवर दया करणे / मदत करणे.

      ३> आत्मिक शक्ती वाढवणारी कर्मे ज्यात : खरे बोलणे, दुसर्‍या बद्दल वाईट न बोलणे / न चिंतणे, सतत सकारात्मक विचार करणे, सात्विक भाषा , सात्विक आहार

      ४> कुरकर न करता , नशिबाला दोष न देता , दुसर्‍याला दोष न देता, आपली ध्येय धोरण आखून त्या दिशेने सतत प्रयत्न करत राहणे

      आता जे ‘उपाय –तोडगे ’ म्हणून जे सुचवले जाते ते कोणतेही कृत्य , कर्म असले तरी तरी ते वरील चार (आणखीही काही ) निकष पूर्ण करत नाहीत हे इथे लक्षात घ्या, त्यामुळे या असल्या उपाय तोडग्यांनी काहीही साध्य होणार नाही, अशक्य ते शक्य होणार नाही, जे आडात नाही ते पोहोर्‍यात येणार नाही.

      मी लिहले आहे त्याप्रकारची चांगली कर्मे केली तरीही मुळ ‘प्राकत्न किंवा ढाँचा’ बदलता येणे शक्य नसते , वन रुम किचन फ्लॅट चा आलिशान बंगला तर सोडाच साधा टू बिएच के फ्लॅट सुद्धा करता येणार नाही!

      मी वर लिहली आहेत त्या प्रकाराची चांगली कृत्ये काही प्रमाणात ( फक्त काही प्रमाणातच!) मदत करु शकतात , ही मदत:

      १)फळांची तिव्रता कमी करणे
      २)फळे मिळायाचा / भोगायचा कालवधी आपल्याला अनुकूल असा मागे –पुढे करुन घेणे
      ३)अगदी अपवादात्मक स्थितीत या जन्मात मिळणारी फळे पुढच्या जन्मात ढकलणे

      अशी असू शकते , पण त्यासाठी मी सांगीतल्या प्रमाणे फक्त चांगली कर्मेच फळाची अपेक्षा न धरताच केली पाहीजेत.

      इथे परत हे लक्षात घ्या , ही ‘चांगली कृत्ये’ देखिल आडात नसलेले पोहोर्‍यात आणून देत नाहीत ! ‘तहशीलदार कचेरीतली ‘ नोकरी नशिबातच नसेल तर ही चांगली कृत्ये करुन सुद्धा ती नोकरी मिळणार नाही !!

      भगवान श्रीकृष्णांनी ‘कर्मेणेंवाधि कारस्ते..” असे जे गीतेत सांगीतले आहे त्याचे मर्म हेच तर आहे. आपले कर्म करत राहा , काय फळ द्यायचे, कसे द्यायचे , केव्हा द्यायचे ते मी (परमेश्वर) ठरवेन , शनीला तेल वाहणे ‘ ,’ नक्षत्र शांती करणे’, ‘कुठलीतरी भाकड पोथी वाचणे’ (वेडगळ, मतीमंद, गांजेकस महाराजाची तर अजिबात नाही) ह्या असल्या कर्मांनी देव प्रसन्न होणार नाही. ही कर्मे वाईट नसली तरी फुसकी आहेत , भाकड आहेत , दुध न देणारे रेडे आहेत! त्यांनी काहीही साध्य होणार नाही हे पण लक्षात घ्या.

      आपण लिहले आहे:

      “आपल्याकडे रत्नांचा उपयोग ज्योतिषामद्ये पुरातन काळापासून केला गेलेला आहे. रत्नांच्या वापरातून कर्मफळाची तीव्रता कमी करता येऊ शकते हे देखील सांगितले आहे. मग तो तोडगाच नाही का? हे खरे कि सध्याच्या काळात त्याचा प्रचंड गैरवापर होत आहे तेही ज्योतिषांकडूनच…परंतु त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास रत्नाचा तोडगा म्हणून वापर का करता येऊ नये?”

      माझे उत्तर:

      हा आपला गैरसमज आहे , रत्नांचा उल्लेख आहे पण प्राचिन काळापासुनचा नाही. दुसरे म्हणजे पोथीत लिहलेले सगळेच बरोबर / खरे हा पण गैरसमजच आहे. मुळ जुन्या पोथ्या शुद्ध स्वरुपात उपलब्ध नाहीत, जे काही आहे ते अत्यंत भ्रष्ट (करप्ट) आहे , कोणीही उठावे काहीही भाकड रचावे आणि पोथी पुराणात घुसडून द्यावे (नारदमुनी म्हणाले अशी सुरवात केली की झाले! नाहीतर सगळ्याची सोय करायला कैलासा वर सारीपाट खेळणारे शंकर – पार्वती आहेतच !). जर पोथीत लिहल्या प्रमाणेच जायचे तर मुलींची लग्ने वयाच्या सात-आठ वर्षाच्या आत (रजोदर्शन सुरु व्हायच्या आत) व्हायला पाहीजेत ना? केवळ मतलबा साठी जुन्या पोथ्यांतल्या एखाद्या त्रोटक उल्लेखाचा कशाशीही बादरायण संबंध जोडणे चुकीचे आहे.

      संकटांनी / निराशेने ग्रासलेल्या व्यक्तीला थोडी मानसिक उभारी मिळावी म्हणून काही उपाय तोडगे सुचवावेत अशी कल्पना लोकांच्या मनात येऊ लागली, साध्या साध्या उपायांवर लोकांचा विश्वास बसणार नाही म्हणून काहीतरी दुर्मिळ , इंग्रजीत ज्याला ‘एक्सोटीक’ म्हणतात असे इलेमेंट त्यात असावे म्हणुन रत्ने सुचवायला सुरवात केली असावी (काही जणांनी ह्या ऐवजी स्मशान, प्रेत, रक्त, हाडे, बाहुल्या, कवड्या, टाचण्या खुपसलेली , पिंजर मारलेली लिंबे, माकडाची वार, बाळंतिणीचा केस पासुन ते पशुबळीं, नरबळी असाही मार्ग निवडला..जोडीला शाबरी मंत्र आणि चामुंडा माता आहेच !). महागडे खडे परवडत नाहीत म्हणून मग ‘उपरत्ने’ सुचवायला सुरवात झाली , ‘उपरत्ने’ पण महाग म्हणून आता चक्क मशीन वर पॉलीश केलेले गारेचे तुकडे ! (उत्पादन खर्च २५ रुपयांहून ही कमी मात्र विक्री किंमत रुपये २००० पासुन ते कितीही – डिपेंडस ऑन द कॅच ऑफ द डे !, दोन -पाच रुपयांची सुद्धा नसलेली प्लॅस्टीकची पिरॅमीड नामक टोपली चक्क ५०० रुपये ! )

      इथे हे लक्षात घ्या , रत्नांचा आपल्या प्रभाव पडतो हा गैरसमज आहे. रत्नांतून कोणतेही शुभ किरण निघत नाहीत’, रत्न हा एखाद्या दिव्या सारखा प्रकाशाचा सोर्स नाही त्यातले किरण आपले भाग्य पालटवू शकेल, रत्नात कोणतेही औषधी गुणधर्म नाहीत जे तुमचा रोग (मानसीक ?) बरा करु शकेल. रत्न/ खडा त्याच्या वर पडणारा सुर्य प्रकाश काही प्रमाणात ‘रिफ्रॅक्ट ‘ करुन बाहेर सोडते (याला भौतिक शास्त्रात ‘रिफ्रॅक्शन ऑफ लाईट’ म्हणतात) , पण या रिफ्रॅक्टेड लाईट चा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. मुळात असे प्रकाशाचे ‘रिफ्रॅक्शन’ प्रभावी असायाला (लेझर सारखा इफेक्ट मिळायला !) मुळात तो खडा तांत्रिक (ऑप्टीकल जिओमेट्री) दृष्ट्या निर्दोष असावा लागेल, त्याचा आकार किमान एका कोंबडीच्या अंड्या एव्हढा (गेला बाजार , एखाद्या आवळ्या इतका तरी) असायला हवा, असे रत्न / खडा मिळणे कमालीचे दुर्मिळ असते आणि त्याची किंमत लाखो / करोडों मध्ये जाईल. हजार – बाराशेचा खडा (हॅ हॅ हॅ … ४००० रुपयाचा पुष्कराज!) हे असले काहीही साध्य करुन देणार नाही! मुळात इथे पहीले प्रिंसीपल कायमच लक्षात ठेवायचे ‘आडात असेल तरच पोहोर्‍यात येणार’ त्यामुळे प्राकत्नातच नसेल तर एक खडाच काय खड्याची माळ घालून बसले तरी काहीही होणार नाही (पैसे मात्र बरबाद होतील हा भाग वेगळा)

      आपण लिहले आहे:

      “तोडगे हे फक्त मानसिक समाधान देतात तर ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात (कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागणे, किंवा ज्या गोष्टींचे परिणाम आपल्या हातात नाहीत जसे कि जवळच्या व्यक्तीचे अपघातातून वाचणे etc) त्या गोष्टी घडून आल्यास त्या तोडग्याद्वारा नसाव्यात हे कशावरून?”

      माझे उत्तर:

      इथे मी उलट प्रश्न विचारतो ‘तोडगा केला म्हणून केस जिंकली ‘ हे सिद्ध करुन दाखवता येईल का? जो पर्यंत हे तुम्ही निर्विवाद पणे सिद्ध करुन दाखवत नाही तो पर्यंत यावर कोणताच प्रतिवाद करता येणार नाही , उपाय तोडगे करुनही केस हरल्याची अनेक उदाहरणे मी देऊ शकतो त्याचे काय? मी उपाय तोडगे केल्याने दुसर्‍याला लाभ होतो ही तर कमालीची हास्यास्पद वेडगळ कल्पना आहे , मी औषध घेऊन दुसर्‍याचा आजार कसा बरा होईल? मी जमा केलेले पुण्य दुसर्‍याच्या खात्यावर जमा करायचे असे कोणतेही नेट बँकिंग आस्तीत्वात नाही. दुसर्‍याच्या वतीने जप करा (संकल्प सोडून बरे का!) इ. सुचना म्हणजे हातचे गिर्‍हाईल निसटून जाऊ नये म्हणून शोधलेली केविलवाणी पळवाट आहे. ‘ती व्यक्ती समोर नसली तरी हरकत नाही आपण तिच्या फोटो वरुन नारळ उतरवून टाकू’ … अरे हाय काय आन नाय काय ! हा शोध कोणी लावला असेल ? ज्या जुन्या पोथ्यांचे दाखले देतात त्या पोथ्या जेव्हा रचल्या / लिहल्या गेल्या त्यावेळी फोटोग्राफी आस्तीत्वतच नव्हती!

      मग याला लाभ झाला, त्याला पडताळा आला त्याचे काय ? असा युक्तिवाद केला जातो त्याला एकच उत्तर आहे ‘बोला फुलाला गाठ पडली’!

      कळावे

      सुहास गोखले

Leave a Reply to सुहास गोखले Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *